Thursday, March 1, 2018

रोजगाराच्या शोधात चाणक्य

संबंधित इमेज

चार वर्षापुर्वी राजकीय प्रकाशझोतात आलेला प्रशांत किशोर आज माध्यमे व राजकीय अभ्यासक विसरून गेले आहेत. वर्षभरापुर्वी त्याचे नाव गाजत होते, ते उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणूकीतला कॉग्रेसचा चाणक्य म्हणून! त्यापुर्वी त्याने बिहारमध्ये मोदीलाट थोपवून दाखवली, म्हणून त्याचे कोडकौतुकही चालले होते. त्यानंतरच पंजाबच्या विधानसभा निवडणूकांसाठी कॉग्रेसनेते अमरिंदर सिंग यांनी त्याची मदत मागितली आणि राजकीय निवडणूकांचा व्यवसायच उभारला असल्याने प्रशांत किशोरने ती ऑफ़र स्विकारली होती. मध्यंतरी राहुल गांधींना उत्तरप्रदेश स्वबळावर जिंकण्याची सुरसुरी आली आणि त्यांनी पंजाबसोबत उत्तरप्रदेश कॉग्रेसचे घोंगडेही त्याच्याच गळ्यात घातले. ते देशातील मोठे राज्य असल्याने प्रशांतला खुप आधी आरंभ करून जमवाजमव करावी लागली होती. पण राहुलचे काम स्विकारणे यातला धोका त्याला वेळीच ओळखता आला नाही. परिणामी त्याने कमावलेली प्रतिष्ठा मातीमोल करून घेतली. कारण उत्तरप्रदेशात कॉग्रेसची धुळधाण उडाली आणि प्रशांतची पत दिवाळखोरीत गेली. पण त्या अपयशाखाली त्याने मिळवलेले पंजाबचे यश झाकले गेले होते. मात्र ते लहान राज्य असल्याने त्याचा कुठे गाजावाजा झाला नाही आणि सगळे श्रेय अमरिंदर सिंग व अकालींच्या नाकर्तेपणाला जाऊन प्रशांत किशोरचा कुठेही उल्लेखही आला नाही. पण उत्तरप्रदेशातील अपयशाने मात्र प्रशांतच्या नावाला काळीमा फ़ासला गेला. आजकाल हा २०१४ चा चाणक्य काय करतो, तेही कोणाच्या चर्चेत नाही. पण हाती आलेल्या बातमीनुसार तो आंध्रातील विधानसभेसाठी जगमोहन रेड्डी याच्या पक्षासाठी रणनिती आखत आहे आणि २०१९ सालच्या लोकसभेसाठी कॉग्रेस वा भाजपाची सुपारी मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहे. त्यापैकी कॉग्रेसचे काम त्याला मिळायचे गतवर्षीच नक्की झाले होते. पण उत्तरप्रदेशच्या निकालांनी तो विश्जय मागे पडला.

२०१७ च्या उत्तरप्रदेश विधानसभेसाठी प्रशांतने वर्षभर आधीपासून माहिती जमवली व रणनिती आखली होती. पण तिथे त्याला मोदी वा नितीश यांच्याशी काम करायचे नव्हते, तर राहुल गांधींशी गाठ होती. त्याचे प्रशांतला भान राहिले नाही. म्हणूनच ते काम ही त्याच्यासाठी आत्महत्या ठरली. त्याने अभ्यासपुर्वक कॉग्रेससाठी रणनिती आखलेली होती. त्यात ब्राह्मण नेता मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करावा आणि त्यातही राहुल वा प्रियंकाला चेहरा म्हणून पुढे आणावे, असा आग्रह होता. तात्काळ ती मागणी फ़ेटाळली गेली. कारण प्रशांतच्या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रामध्ये भले त्याचा लाभ कॉग्रेसला झाला असता. पण नेहरू गांधी घराण्यात फ़क्त पंतप्रधानच जन्माला येत असतात, ही बाब प्रशांतने लक्षात घेतली नव्हती. सहाजिकच त्याची मागणी फ़ेटाळली गेली आणि अखेरच्या काही महिन्यात त्याला नव्याने रणनिती आखावी लागलेली होती. त्यात तडजोड म्हणून दिल्लीच्या अनुभवी वयोवृद्ध माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांना ब्राह्मण चेहरा म्हणून पुढे करण्यात आले. पण त्याचा फ़ारसा उपयोग नव्हता. कारण राहुल म्हणजे मोदी वा नितीश नव्हेत, याचे स्मरण राहिले नव्हते. त्यांच्याइतका राहुल हा मुरलेला अनुभवी राजकीय नेता नव्हता. त्यामुळेच चायपे चर्चा प्रमाणे योजलेल्या खाटपे चर्चा उपक्रमाचा पुरता बोजवारा उडाला. लोक गर्दी करायचे ते खाटा पळवून न्यायला आणि बाकी प्रचाराचे दिवाळे वाजलेले होते. अखेरीस त्या संकटातून कॉग्रेसला बाहेर काढण्यासाठी प्रशांतने समाजवादी पक्षाशी आघाडी करण्याचा प्रस्ताव आणून चाचपणी केली. तर स्थानिक कॉग्रेस नेत्यांनी त्याला चांगलेच फ़ैलावर घेतले. त्यात महिना गेला आणि अखेरीस ती आघाडी मान्य होईपर्यंत कालापव्यय झाला. आघाडी झाली तरी जागावाटपाचा बोर्‍या वाजलेला होता. थोडक्यात प्रशांतने नेहमीइतकी रणनिती छान बनवली होती. पण राहुलनी आपल्या पद्धतीत त्याचे दिवाळे वाजवून दाखवले.

अशा रितीने तीन वर्षात तीन भिन्न राजकीय नेते व पक्षांना मोठे नेत्रदिपक यश मिळवून देणार्‍या प्रशांत किशोरची पत राहुलने उत्तरप्रदेश निवडणूकीत संपवून दिली. त्या मतमोजणीचे निकाल लागत असताना मतचाचणीचे एक म्होरके यशवंत देशमुख यांनी मारलेला ताशेरा आठवतो. प्रशांत किशोर हा मोदींनीच कॉग्रेस व राहुलच्या गोटात सोडलेला दगाबाज हस्तक होता काय? हा अतिरेक होता. कारण मोदी व भाजपाला उत्तरप्रदेशात यश मिळण्यासाठी प्रशांत किशोर आपल्या प्रतिष्ठेला मातीमोल करून घेण्याची अजिबात शक्यता नव्हती. लोकसभेत दारूण पराभव पत्करलेल्या कॉग्रेसमध्ये शहाण्यांचे बोल ऐकण्याचा संयम आला असेल, अशी त्याची अपेक्षा असावी. पण ती राहुलनी खोटी पाडली आणि अखिलेश यादवसह प्रशांत किशोरलाही दिवाळखोर व्हायची पाळी राहुलनी आणली. त्यानंतर वर्षभर कुठे प्रशांत किशोरचे नाव आले नव्हते की चर्चाही झाली नव्हती. त्याच्याच कर्तबगारीने पंजाबात अमरिंदर सिंग मोठे यश व सत्ता मिळवू शकले, तरी त्याचा उल्लेख कोणी कुठे केला नाही. प्रशांत आता त्या धक्क्यातून सावरला आहे आणि नव्याने आगामी निवडणुकांसाठी तयारी करू लागला आहे. त्यात आंध्रप्रदेशातील जगमोहन रेड्डी याच्या वायएसआर कॉग्रेस पक्षासाठी रणनिती बनवण्याचे काम त्याने हाती घेतले आहे. पण ती निवडणूक लोकसभेसोबत आणखी वर्षभराने व्हायची असल्याने त्यापुर्वीच देशव्यापी निवडणूकीचे कंत्राट मिळवण्याच्या विचारात प्रशांत आहे. त्यात कॉग्रेस वा भाजपा यापैकी कोणीतरी एका पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकावी, असा त्याचा प्रयास आहे. मात्र तशा कुठल्याही हालचाली अजून सुरू झालेल्या नाहीत. प्रामुख्याने इशान्येकडील विधानसभांचे निकाल व कर्नाटक विधानसभा पुर्ण झाल्यावरच लोकसभेचे वेध लागणार आहेत. तोपर्यंत प्रशांतला प्रतिक्षा करण्याखेरीज पर्याय नाही.

अर्थात आता त्याला नुसती निवडणूक कुठल्या तरी पक्षाला जिंकून देण्यापुरते आव्हान उरलेले नाही. उत्तरप्रदेश व राहुलमुळे गमावलेली प्रतिष्ठा नव्याने मिळवावी लागणार आहे. आपल्या नव्या तंत्राची जादू कायम असल्याचे त्याला पुन्हा एकदा सिद्ध करावे लागणार आहे. त्यात राहुलप्रमाणे योजलेली रणनिती उधळून लावणारा क्लायंट उपयोगाचा नाही, तर प्रत्येक बारीकसारीक सुचनांचे पालन करणारा ग्राहक प्रशांतला हवा आहे. सहाजिकच जिंकण्याची शक्यता असलेला आणि शिस्तीचा भोक्ता असा क्लायंट प्रशांतला मिळवणे भाग आहे. तो देशव्यापी पक्ष हवा असेल, तर कॉग्रेस व भाजपा हेच दोन पर्याय आहेत. त्यात राहुल नको असेल, तर मोदी एवढाच पर्याय शिल्लक उरतो. तशा बाजारगप्पाही सुरू झाल्या आहेत. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोदी-प्रशांत यांच्यात संपर्क असल्याचे बोलले जाते. पण प्रशांतच्या गोटातून तसे काही नसल्याचे सांगितले जाते. मात्र दोन्ही पक्षांचा व नेत्यांचा प्रशांतशी संपर्क असल्याचेही तेच लोक सांगतात. म्हणजेच प्रशांतच्या गोटातून त्याचा पुर्ण इन्कार झालेला नाही. त्यामुळे आता २०१९ च्या लोकसभेचे संबंधित लोकांना वेध लागले हे मान्यच करावे लागेल. मात्र त्यासाठी आतापासून तयारी सुरू झालेली नसली तरी कर्नाटक विधानसभेचे निकाल दोन्ही देशव्यापी पक्षांना आपापल्या लोकप्रियतेचे प्राथमिक अंदाज देतील. त्यानंतरच कोणता चाणक्य मदतीला घ्यावा वा कोणता चाणक्य नाकारावा, त्याचा निर्णय या पक्षांना करता येईल. तोपर्यंत प्रशांत सारख्या निवडणूक जाणत्याला रोजगाराच्या शोधात फ़िरत रहाणे भाग आहे. उत्तरप्रदेशात त्याने राहुलच्या नादी लागण्याची तीच किंमत आहे. त्याने तिथे राहुल व कॉग्रेसला काही अटी आधीच घातल्या असत्या, तर त्याची कमावलेली प्रतिष्ठा अशी मातीमोल झाली नसती, की आज त्याला राजकीय ग्राहक शोधण्याची नामुष्की आली नसती.

No comments:

Post a Comment