(त्या वादग्रस्त चित्रमालिकेतील हे एक छायाचित्र)
गेले दोनतीन दिवस सोशल मीडिया व अन्य इंटरनेट माध्यमातून माहितीची चोरी करून मतदानाला प्रभावित करणार्या भानगडी चव्हाट्यावर येत आहेत. त्यात जी नावे घेतली जात आहेत, त्यातले एक नाव चक्रावून टाकणारे आहे. कुठल्याही माध्यमवीर वा जाणत्या पत्रकाराला त्या नावाने चकीत कसे केले नाही, याचेच नवल वाटते. ते नाव आहे के. सी. त्यागी. ज्या केंब्रीज अनालेटिका कंपनीच्या नवाने शंख चालू आहे, तिच्या भारतीय उपकंपनीचा कर्ताकरविता अमरीश त्यागी, हा त्याच केसींचा सुपुत्र असल्याचे ऐकल्यावर खुप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. किंबहूना वेगळ्या क्षेत्रात जाऊन केसींच्या सुपुत्राने आपल्या पित्याचा वारसा कायम राखला, याची जाणिव झाली. गुजरात निवडणूकीच्या आधी या चिरंजीवांनी वा त्यांच्या परदेशी कंपनीने सोशल माध्यमातील सामान्य मतदाराची माहिती चोरून मतदान प्रभावित केल्याचा आरोप आहे. त्याचा गवगवा झाल्यापासून अमरीश बेपत्ता असून, तो पित्याच्याच दिल्लीतील सरकारी निवासस्थानी दडी मारून बसल्याचे सांगितले जात आहे. त्यात तथ्य असेल तर केसींना आपल्या पुत्राचा अभिमानच वाटेल. कारण आज अमरीशने जे काही पराक्रम आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केले आहेत, तितक्या सुविधा नसतानाच्या काळात चाळीस वर्षापुर्वी, पित्यानेही काही पराक्रम करीत भारतीय राजकारणाला कलाटणी दिलेली होती. तेव्हा आजच्यासारखे डिजिटल कॅमेरे व कॅमेराची सुविधा असलेले स्मार्टफ़ोन नव्हते. साधा फ़ोटोही काढताना कसरती कराव्या लागत होत्या. त्या काळात केसींनी एका मोठ्या राजकीय नेत्याच्या सुपुत्राचे प्रणयराधनाचे फ़ोटो टिपले होते आणि त्यामुळे जनता पक्षीय राजकारणाला विचित्र कलाटणी मिळून गेलेली होती. बाबू जगजीवन राम यांच्या राजकीय जीवनाचा अस्त त्यातूनच झालेला होता. मग तुलनेने अमरीश पित्याचीच गादी चालावित नाही काय?
१९७७ सालात देशात मोठी राजकीय क्रांती मतपेटीने घडवलेली होती. तेव्हा आणिबाणी उठली आणि चार पक्षांनी एकत्र येऊन मतविभागणी टाळण्यासाठी जनता पक्षाची स्थापना केलेली होती. त्यात आणिबाणीचा प्रस्ताव संसदेत मांडणारे बाबू जगजीवनरामही सहभागी झालेले होते. त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत होती. मात्र त्याच जनता पक्षाचे तितकेच खंबीर दावेदार चौधरी चरणसिंग यांचा बाबुजींना कडवा विरोध होता, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले आणि दुसर्या क्रमांकाची लढाई चरण सिंग व बाबुजी यांच्यात जुंपलेली होती. त्यात अनेक समाजवादी नेतेही बाबुजींच्या समर्थनाला उभे ठाकलेले होते. प्रसंगी मोरारजींना बाजूला व्हावे लागले, तर बाबुंजींचा नंबर लागण्याची शक्यता असल्याने त्यांना राजकीय जीवनातूनच उठवण्याचा कट रचला गेला होता. तो चरणसिंग यांनी नव्हेतर त्यांचे हनुमंत संकटमोचक मानले जाणारे राजनारायण यांनी शिजवला असल्याचे तेव्हा कुजबुजले जात होते. त्या बुजूर्ग लोहियावादी नेत्याचे निकटवर्ति कमांडो अशी ज्यांची ओळख होती, त्यापैकी एक के. सी. त्यागी होते. ओमपाल सिंग व एपी सिंग असे आणखी दोघे त्यात होते. नेताजी राजनारायण यांच्या इशार्यावर या तिघा कमांडोंनी एक जबरदस्त सर्जिकल स्ट्राईक बाबू जगजीवन राम यांच्यावर केलेला होता. त्यात बाबुजींचे लाडके पुत्र व माजी लोकसभापती मीराकुमार यांचे बंधू सुरेश कुमार असे काही फ़सले, की पित्याच्या राजकीय कारकिर्दीचा पुरता बोर्याच वाजला. सुरेश कुमार यांची एका महिलेशी शरीर संबंध करतानाची आक्षेपार्ह छायाचित्रे, या तिघा कमांडोंनी मिळवली होती आणि ती इंदिरा गांधींची सून चालवित असलेल्या ‘सूर्या इंडिया’ नावाच्या मासिकात प्रसिद्ध झालेली होती. त्याचा इतका गाजावाजा झाला, की बाबुजींना तोंड दाखवायला जागा राहिलेली नव्हती. त्या गौप्यस्फ़ोटाचा मानकरी म्हणून केसी त्यागी प्रथम जगासमोर आलेले होते.
अर्थात हे पाप आपण केले, असे त्यांनी कधी स्वत: कबुल केले नाही की सांगितले नाही. तशी वदंता होती आणि कुठलाही पुरावा समोर नव्हता. त्या काळात आजच्या सारखे अत्याधुनिक कॅमेरे नव्हते. पण जिथे ही छायाचित्रे टिपली गेली, ती जागा चौधरी चरणसिंग यांचा मतदारसंघ वा बालेकिल्ला होता. बागपत या शहरातील एका अत्यंत सुंदर महिलेशी सुरेश यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे कथानक त्यातून जगासमोर आणले गेले होते. तसे काही खरोखर संबंध होते की चित्रणापुरता लावलेला तो एक सापळा होता आणि त्यात सुरेश कुमार फ़सले; त्याचा खुलासा कधीच होऊ शकला नाही. पोलोराईड तंत्राचा कॅमेरा त्यासाठी वापरला गेला होता. जिथल्या तिथे टिपलेल्या दृष्य़ाची प्रत देणारा हा कॅमेरा, नेमकी व स्वच्छ छायाचित्रे देऊ शकत नव्हता. पण चेहरे ओळखता येण्य़ाइतकी स्पष्टता त्यात असायची. असे करून जगजीवन राम यांना संपवण्याच्या त्या कारस्थानाचे मुळ सुत्रधार प्रख्यात लेखक संपादक खुशवंत सिंग होते, अशीही वदंता होती. कारण तेव्हा ते कॉग्रेसप्रणि्त गांधी खानदानाच्या मालकीच्या नॅशनल हेराल्ड दैनिकाचे संपादक होते. शिवाय मनेका गांधींनी चालविलेल्या सूर्या इंडीया मासिकाचे संपादकीय सल्लागारही होते. त्याच मासिकात सुरेश कुमार यांची ही वादग्रस्त छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती आणि मग इतर माध्यमातून त्याचा गदारोळ झालेला होता. कोणीतरी या छायाचित्रांचे पाकिट सूर्या इंडियाच्या पत्रपेटीत आणून टाकल्याचा खुलासा त्या मासिकाने केला. परंतु लौकरच त्यामागचे सुत्रधार शोधण्याची मोहिम सुरू झाली व त्यातले छायाचित्रकार म्हणून जी तीन नावे समोर आली, त्यात केसी त्यागी हे एक नाव होते. तेव्हा ते कोवळ्या वयातील तरूण होते आणि असे काही धाडसी व आक्रमक करण्याची खुमखुमी त्यांच्यात होती. पण जे काही घडले त्यानंतर बाबु जगजीवनराम राजकारणातून जवळपास अस्तंगत झाले.
पुढल्या काळात केसी त्यागी यांची ही पार्श्वभूमी बहुधा सगळे माध्यमवीर विसरून गेले असावेत. किंवा नव्या पिढीतल्या आविष्कार स्वातंत्र्यविर वा स्टींगवीरांनाही आपला जनक मूळपुरूष माहिती नसावा. आजकाल बहुतेक वाहिन्यांवर केसी त्यागी जदयु या नितीशकुमारच्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून प्रतिक्रीया देत असतात, किंवा चर्चांमधून सहभागी होत असतात. पण त्यांचा हा इतिहास कोणी सांगत नाही की त्यांना विचारला जात नाही. चाळीस वर्षापुर्वीचा हा इतिहास अडगळीत धुळ खात पडलेला असावा. आता त्याच केसींचा पुत्र अमरीश याने जो घोटाळा केला म्हटले जात आहे, त्यात पुन्हा कॉग्रेस कनेक्शन आहे आणि पित्याच्याही स्टींग कॅमेराशी कॉग्रेस कनेक्शन होते. हा योगायोग असेल किंवा त्यागी खानदानात तो वंश परंपरागत गुण आलेला असावा. दोन दिवस हे प्रकरण गाजत असताना पत्रकार जदयु नेत्याचा पुत्रचा त्यात गुंतालाय म्हणत होते. जेव्हा त्यागींचा उल्लेख आला, तेव्हा हा जुना इतिहास जसाच्या तसा आठवला. अमरीश याने वेगळ्या प्रकारे उद्योग केला असेल, पण राजकीय वादळ उठवणारे काम केलेले आहे. त्याविषयी पिताजी त्यागी यांचे म्हणणे काय आहे, त्याचा खुलासा अजून समोर आलेला नाही. सांगायचा मुद्दा इतकाच, की भारतीय राजकारणात अशी कारस्थाने व उचापती नव्या नाहीत. त्याचा उपयोग सढळ हस्ते प्रत्येक काळात होत राहिला आहे. साधने व सुविधा कमीअधिक झालेल्या असतील. अलिकडे असले उद्योग कुठल्याही वाहिन्या व पत्रकार छुप्या व आधुनिक कॅमेराने करीतच असतात. त्यात माहितीची चोरी हा इतका वादग्रस्त विषय होण्याचे कारण नाही. सलग बारा वर्षे मोदींच्या विरोधात खोटेनाटे आरोप जनमानसाच्या माथी मारण्याचा उद्योग सर्वच वाहिन्या व माध्यमांनीही राजरोस केला आहे. पण खोटेपण उघड झाल्यावरही कधी माफ़ी मागितलेली नाही. मग बिचारे त्यागी वा त्यांच्या पुत्राला सुळावर चढवण्याचे काय कारण?
भाऊ तुमच्या अफाट स्मरणशक्तीला सलाम✍✍✍✍
ReplyDeleteAccept my salute also.
DeleteElection Meddling and influencing च्या संदर्भात, KGB विषयी चा हा इंटरेस्टिंग लेख सापडला
ReplyDeletehttps://swarajyamag.com/politics/long-before-cambridge-analytica-there-was-kgb?utm_source=one-signal