Wednesday, March 21, 2018

अगतिक मुंबईकर

Image result for mumbai rail roko dadar

सोमवारी भल्या सकाळी रेल्वेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने मुंबईला ओलिस धरायला लोहमार्गावर एकत्र आले. देशाच्या कानाकोपर्‍यातून हे हजारो प्रशिक्षणार्थी मुंबईत जमा झालेले होते आणि त्यांनी दादर-माटुंगा अशा लोहमार्गावर ठाण मांडून मध्यरेल्वेची संपुर्ण वाहतुक कोलमडून टाकली. भल्या सकाळी दूर कल्याण कर्जत कसारा येथून आपल्या कामधंद्यासाठी दक्षिण मुंबईच्या दिशेने येणार्‍या लाखो मुंबईकरांची त्यामुळे तारांबळ उडाली. मुद्दा त्यांची अशी तारांबळ उडण्याचा नाही, किंवा एकूणच मुंबईला आपल्या समस्येसाठी ओलिस ठेवणार्‍या प्रशिक्षणार्थींचाही नाही. देशात अशा प्रकारची आंदोलने अधूनमधून कुठल्याही प्रांतात व राज्यात होतच असतात. मुंबईत होण्याचे वेगळेपण इथल्या नागरी व भौगोलिक रचनेमध्ये सामावलेले आहे. प्रशिक्षणार्थी देशभरातील होते, तर त्यांनी मुंबईला ओलिस कशाला ठेवावे? बिहार वा बंगाल तामिळनाडूपासून आलेले हे हजारो प्रशिक्षणार्थी मुंबईकराला का ओलिस ठेवतात? तर इथे काही करणे शक्य आहे आणि इथे केल्यास त्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाऊ शकेल, अशी त्यामागची मानसिकता आहे. त्यांच्या बाबतीत अन्याय झाला व त्यांनी दाद मागण्यात काही चुक नाही. पण त्यात मुंबईकर भरडला जातो, त्याच्या अधिकार, हक्क व न्यायाचे काय? ज्या मुलांच्या परिक्षा होत्या, त्यांनी काय गुन्हा केला होता? असे काही घडले, मग त्याचे सरकारच्या वा प्रशासनाच्या माथी खापर फ़ोडणे ही सुद्धा आता फ़ॅशन झाली आहे. जणु कोणालाही खर्‍या प्रश्नाला हात घालायची इच्छा नाही, की ते सत्य बोलण्याची भिती वाटत असावी. म्हणूनच ते सत्य बोलायचे नाही, हा जणू अलिखीत नियम झाला आहे. समस्या मुंबईची नसून मुंबईच एक देशव्यापी समस्या झालेली आहे. किंबहूना मुंबई हीच राष्ट्रीय समस्या बनवण्यात आलेली आहे. सहाजिकच समस्येतच जीवन शोधणार्‍यांनी समस्येविषयी तक्रार करण्यात अर्थ नसतो.

कुठल्याही व्यक्तीची हत्या करताना दुबळी नाजूक जागा शोधून हल्ला केला जातो. गळा कापून वा छातीत भोसकून गोळ्या घालून खुन पाडला जातो. कारण माणसाचे जीवन त्याच वळणावर अतिशय नाजूक असते. गळा कापला, मग श्वासनलिका तुटते आणि रक्तस्त्राव होऊन माणूस झटपट मारला जाउ शकतो. छातीत गोळ्या झाडल्या वा भोसकले, मग हृदय फ़ुफ़्फ़ूसाला छेद जाऊनही माणूस तात्काळ मरतो. म्हणून तर चिलखत अशाच जागी वापरले जात असते. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिच्या नाड्या आवळल्या, म्हणजे देशालाही कासाविस करून टाकता येते. म्हणून कसाब वा दाऊद मुंबईला आपले लक्ष्य बनवत असतात. परंतु ते तर देशाचे शत्रू आहेत. बाकी जे कोणी देशाचे राष्ट्रवादी नागरिक वा नेते आहेत, त्यांना मुंबईविषयी किती आस्था आहे? ही देशाची आर्थिक राजधानी घुसमटली किंवा तिचा गळा कापला गेला तर काय व्हायचे, असे कुणा देशप्रेमी भारतीयाला वाटते काय? कारण मुंबई हेच भारताचे धडकणारे हृदय आहे आणि तोच भारतीय आर्थिक व्यवस्थेचा गळा सुद्धा आहे. परवा मुठभर प्रशिक्षणार्थींनी तोच गळा थोडा काळ आवळला. कसाबने त्याच मुंबईचे नाक दाबले होते. त्यांना हे शक्य झाले, कारण त्या मुंबईला आपणच सर्वांनी नाजुक करून टाकलेले आहे. या मुलांच्या मनात कुठलीही दहशत माजवण्याची इच्छा नव्हती, हे कोणीही सांगू शकेल. पण त्यांच्या कृतीमुळे मुंबईचे प्राण तात्काळ कंठी आले होते. कुणालाही सुगावा लागू न देता या मुलांनी किती नेमकी जागा निवडली व अवघ्या मुंबईला ओलिस ठेवले ना? त्यांनी माटुंगा दादर यामधला दिडदोन किलोमिटर्स लांबीचा लोहमार्ग आपल्या आंदोलनासाठी निवडलेला असला, तरी तो मार्ग इतका नाजूक वा वर्मावर बोट ठेवण्याइतका प्राणघातक त्या मुलांनी बनवलेला नाही. ज्यांच्यापाशी मुंबईचे नियंत्रण व अधिकार आहेत, तेच त्यातले दोषी आहेत.

मागल्या अर्धशतकात मुंबईची लोकसंख्या सतत वाढती ठेवण्यातून अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत. १९६० च्या दशकात मुंबईवरचा भार उठवण्यासाठी खाडीच्या पलिकडे नवी मुंबई वसवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला गेला. त्याला आज नवी मुंबई म्हणून ओळखले जाते. पण ती नवी मुंबई आहे की नवे ठाणे वा नविन बोरिवली आहे, असा प्रश्न पडतो. त्याला मुळातच जुळी मुंबई वा जुळे शहर अशी कल्पना घेऊन विकसित करायचे ठरले होते. पण त्यालाही मुंबईवरच विसंबून राखताना मुंबईचे विकेंद्रीकरण करायचे कोणालाही स्मरण राहिले नाही. आजही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या कारस्थानाचा आरोप होतच असतो. पण विकेंद्रीत मुंबई झाली असती, तर मुंबई तोडण्याची भितीच कशाला भेडसावू शकली असती? पनवेल, विरार-पालघर वा कर्जत कसार्‍यापासून लाखो लोक दक्षिण मुंबईतच सकाळी यावे, अशी काय गरज आहे? अनेक बड्या कंपन्या वा त्यांची व्यावसायिक कार्यालये यामुळे दक्षिण मुंबईत लाखो लोकांना यायला भाग पडते. प्रशासनाची वा महत्वाची कार्यालये मुंबई बेटाच्या बाहेर हलवली गेली असती, तर तशी नौबत आली असती का? मध्यरेल्वे वा अन्य उपनगरीय रेल्वे व तसे महामार्ग हे मुंबईत लोंढा आणतात आणि मग संध्याकाळी तोच लोंढा माघारी फ़िरत असतो. मोक्याच्या क्षणी त्याच्या नाजुक वळणावर कोंडी केली, तर हजारो माणसांना कुठलीही गोळी झाडल्याशिवाय यमसदनी पाठवणे शक्य आहे. कारण या लाखो लोकांना घराबाहेर काढून तासभरासाठी नाजुक वळणावर आणून ठेवण्याचीच योजना मागल्या अर्धशतकात अविरत राबवली गेली आहे. त्यातून मुंबईत अशी पंधरावीस तरी नाजुक वळणे व जागा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्या कुणा जिहादी अतिरेक्याने वा त्या प्रशिक्षणार्थींनी उभ्या केल्या नाहीत. त्याला नियोजनकार व व्यवस्थापन कारभारी जबाबदार आहेत.

ओलिस ठेवण्यास योग्य अशी मुंबईची रचना व विस्तार ज्यांनी केला, तेच त्यातले जबाबदार लोक आहेत. पुर्वी बालवाचनासाठी ज्या मनोरंजक गोष्टी असायच्या, त्यात मोठ्या भयंकर राक्षसाचा जीव म्हणून कुठल्या तरी पिंजर्‍यात बंदिस्त असलेल्या पोपट वा पक्षामध्ये ठेवलेला असायचा. त्या पोपटाच गळा आवळला, तरी राक्षसाचे प्राण घुटमळू लागायचे आणि त्याला सहज मारता यायचे. तशी मुंबई आता एका पिंजर्‍यातल्या पक्षात ठेवलेला देशाचा जीव बनला आहे. किंबहूना बनवला गेला आहे. देशाचा सर्वाधिक पैसा वा उलाढाल मुंबईतून होते आणि म्हणून कोणीही अवघ्या देशाला ओलिस ठेवण्यासाठी मुंबई नावाच्या पिंजर्‍यात वास्तव्य करणार्‍या मुंबईकर नामे पक्षाचा गळा आवळू लागतो. तसे केले मग दिल्लीत व देशभर सत्ता गाजवणार्‍या महाकाय सत्तेचा जाग येते. तिचा जीव घुसमटू लागतो, हे समिकरण झाले आहे. पण तशी मुंबईची नाजुक अवस्था कोणी केली, तेच खरे गुन्हेगार आहेत. देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई शहराला देशातील सर्वात अगतिक महानगर करून टाकले आहे. ते पाप ज्यांचे आहे, तेच मग मुंबईकरांच्या अशा घुसमटीचे खरे गुन्हेगार असतात. सात लहान बेटांच्या समुहाला जोडून बनवलेल्या एका मोठ्या बेटावर किती लोक वास्तव्य करू शकतात आणि तिथली नागरी व्यवस्था किती भार सोसू शकते; याचे भान सुटलेल्यांच्या हाती व्यवस्था गेल्यावर यापेक्षा अधिक दुरावस्था काय होईल? सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कापून सगळीच अंडी फ़ाटाफ़ट मिळवू बघणार्‍यांची गोष्ट यातून खरी वाटू लागते. मग त्या कोंबडीला आपण सोन्याचे अंडे देतो, त्याविषयी अभिमान वाटण्यापेक्ष तो अभिशाप वाटू लागतो. आज मुंबईची तशी दुर्दशा झालेली आहे. कोणीही केव्हाही यावे, उठावे अणि मुंबईचा गळा आवळून कोणालाही धमक्या द्याव्यात, इतकी मुंबई अनाथ वा अगतिक होऊन गेलेली आहे. कारण राखणदारच गारदी झाले आहेत.

5 comments:

  1. भाऊ,राज ठाकरे यांच्या ताज्या भाषणाबद्दल आपला लेखाची वाट बघतोय.

    ReplyDelete
  2. what you have written is correct, it is possible to decentralise this place by asking private companies to shift their offices and GOVT also should do the same thing but the question is "WHO WILL BAIL THE CAT" and again LOCAL AAP will start shouting "MUMBAI LA VILAG KARYACHE KARSTHAN"

    ReplyDelete
  3. भाऊ राज ठाकरे यांच्या वर लेखाची वाट पाहतो आहे

    ReplyDelete
  4. भाऊ या सगळ्या गोंधळात तिथे रशिया मध्ये पुतीन पुन्हा निवडून आले आहेत. त्या बद्दल काहीतरी लिहावं हि विनंती. त्याचे भारतावर होणारे परिणाम आणि दक्षिण आशिया आणि मध्यं पूर्वेत होणारे बदल आणि परिणाम.

    ReplyDelete
  5. भाऊ, लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा आणि अल्पसंख्यांक दर्जा देन्याबद्दल आपल्या लेखाची वाट पहात आहे.

    ReplyDelete