Wednesday, May 1, 2019

प्रतिस्पर्धी असावा राहुल सारखा

Image result for opinion poll 2019 neerja chaudhary

मंगळवारी मतदानाची तिसरी फ़ेरी चालू असताना ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीवर नीरजा चौधरी यांच्याकडून यावेळी पहिल्यांदाच undercurrent हा शब्द कानी पडला. आपण अनेक राज्यात कसे फ़िरलो व लोकमत कसे आहे, हे सांगताना त्यांनी मोदींना बहूमत मिळेल असे अजिबात सांगितले नाही. पण आजही मोदींची लोकप्रियता कितीशी कायम आहे, त्याचा हवाला देत २३ मे रोजी निकाल थक्क करणारे लागल्यास स्वत:साठी पळवाट काढून ठेवलेली आहे. मागल्या चार महिन्यापासून लोकसभेत मोदी कसे बहूमत गमावतीला आणि एनडीएलाही बहूमतापासून वंचित रहावे लागेल; त्यावर प्रवचन करणार्‍या याही एक विदुषी आहेत. किरकोळ काही विश्लेषक चाचणीकर्ते सोडल्यास कोणीही मनापासून भाजपा वा एनडीएला बहूमत द्यायला राजी नव्हता. पण मतदानाची पहिली फ़ेरी होण्यापुर्वी ओपिनियन पोल आवरायची वेळ आल्यावर हळुहळू एक एक विश्लेषक मोदींचे पारडे जड असल्याची कबुली देऊ लागला. एकदोन पोलकर्त्यांनी एनडीएला बहूमताच्या जवळही आणून ठेवले. त्यातच या नीरजा चौधरींचा समावेश होतो. पण आता त्यांना अंडरकरंट जाणवला आहे. भूमीगत असलेला हा प्रवाह जाणवण्यासाठी पाय जमिनीवर हवेत आणि चौधरी यांचे पाय जमिनीला लागत असल्याचा हा संकेत आहे. पण त्याच चर्चेत त्यांनी मांडलेला एक मुद्दा मला भावला. जिथे त्या फ़िरल्या, तिथे सामान्य ग्रामिण आदिवासी मतदाराला राफ़ायल ही काय भानगड आहे तेच ठाऊक नसल्याची त्यांनी कबुली दिली. तसेच प्रत्येकाच्या खात्यात ७२ हजार भरण्याविषयी लोक अनभिज्ञ असल्याचे सांगून त्यांनी कॉग्रेसच्या चुकीच्या अजेंड्याचीही कबुली दिली. थोडक्यात सतराव्या लोकसभेचा अजेंडा पुन्हा राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या हाती कसा सोपवला; त्याचीच ही कबुली होती. राहुल व त्यांच्यामागे धावत सुटलेल्यांनी निवडणूक मोदींना आंदण दिल्याची ही जाहिर कबुली म्हणता येईल.

लोकशाहीत निवडणूक हीच सर्वात मोठी निर्णायक लढाई असते आणि लढाईत मैदान आपल्या सोयीचे असण्यालाही निर्णायक महत्व असते. इथे लढाईचे मैदान म्हणजे कुठले मुद्दे घेऊन लोकांनी मतदान करावे आणि कुठल्या विषयावर आपण विरोधकांना लढवावे; याला प्राधान्य असते. पाच वर्षात अच्छे दिन आले का? रोजगाराच्या आघाडीवर मोदी किती आश्वासने पुर्ण करू शकले? गरीबांसाठी मोदी सरकारने काय केले? शेतकर्‍यांची दुर्दशा किती कमी झाली? असले मुद्दे ५ वर्षे कारभार केलेल्या पक्षासाठी अडचणीचे असतात. म्हणूनच विरोधक वा राहुल गांधींनी तिथेच मोदी व भाजपाला कोंडीत पकडण्याचे डावपेच आखायला हवे होते. तसे अनेकदा हे मुद्दे पुढे आणले गेलेले आहेत. उलट याच विषयावर आपल्याला उत्तरे देणे कठीण असल्याची पुर्ण जाणिव मोदी व त्यांच्या सहकार्‍यांना होती व आहे. म्हणूनच त्यांनी सातत्याने राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, हिंदूत्व अशाही विषयांना फ़ोडणी दिलेली होती. पण त्याला झाकोळून विरोधकांनी सामान्य जनजीवनाशी निगडित विषयांवरच आपले हल्ले केंद्रित केले असते, तर अधिक अटीतटीची लढत होऊ शकली असती. अगदी सर्व पक्षांची आघाडी वा जागावाटप होऊ शकले नसले, तरी भाजपासाठी निवडणूक बिलकुल सोपी राहिली नसती. पण मोदींना रोखायचे कुठे व कोणत्या विषयावर; याच बाबतीत विरोधकांचा गोंधळ राहिलेला होता. सहाजिकच जसजशी निवडणूक जवळ येत गेली, तसतसे विरोधकांत मोदी गोंधळ माजवित गेले. ऐन पहिल्या फ़ेरीचे मतदान संपत असताना भोपाळ येथून मालेगाव खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना देण्यात आलेली उमेदवारी सुद्धा अशीच एक खेळी म्हणता येईल. त्यावरून विरोधकांनी इतके काहूर माजवण्याची गरज नव्हती. कारण यापुर्वी अशा अनेक निवडणूका झाल्या आहेत आणि असे वादग्रस्त उमेदवार त्यात लढले व जिंकलेलेही आहेत. मग आताच त्यावर काहूर कशाला माजवायचे?

खलिस्तानी दहशतवाद ऐन जोशात असताना सिमरनसिंग मान हा सेवेतला पोलिस वरीष्ठ अधिकारी खलिस्तानी झाला आणि नंतर त्याने पंजाबातून लोकसभा लढवली होती. फ़ुलनदेवी या डाकू महिलेलाही समाजवादी पक्षाने उमेदवारी दिलेली होती. पण असा उमेदवार टाकला की उतावळे विरोधक त्याच सापळ्यात अडकून हिंदूत्व किंवा हिंदू दहशतवादाचे काहूर माजवतील आणि अनायसे पुन्हा हिंदूत्वाचा मुद्दा ऐरणीवर आणतील, याची मोदी-शहांना खात्री होती. आपल्या तोंडाने हिंदूत्वासाठी मते मागायची माहित आणि विरोधकांच्या गदारोळ काहूर माजवण्यातून हिंदूत्वाचा प्रक्षोभ आयता उफ़ाळून आणायचा; असा मोदींचा डाव नाही, असे कोणी छातीठोकपणे सांगू शकणार आहे काय? साध्वीला उमेदवारी देऊन नेमका तोच डाव टाकला गेला आणि विरोधकांनी नुसत्या नावाच्या घोषणेतूनच आकांडतांडव सुरू केले. थोडक्यात त्यातून राहुल गांधींनी देशातल्या शेकडो देवळांना भेटी देऊन आपणही हिंदू असल्याचे मांडलेल्या प्रदर्शनावर पाणी ओतले गेले. विरोधकांच्या चोंबड्या प्रतिक्रीया व आरोप यातून आपोआप हिंदूत्वाचा मुद्दा ऐरणीवर आणला गेला. त्यात भाजपा साध्वीच्या बाजूने तर बाकी तमाम सेक्युलर पुरोगाम्यांना साध्वीच्या विरोधात बोलण्याची जणू सक्तीच करण्यात आली. कारण इथे विषय साध्वी या व्यक्तीचा नसून तमाम हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचा जो बालीशपणा वा कारस्थान कॉग्रेसने युपीएच्या काळात शिजवले व राबवले होते, त्या जखमेवरची खपली काढली गेली. मागल्या निवडणूकांमध्ये त्याचीच किंमत कॉग्रेसने मोजलेली होती. पण आज ती खपली भाजपाने काढली असे आज कोणी म्हणू शकत नाही,. त्याचे खापर कॉग्रेस व विरोधकांवरच फ़ुटते. पण दरम्यान हिंदूत्व हा विषय पुन्हा ऐरणीवर आणला गेला आणि भाजपालाच त्याचा लाभ मिळू शकतो. किंबहूना त्याचा तोटा विरोधकांना होऊ शकतो. मग त्यांनी थोडा संयम दाखवण्याने काय बिघडले असते?

साध्वीला उभे केले, मग तिची भिती मुस्लिम मतांना घालण्याचा मोह कॉग्रेसवाले किंवा पुरोगाम्यांना आवरणार नाही, हेच तर मोदी-शहांचे गणित होते व आहे. त्यामध्ये आपले नुकसान होणार नाही, याचे भान विरोधकांनी राखायला हवे होते. सहाजिकच भाजपाने साध्वीला आणुन आपला हिंदूत्वाचा अजेंडा कायम असल्याचे संकेत दिलेले होते आणि उतावळेपणातून विरोधकांनी आपण आजही हिंदूंचे धार्मिक शत्रू असल्याची कबुली देऊन टाकली आहे. कारण साध्वीच्या विरोधात बोलताना हिंदू संघटना वा हिंदू समाजाच्या भावनांना दुखावण्याला पर्याय उरत नाही. जेव्हा अशा विषयांचा भडका उडतो, तेव्हा आपोआप जगण्यातले महत्वाचे ज्वलंत मुद्दे बाजूला पडत जातात. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, आर्थिक परिस्थिती, विकास वगैरे मुद्दे दुय्यम होऊन जातात. मात्र इथे कामाची विभागणी झालेली आहे. मोदी विकासावर बोलतात व पाच वर्षे केलेल्या कामावर बोलतात. उलट विरोधक साध्वी किंवा हिंदूत्वाच्या छुप्या अजेंड्यावर बोलू लागतात. परिणामी त्यांचा मोदी विरोधातला अजेंडाही नरेंद्र मोदीच ठरवतात ना? विरोधकांचा हा उतावळेपणा कमी म्हणून की काय, राहुल गांधी चौकीदार चोर ही घोषणा हट्टी मुलासारखी धरून बसलेले आहेत. त्यांना जोशात आल्यावर कसलेही भान उरत नाही. म्हणून तर राफ़ायलच्या फ़ेरसुनावणी प्रकरणात काही कागदपत्रांच्या बाबतीत झालेल्या निर्णयाचे विकृतीकरण करून राहुलनी सुप्रिम कोर्टामध्ये माफ़ीनामा लिहून देण्याची पाळी आणली. आपण निकाल वा कोर्टाचा आदेश न वाचता वा समजूनही न घेता बडबडून गेलो, हा राहुलचा खुलासा त्यांच्या पोरकटपणाचा दाखलाच झालेला आहे. जो माणुस सुप्रिम कोर्टाच्या आदेश व निकालाविषयी इतका गाफ़ील बरळतो, तो अन्य बाबतीत किती जबाबदारीने विधाने करीत असेल? मग त्यांच्या प्रत्येक शब्द, विधान वा घोषणांविषयी लोकांच्या मनात त्यांच्याच प्रतिज्ञापत्राने शंका निर्माण केलेली नाही काय?

आज हा माणुस म्हणतो, निकाल वाचला नसताना व समजला नसताना आपण उत्तेजित होऊन काही बोललो. उद्या म्हणेल निवडणूक प्रचाराच्या जोशात होतो, त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात ७२ हजार रुपये म्हरण्याचे आश्वासन दिलेले होते. ७२ हजार रुपये म्हणजे किती आणि पाच कोटी खात्यात प्रत्येकी तितकी रक्कम म्हणजे एकूण किती कोटी होतात, तेही बोलताना आपल्याला ठाऊक नव्हते; असाही खुलासा निकालानंतर राहुल गांधी करू शकतील. राफ़ायल व चौकीदार चोर है, असल्या घोषणांनी राहुल एखाद्या लहान बालकासारखे उत्तेजित झालेले आहेत. त्यामुळे कुठे काय बोलतोय, त्याचे भान त्यांना उरलेले नाही. पण तोच डाव उलटल्यावर त्यांनी कोर्टामध्ये दिलेला खुलासा आणखी घातक आहे. हा माणूस कायदा वा योजना याविषयी किती बेजबाबदार आहे, त्याची ती कबुली आहे. काही समजून घेण्याची इच्छा त्याच्यापाशी नाही, पण कुठल्याही बाबतीत मनात येईल ते बरळण्याकडे त्याचा कल असल्याचे त्यातून सिद्ध झालेले आहे. साध्या निवडणूक प्रचारात हा इतका बेभान होत असेल, तर देशाचा कारभार हाकताना तो किती सावध संयमी राहिल; याचीच कुणाच्याही मनात शंका येणार ना? राफ़ायलने सुरू झालेला राहुल गांधींचा प्रवास ७२ हजार रुपये रकमेपर्यंत पोहोचताना इतका भरकटत गेला आहे, की आपण पंतप्रधान वा देशाचा नेता व्हायला किती नालायक आहोत, त्याचेच दाखले त्यांनी निर्माण करून ठेवलेले आहेत. त्याच बालिशपणाचा लाभ उठवित मोदींनी धुर्तपणे आपला अजेंडा राहुलच्या व पर्यायाने विरोधकांच्या गळ्यात घातला आहे. पुलवामा, बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक अशा विषयांवर विरोधकांनी अकारण बडबड करून मोदींचे हात बळकट करून टाकलेच. पण मोदींना हवा असलेला निवडणूकीचा अजेंडाही स्विकारून टाकला. परिणामी कॉग्रेस वा विरोधकांचा सहानुभूतीने विचार होऊ शकला असता, असे मुद्दे कुठल्या कुठे फ़ेकले गेले आहेत.

मागल्या दिडदोन वर्षापासून विरोधकांनी मोदींना खोटारडे ठरवण्याचा विषय लावून धरलेला होता. आज काय स्थिती आहे? मोदींना खोटे ठरवण्याच्या लढाईतला सेनापती सुप्रिम कोर्टाला आपण खोटेपणा केल्याचे लेखी लिहून देतो आहे. मुळात ही वेळ कशामुळे आली? राफ़ायलमध्ये नसलेला भ्रष्टाचार सिद्ध करण्याचा हव्यास नडलेला आहे. कुठलेही सरकार कितीही चांगला कारभार करीत असले, तरी त्याच्यामुळे सर्व जनता कधीच समाधानी नसते. असे लहानसहान वाटणारे नाराज घटक आणि वर्ग गोळा करून त्यांच्या नाराजीचा वणवा बनवण्याला विरोधी पक्षाचे डावपेच मानले जाते. त्यामुळे मोदी सरकारच्या कारकिर्दीत शेतकर्‍यांच्या आत्महत्या किंवा ग्रामिण भागातील अस्वस्थता, निराशा वा बेरोजगारी असल्या विषयांना विरोधकांनी प्राधान्य दिले असते, तर मोदींना ही निवडणूक नक्कीच सोपी राहिली नसती. कारण अशा नाराजीचे समाधानकारक उत्तर त्यांनाही देता आले नसते. त्याच्या उलट खोटे आरोप करून मोदींचे काम सोपे करण्याचे कष्ट राहुल गांधींनी घेतले. त्या संबंधात चर्चात भाग घेऊन अन्य विरोधकांनी राहुलच्या बिनबुडाच्या आरोपांना वजन देताना प्रत्यक्षात मोदींसाठी काम आणखी सोपे करून ठेवले. राहुलचे आरोप बिनबुडाचे होते आणि त्याची पाठराखण करण्यातून कॉग्रेस नेते प्रवक्त्यांची सुटका नव्हती. पण अन्य विरोधी पक्षांवर राहुलच्या पाठराखणीची सक्ती नव्हती. त्यांनी राहुलना पोरकट ठरवून मोदींच्या त्रुटी व चुकांवर लक्ष केंद्रीत केले असते, तर विरोधकांना राहुल वा कॉग्रेसपेक्षा आपली प्रतिमा वेगळी राखता आली असती. मोदींसह भाजपाला सरसकट विरोधक वा महागठबंधन म्हणून टिकेच्या तोफ़ा डागणे शक्य राहिले नसते. पण सगळे विरोधक मोदी द्वेषाच्या आहारी जाऊन राहुलच्या हातचे खेळणे होऊन गेले आणि राहुलनी सुप्रिम कोर्टाच्या एका निर्णयाशी पोरखेळ करून सर्व विरोधकांची माती करून टाकली आहे.

मोदींना खोटे पाडण्याच्या या शर्यतीमध्ये विरोधक व खुद्द राहुल गांधीच आपल्या खोटेपणाची कबुली देण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे मोदींचे काम सोपे झाले आहेच. पण मोदींना पुन्हा लोकसभा जिंकण्यासाठी हवा असलेला अजेंडाही ठामपणे समोर आणता आला आहे. सुरक्षा, पुलवामा, बालाकोट वा एअरस्ट्राईक असे विषय मोदींना हवे होते आणि विरोधकांनी त्यावर काहूर माजवले नसते, तर मोदींना इतक्या सहजपणे ते विषय पटावर आणता आले नसते. ग्रामिण भागातील नाराजी किंवा शेतकरी आत्महत्या, शेतीची दुर्दशा असल्या भडीमाराला उत्तर देताना मोदींची दमछाक झाली असती. पण धुर्तपणे साध्वी प्रज्ञासिंग यांना उमेदवारी देऊन पुन्हा मोदींनी विरोधकांना आपल्या मैदानात आणलेले आहे. सेक्युलर वा मोदी विरोधक हिंदूविरोधी असल्याची समजूत निर्माण करायला त्यांचाच हातभार लागतो आहे. थोडक्यात मोदी-शहांना हव्या असलेल्या रणांगणात सतरावी लोकसभा लढवली जात आहे आणि त्यात विरोधकांची पुर्ण दैना उडालेली दिसते आहे. जगातला कुठलाही राष्ट्रीय नेता मोदींच्या नशिबाचा हेवा करीत असेल. कारण त्यांच्या नशिबी राहुल गांधींसारखा कोणी आव्हानवीर किंवा प्रतिस्पर्धी मिळत नसतो. आपल्याला हवा तसा डाव किंवा खेळ करणारा प्रतिस्पर्धी असणे, ही लॉटरी असते आणि राहुलच्या रुपाने मोदींना ती पहिल्या फ़ेरीपासून लागलेली लॉटरी आहे. मागल्या खेपेस पाच वर्षापुर्वी राहुल गांधींनी कॉग्रेस पक्षाचा बोजवारा उडवून दिलेला होता. यावेळी ते अधिक मेहनतीने मोदींच्या विरोधातील अन्य पक्ष व प्रादेशिक पक्षांचा धुव्वा उडवून देण्यासाठी राबत आहेत. निदान निकाल लागल्यानंतर तरी असे बिगर कॉग्रेस पक्ष आपले कुठे काय चुकले, त्याचा विचार करतील अशी अपेक्षा बाळगावी काय? कारण राजकीय लढाईत आपला अजेंडा शत्रूच्या व विरोधकाच्या गळी मारू शकणारा जिंकत असतो. पण हे मोदीत्रस्तांना कोणी कसे समजावून सांगावे?

24 comments:

  1. २०१४ च्या निवडणुकांत पहिली फेरी पडली तेव्हा मतदानात उत्साह खूप आहे असं काही वाटलं नव्हतं. पण त्यानंतर मात्र टक्केवारी वाढतच गेली.

    २०१९ ला मात्र पहिल्या तीन फेज मध्ये झालेले मतदान पाहिले तर ते फेज १ मध्ये ६९.५०%, फेज २ मध्ये ६९.४४% व फेज ३ मध्ये ६८.४०% झालंय. म्हणजे सरासरी ६८% च्या जवळपास टिकून असल्याचे जाणवतंय. तीनही फेजच्या मतदानात फार मोठा बदल दिसत नाहीये.

    ReplyDelete
  2. पण यातून दुसरा एक अर्थ असा निघतोय की, २०१४ साली झालेल्या निवडणूकीची जी सरासरी आहे बरोबर तिथेच या निवडणूकीची सुरवात झालीय. मग याला २०१४ ची निवडणूक पुढे चालू असं समजायचं का? किंवा २०१४ साली जे चालू झालंय, त्यात फारसा बदल करावासा लोकांना वाटत नाहीये? मी तरी असाच थोडासा अर्थ यातून निघतोय असंच समजतोय.

    पण चौथ्या फेरीत बदल घडायला लागलाय असं वाटतंय. चौथ्या फेरीअखेर केरळ, तामिळनाडू, कर्नाटका, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र येथील निवडणुका संपल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.

    म्हणजेच मागच्या निवडणूकीप्रमाणे दक्षिण भारतातील निवडणूक संपली व नंतर हिंदी पट्ट्यांतील मतदान वाढायला लागलं. त्या वेळेस जातपात, हिंदू कार्ड वगैरेला महत्व दिले गेले होते.

    यावेळी तसंच काहीस होताना दिसत आहे. फक्त चौथ्या फेरीतील मध्यप्रदेश व राजस्थान मध्ये हा बदल दिसायला लागला आहे.

    मध्यप्रदेशमध्ये मोठी लाट निर्माण होतेय. भोपाळ त्याचा केंद्र बिंदू असावा की काय असं वाटतंय. साध्वी प्रज्ञासिंह प्रकरण फार मोठी उलथापालथ करणार अशी चिन्हे दिसताहेत. नेहमीप्रमाणे त्यांचे एकच वाक्य संदर्भ सोडून मिडियाने वापरले की काय अशीही शंका यायला लागलीय. असो.मध्यप्रदेशमध्ये चौथ्या फेरीत मतदानाला सुरवात झाली. त्या पहिल्या सहा मतदारसंघात झालेला मतदानाचा उत्साह आश्चर्यचकित करणारा आहे.याचाच परिणाम राजस्थानवर झालेला दिसून येतोय. पण तो परिणाम त्यामानाने कमी असल्याने मी मध्यप्रदेशला लाटेचा केंद्रबिंदू समजतोय.हे सर्व तर्क मी टक्केवारीच्या गणितांवर करतोय. :)असो.

    ReplyDelete
  3. वाह! छान विश्लेषण.

    ReplyDelete
  4. हळूहळू मला अशी शंका यायला लागली आहे की मोदीच राहुलच्या मार्फत आपली व्यूहरचनेवर राबवत नाहीएत ना?

    ReplyDelete
  5. नेहमीप्रमाणे अप्रतिम व अभ्यासपुर्ण विवेचन. गेल्या ८ दिवसात मी तुमचे मार्च व एप्रील मधील सर्व पोस्ट वाचलेत. काही २०१७ मधील पुरोहीतां संबंधीत सुद्धा.
    उद्या मसुद अझर बद्दल काय लिहीणार आहात त्याची वाट बघतोय.

    ReplyDelete
  6. आता तर चीन ने सुद्धा मोदींच्या जिंकण्याला हातभार लावलाय

    ReplyDelete
  7. 👍👍👍👍👍👍👍
    अप्रतिम विश्लेषण

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर विश्लेषण भाऊ.

    ReplyDelete
  9. भाऊ,आज जाणता राजा काय म्हणाले,बारामती मध्ये बीजेपी जिंकली तर व्हिईएम शंका स्पद आहे.साहेबाना बहुतेक सपशेल पराभवाची चाहूल लागली वाटतय.

    ReplyDelete
  10. प्रियंका वाड्रा या देखील राहुल सारख्या बालिश निघाल्या त्यांनी आज धड़धड़ीत कबूल केले की कांग्रेस उत्तरप्रदेश मधे फक्त भाजप ची मते खायला निवडणूक लढ़वत आहे

    ReplyDelete
  11. भाऊ शब्द न शब्द खरा आहे.काँग्रेस संपवायला राहुल जेवढे कष्ट घेत आहेत तेवढे भाजप पण घेत नाहीत. भरीला बहिण प्रियांका आपण राहुल पेक्षा कमी नाही हेच तिच्या वक्तव्यातुन दाखवत आहे, आज पत्रकारांना सांगितले की काँग्रेस ऊमेदवार जिंकण्यासाठी लढत नाहीत तर भाजपची मते खाण्यासाठी निवडणुका लढवत आहेत.काँग्रेस संपवायला अजुन तिने काय करायला हवे? भाजप यावर रान ऊठवुन काँग्रेसची मते आपल्या कडे वळवण्याची खात्री आहे. आत्ता आलेल्या बातमी प्रमाणे अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे व हा मोदींचा व भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय आहे व याचा फायदा मोदी व भाजपला मिळणार ही काळ्या दगडा वरची रेघ आहे. विरोधक व राजकीय विचारवंत
    यांची मात्र पंचाईत होणार आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी येणार हे सर्वांंनी मान्य केले आहे ,भाऊ आपण या विषयावर आपले विचार मांडावे ही विनंती.

    ReplyDelete
  12. भाऊ लेख टाकण्यापूर्वी संपादित करा. बरेच मुद्दे/वाक्य परत परत आल्यामुळे लेख कंटाळवाणा होतोय.

    ReplyDelete
  13. आज शिवसेनेने केलेली बुरखाबंदीची मागणीही अशीच आहे.

    ReplyDelete
  14. महेश लोणेMay 1, 2019 at 12:00 PM

    मोदींना खोटे पाडण्याच्या या शर्यतीमध्ये विरोधक व खुद्द राहुल गांधीच आपल्या खोटेपणाची कबुली देण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. उत्तम विश्लेषण.

    ReplyDelete
  15. याचे श्रेय देखील नेहरूंचेच .

    ReplyDelete
  16. श्री. नरेंद्रभाई मोदी आणि श्री. अमितभाई शहा ही जोडी नुसती राजकारणी नाही तर विरोधकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून त्यांना कसे हाताळायचे , यात ही तरबेज आहे. भारतीय राजकारणाचा हा नवा पैलू आहे.
    तुमच्या या लेखात तुम्ही अतिशय मुद्देसूद विवरण करून हाच मुद्दा सांगीतला आहे. भारतीय राजकारण मोदी व शहा या जोडगोळी मुळे एक वेगळेच वळण घेत आहे....

    ReplyDelete
  17. Bhau you are genius. Perfect analysis of political situation.

    ReplyDelete
  18. प्रतिस्पर्ध्याला आपल्या सोईच्या battlefield मध्ये खेचून आणणे हे विजयाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल ! सदय परिस्थितिचे अचूक विश्लेषण .

    ReplyDelete
  19. भाऊ.. विरोधकांनी योग्य मुद्दे लावून धरले असते तर मोदींची उत्तरे देताना दमछाक झाली असती, असं तुम्ही म्हणताय तर मग काम झालेलं नाही असा अर्थ काढता येईल काय? किंबहुना, तसा अंदाज कोणीही विरोधक या लेखातून काढू शकेल...

    ReplyDelete
  20. After losing badly in 2014, the Congress was perhaps at its lowest point. They had the opportunity to rebuild and restructure their party. However they stuck with RaGa. It was really surprising to see that the people like Capt. Amarinder Singh were not taken onto the center stage. He was someone who turned Punjab around for the Congress. It seems that some heavyweights in the Congress are hell bent on retaining their influence by keeping the Gandhis at centrestage. This is not just hurting the party but democracy as a whole.
    For the time being BJP being a single largest party is good. In fact if they return this year they have a huge opportunity to turn things around as they will have both Lok and Rajya Sabha for a while. That will be their real test. Meanwhile the Congress and others need to learn how to become a more mature opposition party. The BJP is good at being a solid opposition. It's high time the Congress learns that too. It is in the beat interest of the country. And they must learn to respect the mandate. Just cribbing and denouncing any government scheme is childish to say the least. Congress has only done childish stuff in five years. Hope to see some good solid and responsible opposition 2019 onwards.

    ReplyDelete
  21. ५० वर्षाचा बालिश बालक.

    ReplyDelete
  22. Bhau, you are a very senior journalist. It's journalist's responsibility to report things in an unbiased way. I have read many of your blogs, each & every blog praises Narendra Modi and BJP and exposes opposition. You are exposing opposition which is very good. But as an "unbiased" senior reporter, you never expose govt policies or decisions e.g. Lack of transparency in electoral bonds or demonatization. I would like to read your views on govt's decisions.

    ReplyDelete