Saturday, August 3, 2019

वाघ आणि आव्हाड

Image result for wagh awhad

भाजपातील मेगाभरती म्हणजे काही अन्य पक्षातले आमदार नेत्यांना पक्षप्रवेश देण्याचा सोहळा याच आठावड्यात पार पडला. त्यात एक कॉग्रेसचा आमदार होता, तर बाकी सगळी भरती राष्ट्रवादी कॉग्रेसमधून झालेली होती. त्यामुळे त्या मेगाभरतीचे दु:ख त्याच पक्षाला होणेही स्वाभाविक होते. अशा रितीने एका पक्षातून दुसर्‍या पक्षात जेव्हा नेते, लोकप्रतिनिधी जातात; तेव्हा सहसा जुन्या पक्षावर शरसंधानही करतात. पण तसे इथे झाले नाही. नव्याने भाजपात दाखल झालेल्यांनी आपल्या जुन्या पक्षाला वा नेत्यांना नावे ठेवण्याचा उद्योग अजिबात केला नाही. पण त्या पक्षाला काही राजकीय भवितव्यच नसल्याचे सांगत आपल्या पक्षांतराचे समर्थन केले होते. त्यामुळेच जुन्या पक्षातूनही काही विपरीत प्रतिक्रीया येण्याची गरज नव्हती. पण उथळ पाण्याला खळखळाट फ़ार म्हणतात, तेच खरे आहे. पक्षाचे अत्यंत आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणार्‍या आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी निघून गेलेल्यांवर यथेच्छ तोंडसुख घेत्ले. पण असे करताना आपण आपल्याच ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्याचेच दोष सविस्तर मांडत असल्याचे भान त्यांना नेहमीप्रमाणेच राहिले नाही. किंबहूना बेताल बोलण्यासाठीच आव्हाड यांची ख्याती असल्याने, ते ख्यातीला शोभेसेच वागले म्हणावे लागते. अन्यथा पक्षांतर करणार्‍यांवर दोषारोप करताना, त्यांनी त्यांच्याच दाव्याला दुजोरा देण्याचा पराक्रम कशाला केला असता? नव्यांपैकी राष्ट्रवादीची महिला आघाडी संभाळणार्‍या चित्राताई वाघ यांनी पक्षांतराचे जे कारण सांगितले, त्यालाच आव्हाड आपल्या वक्तव्यातून आग्रहपुर्वक दुजोरा देत होते. त्यालाही हरकत नाही. पण त्यातून एक वेगळाच प्रश्न त्यांनी निर्माण करून ठेवला आहे आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार पक्षासाठी नेमके काय करतात, यावरच प्रश्नचिन्ह लावले आहे. मात्र त्याची उथळ माध्यमातून साधी चर्चाही झाली नाही. कोणते आहे ते प्रश्नचिन्ह?

चित्रा वाघ या कोणी आमदार वगैरे नाहीत. त्या नुसत्याच पदाधिकारी होत्या आणि तुलनेने नवख्याही होत्या. पण त्यांच्या पक्षांतराची दखल खुद्द पवारांनीच घेतलेली होती. आयकर, इडी वा तत्सम तपास यंत्रणांचा दबाव आणुन पक्षांतर करायला भाग पाडले जाते, हा पवार साहेबांचा जुनाच आरोप आहे. आताही त्यांनी चित्रा वाघ यांना तशाच पद्धतीने राष्ट्रवादीतून पळवून नेण्यात आल्याचा आरोप केला. तो किती उथळ असावा? कारण तात्काळ चित्राताईंनी त्याचा साफ़ इन्कार केला. पवारांची ज्येष्ठता व त्यांचा सन्मान राखण्यासाठी चित्राताईंनी त्यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला नाही. कारण चित्राताई पतीच्या व्यावसायिक अडचणीमुळे पक्षांतर करीत असल्याचे पवारांनी सांगितले होते. म्हणजेच त्यातून चित्राताईंचे पती कुठल्या तरी व्यावसायिक घोटाळ्यात फ़सले असल्याचा अर्थ निघतो. पण तसे काहीही नसल्याचे व पक्षातील गटबाजीमुळे काम करणेच शक्य नसल्याचे कारण देऊन, पक्षांतर केल्याचा खुलासा चित्राताईंनी केलेला आहे. त्याच्याही पुढे जाऊन अशा गटबाजीने पुढे पक्षाचेच नुकसान होत असल्याचे साहेबांच्या कानी घातल्याचेही चित्राताईंनी सांगितलेले आहे. त्याचा अर्थ काय निघतो? की पवारांना पक्षातल्या गैरप्रकार वा गटबाजीची कल्पना देऊनही ते कुठलाही हस्तक्षेप करीत नाहीत, किंवा दुरुस्ती करीत नाहीत, याचीच ग्वाही दिली गेली ना? त्यामुळे चित्राताई खरे बोलत असतील, तर पक्षामध्ये अध्यक्ष म्हणून साहेबांचे नेमके स्थान काय, असाच प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर चित्राताईंनी दिलेले नाही, किंवा पवार साहेबांनीही दिलेले नाही. पण गमतीची गोष्ट म्हणजे त्याच चित्राताईंवर सरसकट गद्दारीचा आरोप करताना आव्हाड यांनी साहेबांच्या निष्क्रीयतेला मात्र दुजोरा दिलेला आहे. कितीही व कोणीही कसल्या तक्रारी करू देत. पवार साहेब ढिम्म हलत नाहीत, की काही करीत नाहीत; असेच आव्हाड यांनीही एका वाहिनीच्या चर्चेत अगत्याने सांगितले.

या मेगाभरतीतले एक आमदार नव्या मुंबईतील ऐरोलीचे संदीप नाईक आहेत. त्यांचा मतदारसंघ आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला लागूनच आहे. म्हणूनच आव्हाडांनी नाईक व त्यांच्या एकूण कुटुंबावर मनसोक्त शरसंधान करून घेतले. गणेश नाईक व त्यांचे एकूण कुटुंब वगळता नव्या मुंबईत राष्ट्रवादीची वाढ त्यांनी कधी होऊ दिली नाही. गणेश नाईक पालकमंत्री असताना त्यांनी ठाण्यातून पक्षाचा पायाच उखडून टाकण्यासारखे काम केले. असाही आव्हाडांचा आक्षेप होता. मग त्यांनी याविषयी पक्षनेतृत्व किंवा पवार साहेबांचे लक्ष कशाला वेधले नाही? या प्रश्नांचे उत्तर चित्राताईंच्या आक्षेपाला दुजोरा देणारे आहे. आपण नेते व पवार साहेबांचे नाईकांच्या पक्षविरोधी कृती व उचापतींकडे वारंवार लक्ष वेधले. पण उपयोग झाला नाही. कोणीही काही केले नाही की कारवाई झाली नाही, असेच आव्हाड सतत ठामपणे सांगत होते. याचा अर्थच पवार साहेब पक्षातल्या अशा हानीकारक कारवायांना पाशीठी घालत होते, किंवा त्याला प्रोत्साहन देत होते, असाच होतो ना? मग चित्राताई काय वेगळे सांगत आहेत? मग ज्यांनी पक्षांतर केले त्यांचा दोष काय? त्यांना पक्षात कुठला आवाज नव्हता, की त्यांच्या साध्या तक्रारीही कोणी दुर करीत नसेल, तर राष्ट्रवादीत रहायचे कशाला? केवळ पवार साहेब हृदयात आहेत किंवा देवस्थानी आहेत, असे अभिमानाने मिरवणे; एवढ्यासाठीच राजकीय पक्षाचा अध्यक्ष निवडला जात असतो काय? आपले दुय्यम सहकारी वा अनुयायी पक्षाच्या भल्याच्या गोष्टी सांगतात, त्याकडे पाठ फ़िरवण्यासाठीच पक्षाध्यक्ष असतो काय? परस्पर विरोधी गोटात आज बसलेल्या राष्ट्रवादीच्याच या दोन दिग्गज कार्यकत्यांच्या विधानांचा अर्थ कसा लावायचा? कारण ते दोघेही ज्या व्यक्तीला आदरणीय म्हणून अजूनही मानतात, तो पक्षाध्यक्ष म्हणून अजिबात निष्क्रीय वा निरूपयोगी असल्याचीच दोघेही ग्वाही देतात ना? म्हणून प्रश्न निर्माण होतो, की पवारांचे पक्षातील स्थान कोणते व उपयोग काय?

कुठल्याही पक्षाचा वा संघटनेचा सर्वोच्च नेता आपल्या अनुयायी व पाठीराख्यांच्या संघटनेतील समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठीच उच्चपदी बसलेला असतो ना? मग इथे पक्षात राहिलेले व सोडून गेलेले दोघेही एकाच सुरात कुठली तक्रार करीत आहेत? की त्यांचा आदरणिय पक्षाध्यक्ष कितीही तक्रारी केल्या वा सुचना दिल्या, तरी फ़क्त निष्क्रीय रहातो. ही बाब लक्षात घेतली, तर शरद पवार राष्ट्रवादी पक्षासाठी नेमके काय करतात, असा प्रश्न आहे. की कुठल्याही बाबतीत खळबळ माजवणारी विधाने करण्यासाठी त्यांनी अध्यक्षपद आपल्यापाशी राखलेले आहे? बाकी पक्षातल्या कार्यकर्ते नेत्यांनी आपल्या परीने लढावे, निवडणुका जिंकण्यासाठी श्रम घ्यावेत आणि साहेबांनी बसून उचापती कराव्यात, अशी अपेक्षा आहे काय? एका पक्ष संघटनेचा चुथडा सर्वोच्च नेता कशारितीने करू शकतो, त्याचा अनुभव आपल्याला राहुल गांधींनी दोन लोकसभा निवडणूकीतून दिलेला आहे. पण शरद पवार राहुलपेक्षाही अनुभवी राजकारणी आहेत व त्यांनी संघटनेत काम करूनच इथपर्यंत मजल मारलेली आहे. त्यांचे अनुकरण राहुलनी करावे की पवारांनी राहुलच्या पावलावर पाऊल टाकावे? कारण आव्हाड किंवा चित्राताईंच्या शब्दांवर् विश्वास ठेवायचा असेल, तर आजकाल पवार राहुलचे अनुकरण करताना दिसतात. अमरिंदर सिंग सिद्धूविषयी तक्रार करतात, राहुल तिकडे दुर्लक्ष करतात. जयराम रमेश वा जयंती नटराजन राहुल गांधींना येऊ घातलेल्या संकटाचा इशारा देतात. पण राहुल तिकडे दुर्लक्ष करतात. आव्हाड वा चित्राताई तेच काम राष्ट्रवादीमध्ये करतात आणि पवार त्यांच्याकडे ढुंकून पहात नाहीत. मग त्याला राहुलचे अनुकरण नाहीतर काय म्हणायचे? चित्राताई वा आव्हाड यांनी एकप्रकारे पक्षात अजून असलेल्यांच्या डोळ्यात घातलेले हे अंजन आहे. अर्थात त्यांनी डोळे उघडे ठेवलेले असले तर उपयोग आहे ना?

7 comments:

  1. राष्ट्रवादी पक्षात सर्व हक्काबक्का आहेत, भूकंपाच्या जोरदार हादऱ्यानंतर काही वेळ सगळे सुन्न होतात तसे पवार आणि कंपनी यांचे झाले आहे. पेरावे तेच उगवते याचे चांगले प्रत्यंतर तथाकथित शेतकरी जाणत्या राजाला येत आहे, बघूया यातून ते कसे सावरतात. अन्यथा मतदारांनी जीव फुंकल्याशिवाय काही खरं नाही.

    ReplyDelete
  2. satarche shivendra rajeni pan hich takrar keliy.

    ReplyDelete
  3. भाऊ अगदी हाच प्रश्न माझ्या मनात आला होता. आव्हाड म्हणतात अनेकदा सांगुन देखील, नेतृत्वाने गणेश नाईकांबाबत कोणतीही हालचाल केली नाही. आव्हाड यांनी नेतृत्वावरच हल्लाबोल केला आहे. साहेब याबद्दल काहीच बोलत नाहीत, म्हणजे साहेबांना हे मान्य आहे किंवा साहेब यावर काहीच बोलू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. आव्हाड देखील साहेबांना भारी पडतायत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
    गणेश नाईक हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कुबेर म्हणुन ओळखले जात होते, आव्हाड हे सध्या तरी वरचढ आहेत. कदाचित यातचं कुठेतरी उत्तर दडलेले असावे.

    ReplyDelete
  4. जयंती नटराजन यांनी मे २०१५ मध्ये काँग्रेस सोडली. आता त्या कुठच्या पक्षात आहेत किंवा त्या काय करत आहेत हे माहित नाही. मला वाटते की भाऊ तुम्ही त्यांचा उल्लेख सध्याच्या संदर्भात केला आहे.

    ReplyDelete
  5. बहुधा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस मध्ये विलिन होणार आहे. त्यामुळे अगदी एकसारख्या पद्धतीने दोन्ही पक्षांची वाटचाल सुरू आहे.

    ReplyDelete
  6. राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे स्वतःच्या ताकदीवर निवड़ून येण्याची क्षमता असलेल्या नेत्यांचे , राज्य सरकारी सत्तेचे फायदे उपटण्यासाठी एकत्र आलेले टोळकं होतं. उद्देश भविष्यात साध्य होण्याची शक्यता धुसर झाल्याने टोळकं नष्ट झाले आहे. इतकेच.

    ReplyDelete
  7. लेखाचे शीर्षक वाघ आणि माकड किंवा वाघ आणि डुक्कर असेच केले असते तरी चालले असते भाऊ

    ReplyDelete