Saturday, August 31, 2019

आजीची मालवणी गोष्ट

सोमगो गेलो नि पाटपरूळा पावन इलो

Image result for rahul in shrinagar

गेल्या आठवड्यात राहुल गांधी विरोधी पक्षाचे एक शिष्टमंडळ घेऊन श्रीनगरला गेले आणि हात हलवित परत आले. त्यावेळी त्यांची खुप टवाळी झाली. तरीही अनेक पत्रकार राहुलचे समर्थन वाहिन्यांवर करीत होते आणि त्यातला नसलेला मतितार्थही समजावून सांगत होते. तो सगळा तमाशा बघितल्यावर मला आजीची आठवण आली. कारण पोरवयात आम्हा नातवंडांकऊन असा काही निरर्थक प्रकार घडला की आजी म्हणायची, सोमगो गेलो नि पाटपरूळा पावन इलो. अर्थात माझी आजी मालवणी होती आणि तिची बोलीभाषाही तशीच मालवणी होती. त्या भाषेतला हिसका व इरसालपणा ज्याला भाषा समजते, त्यालाच समजू शकतो. राहुल गांधींनी श्रीनगरला जाण्याला निरर्थक कशाला म्हणायचे? तर त्याचे उत्तर माझ्यापेक्षाही आजीकडूनच घेतलेले बरे. आजीकडून असे शब्द अनेकदा ऐकलेले होते. म्हणून एक दिवस तिला हा सोमगा कोण आणि तो पाटपरुळ्याला कशाला गेला, असा प्रश्न विचारलाच. तेव्हा तिने मनोरंजक गोष्ट कथन केली. सोमगा म्हणजे सोम्या नावाचा गडी होता आणि मालकाने त्याला एका संध्याकाळी उद्याच्या कामाविषयी पुर्वसुचना दिलेली होती. सोम्या उद्या सकाळी लौकर उठून तयार रहा. आज रात्री उगाच कुठेतरी वेळ घालवू नकोस. लौकर झोपून जा आणि पहाटेच उठून पाटपरूळ्याला जायचे आहे, असे बजावले होते. सोमग्याने नंदीबैलासारखी मान हलवली आणि होकार भरला होता. मात्र सकाळी सोम्या बेपत्ता होता. भल्या पहाटे उठून मालकाने आपले प्रातर्विधी उरकले आणि निघायची तयारीही केली. पण सोम्याचा कुठे पत्ता नव्हत. सहाजिकच मालक खवळलेला होता. त्याने सोम्याच्या नावाने शिव्याशापही देऊन झाले. पण सूर्य डोक्यावर चढत गेला तरी सोम्याचा कुठेही पत्ता नव्हता. किंबहूना तो कुठे गायब झाला, तेही कुणाला ठाऊक नव्हते. सुर्य उगवल्यापासून त्याला कोणी बघितलेलेच नव्हते. मग सोम्या गेला तरी कुठे?

सकाळ उलटून गेली आणि चिडलेल्या मालकालाही सोम्यविषयी चिंता वाटू लागली. गडी वा नोकर असला म्हणून काय झाले? घराचा एक घटक असल्यासारखाच सोम्याला मालकाने संभाळलेला होता. म्हणूनच ऊन चढू लागले तसा मालक गडबडला आणि पोरसवदा सोम्याने काही बरेवाईट केले नाही ना? म्हणून मालकाने सोम्याचा शोध सुरू केला. पण कोणीही सोम्याला त्या दिवशी बघितलेलेच नव्हते. मग सोम्या गायब कुठे झाला? तसा सोम्या साधाभोळा गडी होता. कुठले छक्केपंजे नाहीत की लांडीलबाडीही नाही. मग हा पोरगा गेला कुठे? दुपार होईपर्यंत सगळ्या गावाला सोम्याची चिंता वाटू लागली आणि गावभर सोम्याचीच चर्चा चाललेली होती. अशा भर दुपारच्या उन्हात कसेब्से लोक चार घास जेवले आणि मालकानेही दोन घास कसेबसे जेवून घेतले. ओसरीत मालक चिंताक्रांत बसला असताना अचानक त्यांना सोम्या धापा टाकत त्यांच्याच दिशेने येताना दिसला. तेव्हा मात्र चिंतेची जागा संतापाने घेतली होती. केरसुणीने हाणावा असाच विचार त्यांच्या मनात घोळत असताना घामाघुम झालेला सोम्या दारात येऊन थडकला. इतका दमला होता, की त्याला श्वासही घेताना दम लागत होता. संतप्त मालकाने त्याला दरडावून विचारले, ‘खंय गेल्लंस मरूक? सकाळधरून वाट बघत बसलंय तुझी मेल्या.’ धापा टाकत सोम्या उत्तरला. ‘तुमीच म्हटल्यात ना? म्हणान भल्या फ़ाटेक उठान पाटपरुळ्याक जावन इलंय बघा.’ ‘आणि थंय जावन केलंस काय?’ मालकाच्या या प्रश्नावर सोम्यापाशी उत्तर नव्हते. तो गप्प झाला. मग म्हणाला, ‘काय करूचा ता तुमी सांगितलाच नाय तर करू काय? नुसतो गेलंय आणि पाटपरुळा पावन इलंय’. मालकाने कपाळावर हात मारून घेतला. जमलेले सगळेच खदखदा हसू लागले आणि धापा टाकणार्‍या सोम्याला आणखी शिव्याही द्यायची मालकालाही इच्छा राहिली नाही. पाटपरुळे गावाला जायचे तर कशाला, हे मालकाने सांगितले नाही आणि सोम्याने विचारले नाही. पण जाऊन मात्र आला. कशाला? त्याला ठाऊक नाही की मालकाला ठाउक नाही.

असो, राहुल गांधी तरी श्रीनगरला कशाला जाऊन आले? तिथे त्यांना राज्यपालांनी बोलावले असे त्यांचे म्हणणे होते. पण विमानतळ पोलिसांनी त्यांना बाहेरच पडू दिले नाही. हे व्हायचेच होते. कारण गंमतीने राज्यपालांनी राहुलना सोशल मीडियात दिलेले उपरोधिक आमंत्रण त्यांनी खरे मानले आणि त्यांच्यापेक्षाही खुळावलेल्या अन्य विरोधी पक्षांनी मनावर घेतले. मंडळी विमानाने श्रीनगरला पोहोचली. तिथे गेलात तरी विमानतळाच्या बाहेर जाता येणार नाही, हे माहिती असूनही तिथे जायचे कशाला? कारण सरकारने प्रतिबंध घातलेला होता. काही दिवसांपुर्वीच राज्यसभेतील कॉग्रेसचे विरोधी नेते गुलाम नबी आझादही जाऊन तसेच माघारी परतलेले होते. कारण ते काश्मिरचे नागरिक असूनही त्यांना प्रवेश नाकारला होता. मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणिस सीताराम येच्युरी यांनाही त्याच अनुभवातून जावे लागलेले होते. आधीच प्रतिबंध लावलेला असेल, तर पोलिस विमानतळाच्या बाहेर जाऊ देणार नाहीत, याविषयी शंकेला जागा नव्हती. मग नुसता भोज्जाला हात लावायला राहुल व त्यांचे खुळे सहकारी श्रीनगरला गेलेले होते काय? जर सरकारने रोखले तर निदान तिथेच ठाण मांडून धरणे धरायचे्. राजकीय नेत्यांकडून तशी अपेक्षा असते. कारण राहुल गांधी तिकडे काश्मिरी जनतेचा हालहवाल बघायला अजिबात गेलेले नव्हते. अशा प्रसंगी राजकीय नेते भेटी द्यायला जातात, तेव्हा राजकीय डाव खेळायलाच गेलेले असतात. राहुल त्यासाठीच गेले अशीच बहुतेकांची अपेक्षा होती. म्हणून तर अनेक वाहिन्यांचे पत्रकार कॅमेरामनही त्यांच्या सोबत गेलेले होते. पण या गड्याने कुठलाही तमाशा केला नाही, की धरणे सत्याग्रह सुद्धा केला नाही. पोलिसांशी हास्यास्पद युक्तीवाद केले आणि त्यांनी नकार् दिल्यावर उलट्या पावली येऊन साहेब दिल्लीच्या विमानात बसले. निदान काही दिवसांपुर्वी त्यांच्या भगिनी प्रियंकाने सोनभद्रमध्ये केला, तितका तरी देखावा करायचा ना?

सोनभद्र येथे दलितांची वस्ती जाळण्यात आलेली होती. तर अचानक वाराणशी मार्गे प्रियंका गांधी तिथे जाऊन धडकल्या. अर्थातच सोनभद्रला कर्फ़्यु लागलेली होती, म्हणूनच जिल्हा वेशीवरच प्रियंकांना रोखण्यात आलेले होते. पण त्या मागे हटल्या नाहीत. त्यांनी सोनभद्रला जाऊन पिडीत दलितांची भेट घेण्याचा हट्ट धरला आणि प्रशासनाला प्रियंकांना प्रतिबंधक अटक करावी लागली. त्यांनीही माघार घेतली नाही आणि अखेरीस गावात जायला प्रतिबंध असताना प्रियंकाचा हट्ट पुर्ण करण्यासाठी पोलिसांनीच पिडीत दलितांपैकी काहीजणांना गावाबाहेर आणुन ती भेट घडवून आणली. त्यामुळे त्या दलितांना कुठला न्याय वगैरे मिळालेला नाही व मिळणारही नाही. पण प्रियंकांनी छानपैकी राजकारण खेळून घेतले ना? त्यानंतर सोनभद्रच्या दलितांचे काय झाले, तेही आता प्रियंकांना आठवत नसेल. त्यांना आता सोनभद्र नावाचे गावही आठवणार नाही. पण मुद्दा तो नाहीच, राजकारण करताना लोकांच्या भावनांशी खेळ करण्यासाठीच असले तमाशे चालतात. पण राहुलना तितकाही तमाशा करता आला नाही. श्रीनगरला जाऊन काय करायचे तेच मम्मीने वा इतर कोणी सांगितलेले नसेल, तर दुसरे काय व्हायचे? आईने सांगितले असेल, जरा श्रीनगरला जाऊन ये. तर राहुल तिकडे निघाले आणि श्रीनगरच्या भोज्जाला हात लावून माघारी दिल्लीला परतले. कशासाठी त्यांनाही ठाऊक नाही, की त्यांच्यासोबत तिकडे गेलेल्या एकूण शिष्टमंडळालाही ठाऊक नसावे. सोमग्या पाटपरुळ्याला जाऊन आला आणि राहुल श्रीनगरला जाऊन दिल्लीला परतले, दोघांमध्ये काही फ़रक आहे काय? इतकी साधी गोष्ट आहे. आज माझी आजी हयात असती, तर राहुलच्या श्रीनगर भेटीची बातमी बघून तेच म्हणाली असती. राहुल गेलो नि श्रीनगरचो विमानतळ पावन इलो. पुढे बाकीच्या येच्युरी, आझाद वा अन्य विरोधी नेत्यांना आजी म्हणाली असती. पोर खुळो रे. तुमची अक्कल खंय शेण खावक गेली मेल्यांनो?

14 comments:

  1. भाऊ, मस्तच.. दुसरे काही लिहिण्याची गरज नाही. पप्पूनंतर याला नवीन नाव सोमग्या.

    ReplyDelete
  2. भाऊ मुद्देसुद व सडेतोड लेख

    ReplyDelete
  3. ऊपयोग काय?. राहूल गांधी यांनी आता ह्या फंदात पडूच नये....

    ReplyDelete
  4. राहुल गांधी आणि तमाम विरोधी पक्षनेते इतके बालीष (खरेच म्हणायचे तर मुर्ख) का वागताहेत हेच कळत नाही. वास्तविक अस्तित्वच धोक्यात आले असताना या मुर्खशिरोमणींना दक्ष आणि सजग विरोधी पक्षाची भूमिका बजावणे अपेक्षित आहे पण म्हणतात ना आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार?

    ReplyDelete
  5. Ha ha ha!!! Khoop hasawlet Bhau!!! Chapkhal!!!

    ReplyDelete
  6. फारच छान, गोष्ट व गोष्टीचा उपयोग. म्हणजे प्रियांका दोन पावले पुढे दिसत आहे. धन्यवाद

    ReplyDelete
  7. भाऊ मजेदार खूप हसू आले.

    ReplyDelete
  8. नको तिथे नाक खुपसणे ही राहुल गांधी यांची वृत्ती अनुवंशिक आहे. 1991 साली काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर यांचे सरकार सत्तारुढ होते. त्यावेळी इराकने कुवेटवर हल्ला करून तो प्रदेश इराकमध्ये विलीन केला होता. त्यावर युनोच्या सैन्याने कुवेटचा भाग स्वतंत्र होण्यासाठी युद्ध पुकारले होते. युद्धावर समेट व्हावा म्हणून रशियाच्या मॉस्कोमध्ये वाटाघाटी चालू होत्या. आपण या प्रकरणात कोणतीही बाजू न घेता तटस्थ राहिलो होतो. मॉस्कोमधील वाटाघाटीत सर्व देशांच्या प्रमुखांना (म्हणजे राष्ट्रपती अथवा पंतप्रधान) यांना आमंत्रण होते. आपण तटस्थ असल्यामूळे आपले पंतप्रधान वा राष्ट्रपती गेले नव्हते. राजीव गांधी यांना या वाटाघाटीत सहभाग घेण्याची खुमखुमी आली. ते आमंत्रण नसताना गेले. ते पंतप्रधान नसल्यामूळे त्यांना वाटाघाटीत प्रवेश दिला नाही. ३-४ दिवस फक्त हाॅटेलमध्ये बसून रहावे लागले. शेवटी हात हलवत परत यावे लागले.

    राहुल गांधी यांनी आता थोडेफार असेच केले आहे.

    ReplyDelete
  9. काही दिवसांपुर्वीच राज्यसभेतील कॉग्रेसचे विरोधी नेते गुलाम नबी आझादही जाऊन तसेच माघारी परतलेले होते. कारण ते काश्मिरचे नागरिक असूनही त्यांना प्रवेश नाकारला होता.
    अतिशय चुकीचा शब्द वापरलात. आता तो फक्त भारताचा नागरिक आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर, भारताचा नागरिक म्हणणेच योग्य. भाऊंकडून हे अपेक्षित नाही

      Delete
  10. मजेदार, राहुल आणि इतर विरोधी पक्षनेत्यांची जागा दाखवून दिली

    ReplyDelete
  11. सुंदर विश्लेषण आणि उदाहरण������

    ReplyDelete
  12. महेश विश्वनाथ लोणेSeptember 7, 2019 at 9:46 AM

    अस्तित्व धोक्यात आले असल्यामुळे असला मुर्खपणा सुचतो आहे. मुद्देसुद व सडेतोड लेख.

    ReplyDelete