Tuesday, August 27, 2019

हायवेवरचे ‘फ़लक’

Image result for road signs

कुठल्याही महामार्गावरून तुम्ही प्रवास करीत असाल, तर शेकडो लहानमोठे फ़लक तुम्हाला बघायला मिळतात. ते सामान्य प्रवाश्यासाठी नसतात, तर जो कोणी वाहन चालक असेल, त्याच्यासाठी सावधानतेचे इशारे असतात. कुठे उजव्या किंवा डाव्या बाजूला वळण आहे, किंवा कुठे सहसा अपघात होतात, त्याच्या सूचना त्यातून दिलेल्या असतात. नवख्या ड्रायव्हरला वेगात गाडी पळवताना असलेला धोका त्यातून सुचित केलेला असतो. पण असे फ़लक त्या ड्रायव्हर किंवा त्याच्या वाहनाला अपघातातून संरक्षण अजिबात देत नाहीत. ते फ़क्त स्ंभाव्य धोक्याचा इशारा देतात. तो समजून घेतला तर अपघातापासून आपल्याला आपलेच संरक्षण करणे शक्य असते. उलट त्याकडे काणाडोळा करण्यात पुरूषार्थ वा शहाणपणा मानला, तर अपघाताला आमंत्रणच दिले जात असते. अर्थात त्यामुळे अपघात टाळला जाईल अशी हमी कोणी देऊ शकत नाही. पण सहसा कोणी तितका आगावूपणा करीत नाही. पण काही अतिशहाणे असतात आणि त्यांना सुचना वा इशार्‍यापेक्षाही आपल्या कौशल्य व हिंमतीवर अधिक विश्वास असतो. ते अपघाताला आमंत्रण देण्यास पुढे सरसावलेले असतात. किंबहूना अशा धोक्यातूनही आपण कसे सहज निसटलो, त्यातही पुरूषार्थ सांगण्यात पुढेच असतात. मात्र म्हणून त्यांचा कपाळमोक्ष व्हायचे थांबत नाही. तो लांबू शकतो, पण कपाळमोक्ष अपरिहार्य असतो. जे रस्त्यावरच्या प्रवासाच्या बाबतीत असते, तेच नेहमीच्या जीवनातही असते, व्यवहारातही असते. नको तितका धोका पत्करणे, हा शहाणपणा नसतोच. पण धोका कोणी समजावला असतानाही तो झिडकारण्यातला पुरूषार्थ जीवनात कुठेही घातपातालाच आमंत्रण देत असतो. जयराम रमेश नावाचा फ़लक असाच आहे व होता. पण त्याला झुगारण्यातला पुरूषार्थ कॉग्रेसच्या कपाळमोक्षाला कारणीभूत झाला आहे. सध्या दिल्लीमध्ये रमेश यांच्या एका वक्तव्यावरून गदारोळ सुरू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलनायक म्हणून रंगवण्याचे बंद करा आणि त्यांचे कुठले कार्यक्रम लोकप्रिय ठरले वा त्यातून त्यांना पुन्हा सत्ता मिळाली, त्याचे विधायक परिशीलन करा. असा सल्ला रमेश यांनी दिला आहे. एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना रमेश म्हणाले, नुसता विरोधासाठी विरोध वा एका व्यक्तीला खलनायक रंगवणे कॉग्रेस पक्षाला महागात पडलेले आहे. मोदींच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि म्हणूनच त्यांना लागोपाठ दुसर्‍यांदा जनतेने कौल दिलेला आहे. त्यांना मिळालेली एकूण मते बघितली पाहिजेत. पण २००९ च्या निवडणूकीत कुठेही राष्ट्रीय क्षितीजावर नसलेला हा नेता, अकस्मात २०१४ साली कॉग्रेसला आव्हान होऊन कशाला पुढे येऊ शकला? त्याकडेही गंभीरपणे बघितले पाहिजे. त्याच्या आगमनाला किंवा स्वागताला तात्कालीन परिस्थिती कारण झालेली आहे. असे रमेश म्हणतात, तेव्हा ते स्वपक्षाचे कान उपटत असतात. २००९ साली कॉग्रेसला वा युपीएला मतदाराने दुसरी संधी दिली, तेव्हा कुठलेही मोठे राजकीय आव्हान कॉग्रेस समोर नव्हते. कोणी आव्हानच नसल्यामुळे पक्षाला सत्ता मिळू शकली. पण त्यालाच आपले कर्तृत्व ठरवून पुढल्या पाच वर्षात कॉग्रेसने जो कारभार केला, त्याचे फ़लित म्हणजे नरेंद्र मोदींचे नेतृत्व होते, असेच रमेश यांना सांगायचे आहे. अडवाणींच्या नेतृत्वाखालचा दुबळा भाजपा आणि इतर मरगळलेले विरोधी पक्ष आव्हान उभे करू शकले नाहीत, हे कॉग्रेसचे यश नव्हते. पण त्याची मस्ती चढलेल्या कॉग्रेसने जनतेला लाथ मारून जी मनमानी चालविली होती, त्यातून लोकक्षोभ निर्माण होत गेला. तोच लोकक्षोभ पर्यायी नेतृत्वाच्या शोधात फ़िरू लागला आणि त्यानेच मोदींच्या नेतृत्वाला जागा निर्माण करून दिली, हा रमेश यांच्या विधानातला आशय आहे. अर्थात कॉग्रेसचा दुसर्‍यांदा दारूण पराभव झाल्यावर रमेश यांना सुचलेले हे शहाणपण नाही. त्यांनी हाच इशारा २०१३ साली दिलेला होता आणि २०१८ सालातही दिलेला होता. पण राफ़ायलमधून उंच भरार्‍या मारणार्‍या राहुलना कोणी समजवायचे?

२००९ सालात कॉग्रेससमोर कुठले मोठे आव्हान नव्हते. पण विरोधात कोणी नसल्याची मस्ती किती असते, ती कॉग्रेसने अल्पमताचे सरकार चालवितानाही दाखवलेली होती. ती मस्ती नुसतीच शिरजोरी नव्हती, तर किळसवाणा म्हणावा इतका सत्तेचा माज होता. पण त्याला विरोध करायला कोणी विरोधी राजकीय पक्ष वा नेता ठामपणे समोर आला नाही. लोकांच्या भावनांचा आवाज उठवायला अण्णा हजारे किंवा बाबा रामदेव अशा राजकारणबाह्य लोकांना मैदानात यावे लागले होते. तर त्यांचीही गळचेपी करायला सत्तेचा वापर कॉग्रेसने क्रुरपणे केला होता. अण्णांना धरणे धरण्यापासून रोखताना हजारो लोकांची धरपकड केली होती आणि रामदेव बाबांना तर रामलिला मैदानातून मध्यरात्री पळवून लावण्यापर्यंत गुंडगिरी युपीए सरकारने केलेली होती. तितकेच नाही, निर्भया प्रकरणातही कॉग्रेस पक्ष अत्यंत निर्दयपणे वागला होता. सहाजिकच त्याला सत्तेतून हटवणे अगत्याचे झाले होते. पण रामदेव किंवा अण्णा हजारे राजकीय पर्याय नव्हते आणि लोक समर्थपणे राजकीय नेतृत्व देऊ शकेल अशा नेत्याचा शोध घेऊ लागले होते. ती राजकीय पोकळी भरून काढू शकेल असा नेता म्हणून नरेंद्र मोदी पुढे सरसावले. खरेतर त्यांना नेता म्हणून पुढे आणण्याचे कामही त्यांच्याच विरोधकांनी केलेले होते. ज्यांच्यावर सामान्य जनता रागावलेली व नाराज होती, असा प्रत्येक पक्ष व नेता नरेंद्र मोदींच्या नावाने कायम शिवीगाळ करत होता आणि एकप्रकारे मतदारासमोर नरेंद्र मोदींना पर्यायी नेता म्हणूनच सादर करीत होता. ज्यांच्याविषयी मतदाराला तिटकारा आलेला होता. त्यांना ज्याचा धोका वाटतो, तो आपोआप जनतेला पर्याय वाटला. कारण लोकांना नुसता नेता पंतप्रधान नको होता, तर मुजोर राजकारण्यांना वठणीवर आणू शकेल, धाक दाखवू शकेल असा कोणी हवा होता. या लोकांनी आपल्याला कोणाचा धाक आहे, त्याचीच साक्ष दिल्याने लोकांचे काम सोपे झाले आणि २०१३ च्या आरंभी भारतीय क्षितीजावर मोदींचा उदय झाला होता.

इथे रमेश यांचे विधान समजून घेतले पाहिजे. २००९ पासून २०१४ पर्यंत परिस्थितीनेच मोदींना राजकीय क्षितीजावर आणले, असेही त्यांनी उगाच म्हटलेले नाही. कॉग्रेस व गांधी घराण्याच्या मस्तवाल वागण्याने जी राजकीय दुर्दशा देशाची करून टाकलेली होती, त्या स्थितीने मोदी हा उपाय बनवला होता. असेच रमेश यांना म्हणायचे आहे. आणखी काहीकाळ कॉग्रेसच्या हाती सत्ता राहिली तर देश दिवाळखोरीत जायला वेळ लागणर नाही, अशी मानसिकता कॉग्रेस व युपीएने निर्माण केली. म्हणून मोदींचे काम सोपे होऊन गेले होते. कारण तेव्हा लोकांना कल्याणकारी वा विकास करणारा नेता अजिबात नको होता. कॉग्रेसी दिवाळखोरीतून मुक्ती देईल, असाच नेता लोक शोधत होते आणि त्याच मतदाराला गुजरातचे विकास मॉडेल भुरळ घालून गेले. कॉग्रेसी अनागोंदी विरुद्ध गुजरातचे सुसह्य प्रशासन, असा तुलनात्मक प्रकार लोकांसमोर होता आणि तिथेच मोदी बाजी मारून गेले होते. हे आज रमेश सांगतात, असेही नाही, तेव्हाही त्यांनी तेच सांगितले होते. पण ऐकायला कोण तयार होता? २०१३ च्या जुलै महिन्यात भाजपाने मोदींना पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. त्यावेळी भाजपातही कोणाला मोदींची क्षमता ओळखता आलेली नव्हती, ती ओळखणारा देशातील एकटा राजकीय नेता वा अभ्यासक जयराम रमेशच होते. त्यांनी तेव्हाच आपल्या कॉग्रेस पक्षाला धोक्याचा इशारा दिलेला होता. नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. पण त्यातला इशारा समजून घेणे बाजूला राहिले आणि त्यांच्यावरच मोदीभक्त असल्याचा शिक्का मारून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला गेला होता. म्हणून सत्य सिद्ध व्हायचे थांबले नाही, की कॉग्रेसला कोणी दुर्दशेपासून वाचवू शकला नाही. इतिहासात कॉग्रेसचा इतका मोठा पराभव कधी झाला नव्हता आणि तेच सत्य दहा महिने आधी रमेश सांगत नव्हते का?

स्वतंत्र्योत्तर काळातले सर्वात मोठे आव्हान मोदी म्हणजे सर्वात मोठा पराभव करू शकणारा नेता समोर उभा आहे, असा फ़लक घेऊन रमेश उभे होते ना? त्यांना झुगारून कॉग्रेसची गाडी कोणी वेगाने पुढे नेली? त्यानेच तो कपाळमोक्ष घडवून आणलेला होता. पण रस्ता चुकीचा व फ़लकही दिशाभूल करणारे असल्याची समजूत आणखी मोठमोठ्या अपघाताना आमंत्रण देत असते. नंतरच्या पाच वर्षात कॉग्रेसची राज्यांमध्येही धुळधाण उडत गेली. पाच वर्षानंतर आलेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतही कॉग्रेसचा पुन्हा दारूण पराभव झाला आणि यावेळी कॉग्रेस अन्य विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन बुडाली. याला राहुल गांधी पहिल्यापासून जबाबदार होते व हा मुर्ख मुलगा आपल्या पक्षाला देशोधडीला लावणार असल्याचेही भाकित, २०१३ च्या अखेरीस रमेश यांनीच केलेले होते. पक्षाला २०१४ च्या लोकसभा निवडणूकीची फ़िकीर आहे आणि राहुल गांधी २०१९ च्या लोकसभेत लढण्यासाठी पक्षाची संघटना उभारण्यात रमलेले आहेत, असे उपरोधिक विधान रमेश यांनी केले होते. त्याचा अर्थच त्यांनी काही महिन्यात आलेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणूका राहुलच्या ध्यानीमनीही नसल्याचेस उघडपणे सांगितले होते. त्याचा साधा अर्थ इतकाच होता, की कॉग्रेस राहुलच्या नादी लागली तर २०१४ च्या लोकसभा निवडणूका हातून गेल्याच समजा. पण ऐकतो कोण? सगळी कॉग्रेस राहुलच्या मागे धावत गेली व दरीत कोसळून तिचा कपाळमोक्ष होऊन गेला. पुन्हा त्याचप्रकारे आपला कपाळमोक्ष होऊ नये, याची मात्र २०१९ सालात राहुलनी खुप काळजी घेतली. यावेळी त्यांनी कॉग्रेसला पराभूत करण्यासाठी वेगळ्या तंत्राचा वापर केला आणि आता रमेश त्याच दुखण्यावर बोट ठेवत आहेत. मोदींना खलनायक ठरवू नका असे रमेश म्हणतात, तेव्हा त्यातूनच राहुलनी कॉग्रेसचा बॅन्डबाजा वाजवल्याचे विश्लेषण करीत आहेत. निदान उरलासुरला कॉग्रेस पक्ष संपवू नका, म्हणून आता रमेश गयावया करीत आहेत.

एका व्यक्तीला खलनायक रंगवून काहीही साध्य होत नाही. त्या व्यक्तीला वा त्याच्या कामाला कार्यशैलीला समजून घेऊनच त्याच्याशी दोन हात करता येतील, असेही रमेश यांनी म्हटलेले आहे. त्याचा अर्थ काय होतो? तर विरोधक मोदींविषयी काही ठराविक कल्पना करून बसलेले आहेत. मोदी म्हणजे हुकूमशहा, मनमानी करणारा नेता, एकांगी व जनतेच्या भावनांना पायदळी तुडवणारा, असे एक चित्र विरोधकांनी सतत लोकांसमोर मांडलेले आहे. त्याखेरीज मोदींवर भ्रष्टाचार व गैरकारभाराचेही आरोप मुक्तपणे झालेले आहेत. पण ते नुसतेच आरोप आहेत. त्याचा कुठला पुरावा देण्याचे कष्ट विरोधकांनी वा राहुल गांधींनी घेतलेले नाहीत. त्याची कुठली अनुभूतीही लोकांना आलेली नाही. ज्याच्यावर विरोधक भ्रष्टाचार व अनागोंदीचा आरोप करतात, त्याच्या कारकिर्दीत कोट्यवधी लोकांना प्रथमच अनेक सरकारी योजनांना खराखुरा लाभ मिळालेला आहे. गरीबांना स्वैपाकाचा गॅस, शौचालय किंवा मालकीचे घर उभारायला आर्थिक मदत. आजवर जिथे सात दशके अंधारच राहिला अशा दुर्गम गावात वीजपुरवठा, अशा योजना काही प्रमाणात तरी लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. असे आजवर कधी झाले नव्हते. योजना जाहिर व्हायच्या. पैसे मंजूर व्हायचे व खर्चही व्हायचे. परंतु त्याचा खराखुरा लाभ गरीबांना क्वचितच मिळालेला होता. मोदींच्या पाच वर्षात काही मोजक्या लोकांना तरी त्या योजनांचे लाभ मिळत गेले आहेत. अनेक योजनातील अनुदानाची रक्कम कुठल्याही दलालाखेरीज थेट बॅन्क खात्यात येऊन जमा झालेली आहे आणि असे सरकार चालवणार्‍याला हुकूमशहा वा मनमानी संबोधण्याने विरोधक खोटे पडतात. असे आरोप होतात, कारण प्रचारातून मोदींची प्रतिमा मलीन करून मते मिळतील, हा आशावाद आहे. पण प्रतिकुल अनुभव लोकांना येत असेल तर विरोधकच खोटे पडतात. म्हणून अधिकाधिक लोक मोदींकडे वळत गेले, असेच रमेश सांगत आहेत.

अर्थात यातही काही नवे नाही. कॉग्रेस पक्ष व त्याचे नेतृत्व पर्यायाने गांधी कुटुंब, किती भ्रमात आहे, त्याचीही वाच्यता जयराम रमेश यांनी गेल्यावर्षी लोकसभेपुर्वीच केलेली होती. सत्ता गेली आहे, साम्राज्य धुळीस मिळाले आहे. पण आजही कॉग्रेसचे नेतृत्व आपणच सम्राट असल्याच्या थाटात व साम्राज्याचे धनी असल्याच्या मस्तीत जगत आहे, असे जुलै २०१८ मध्ये एका मुलाखतीतून रमेश यांनी सांगितले होते. त्यातला आशय राहुल, प्रियंका वा सोनियांनी समजून घेतला असता तरी खुप झाले असते. चिदंबरम, सिब्बल वा तत्सम भाट चमच्यांच्या गर्दीत बसून आपली स्तुती ऐकण्यापेक्षा गांधी कुटुंबाने रमेश यांनी दाखवलेला धोक्याचा फ़लक बघितला असता, तरी लोकसभेच्या निकालात काहीतरी फ़रक नक्कीच पडला असता. सहा महिने चौकीदार चोर असल्या डरकाळ्या फ़ोडणार्‍या राहुलना आता राफ़ायल आठवतही नाही. तेव्हा कुठल्याही गावात गल्लीत जाऊन लोकांसाठी लढायच्या वल्गना करणारे राहुल गांधीच आज बेपत्ता आहेत. कॉग्रेसमध्ये नेता कोण व कुठल्याही विषयावर भूमिका कोणती, तेही सांगणारा कोणी उरलेला नाही. मोदींना शिव्या घालणे आणि कसल्याही बाबतीत मोदींच्या निर्णयाला शब्दाला विरोध करणे, हे आता कॉग्रेसचे धोरण व विचारधारा होऊन बसली आहे. तिनेच कॉग्रेसला बुडवलेले आहे. त्या आपणच निर्माण केलेल्या दुष्टचक्रातून कॉग्रेसला बाहेर पडावे लागेल. मोदींचे कोडकौतुक करण्याची गरज नाही. पण त्यांनी केलेल्या चांगल्या कामाला दाद द्यायला हवी. त्याकडे विधायक नजरेने बघायला हवे. मुळात मोदी समजून घ्यायला हवे. तरच त्यांच्याशी व त्यांच्या राजकारणाशी दोन हात करता येतील. इतकेच रमेश यांना सुचवायचे आहे. पण कोणी ऐकून घेणारा आहे काय? घाटात वा वळणावर अपघातक्षेत्र अशी सुचना देणारा फ़लक उभा आहे. त्याकडे बघणार की नाही? की यालाच मोदीभक्त किंवा पक्षशिस्तीचा भंग ठरवून आत्महत्येसाठी धावत सुटायचे?

10 comments:

  1. भाऊ .. याच विषयावरच माझं quora या साईट वरचं उत्तर वाचून बघा.. प्रतिक्रिया जरूर कळवा ...
    https://www.quora.com/Why-are-so-many-opposition-leaders-like-Jairam-Ramesh-and-A-M-Singhvi-suddenly-supporting-PM-Modi-Is-there-any-correlation-with-Chidambaram-s-arrest/answer/Chinmay-Joshi-4

    ReplyDelete
    Replies
    1. Chinmay, upvoted. Nicely summarized

      Delete
    2. "फक्त" मराठी वाचकांना सोईचं होईल का?

      Delete
    3. भाऊंनी जे मुद्दे इतके दिवस मराठीत मांडले ते तुम्ही इंग्रजीत मांडले. तुमचे प्रयत्न कौतुकास्पद आहे. ह्यामुळे भाऊ जे सांगत होते ते जगभरातील अमराठी लोकांपर्यंत पोहचेल. हे कार्य चालू ठेवा.

      पण ह्यासाठी तुम्हाला भाऊंकडून अभिप्राय का हवा? त्याचेच मुद्दे त्यांनीच इंग्रजीत वाचून त्यांच्या माहितीत कोणती भर पडणार? किंबहुना मलाही त्यात नवीन काही दिसले नाही. अभिप्राय जरूर मागावा. पण त्यासाठी स्वतःचे विचार असावे. अन्यथा भाऊंचे लेख वाचून मी quora वर उत्तर दिले असे सांगावे. तुमची प्रतिक्रिया वाचून असे वाटले की तुम्ही काही नवीन सांगितले आहे का. नाहीतर ह्याला plagiarism म्हणजे वाड्‍ःमयचौर्य म्हणतात. भाऊंनी केले ते विश्लेषण तुम्हीही केलेले असू शकते. पण भाऊंनी ते फार आधी प्रसिद्ध केले होते.

      Delete
  2. छान विवेचन.2014,कांग्रेसची मुजोरी, मोदी कार्य

    ReplyDelete
  3. काल परवाच शशी थरूर यांनी पण मोदींवर विरोधकांनी सकारात्मक टिका करावि अशी टिप्पणी केली तर म्हणे कांग्रेस हाय-कमांडने नाराजी व्यक्त केली.
    काग्रेस सध्या प्रचंड वैचारिक दिवाळखोरी ने ग्रासलेली आहे.

    ReplyDelete
  4. एक नंबर भारी आहे

    ReplyDelete
  5. Bhau’s analysis is always apt and to the point. Your article is good too Chinmay

    ReplyDelete
  6. " विनाश काले विपरीत बुध्दी " ...दुसरं काय म्हणणार ? तुमच्या या लेखातील विवेचनाशी संपूर्ण सहमत !

    ReplyDelete