Thursday, August 22, 2019

सुडबुद्धीचे गुणगान

Image result for ishrat jahan encounter

माजी अर्थमंत्री व गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या बुधवारी झालेल्या अटकेनंतर सुडबुद्धीच्या कारवाईची खुप चर्चा झाली आहे. अर्थात गेल्या चारपाच वर्षात अशी चर्चा नवी नाही. कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा करणार्‍यासाठी हे शब्द आजकाल कवचकुंडले होऊन बसलेली आहेत आणि त्याचा प्रणेता तरूण तेजपाल नावाचा इसम आहे. त्याचे शब्द खरे मानायचे, तर भारतात कुठलाही गुन्हा करण्याची मुभा पुरोगाम्यांना कायदा व घटना देत असते. मात्र पुरोगामी नसलेल्यांना ती सवलत उपलब्ध नाही. थोडक्यात जी कृती अन्य कुणासाठीही गुन्हा असते, तीच कृती पुरोगाम्याने केल्यास मात्र त्याला पुण्यकर्म मानण्याची सक्ती आहे. त्यामुळेच आज चिदंबरम यांना आपले सर्व गुन्हे पुण्यकर्म वाटते आहे आणि म्हणूनच त्याविरोधात कुठलीही कारवाई करण्याला ते सुडबुद्धीची कारवाई समजतात. तेजपाल यापेक्षा वेगळे काय म्हणाला होता? त्याच्यावर आपल्या कार्यालयातील तरूणीचा विनयभंग व अतिप्रसंग केल्याचा आरोप होता. तेव्हा चिदंबरम यांच्याप्रमाणेच तेजपाल फ़रारी झाला होता. भूमिगत होऊन त्याने आरोपाचा इन्कार केला होता आणि आपण पुरोगामी आहोत म्हणूनच भाजपा सरकार आपल्याला गुन्ह्यात अडकवत असल्याचा त्याचा आक्षेप होता. अर्थात तेव्हा मोदी देशाचे पंतप्रधान नव्हते, की केंद्रात भाजपाचे वा एनडीएचे सरकारही सत्तेत आलेले नव्हते. पण जिथे तेजपाल विरोधातला गुन्हा नोंदला गेला, कारवाई सुरू झाली, त्या गोव्यात मात्र भाजपाचे सरकार होते. म्हणूनच तेजपालने त्याला सुडाची कारवाई म्हटलेले होते. मजेची गोष्ट म्हणजे त्याने आरोप असलेल्या कृतीचा इन्कार केला नव्हता. तर कायदेशीर कारवाईला आक्षेप घेतलेला होता. आज चिदंबरम यांचा आक्षेप तरी किती वेगळा किंवा भिन्न आहे? त्यांनाही आपली कृती कायद्याच्या कक्षेबाहेरची वाटलेली नाही. पुरोगामी असल्याने आपल्याला सर्व गुन्हे माफ़ असल्याची त्यांची धारणा आहे. किंबहूना तेच बहुतांश पुरोगाम्यांचे म्हणणे आहे. म्हणून हे लोक चिदंबरम यांच्यावरील कारवाईला सुड म्हणतात. कोणाचा सुड? कशाचा सूड?

अर्थातच आजचे गृहमंत्री अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरंभलेली ही सुडाची कारवाई आहे, असेच त्यांना म्हणायचे आहे. पण हे दोघे नेते कशासाठी ही सुडाची कारवाई करीत आहेत? चिदंबरम यांनी मोदी-शहांचे असे काय नुकसान केले आहे? कशामुळे पिसाळल्यासारखे हे दोघेजण चिदंबरम वा अन्य कॉग्रेसवाल्यांच्या मागे हात धुवून लागलेले आहेत? चिदंबरम यांनी काहीतरी नक्कीच केलेले असणार ना? निदान त्यांना ही सुडबुद्धी वाटत असेल, तर त्यांनीच त्याचा खुलासा करायला हवा. तो खुलासा सामान्यबुद्धीला पटणाराही असायला हवा ना? म्हणजे असे, की चिदंबरम यांनी मोदी-शहांचे व्यक्तीगत स्वरूपाचे काही नुकसान केलेले असायला हवे. त्याची भरपाई म्ह्णून त्या दोघांनी ह्या उचापती करायला हव्यात. चिदंबरम व त्यांच्या समर्थकांवर विश्वास ठेवायचा, तर ते भाजपा किंवा मोदींवर कठोर टिका करतात, म्हणूनच त्यांच्यावर कारवाईचा सूड घेतला जातो आहे. त्यात तथ्य असते, तर मोदी वा शहांनी आजपर्यंत अनेक संपादक वा नेते कार्यकर्त्यांवर सुडाची कारवाई केलीच असती ना? उदाहरणार्थ शेहला रशीद, कन्हैयाकुमार वा हार्दिक पटेल वा जिग्नेश मेवानी यांच्याही विरोधात कायद्याचा बडगा उगारून त्यांना मोदी-शहांनी धडा शिकवला असता ना? केवळ चिदंबरम यांनाच कशाला लक्ष्य केले जाईल? ममता बानर्जी, चंद्राबाबू, शरद पवार असे एकाहून एक दिग्गज पडलेले आहेत. त्यांना मोदी वा शहांनी हात कशाला लावलेला नाही? ज्यांना हात लावला आहे, त्यांच्यावर कुठल्या तरी गुन्हे वा बेकायदा कृत्याचाच तपशील कशाला शोधला गेला आहे? ज्यांनी कुठलेही गैरकृत्य केलेले नाही, अशा कुठल्याही टिकाकाराला मोदी-शहा हातही लावू शकलेले नाहीत. म्हणजेच मुद्दा फ़क्त टिकेपुरता नसून, काहीतरी बेकायदा कृत्याशी जोडलेला आहे. असे काही चिदंबरम वा अन्य कॉग्रेसच्या कोणा नेत्याने पापकर्म केलेले नसेल, तर त्याला मोदी-शहांनी हात लावायची हिंमत केलेली नाही.

अर्थात या वादातही पडण्याचे कारण नाही. काही क्षणापुरते मान्य करूया, की चिदंबरम महापुरुष व साधूसंत असल्याने निव्वळ खरेच बोलत आहेत. मोदी-शहांनी त्यांच्या विरोधात आरंभलेली कारवाई खरोखरच सुडबुद्धीने चालवलेली कृती आहे. पण कोणी माणूस विरंगुळा म्हणून सुडाला प्रवृत्त होत नाही. समोर कोणी दिसला म्हणून त्याच्यावर सूड उगवायला सज्ज होत नाही. तुम्ही काहीतरी कारणाने त्याला दुखावलेले असायला हवे. त्याची हानी केलेली असली पाहिजे. त्याला इजा पोहोचवलेली असली पाहिजे. रिकामटेकडा कोणी आपला कामधंदा सोडून तुमच्यावर सूड उगवायला वेडा अजिबात नसतो. मोदी-शहा तर अत्यंत बिलंदर मंडळी आहेत. म्हणूनच ते रिकामपणी कुठलीही सुडाची कारवाई करण्याची शक्यता नाही. सहाजिकच ते सुडाला प्रवृत्त कशाला झालेत, त्याचेही स्पष्टीकरण चिदंबरम यांनी द्यायला हवे ना? त्यांनी नसेल तर अन्य कोणा कॉग्रेसवाल्याने वा समर्थकाने खुलासा करायला हवा ना? मोदी-शहांना चिदंबरम वा तत्सम लोकांनी असे कुठले नुकसान पोहोचवलेले आहे? कोणती हानी केली आहे? नुसत्या टिकेला कोणी कधी किंमत देत नाही. मोदीही नाही. मग सुडाला प्रवृत्त होण्यासाठी आपण केलेल्या मूळ कृतीविषयी चिदंबरम काहीच खुलासा कशाला करत नाहीत? की ते करायला गेल्यास आणखी एका गुन्ह्यात फ़सण्याची भिती त्यांना सतावते आहे? सूडबुद्धीची कारवाई, असा आरोप ठोकून देणे सोपे आहे. पण त्यासाठी तपशील वा पुरावे देणे अजिबात शक्य नाही. यालाच चोराच्या मनात चांदणे म्हणतात. कारण मोदी सरकारने कधीच सुडापोटी कुठली कारवाई केली असल्याचे कुठे म्हटलेले नाही. जे काही कायद्याच्या कक्षेतले आहे, तितकेच आपण करीत असल्याचा दावा मोदी-शहांनी केलेला आहे. पण चिदंबरम व त्यांचे समर्थक मात्र त्याच कायदेशीर कारवाईला सुडबुद्धी ठरवित आहेत. यालाच चोराच्या मनात चांदणे म्हणतात.

पहिल्या दिवसापासून प्रत्येक बाबतीत कॉग्रेसवाले किंवा कुठलाही पुरोगामी मोदी सरकार विरोधात सुडबुद्धीचा आरोप करीत सुटलेले आहेत. कारण त्यांना मनातली चोरीच सतावते आहे. मोदी पंतप्रधान होण्यापुर्वी किवा पाच वर्षानंतर अमित शहा गृहमंत्री होण्यापर्यंत पुरोगामी म्हणून मिरवणारे जे कोणी आहेत, त्यांनी असे काहीतरी केलेले आहे, की आता त्यांना स्वत:चा अपराधगंड सतावतो आहे, अन्यथा त्यांनी सुडबुद्धीची कारवाई असा आरोप केलाच नसता. मागल्या दोन दशकात हेच चिदंबरम देशाचे सत्ताधीश होते. पुरोगामी पक्षांच्या हातातच देशाची सर्वसत्ता होती. त्यांनी शक्य तितक्या मार्गाने व कायद्याचा आडोसा घेऊन, गुजरातचा मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी व राज्याचा गृहमंत्री असलेल्या अमित शहांच्या बाबतीत काय काय उचापती केल्या होत्या? त्या सर्व कायदेशीर कारवाया होत्या का? निदान त्याची झळ लागून वा चटके बसूनही कधी मोदी-शहांनी सुडबुद्धीचे राजकारण खेळत असल्याचा आरोप कॉग्रेस किंवा पुरोगामी पक्षांवर केला नव्हता. आज चिदंबरम गजाआड गेलेले आहेत आणि तेव्हा अमित शहांना गृहमंत्री असतानाही तुरूंगात डांबण्याची किमया चिदंबरम यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून केलेली होती. त्यावेळी शहांनी कधी सूडबुद्धीची कारवाई केल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर केल्याचे कोणी ऐकलेले आहे काय? असेल तर मुद्दाम समोर आणावे. त्या प्रत्येक अन्याय्य कारवाई व कृतीला कायद्याची अग्निपरिक्षा समजून शहा मोदी सामोरे गेलेले होते. मग तुरूंगात बसायची वेळ आलेली असो, किंवा दिवसभर प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तर देण्याचे प्रसंग असोत. कोर्टात पायर्‍या झिजवायला लागलेल्या असोत. मोदी-शहांनी एकदाही सुडबुद्धीचा आरोप केलेला नव्हता. कारण त्यांच्या मनात चोराचे चांदणे नव्हते. कोर्टाने़च त्या दोघांना निर्दोष ठरवणारे निकाल देईपर्यंत त्यांनी कुठली तक्रार केली नाही, की कांगवा केला नाही.

आज अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत आणि चिदंबरम यांना सीबीआयने अटक केलेली आहे. काही वर्षापुर्वी चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते आणि त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने अमित शहांना एका राज्याचे गृहमंत्री असतानाही अटक करून काही महिने तुरूंगात डांबलेले होते. ते चिदंबरम यांच्या ‘घरचे कार्य’ होते काय? ज्याचे खटले दिर्घकाळ चालूनही काहीही सिद्ध झाले नाही, अशा आरोपांसाठी शहा किंवा मोदींना कायदेशीर जंजाळात फ़सवण्यामागे चिदंबरम यांचा कोणता पवित्र हेतू असावा? त्याचा खुलासा आजही करायला हरकत नाही. इतक्या पवित्र हेतूने केलेल्या कार्यासाठी आज शहा वा मोदी सूडबुद्धीने वागणूक देत असतील, तर ते जगाला कळायलाच हवे. त्यातून या दोघांचे खरे चरित्र लोकांसमोर येऊ शकेल. नसेल तर चिदंबरम यांना खायी त्याला खवखवे, या उक्तीप्रमाणे आपलीच पापे सतावत असल्याचे मान्य करावे लागेल. मुद्दा इतकाच आहे, की कायद्याचा आडोसा घेऊन जे राजकीय सुडाचे राजकारण चिदंबरम व कॉग्रेसने २००४ नंतरच्या काळात खेळलेले होते, त्याचीच भुते आता त्यांच्यासमोर फ़ेर धरून नाचत आहेत. सोहराबुददीन वा इशरत जहान यांच्या चकमकींना खोट्या ठरवून, जी कागदोपत्री हेराफ़ेरी करण्याने शहा मोदींना छळण्याचे कारस्थान चिदंबरम यांनी राबवलेले होते, त्यानेच त्या दोघांना कमालीचे दुखावून ठेवलेले आहे. आता सत्ता त्यांच्या हाती आल्यावर त्यांनीही चिदंबरी पद्धतीने कायद्याचा खेळ चालू केलेला आहे. त्यात सुडबुद्धीचा वास चिदंबरम यांना येत असेल, तर ती दुर्गंधी त्यांनीच केलेल्या घाणीची आहे. गुजरातचे भाजपा सरकार व मोदींना उध्वस्त करण्यासाठी ज्या सुडबुद्धीने आधीच्या दहा वर्षात सोनिया, राहुल, चिदंबरम इत्यादिकांनी कारवाया केल्या, त्याचाच हा परिपाक आहे. ज्याचा पाया चिदंबरम यांनी आपल्या गृहमंत्री पदाच्या कार्यकाळात घातला होता, त्याच्यावरच आज अमित शहा कळस रचण्याचे काम करीत आहेत. त्याला सुडबुद्धी म्हणा किंवा विवेकबुद्धी म्हणा. हे सुडबुद्धीचे खरेखुरे गुणगान आहे. कोणाला आवडो किंवा नावडो!

12 comments:

  1. एकदम झकास भाऊ,चिदंबरम्नी केलेल्या आधीच्या उचापतींनी मोदींना मोठे केले ते बसले पंतप्रधान होऊन आणि हे परत कोर्ट कचेरी .काँग्रेसचे कोण लोक होते ज्यांनी हा सल्ला दिला मोदी शहांना डिवचयाचा ? डबल नुकसान. हे सर्व केले नसते तर अजून मोदी शाह गुजरातमध्येच असते कदाचित 'टीम राहुल' सत्तेत असती.

    ReplyDelete
  2. काल सी बी आयने कोर्टात संगितले की पुर्व गृहमंत्री आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत.यावरुन त्याच्याकडे काही लपवण्यासारखे आहे.नाहीतर ना कर तो कहेका डर.

    ReplyDelete
  3. म्हणूनच कपिल सिब्बल कोर्टात युक्तिवाद करताहेत की चिदंबरम यांना आय एन एक्स मीडिया बाबत प्रश्न विचारत नाहीयेत.

    ReplyDelete
  4. So true, and so perfect I always read your article again and again, repeatedly to understand the minute and in-depth analysis. U r simply great.

    ReplyDelete
  5. भाऊ खरं पाहता मोदी आणि शहा यांनी गुजरात मध्ये सरकार चालवताना जो प्रगतीपथ बांधला त्यांचं फळ म्हणून भारतीयांनी त्यांना देशाची सत्ता दिली. मागील ५वर्षात त्यांनी लोकांसाठी देश स्तरावर जी कामे केलीत त्याची परतफेड म्हणून लोकांनी पूर्ण बहुमत देवून त्यांना पुन्हा सत्तेत आणले. ह्या देशातील जनतेची हजारो किंबहुना लाखो करोड रुपयांची जी लूट गेल्या काही दशकांत झाली ती भरून काढण्यासाठी जी कठोर कारवाई करावी लागेल त्यासाठी जनतेने संपूर्ण पाठिंबा दिल्याने ही कारवाई येत्या काळात आपल्या अंगवळणी पडणार आहे आणि मग त्याचं अप्रूप ही राहणार नाही. येत्या काळात हा देश पुन्हा एकदा समृद्धी चा आस्वाद घेणार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. जर खांग्रेस वाले मोदींच्या मागे एवढे हात धुवून लागले नसते तर मोदींना प्रसिद्धी मिळाली नसती, ते भारतातल्या एका राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते फक्त

      Delete
  6. भाऊ।
    आता सगळे म्हणतात की सारख मोदींना नाव ठेवण बंद करायला हवे .. आता बाण मोदींच्या हातात आहे so 2024 चा विचार सोडून द्यावा लागेल .

    ReplyDelete
  7. नियतीचे कालचक्र आता उलटे फिरत आहे.पेरावे तसे उगवते म्हणजे काय याचे हे ऊदाहरण. ज्या CBI च्या कार्यालयाच्या उदघाटनाला मुख्य अतिथी म्हणून चिदंबरम यांना गृहमंत्रि या नात्याने बोलावले त्याच कार्यालयात आता २६ आॕगस्ट पर्यंत कोठडीत ठेवले आहे . नियतीने सुड उगवला आहे. आता एक एक प्रकरण बाहेर निघतील व सगळे भ्रष्ट नेते उघडे पडतील ,काँग्रेस पक्षाच्या अंताला सुरुवात झाली आहे.

    ReplyDelete
  8. Hya congress chya pilla na asach pahije

    ReplyDelete
  9. ED विजय माल्या चोक्सि या सारख्या देशभक्ताना का पकड़त नाही याचा अर्थ कोणी अस घेऊ नये की मी चिदम्बरम ला सपोर्ट करतोय जर गुन्हा केला असेल तर नक्कीच शिक्षा झालीच पाहिजे आणि दूसरी गोष्ट अशी की सरकार ला प्रश्न विचारण म्हणजे देशविरोध होत नाही

    ReplyDelete
  10. इंद्राणी मुखर्जी च्या ड्रायव्हर मुळे हे चिद्दु चे प्रकरण बाहेर आलें ।मग ED आणि CBI ने पाळेमुळे खणून काढली

    ReplyDelete