Tuesday, August 6, 2019

मेगाभरती, की महागळती

Image result for pawar pichad

युक्तीवादाने खटला किंवा विवाद जिंकता येत असतो. पण लढाई मैदानात उतरून जिंकावी लागते. पण ऐन लढाईच्या तोंडावरच तुमचे सरदार किंवा सहकारी तुमची संगत सोडून जाऊ लागले, तर परिस्थितीचे गांभिर्य ओळखण्याला पर्याय नसतो. कारण सत्याकडे दुर्लक्ष करता आले तरी त्याचे दुष्परिणाम टाळता येत नसतात. हेच मागल्या पाचसात वर्षात झाले आणि त्याच्या परिणामी महाराष्ट्रा्तील कॉग्रेस संस्कृती रसातळाला गेलेली आहे. मग त्याच संस्कृतीच्या पायावर उभे असलेल्या पक्षांचे भवितव्य कोणते असणार? मागल्या दोन दशकात शरद पवार कॉग्रेसमध्ये असले किंवा नसले, म्हणून त्यांच्याखेरीज या संस्कृतीचा दुसरा कोणी खंदा लढवय्या नव्हता. म्हणूनच आज दोन्ही कॉग्रेसमधून विधानसभेपुर्वी गळती लागलेली असेल, तर त्याचे उत्तर पवारांनाच द्यावे लागणार आहे. मुठभर पत्रकार किंवा वाहिन्यांच्या कॅमेरासमोर उफ़राटी विधाने केल्याने इतिहास बदलत नसतो. तो प्रत्येक घटनाक्रम नोंदवित असतो आणि पवारांना त्यापासून सुटता येणार नाही. कालपरवा भाजपात मेगाभरती म्हणून दोन्ही कॉग्रेसमधले काही आमदार नेते सामावून घेण्यात आले. त्याची यथेच्छ टवाळी पवारांनी केलेली आहे. पण म्हणून विधानसभेची लढत सोपी होणार आहे काय? यशवंतराव चव्हाणांच्या नंतर कमीअधिक प्रमाणात महाराष्ट्रातील कॉग्रेसचा चेहरा म्हणून शरद पवारच पुढे राहिले आहेत. ते कधी कॉग्रेसमध्ये होते, तर कधी बाहेर होते. पण महाराष्ट्रातला कॉग्रेसी चेहरा अशीच त्यांची ओळख राहिलेली आहे. प्रामुख्याने पुरोगामी विचारवंत अभ्यासकांना तसे वाटत राहिले आहे. पण एकूण महाराष्ट्राच्या अर्धशतकातल्या राजकीय वाटचालीत पवारांचे योगदान कोणते? तर त्यांनी आपल्या धुर्त ठरवल्या गेलेल्या राजकारणातून कॉग्रेसची पाळेमुळे उखडून टाकण्याला मोठा हातभार लावला आहे. किंबहूना कॉग्रेससहीत पुरोगामी राजकारणाला संपवण्यातले त्यांचे योगदान ऐतिहासिक आहे.

सुजय विखे, वैभव पिचड, रणजित मोहिते आणि आता त्यांचे पिताजीही भाजपात दाखल झालेले असतील, तर ती बाब उडवाउडवी करण्यासारखी मानता येत नाही. कारण ही मुले तिसर्‍या पिढीतले कॉग्रेसजन आहेत आणि त्यांना आपल्या पुर्वजांचा वैचारिक वारसा नकोसा झाला आहे. तो केवळ सत्तापदांसाठी नकोसा झालाय, असा आरोप सोपा सुटसुटीत आहे. पण त्याची कितीशी कारणमिमांसा होऊ शकली आहे? पुलोद बनवताना पवारांना मुख्यमंत्रीपद नको होते, असा कोणाचा दावा आहे काय? त्या एका खेळीतून अशा उध्वस्तीकरणाला सुरूवात झाली. आजचे तरूण भाजपात जातात, तेव्हा सत्तापदाची लालसा असते. मग १९७८ सालात मुठभर आमदार घेऊन जनता पक्षाच्या वळचणीला जाण्यात कुठला वैचारिक लढा पवारांनी केला होता? पण तिथेच हा खेळ संपत नाही. १९७८ सालात कॉग्रेसमधून पवार बाहेर पडले व त्यांनी पुलोदची मोट बांधली; तेव्हा राज्यातले तमाम पुरोगामी लहानमोठे पक्ष त्यांच्या समवेत आलेले होते. आठ वर्षात पवारांनी आधी अशा तमाम पुरोगामी पक्षांना विकलांग करून पुन्हा कॉग्रेसप्रवेश केला. तेव्हा त्यांनी राजीव गांधींचे हात बळकट करण्याची भूमिका घेतली होती. पण वास्तवात जनता पक्ष, शेकाप किंवा रिपब्लिकन इत्यादी डाव्या पक्षांना वार्‍यावर सोडून दिलेले होते. पुलोद मोडली आणि त्या पक्षांना आपली ओळखही राहिली नाही. उलट त्यांची जागा पुढल्या काळात शिवसेना भाजपा व्यापत गेले. म्हणजेच पवारांनी कॉग्रेसमध्ये जाण्यापुर्वी पुरोगामी पक्षांची पुर्ण वाताहत करून टाकली होती. नंतर कॉग्रेसमध्ये जाउन मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्याही पक्षाला इतका खुळखुळा करून टाकले, की त्यातून अजून कॉग्रेस सावरू शकलेली नाही. मधली पंधरा वर्षे भले दोन्ही कॉग्रेस सत्तेत होत्या व एकमेकांच्या आधाराने निवडणूका जिंकत होत्या. पण त्याचे श्रेय शिरजोर न झालेल्या शिवसेना भाजपा यांना होते.

१९९५ सालात कॉग्रेसला पराभूत करून सेना भाजपा युतीने सत्ता मिळवली आणि १९९९ सालात सत्ता गमावली. तरी त्यांना मिळालेला विरोधी पक्षाचा अवकाश किरकोळ नव्हता. मात्र भाजपा सेनेला सत्तेपासून बाजूला करून सत्ता बळकावणार्‍या दोन्ही कॉग्रेस पक्षांना जुन्या मस्तीतून बाहेर पडता आलेले नव्हते. त्या कालखंडात शरद पवारांनी राज्यात पुन्हा कॉग्रेस संस्कृतीला उभारी येण्यासाठी काय केले? अन्य पक्षातून होतकरू माणसे गोळा करायची आणि त्यांचीच मोळी बांधून राजकीय पक्ष चालविला होता. त्या कालखंडात भाजपाकडे राज्यात वा केंद्रात कोणी खंबीर नेता नव्हता किंवा शिवसेनाप्रमुख थकले होते. त्याचा लाभ सत्तेतील दोन्ही कॉग्रेसला मिळत राहिला. दुबळा विरोधी पक्ष म्हणजे आपले बळ नव्हे, हे जाणू शकणारा एकमेव पोक्त नेता शरद पवारच होते. पण त्यांनी कॉग्रेसला प्रतिस्पर्धी मानून खेळलेले डावपेच अखेरीस राज्यातील कॉग्रेसची पाळेमुळे उखडून टाकणारे ठरले. सत्तेसाठी वाटेल ते करायचे आणि लोकमताला झुगारून सत्तेची मस्ती दाखवायची; यापेक्षा दुसरे काहीही चाललेले नव्हते. नरेंद्र मोदींचा २०१३ च्या मध्यास झालेला उदय, राहुल गांधींनी गंभीरपणे घेतला नाही. पण शरद पवारांनी तरी त्याचे गांभिर्य ओळखले होते काय? असते, तर २०१४ च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी आघाडी मोडण्यापर्यंत मस्तवालपणा कशाला झाला असता? लोकसभेत एकत्र लढून मोठा विजय मिळवलेल्या भाजपा व शिवसेनेत सर्व श्रेय लाटण्यासाठी युती मोडली जाणे समजू शकते. एकत्र पराभूत झाल्यावर राष्ट्रवादीने आघाडी मोडण्यात घेतलेला पुढाकार धक्कादायक होता. त्याने एकहाती भाजपाला राज्यातला मोठा पक्ष होण्याचा मार्ग प्रशस्त करण्यातला धुर्तपणा फ़ाक्त पवारांनाच समजू शकतो. पण तिथेच साहेब थांबले नाहीत. निकालानंतर भाजपाचे बहूमत हुकल्यावर त्यांचेच सरकार बनावे; याची सर्वाधिक फ़िकीर पवारांनाच असावी? ह्यातले रहस्य लपून रहाते काय?

निकाल पुर्ण झाले नव्हते, पण भाजपाच बहूमत हुकलेला सर्वात मोठा पक्ष विधानसभेत होण्याची चिन्हे साफ़ दिसू लागलेली. कोणीही न मागितलेला पाठींबा पवारांच्या पक्षाने भाजपाल कशाला जाहिर केला होता? त्यातून त्यांनी कॉग्रेस संस्कृतीची राज्यातील कबर खोदली. एकीकडे कॉग्रेसचे खच्चीकरण व दुसरीकडे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे हे डावपेच; भाजपाला मजबूत करण्यासाठी नव्हते असे कोण म्हणू शकतो? त्याला डावपेचही म्हणता येणार नाही. ती शुद्ध दगाबाजी होती. जे पवारांकडे संघ वा भाजपाचे विरोधक म्हणून बघतात. त्यांच्याशी केलेला तो दगाफ़टका होता. तेव्हा भाजपाची येदीयुरप्पांसारखी पळापळ झाली असती. पण ती होण्यापुर्वीच शरद पवार मदतीला धावून गेले. त्यात उदात्तता असेल व संधीसाधूपणा नसेल, तर आज थेट भाजपात दाखल होणार्‍यांना गद्दार कशाला म्हणायचे? जे पवार करतात ते पुण्याचे काम असेल, तर त्यांच्याच अनुयायांनी तसेच केल्यास पाप कशाला असू शकेल? मात्र इतके होऊनही पवारांनी परवा मेगाभरतीवर केलेली मल्लीनाथी थक्क करून सोडणारी आहे. नोकरभरतीचे काय झाले? दोनचार लोकांची मेगाभरती असते का? ही पवारांची भाषा त्यांना वस्तुस्थितीचे गांभिर्य कळत नसल्याची लक्षणे आहेत. शिवेंद्रराजे यांनी भाजपात जाताना दिलेले कारण राष्ट्रवादी व कॉग्रेसमधली वास्तविकता कथन करणारे आहे. दोन्ही कॉग्रेस सत्तेत येण्याची शक्यता उरलेली नाही आणि पक्षांमध्ये मरगळ आटोपत नाही, असे त्यांनी म्हटले. त्याचे उत्तर पवार देऊ शकलेले नाहीत. कारण ते स्वत:च त्यातले दोषी आहेत. आजचा पक्ष वा पक्षाचे नेतृत्व यांच्या बळावर पुन्हा निवडणूक जिंकण्याची अनुयायांना आमदारांना शाश्वती राहिलेली नाही. असा शिवेंद्रराजे यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. आपल्या कुवतीवर किंवा बळावर पवार आता कोणाला निवडून आणू शकत नाहीत, इतकाच त्यातला आशय आहे. तो पवारांना उमजलेला नसेल काय?

अमूक जागा आमच्याकडेच राहिल, असे उत्तर देण्यातून सत्याकडे पाठ फ़िरवली जाते. म्हणून परिणाम थांबत नाहीत. लागोपाठच्या दोन लोकसभेत दोन्ही कॉग्रेसचा झालेला दारूण पराभव काहीच शिकवू शकला नाही, असे मानायचे काय? त्याचे खापर मतदान यंत्रावर फ़ोडण्याने थातुरमातूर समाधान मिळवता येते. पण पक्षाची नव्याने उभारणी होत नाही, किंवा पुढल्या निवडणूका जिंकता येत नाहीत. मतदान यंत्रात गडबड असती, तर आमदार गडबडून गेले नसते. किंवा दुय्यम नेत्यांची अशी पळापळ झाली नसती. वास्तवात आपल्या तालुक्यात किंवा मतदान केंद्राच्या परिसरातील लोकभावना सर्वोच्च नेत्यापेक्षाही सामान्य कार्यकर्ता व स्थानिक नेत्यांनाच नेमकी ठाऊक असते. त्याचेच प्रतिबिंब मतमोजणीत पडले, मग त्याचा धीर सुटत असतो. इंदिराजी पुन्हा जिंकण्याची शक्यता पवारांना १९७८ मध्ये वाटली नाही, म्हणून ते पुलोदचा प्रयोग करायला सरसावले होते. आज त्यांचेच दुय्यम सहकारी त्याच प्रयोगाची कास धरत आहेत. मुद्दा इतकाच, की त्यातून पवारांचे वा कॉग्रेसचे भवितव्य काय? राज्यातून कॉग्रेसची पाळेमुळे उखडली गेली समजायचे काय? त्याला नव्याने पालवी फ़ुटण्याची अपेक्षाही उरलेली नाही काय? असती तर असे आमदार भाजपा किंवा शिवसेनेत जाण्यापेक्षा आधीच तिकडे गेलेले आमदार माघारी फ़िरले असते. १९९५ पुर्वी गेलेले गयाराम १९९९ सालात राष्ट्रवादी स्थापन होताच माघारी फ़िरलेले होते ना? पण यावेळी तसे घडताना दिसलेले नाही. २०१४ मध्ये पक्षांतर केलेले आहेत तिथेच आहेत आणि आणखी नव्याने पलायन सुरू झालेले आहे. जाहिरपणे नाही, तरी खाजगीत व एकांतात पवारांनी त्याचा विचार केला असता, तर आतापर्यंत खुप काही हालचाली होताना दिसल्या असत्या. निदान पत्रकारांशी बोलताना वा कुठल्या समारंभात भाष्य करताना पवारांनी उडवाउडवीची भाषा वापरली नसती.

या आमदारांच्या निर्गमानाबद्दल बोलताना पवारांनी ईडी सीबीआयच्या धाडींचा उल्लेख केला. प्रामुख्याने चित्र वाघ या महिला नेत्याचा संदर्भ दिला. पण भाजपात प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याला पक्षांतर्गत गटबाजीने बेजार केल्याने पक्ष सोडल्याचे स्पष्टीकरण दिले. कुठल्याही धाडी तपासाचे कारण नसल्याचा खुलासा केलेला आहे. म्हणजेच पवारांनी ईडी वगैरेचे केलेले उल्लेख बिनबुडाचे ठरतात. किंबहूना त्याला पक्षाच्या कुणा प्रवक्त्याचा थिल्लरपणा म्हणता येईल. सहासात दशके व्यवहारी राजकारणात खर्ची घातलेल्या पवारांसारख्या दिग्गजाला असला छचोरपणा शोभणारा नाही. शिर्डी व नगर मतदारसंघ बदलण्याचे औदार्य पवार दाखवू शकले नाहीत. उलट घरची मुले असताना परक्यांच्या मुलांचे लाड किती करायचे; असे उत्तर त्यांनी दिले होते. त्यातूनच त्यांना पक्षाच्या भवितव्याशी कुठलेही कर्तव्यच उरले नसल्याची साक्ष मिळते. राहुल गांधींनी अशाच थिल्लरपणातून कॉग्रेसचा र्‍हास घडवून आणला आहे. पण त्यांच्या अननुभवी राजकारणाशी पवारांच्या राजकारणाची तुलना होऊ शकते काय? चार माणसे जोडण्यापेक्षा त्यांना आपसात खेळवणे आणि झुंजवण्यालाच राजकारण समजून खेळलेल्या डावपेचांचा हा एकत्रित परिणाम आहे. तुम्ही सर्वांना सर्वकाळ् फ़सवू शकत नाही म्हणतात, त्यातलाच हा प्रकार आहे. आपले अपयश झाकण्यातून पवार नेहमी युक्तीवाद करीत गेले आणि त्यांनी स्वत:इतकी इजा अन्य कोणाला केलेली नसेल. आपले काही उभे करण्यापेक्षा दुसर्‍याचे काही उध्वस्त करण्याच्या डावपेचांनी ही दुर्दशा घडवून आणलेली आहे. आपल्याच जुने सहकारी व सवंगड्यांचा विश्वास आपल्यावर का उरलेला नाही, त्याचीही फ़िकीर नसेल, तर भवितव्य काय शिल्लक उरते? आपापले भवितव्य तुमच्या यशात बघणार्‍या लोकांच्या पाठींब्यातून नेता उदयास येत असतो आणि त्या विश्वासाला तडा गेल्यावर संपूनही जात असतो.

आता नव्याने राजकारण खेळायला आरंभ करण्यापेक्षा आणि विधानसभा जिंकण्याचे मनसुबे करण्यापेक्षा, शरद पवारांनी जरा उसंत घेऊन सिंहवलोकन करावे. आपल्या कृतीमध्ये वा वागण्यात कुठल्या चुका झाल्या, त्याचे आकलन करता आले तरी खुप होईल. गुजरातचा एक व विदर्भातला दुसरा नेता मिळून पवारांचा सहकारासहीत पश्चीम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उध्वस्त करून टाकत असतील, तर आपले कुठेतरी चुकले आहे, इतकी साधी गोष्ट मान्य करणेही खुप झाले. कारण चुक समजून घेण्यातूनच सुधारणेला आरंभ होत असतो. उलट चुक रेटून नेण्यातून त्यांचीच पुनरावृत्ती होते आणि सावरण्याचा कालखंड निघून जातो. पवारांसाठी तो कालखंड संपला आहे. पण त्यांच्याच घरातील दुसरी व तिसरी पिढी राजकारणात धडपडते आहे आणि त्यांना साहेबांच्या चुकांपासून खुप काही शिकता येण्यासारखे असेल. अजितदादा वा सुप्रियाताई यांच्याकडे सुत्रे सोपवून साहेबांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत विराजमान होण्यानेही खुप मोठे योगदान कॉग्रेस व राष्ट्रवादीला मिळू शकते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धवना कार्यकारी अध्यक्ष केले आणि बाजूला झाल्यावर दैनंदिन राजकारणात ढवळाढवळ केलेली नव्हती. भले काहीकाळ शिवसेना घुसमटली वा गडबडली. पण संधी मिळताच, मागल्या पाच वर्षात शिवसेनेला नवी उभारी मिळवून देण्याइतके राजकीय डावपेच खेळण्यात पुढली पिढी यशस्वी झालीच ना? आपल्या हाती असलेली सुत्रे व अधिकारांचा मोह सोडण्याची हिंमत सर्वात मोठे धाडस असते. की साहेबांचा आपल्याच पुढल्या पिढीवरही विश्वास नाही? कधीकाळी रुबाबात फ़िरणार्‍या सिंह वाघाला केविलवाणा झालेला डिस्कव्हरी वा नॅट जिओ वाहिन्यांवरही बघणार्‍यालाही त्रासदायक होते. कुठलीही लढाई अंतिम नसते आणि कुठलाही आरंभ नेहमीच यशस्वी नसतो, हे मानवी आयुष्यातले कायमचे सत्य आहे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.

16 comments:

  1. शरद पवार या माणसाने महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातील सलोख्याच्या वातावरणाची जितके नुकसान केलेले आहे तितके आजवर कोणीही केलेले नाही . हिंदू धर्माचा द्वेष आणि अल्पसंख्यांक धर्मीयांचे लांगूलचालन हा एकच अजेंडा मनामध्ये ठेवून आणि विशेषतः ब्राह्मणात जातीबद्दल समाजामध्ये विष कालवून काही वर्षे पवारांनी राजकारण केले परंतु त्यामुळे समाजमन कायमचे कलुषित झाले व त्याची फळे आजही गावोगावी सर्व समाज भोगत आहेत. पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेऊन आणि सोयीस्कर पणे कोलांट्या उड्या मारून शरद पवारांना काही काळ यशस्वी होता आले परंतु त्यांचा अंतिम काळात अत्यंत कठीण असणार आहे हे आपल्याला दिसतेच आहे देव त्यांना अजून तरी सद्बुद्धी देवो

    ReplyDelete
  2. जे होत आहे ते राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी चांगले आहे.

    ReplyDelete
  3. कुठलीही लढाई अंतिम नसते आणि कुठलाही आरंभ नेहमीच यशस्वी नसतो, हे मानवी आयुष्यातले कायमचे सत्य आहे...... ग्रेट भाऊ .. खूप सुंदर ... बौद्धिक भूक भागतेच आणि राजकारणातील अगदी सूक्ष्म बारकावे सुद्धा तुमच्यामुळे लक्षात येतात ..

    ReplyDelete
  4. मी काहीही करू शकतो...
    माझे डावपेच कोणालाही कळणे शक्य नाही...
    सगळे राजकारण माझ्या भोवती फिरते...
    ह्या मस्तीत काय चुकतयं हेच साहेबांना कळले नाही.

    ReplyDelete
  5. फारच उत्तम हं भाऊ .

    ReplyDelete
  6. खूप छान पोस्ट टाकली sir.. तुमची लेख वाचताना, भूतकाळ पण लक्ष्यात येते

    ReplyDelete
  7. आदरणीय भाऊ, आपले मते या पक्षाचे भवितव्य काय ? यांनी जो नविन डाव टाकला आहे "शिवस्वराज्य" याबद्दल आपला अंदाज व्यक्त करावा. दोन गुजराती दिल्लीत येतात, एकमेकांना स्थिर करण्यासाठी मदत करतात काय, भारतीय राजकारणात उलथापालथ करतात काय. अजूनपण महाराष्ट्रात जातीचे राजकारण नवीन रुपाने पैदा करणे सुरू आहे, यांना राजकिय समज येईल असे आपणास वाटते का??

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊंनी भरभरून लिहिले आहे... वाचाल तर वाचाल 🙏🙏

      https://jagatapahara.blogspot.com/2017/12/blog-post_28.html?m=1

      https://jagatapahara.blogspot.com/2017/12/blog-post_77.html?m=1

      https://jagatapahara.blogspot.com/2017/12/blog-post_89.html?m=1

      Delete
  8. The hyena is inching closer towards the young cub....putra prem hathala bhari padla aata dhanushya pelu shakel ka?

    ReplyDelete
  9. अप्रतिम भाऊ फक्त तुम्हीच त्यांच्या चूका दाखू शकता

    ReplyDelete
  10. Really you explain the situation very well. The skill is extraordinary. Thanks.

    ReplyDelete
  11. पालथ्या घड्यावर पाणी! नाहीतर पक्षाचे जुने नेते-कार्यकर्ते पक्षाला राम-राम ठोकून गेले नसते.

    ReplyDelete