खरे तर भाजपाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याची गरज आहे काय; हाच मुख्य प्रश्न आहे. कारण आजवर तरी आपल्या देशात उघडपणे कधी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची कोणी तशी घोषणा केल्याचे ऐकीवात नाही. कॉग्रेस पक्षात आरंभापासूनच पंडित नेहरू यांचे व्यक्तीमत्व इतके मोठे होते, की त्यांच्या स्पर्धेत अन्य कोणी नेता नव्हता. सहाजिकच नेहरू हेच अघोषित उमेदवार असायचे. त्यांच्या निधनानंतर तसा प्रसंग ओढवला आणि आजच्या भाजपासारखीच तेव्हा कॉग्रेसची अवस्था झालेली होती. मग ज्येष्ठ नेते असलेल्या गृहमंत्री गुलझारीलाल नंदा यांना हंगामी पंतप्रधान म्हणून नेमून नव्या पंतप्रधानाची निवड करण्यात आलेली होती. पण लालबहादूर शास्त्री अधिक काळ जगले नाहीत, की त्यांच्यावर पक्षाचा नेता म्हणून मतदाराला सामोरे जाण्याचा प्रसंग आला नाही. त्यामुळेच मग पुन्हा पक्षात नेतेपदाचा वाद उफ़ाळून आलेला होता. त्या वादातून एकमेकावर कुरघोडी करताना वयाने व अनुभवाने कनिष्ठ असूनही इंदिरा गांधी यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आलेली होती. त्यामुळे नंतर आलेल्या लोकसभा निवडणूकी पक्षाने त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या, तरी त्याच पंतप्रधान होतील हे गृहीत होते. पण तशी घोषणा पक्षाने केलेली नव्हती. बाकीच्या पक्षाची गोष्टच वेगळी. कॉग्रेसेतर पक्षांची ताकद अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवायची नव्हती तर पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करणे दूरची गोष्ट झाली. नाही म्हणायला भाजपाचा जुना अवतार मानल्या जाणार्या जनसंघाने तेव्हा तरूण असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांची भावी पंतप्रधान म्हणून चर्चा चालविली होती. पण त्याची कोणीच कधी गंभीर दखल घेतली नाही.
कॉग्रेसेतर अनेक पंतप्रधान नंतरच्या काळात देशाला मिळाले. पण त्यापैकी कोणी निवडणूकीच्या आधी घोषित उमेदवार नव्हता आणि आजचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगही कधी त्या पदाचे उमेदवार नव्हते. पुन्हा एक अपवाद होता, १९९६ सालातल्या सार्वत्रिक निवडणूकीतला. तेव्हा जैन डायरी आरोपात गुंतलेले अडवाणी आजच्या मोदींइतकेच भाजपासह देशात लोकप्रिय होते. पण जैन डायरी प्रकरणामुळे त्यांनी शर्यतीतून माघार घेऊन परस्पर वाजपेयी यांचे नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहिर केले होते. त्यामुळेच विरोधी पक्षापैकी कोणी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहिर करण्य़ाचा विषय यापुर्वी कधीच आलेला नव्हता. मग आजच नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणेवरून इतका गदारोळ कशाला चालू आहे? प्रामुख्याने भाजपा व मोदींच्या विरोधकांनाच अशा बाबतीत अधिक रस आहे. आणि त्यांनी उठवलेल्या वादळात भाजपा भरकटला आहे असे म्हणायला हरकत नाही. मोदींच्या नावाच्या घोषणेचा इतका गवगवा होण्याची दोन मुख्य कारणे संभवतात. ते नाव जाहिर झाल्यास सेक्युलर मते व मित्र भाजपाला गमवावे लागतील, अशी विरोधकांची अटकळ आहे हे त्याचे पहिले कारण आहे. दुसरीकडे आज देशाच्या कानाकोपर्यात मोदी यांची असलेली लोकप्रियता मरगळलेल्या भाजपाला नवी संजीवनी देऊ शकेल; असे त्या पक्षाच्या देशभरच्या कार्यकर्ता व पाठीराख्यांचे ठाम मत आहे. त्यामुळेच दोन्हीकडून त्यासाठी आग्रह चालू आहे. विविध मतचाचण्या पाहिल्यास त्याची प्रचिती येते. आज देशात पक्षापेक्षा मोदींची लोकप्रियता अधिक आहे. असे असताना त्यांच्याच पक्षाचे वरीष्ठ नेते व श्रेष्ठी मोदींच्या विरोधातही उभे ठाकलेले आहेत. खुद्द मोदींचे वस्ताद मानले जाणारे अडवाणीच त्याच्याविरोधात ठाम उभे आहेत.
अडवाणी यांना पंतप्रधान व्हायची महत्वाकांक्षा खुप आधीपासून आहे. ती त्यांची संधी जैन डायरी प्रकरणाने घालवली व त्यांनीच ती संधी वाजपेयींना बहाल केली होती. त्यानंतर २००४ सालात वाजपेयी निवृत्त झाल्यावर आपला क्रमांक लागणार म्हणून अडवाणी खुशीत गाफ़ील राहिले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षासह एनडीएने सत्ता गमावली. त्यानंतर संसदेत सतत बाहुला पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची हेटाळणी करणार्या अडवाणी यांना, २००९ च्या निवडणूकीतही प्रभाव पाडता आलेला नाही. पण अजून त्यांची महत्वाकांक्षा संपलेली नाही. पक्षाला बहूमत मिळवून देण्य़ाची वा मित्र पक्षांना सोबत घेऊन सत्ता संपादन करण्याचीही क्षमता त्यांच्यात उरलेली नाही. अशावेळी आपल्या चेल्याने सत्ता मिळवावी व आपल्या चरणी अर्पण करावी, अशीच त्यांची अपेक्षा दिसते. कदाचित तेही शक्य झाले असते. मोदींना विश्वासात घेऊन अडवाणी यांनी रणनिती आखली असती, तर त्यांचे तेही स्वप्न साकार झाले असते. पण चेल्याला विश्वासात घेण्यापेक्षा त्यांनी नितीशसारखे मित्र व स्वपक्षातील अन्य दिल्लीकर नेत्यांना हाताशी धरून मोदी विरोधात डावपेच खेळण्यात धन्यता मानली. त्यामुळे त्यांची आज दुर्दशा झालेली आहे. आपल्याच चेल्याकडून धोबीपछाड खाण्य़ाची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. गुजरातच्या राजकारणात आडव्या गेलेल्या केशूभाई पटेल या धुर्त दिग्गज नेत्याची जी अवस्था मोदींनी केली त्यापासून अडवाणींनी धडा घ्यायला होता. मग त्यांच्यावर आज दिल्लीतला केशूभाई व्हायची वेळ आलीच नसती. चार दशकांपुर्वीचे कॉग्रेस सिंडीकेट वा गेल्या दोनपाच वर्षातला गुजरातचा केशूभाई, अशी अडवाणींची आजची केविलवाणी स्थिती आहे. मोदींच्या नावाला अपशकुनापेक्षा अधिक काही करणे त्यांच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही.
विश्लेषण चांगले आहे.
ReplyDelete