भाजपामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून उठलेले वादळ आजचे नाही. त्याची सुरूवात किमान तीन वर्षे आधीपासून झाली होती. कारण त्या पक्षाचे व एकूणच भारतीय राजकारणातले भीष्माचार्य असलेले लालकृष्ण अडवाणी यांना स्वपक्षात नव्या नेतृत्वाचे उभे रहात असलेले आव्हान सर्वात आधी त्यांनाच जाणवले होते. त्यामुळेच त्यांनी खुप आधीपासून मोदी यांना दिल्लीत येण्य़ापासून रोखण्याची मोर्चेबांधणी सुरू केलेली होती. त्यासाठी आधी पाच वर्षे हेच राजनाथ सिंग पक्षाध्यक्ष झाले, तेव्हा अडवाणींनीच संसदीय मंडळासह अन्य कुठल्याही राष्ट्रीय पदावर मोदी यांची वर्णी लागणार नाही; याची पुरेपुर काळजी घेतली होती. याचे कारण विरोधी व बदनामीकारक बातम्या व प्रचारातून देशव्यापी प्रतिमा व लोकप्रियता कशी तयार होऊ शकते, हे अडवाणींनी दोन दशकांपुर्वीच अनुभवलेले होते. तेव्हा रामजन्मभूमी व रथयात्रा यातून कट्टरपंथी व हिंदूनिष्ठ, मुस्लिमद्वेष्टे अशी अडवाणी यांची जी प्रतिमा माध्यमांनी व सेक्युलर विचारवंतांनी उभारली; त्यातूनच भाजपा शून्यातून पुन्हा उभा राहिला होता. ते जसे अडवाणींचे श्रेय होते, तसेच त्याचे श्रेय सेक्युलर गोटालाही होते. गुजरातच्या दंगलीत नवखे मुख्यमंत्री असल्याने बावचळून गेलेल्या मोदींना प्रादेशिक लोकप्रियता खुप मिळाली; पण देशभर त्यांची प्रतिमा डागाळलेली होती. मात्र त्याबद्दल मोदींनी कुठलाच विचार केला नव्हता. त्यांच्या त्याच बदनामीने त्यांना हिंदुहृदयसम्राट बनवले आणि मोदी त्यातून राजकारणातले डावपेच शिकत गेले. खरे तर तेव्हा अडवाणी केंद्रात गृहमंत्रीपद संभाळण्यापेक्षा पक्षात अध्यक्ष म्हणून असते; तर त्यांना मोदी समर्थक म्हणून बहुसंख्य हिंदू समाजात आपली आणखी कडवी प्रतिमा उभारण्याची संधी मिळाली असती.
कारण नंतर सोनिया गांधींनी व माध्यमांनी वाजपेयी व एनडीए सरकारला कोंडीत पकडण्यासाठी गुजरातच्या दंगलीला राष्ट्रीय मुद्दा बनवून टाकले. त्यावेळी तिचा लाभ उठवण्याऐवजी अडवाणी पुढला पंतप्रधान म्हणून आपली सेक्युलर उदारमतवादी प्रतिमा उभारण्यात दंग झाले होते. त्यांना गुजरात दंगल व तिचा राष्ट्रव्यापी अपप्रचार यातून मोदी हा राष्ट्रव्यापी आक्रमक हिंदू नेता म्हणून पुढे येण्याचा धोका वेळीच ओळखता आला नाही. जेव्हा २००४ मध्ये बहुमतासह सत्ता गमावली व पंतप्रधानपद हुकले; तेव्हाही अडवाणी युपीए सरकार कोसळून एनडीएचे समिकरण जमवण्याच्या भ्रमात गर्क होते. थोडक्यात गुजरातची दंगल व त्यासाठी होणार्या टिकेसह सर्व अपप्रचाराचा भडीमार एकट्या मोदींना सोसावा लागला. भाजपाने व त्याच्या श्रेष्ठींनीही मोदींपासून अलिप्त रहाण्याचाच प्रयास केला होता. पण २००७च्या विधानसभा निवडणूकीत मोदींनी राज्यात दुसर्यांदा बाजी मारली आणि त्यांच्याविषयीची उत्सुकता देशभर वाढत गेली. बिहारपासून उत्तरप्रदेश वा कर्नाटकपर्यंत गुजरात दंगल व मोदी हा विषय प्रचारात येऊ लागला आणि बिहारमध्ये तर मित्रपक्ष असून नितीशकुमारांनी मोदींना लक्ष्य केले. त्यातून एका राज्याचा हा मुख्यमंत्री सतत उत्सुकतेचा विषय बनत गेला. एकीकडे हा भडीमार सोसताना त्याने राज्यात कारभार सुटसुटीत व्हावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना फ़ळे येऊ लागली. मग त्याचा तपशील हळुहळू बाहेर येऊ लागला, तसे त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढत गेले. तिथून म्हणजे २००९ च्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान अडवाणींना मोदींच्या क्षमतेची थोडीफ़ार कल्पना येऊ लागली होती आणि त्यांनी दिल्लीत मोदीविरोधी मोर्चेबांधणी सुरू केलेली होती. त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय पदांपासून बहिष्कृत ठेवायचे डाव अडवाणी यशस्वीरित्या खेळले.
पण पुढे अनेक उद्योगपती व माध्यमेही मोदींच्या राष्ट्रीय राजकारणात येण्याची भाषा गंमतीने बोलू लागली आणि त्याची शक्यता चाचपडताना मोदी तयारीने त्या दिशेला वळले. भाजपाच्या संसदीय मंडळात व सर्व अधिकार पदांवर आपले होयबा आणून अडवाणी यांनी मोदींसाठी दिल्लीचा रस्ता बंदच केलेला होता. मग दोन वर्षापुर्वी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने युपीए सरकारच्या तोंडचे पाणी पळवल्यावर त्या राष्ट्रीय प्रक्षोभाचा लाभ उठवायला बाहेर पडलेल्या अडवाणी यांनी, रथयात्रेचा मनसुबा जाहिर केला. त्याआधीच्या सर्वच यात्रा गुजरातमधून सुरू करणार्या अडवाणी यांनी यावेळी मुद्दाम मोदींचा नामोहरम करण्यासाठी बिहारमधून यात्रेचा आरंभ करण्याची घोषणा केली. ती दोन वर्षापुर्वीची म्हणजे २०११च्या सप्टेंबर महिन्यातली होती. अडवाणींच्या त्याच भ्रष्टाचार विरोधी रथयात्रेला नितीशकुमारांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेले होते. मोदी विरुद्ध अडवाणी नाटकाचा तो पहिला खुला प्रवेश होता. मोदी यांनी आपली महत्वकांक्षा जाहिर करण्यापुर्वी गुरूचेल्याच्या भांडणाचा तो पहिला प्रवेश होता. पण त्याचाही पहिला अविष्कार अडवाणी यांनीच केला होता. आपल्या समोरचे आव्हान त्यांनी प्रथम असे उघड केले आणि मग मोदींना आपल्या गुरूचा सन्मान राखून त्यांचा आशीर्वाद घेण्याची गरजही उरली नाही. कारण अन्य पक्षासह स्वपक्षातले अडथळे मोदींच्या नजरेत आले आणि त्यांनी दुरगामी रणनिती आखून दिल्लीकडे वाटचाल सुरू केली. त्यात पहिला टप्पा होता, गुजरात विधानसभा पुन्हा मोठ्या बहूमताचे जिंकणे आणि मग सगळीकडे रान उठवून दिल्लीच्या वर्तुळात आपल्याला घेण्य़ासाठी दबाव निर्माण करणे. त्यानुसार सर्व घटना घडत आल्या आणि जणू विरोधकही मोंदींच्या रणनितीनुसारच खेळी करतात, असे म्हणायची पाळी आज आलेली आहे.
No comments:
Post a Comment