हा चेहरा ओळखता? त्याचे नाव आहे. टी. अंजय्या. तेव्हा तो आंध्रप्रदेशचा मुख्यमंत्री होता. तो तीन दशकांपुर्वीचा मनमोहन होता. ज्याने युवराजांनी जाहिर अपमान केल्यावर डोळ्यात पाणी आणले होत आणि एक राजकीय इतिहास घडला होता. नवे युवराज त्यापासून काही शिकलेले नाहीत किंवा कॉग्रेसजन धडा घेऊ शकलेले नाहीत. म्हणून इतिहास घडायचा थांबतो काय?
१९८० सालात जनता पक्षाच्या दिवाळखोरीमुळेच आणिबाणीने बदनाम झालेला व फ़ाटाफ़ुट झालेला कॉग्रेसचा इंदिरा गट पुन्हा प्रचंड बहूमताने सत्तेवर आला. त्यामुळे कॉग्रेस पक्ष नेस्तनाबुत होऊन नेहरूगांधी खानदानाची खाजगी मालमत्ता अशी त्या पक्षाची अवस्था होऊन गेली. त्याचे परिणाम विनाविलंब दिसलेले होते. देशभरात कॉग्रेस धुळीस मिळाली, तेव्हाही इंदिरा गांधीच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या आंध्रप्रदेशात कॉग्रेसचाच मुख्यमंत्री होता आणि संजय गांधी यांच्या निधनाने घराण्याचा वारसा चालवायला आलेल्या राजीव गांधी यांनी पक्षाची सुत्रे हाती घेतलेली होती. त्याच निमित्ताने हैद्राबादला आलेल्या नवख्या राजीवनी तिथल्या बेगमपेट विमानतळावर जाहिरपणे पत्रकारांच्या साक्षीने मुख्यमंत्री टी. अंजय्या यांना असे अवमानित केले, की आजुबाजूचे लोक बघतच राहिले. खुद्द अंजय्यांनाही रहावले नाही. त्यांचे डोळे त्या अपमानाने डबडबले. सहाजिकच ती घटना लपून राहिली नाही व त्याचीच मग तेलगू वर्तमानपत्रात हेडलाईन झालेली होती. त्या बातमीचा तेलगू जनमानसावर इतका प्रभाव पडला, की तिथला लोकप्रिय सुपरस्टार एन. टी. रामाराव यांनी तो विषय आंध्रच्या तेलगू अस्मितेचा अवमान ठरवून संताप व्यक्त केला. आंध्रच्या मुख्यमंत्र्याचा राजीव गांधींनी अशा जाहिरपणे व असभ्य भाषेत केलेला अवमान म्हणजे तेलगू अस्मितेची पायमल्ली असल्याचीच सार्वत्रिक भावना झाली होती. मग रामाराव यांनी तिचाच हुंकार केला होता. मात्र ज्याचा अपमान व अवमान झाला तो मुख्यमंत्री गुपचुप बसला होता आणि आंध्रातील तमाम कॉग्रेसी नेते राजीव गांधींचे समर्थनच करीत त्या अपमानाची थुंकी झेलण्यात धन्यता मानत होते. ही घटना आहे १९८२ सालची. शुक्रवारी राहुल गांधींनी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती केली म्हणायची.
फ़रक आहे तो मुख्यमंत्र्याच्या जागी पंतप्रधान पदाच्या पायमल्लीचा. तेव्हा अंजय्या गप्प बसले आणि आज देशाचे पंतप्रधान आपल्यावर राजपुत्राने मुर्खपणाचा शिक्का मारल्यावरही गप्प आहेत. तेव्हाच्या आंध्रप्रदेशी कॉग्रेसी नेत्यांप्रमाणेच आजचे देशभरातील कॉग्रेस नेतेही राहुलचेच गुणगान करीत भारतीय सार्वभौमत्वाला अपमानित करण्य़ाला टाळ्या वाजवित आहेत. पण म्हणून सामान्य भारतीय जनता गप्प बसेल काय? अर्धपोटी जीवन कंठणारॊ सामान्य जनता आपल्या अभिमान व स्वाभिमानावर जगत असते आणि त्याला धक्का लागला, मग मोठमोठी साम्राज्ये व राजघराणी उलथून पाडते, असा जगाचा इतिहास आहे. तेच तेव्हा आंध्रप्रदेशात घडले होते. तेव्हा त्या जनतेच्या भावना ओळखून कुठला विरोधी पक्ष तेलगू स्वाभिमान अस्मितेची जपणूक करायला पुढे आला नाही. पण लोकप्रिय अभिनेता रामाराव पुढे सरसावले होते आणि त्यांनी थेट नवा राजकीय पक्ष स्थापन करून कॉग्रेसला आव्हान दिले होते. कुणा राजकीय नेता, अभ्यासक वा पत्रकाराला त्यात तथ्य वाटले नव्हते. म्हणूनच कुठला पक्ष रामाराव यांच्या मदतीला उभा राहिला नाही, की त्यांच्या सोबत गेला नाही. पण सामान्य तेलगू जनता त्यांच्या पाठीशी आपल्या स्वाभिमानासाठी ठामपणे उभी राहिली होती. अवघ्या काही महिन्यातच आलेल्या विधानसभा निवडणूकीत मग त्याच तेलगू जनतेने कॉग्रेसचा धुव्वा उडवला होता. आणि पुढे दिड वर्षानंतर इंदिरा हत्येनंतर देशभर राजीव लाट आली, तरीही त्याच आंध्रप्रदेशात कॉग्रेसचे पानिपत झाले होते. अपमानाने सामान्य जनता किती विचलीत होते व राजघराण्यांना धडा शिकवू शकते, त्याचा हा अलिकडला भारतीय इतिहास आहे. राहुलच्या शुक्रवारच्या नाटकात तोच भारतीयांचा स्वाभिमान दुखावला गेलेला नाही काय?
दिसायला व असायला मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान आहेत. पण त्यांच्या सरकारचे तमाम निर्णय व धोरणे सोनिया गांधीच ठरवतात हे आता कोणापासून लपलेले नाही. निर्णय सोनिया व राहुल घेतात आणि पंतप्रधान नुसती मान डोलावत त्याला होकार भरतात. म्हणूनच दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींची निवड रद्दबातल करण्याच्या न्यायालयीन निकालाला स्थगिती देणारा अध्यादेश काढण्याची जबाबदारी, पंतप्रधान असले तरी मनमोहन सिंग यांची नव्हती. त्यासाठी सोनियाच नव्हेतर राहुल गांधीही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळेच जे काही झाले व अध्यादेश राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला, त्यात मुर्खपणा झालाच असेल तर तो मनमोहन सिंग म्हणजे भारताच्या पंतप्रधानाचा नसून, तसा निर्णय घेणार्या बेजबाबदार लोकांचा आहे. त्यात राहुल व सोनिया गांधीच प्रमुख आहेत. कारण त्यांच्या मान्यता व इच्छेशिवाय सरकार व पक्षातील पान हलत नाही, हे सर्वच जाणतात. म्हणूनच मुर्खपणाच म्हणायचा असेल तर राहुल गांधी यांनी सरकारला, म्हणजे पर्यायाने पंतप्रधानाला दोष देऊन अपमान करण्यापेक्षा स्वत:च पुढे येऊन माफ़ी मागायला हवी होती. पण शहाजोगपणा करीत त्यांनी आपल्या निर्णयाची जबाबदारी मनमोहन यांच्या माथी मारून पंतप्रधानाला मुर्ख म्हणायची अवज्ञा केलेली आहे. तो माणूस भले तुमच्या खानदानाचा निष्ठावान गुलाम असेल. पण घटनात्मक कारणास्तव तो देशाचा सर्वोच्च सत्ताधीश आहे. म्हणूनच त्याची जाहिरपणे बेअब्रु करणे म्हणजे भारतीय नागरिकाची अस्मिताच पायदळी तुडवणे आहे. इतिहासापासून राहुल आणि कॉग्रेसजन काही शिकायला तयार नसले, म्हणून जनता धडा शिकवायची थांबत नाही. म्हणूनच म्हणतात इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.
No comments:
Post a Comment