कॉग्रेस पक्षाला व त्याने चालविलेल्या युपीए सरकारला ह्या देशात सव्वशे कोटी मुर्ख वसतात, असे वाटते काय? कारण आता शंका घ्यायची वेळ आलेली आहे. ज्याप्रकारे शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या प्रेसक्लबमध्ये राहुल गांधी आले व त्यांनी आपल्याच पंतप्रधान व सरकारने आणलेल्या आध्यादेशाची लायकी जगासमोर मांडली, त्यातून पक्षासह सरकारची अब्रुच लयास गेली आहे. ही पत्रकार परिषद पक्षाचे माध्यमप्रमुख असलेले अजय माकन घेत होते. त्यात त्यांना दोषी लोकप्रतिनिधींच्या संरक्षणार्थ जारी व्हायच्या अध्यादेशाबद्दल पत्रकार प्रश्न विचारत होते. त्या अध्यादेशाला भाजपाने उघड विरोध केला आहे व त्यावर सही करू नये, असे खुद्द राष्ट्रपतींना भेटून आवाहन केले होते. तरी कॉग्रेसचे तमाम मंत्री, नेते व प्रवक्ते गेले दोन दिवस भाजपाची निर्भत्सना करीत त्या अध्यादेशाचे समर्थन करीत होते. अगदी ज्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी अचानक येऊन घुसले; त्यातही अजय माकन तेच करीत होते. पण तिथे येऊन थडकलेल्या राहुलनी स्वपक्षाच्या त्याच अध्यादेशाला शुद्ध मुर्खपणा ठरवून तो फ़ाडून फ़ेकून देण्याच्या लायकीचा असल्याचे सांगून टाकले. तिथे व्यासपीठावर शेजारी बसलेले माकनच नव्हेतर समोर बसलेल्या पत्रकारांवरच अचंबित व्हायची पाळी आली. कारण काही मिनीटापुर्वीच माकन त्याच एका अध्यादेशाचे तावातावाने समर्थन करीत होते. आणि अकस्मात तिथे आलेल्या राहुलनी त्यालाच मुर्खपणा ठरवून पक्ष व सरकारसह तमाम नेते, प्रवक्त्यांना मुर्ख घोषित करून टाकले. परिणामी काही मिनीटापुर्वी बोललेले शब्द प्रमुख प्रवक्ता असलेल्या माकन यांना गिळायची लाजीरवाणी पाळी आली. पण आले राहुलच्या मना, तिथे कॉग्रेसचे काही चालेना; अशी आज त्या पक्षाची अवस्था असल्यावर दुसरे काय व्हायचे?
एकूणच कॉग्रेस पक्षाची आजची अवस्था किती हास्यास्पद आहे त्याचे हे जाहिर प्रात्यक्षिक होते. इथे माकन यांना तोंडघशी पडावे लागले. कारण आपल्याला जी मुक्ताफ़ळे उधळायची होती, ती उधळून राहुल गांधी पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे व खुलासे नाकारून उठून निघून गेले. त्यासाठी पत्रकारांकडुन व्हायच्या सरबत्तीच्या तोंडी माकन यांना सोडून राहुल गांधी निसटले. तशीच काहीशी अवस्था तोंडाळ माहितीमंत्री मनिष तिवारी यांची झाली. राहुलच्या त्या कोलांटी उडीने सर्वच वृत्तवाहिन्यांवर ब्रेकिंग न्य़ुज झालेली असतानाच, तिवारी पत्रकारांशी काही बोलत होते व अध्यादेशाचे महात्म्य तपशीलवार सांगत होते. इतक्यात राहुलच्या ‘शहाणपणाचा दाखला’ कोणीतरी त्यांच्या कानी घालून त्याबद्दल खुलासा विचारला. तेव्हा तिवारींची तारांबळ उडाली. पक्षाच्या उपाध्यक्षांची भूमिका आपल्याला नेमकी ठाऊक नाही. त्यामुळे ती समजून घेतल्यावरच आपली प्रतिक्रिया देऊ; म्हणत तिवारींना काढता पाय घ्यावा लागला. तिकडे त्या प्रेसक्लबच्या पत्रकार परिषदेत बिचारे माकन अर्धातास आधी आपणच ठासून मांडलेले मुद्दे खोडण्याची कसरत करीत होते आणि राहुल मुर्खपणा म्हणतात, तर अध्यादेश मुर्खप्णाच असणार, हेच पक्षाचे मत असल्याची सारवासारव करू लागले होते. एकूण काय; गेली दहा वर्षे देशात कॉग्रेस चालवित असलेले युपीएचे मनमोहन सरकार व त्याचे निर्णय, हा कसा निव्वळ मुर्खपणा व अनागोंदी कारभार आहे, याचीच ग्वाही पत्रकारांना देऊन राहुल गांधी निसटले होते. त्यामुळे मग त्यांच्याच चहात्या, अनुयायी व पक्षाची अब्रु झाकण्यासाठी तारांबळ उडालेली आहे. बिचारे पंतप्रधान तिथे अमेरिकेत आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांना प्रश्न पडला असेल; आपण कुणा मुर्खाशी हातमिळवणी करीत आहोत?
हा अध्यादेश कोणी दारू झोकून काढलेला नाही. दीड महिन्यापुर्वी त्यासंबंधीचे विधेयक मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमत झाले होते व राज्यसभेत मांडलेले होते. त्यावर चर्चा होऊन ते फ़ेरविचारार्थ स्थायी समितीकडे पाठवलेले होते. संसदेचे अधिवेशन लांबवून त्यावर निर्णय घेता आलेला नव्हता. लोकसभेत तर ते मांडताच आलेले नव्हते. असे असताना पुन्हा त्या संबंधाने विविध पक्षांशी सल्लामसलत करून त्याचा मसूदा बदलण्याचे सत्ताधारी पक्षाने मनावर घेतले होते. त्यानंतरच त्याचा नवा मसूदा बनवून तो अध्यादेश म्हणून राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवण्यात आला. पण त्याच सुगावा लागताच विरोधी नेत्यांनी त्याला विरोध असल्याचे विनाविलंब जाहिर केले होते. चोविस तास उलटण्यापुर्वीच लोकसभा व राज्यसभेचे विरोधी नेते राष्ट्रपतींना भेटले व त्या अध्यादेशाला मान्यता देऊ नये, असे त्यांनी सुचवले होते. त्यानंतर राष्ट्रपतींनी तीन संबंधीत मंत्र्यांना पाचारण करून खुलासा मागितला होता. त्यातून राष्ट्रपतीही गडबडले असल्याचे स्पष्ट झाले होते. म्हणजे अध्यादेश राष्ट्रपतींकडे गेल्यावर पन्नास तासांचा अवधी गेला होता. दोन रात्री त्यासंबंधी राष्ट्रीय वाहिन्यांवर खडाजंगी चर्चा झालेली होती. कॉग्रेसने त्याचे समर्थन केलेले होते. तोपर्यंत राहुल गांधी झोपा काढत होते काय? आपल्याच पक्ष व सरकारमध्ये चाललेला तद्दन मुर्खपणाचा त्यांना थांगपत्ता नसेल, तर पक्षाचे दुसर्या क्रमांकाचे नेता म्हणून ते काय करत असतात? की राष्ट्रपतींच्या शंका आणि उमटलेली सार्वत्रिक नाराजीची भावना पाहून राहुलना आयुष्यात प्रथमच शहाणपणा व मुर्खपणातल्या फ़रकाविषयी काही दैवी साक्षात्कार घडला? की जे पाप घडले त्यापासून आपली कातडी बचावण्यासाठी ही पळवाट शोधली म्हणायची? सोनिया वा राहुलच्या संमती वा मान्यतेशिवाय पंतप्रधान व मंत्री असा अध्यादेश काढण्यापर्यंत मजल मारू शकले, यावर लोक विश्वास ठेवतील इतके भारतीय नागरिक मुर्ख आहेत अशी राहुलची समजूत आहे काय? की याला झोपी गेलेला जागा झाला म्हणायचे?
हे अजूनही तंतोतंत लागू होतंय राव....
ReplyDelete