Monday, September 16, 2013

नरेंद्र मोदी २४ घंटे



  सध्या कुठल्याही वाहिनीवर बातम्या बघण्याची वा ऐकण्याची सोय राहिलेली नाही. कुठले वर्तमानपत्रही वाचायची गरज उरलेली नाही. त्यात ‘ओम नमो शिवाय’ दुसरे काहीच नसते. गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी याला त्याच्या पक्षाने पंतप्रधान पदासाठी आपला उमेदवार घोषित केला आहे आणि जणू या देशात गुजरातची दंगल घडल्यानंतर काहीच घडलेले नाही. घडलेच वा घडतच असेल; तर ते मोदी काही करतात तेवढेच. अन्यथा काही घडायला वावच उरलेला नाही. कारण बातम्या व चर्चेची अर्धीअधिक वेळ त्याच दोन गोष्टींनी व्यापलेली असते. नरेंद्र मोदी काही बोलले वा कुठे गेले, तर ती बातमी असते आणि अर्थातच तिथे जाऊन वा काही बोलून त्यांनी मोठेच काही पाप केलेले असते. बाकी भारतामध्ये काही घडत नाही. दोन महिन्यापुर्वी बिहारच्या गया जिल्ह्यात महाबोधी मंदिरामध्ये एक मोठी घातपाताची घटना घडून गेली आहे. त्यात गुंतलेले कोणी संशयितही अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्याच संदर्भाने कोणीतरी मुंबईत असेच स्फ़ोट करण्याची धमकी दिलेली आहे. त्याबद्दलही कोणी पुढली बातमी वा माहिती देण्याचा विचार करत नाही. स्फ़ोटासारख्या घातपाती घटना व त्याचे परिणाम याकडे साफ़ डोळेझाक करून युरोपातल्या एका वृत्तसंस्थेला मोदी यांनी दिलेल्या मुलाखतीवरून काहूर सुरू झाले. त्यात मोदी यांनी गाडीखाली कुत्र्याचे पिल्लू सापडण्याबद्दल जे मतप्रदर्शन केले; त्याची सर्वांना इतकी फ़िकीर होती, की आजवर शेकडो स्फ़ोटात मृत्यूमुखी पडलेल्या हजारो निरपराध नागरिकांच्या जीवाची काही किंमतच नसावी. मोदी यांनी कुत्र्याच्या पिल्लाचीच उपमा कशाला द्यावी; यावरून शब्दांचे मनोरे उभे केले जात होते आणि कोसळूनही पाडले जात होते. पण तसे बोलताना मोदी यांना काय म्हणायचे आहे वा सुचवायचे आहे त्याकडे कोणाचे लक्षही नव्हते.

   माणुस हा किती हळवा प्रांणी आहे ते समजावण्यासाठी मोदी यांनी म्हटले गाडीखाली कुत्र्याचे पिलू सापडले, तरी आपण हळहळतो. आपण दु:खी होतो. तेव्हा त्यांना माणसाच्या मृत्य़ुने किती दु;ख होत असेल, असेच सुचवायचे आहे. त्यात मारल्या जाणार्‍या वा मरणार्‍या माणसांना कुत्रा संबोधण्याचा त्यांचा हेतू नाही. पण ज्यांना कंड्याच पिकवायच्या असतात, त्यांच्यासाठी वडाची साल पिंपळाला लावणे आवश्यकच असते. तसेच झाले आणि त्या परदेशी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखती तपशीलाकडे साफ़ पाठ फ़िरवून कुत्र्याच्या पिल्लावर सगळे गिधाडाप्रमाणे तुटून पडले. ही आता एक फ़ॅशन झाली आहे. आणि त्यालाच कंटाळलेल्या मोदी यांनी गेल्या तीन चार वर्षापासून भारतीय माध्यमांशी बोलणेच बंद केले आहे. जे आपल्या शब्दाचा अनर्थच करण्याची खात्री आहे, त्यांना टाळणे हा उत्तम मार्ग मोदींनी चोखाळला आहे. पण माध्यमांचे दुर्दैव आता असे आले आहे, की त्यांना आपला वाचक प्रेक्षकवर्ग टिकवण्यासाठी मोदींच्या नावाचा व चेहर्‍याचा वापर अगत्याचा झालेला आहे. हे रहस्य मोदींनाही उमगलेले आहे. त्यामुळेच त्यांनी भारतीय माध्यमांवर बहिष्कार घातला असून आपल्याला हवे ते अन्य माध्यमातून मोदी थेट लोकांपर्यंत पोहोचवू लागले आहेत आणि आपली टीआरपी वा खप राखण्यासाठी माध्यमांनाच मोदीबद्दल बरेवाईट छापावे वा सांगावे दाखवावे लागते आहे. तसे सांगण्याच्या शर्यतीमध्ये मग थापा मारण्यापर्यंत मजल गेली आहे. उत्तराखंडात ढगफ़ुटीनंतर पोहोचलेल्या मोदींनी काय काय केले, ते सांगताना टाईम्ससारख्या मान्यवर दैनिकाकडून अफ़वा पसरवली गेली आणि नंतर त्यालाच जाहिर माफ़ी मागण्याची वेळ आली. मात्र टाईम्सवर विसंबून बाकीच्यांनी केलेली बकवास तोंडघशी पाडणारी ठरली आहे.

   ढगफ़ुटी व नंतरचा महापूर आल्यावर तिथे मदतीला पोहोचलेल्या मोदींनी माध्यमांना वा पत्रकारांना काहीही सांगितले नव्हते. त्यांच्या पक्षातर्फ़े वा गुजरात सरकारनेही त्या मदत कार्याबद्दल कोणाला अधिकृत माहिती दिली नाही. पण मोदी तिथे चमकायला गेले अशी टिका मात्र सगळीकडून झाली. प्रत्यक्षात तिथे गेलेल्या मोदींनी आपल्या राज्याच्या सरकारी आपत्ती व्यवस्थापनाची टीम तिथे बोलावुन घेतली होती. त्यांच्यावर काम सोपवून मोदी उत्तराखंडातून निघाले. मग मोदी विषयक बातमीच्या मागे धावणार्‍या टाईम्सच्या पत्रकाराने स्थानिक भाजपाच्या कार्यकर्त्या विचारून माहिती गोळा केली व त्याने उत्साहाच्या भरात जे काही सांगितले त्याचा तारतम्याने विचारही न करता टाईम्समध्ये अतिरंजीत बातमी छापली गेली. मग तिची चिरफ़ाड सुरू झाली. मोदींनीच अशी खोटी माहिती दिली असे आरोप झाले, त्यांची टवाळी करण्यात आली. पण मोदींनी त्याचेही उत्तर दिले नाही, की खुलासे पाठवले नाहीत. शेवटी आपली बातमी खोटी व अतिरंजित असल्याचे त्याच पत्रकाराला व टाईम्सला खुलासा करून सांगायची वेळ आली. थोडक्यात आता मोदी या विषयात माध्यमांची विश्वासार्हता पुरती रसातळाला गेलेली आहे. त्यांनी कितीही विरुद्ध लिहिले व अफ़वा पसरवल्या; तरी मोदींना त्याचा खुलासाही करण्याची गरज वाटेनाशी झाली आहे. तर दुसरीकडे माध्यमांना मात्र मोदींच्या लोकप्रियतेचे लाभ हवे असल्याने रोजच्या रोज खरेखोटे काहीही सांगत मोदींचे नाव बातमीत आणायची नामुष्की आलेली आहे. त्यामुळेच मग उपग्रहवाहिन्यांची अवस्था मोदी २४ घंटे म्हणावी, तशी झालेली आहे. जणू क्रिकेटच्या सामन्याचे समालोचन करावे तसे मोदींच्या हालचाली व बोलीचे प्रसारण चालू असते.  थोडक्यात अमेरिकन सरकार आणि आपल्याकडल्या माध्यमांची अवस्था सारखीच आहे. अमेरिकन सरकारकडे मोदींनी न मागितलेला व्हिसा आपण नाकारला असल्याचे ते सरकार सांगत असते आणि इथली माध्यमे मोदींनी त्यांना दिल्या नसलेल्या मुलाखती संबंधी वादविवाद करीत असतात.

No comments:

Post a Comment