Monday, September 16, 2013

कोण तो इंडीयन मुजाहिदीन?



  या वर्षाच्या आरंभीच देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जयपूर येथे कॉग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय चिंतन शिबीरात बोलताना देशासमोरचा सर्वात मोठा धोका हिंदू दशशतवाद असल्याची घोषणा करून टाकली होती. तेव्हा त्यांच्या त्या विधानाला सर्वात उत्तम व उत्स्फ़ुर्त प्रतिसाद सीमेपलिकडून आलेला होता. शिंदे यांचे मन:पुर्वक स्वागत करणारे पहिले मतप्रदर्शन लष्करे तोयबाचे म्होरके आणि जमात उद दावाचे प्रमुख सईद हफ़ीज यांनी केलेले होते. त्यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले होते आणि तात्काळ त्या हिंदू दहशतवादाच्या मुसक्या बांधण्याची मागणी केलेली होती. यापेक्षा आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांची सर्वोत्तम तारीफ़ काय असू शकते? संयुक्त राष्ट्रसंघासह अमेरिकेने ज्याला जगातला प्रमुख घातक दहशतवादी म्हणून घोषीत करून त्याच्या डोक्यावर कित्येक लाख डॉलर्सचे बक्षिस लावले आहे; त्याने भारतीय गृहमंत्र्याला प्रमाणपत्र द्यावे, यातच भारतीय जनतेच्या सुरक्षेच्या दुरावस्थेची कल्पना येऊ शकते. जेव्हा देशाचा गृहमंत्रीच अशी विधाने करतो; तेव्हा डझनावारी स्फ़ोटात संशयित असलेले आरोपी व संघटना यांना घाबरून जाण्याचे कारण उरत नाही आणि त्यांच्या पाठीराख्यांना तोंड लपवून कारवाया करायचीही गरज उरत नाही. सहाजिकच अशा शेकडो स्फ़ोट व घातपातात संशय असले्ली इंडीयन मुजाहिदीन नावाची कुठली संघटनाच नाही आणि भारतीय पोलिस व तपासयंत्रणांनी उभा केलेला तो एक बागुलबुवा आहे; असा दावा झाला तर नवल नव्हते. देशातल्या कित्येक प्रमुख मुस्लिम नेत्यांनी आजवर प्रत्येकवेळी तसा दावा केला होता आणि दोनच आठवड्यापुर्वी नेपा्ळच्या सीमेवर पोलिसांनी एक असा आरोपी पकडला, की जो त्याच संघटनेचा संस्थापक आहे. आता तर त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे अनेक जागी छापे घालून नव्वद स्फ़ोटाला सज्ज असे बॉम्ब पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत.

   दोनच महिन्यांपुर्वी युपीए सरकारमधील कॉग्रेसचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री रेहमान खान यांनी पंतप्रधान व पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची खास भेट घेऊन घातपाताच्या आरोपाखाली अटक झालेल्या तमाम मुस्लिमांच्या प्रकरणांची फ़ेरतपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी केलेली होती. त्यात त्यांनी भारतीय पोलिस व तपासयंत्रणा खोटे आरोप ठेवून अकारण दिर्घकाळ मुस्लिमांना गजाआड डांबून ठेवतात; असा आरोप केला होता. त्यांच्यासहीत सर्वच राजकीय पक्षातल्या प्रत्येक मुस्लिम नेत्यानेही इंडीयन मुजाहिदीन ही संघटना म्हणजे बागुलबुवा असल्याचा दावा सतत केलेला आहे. कारण या संघटनेचे नाव अनेकदा समोर आलेले असले, तरी तिचा ठावठिकाणा व त्यातील कुणा नेत्याचा थांगपत्ता लागत नव्हता. यासिन व रियाझ या दोघा भटकळ बंधूंचे नाव त्यात पुढे यायचे. पण प्रत्येक घातपातानंतर हे निसटलेले असत. त्यांच्या मुक्कामाच्या जागाही बदलत होत्या आणि मुळच्या गावात कुठे काही हाती लागत नव्हते. त्यामुळेच पोलिसांनाही तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा लागत होता. सतरा दिवसांपुर्वी यासिन अलगद पोलिसांच्या हाती लागला आणि इंडीयन मुजाहिदीन हा बागुलबुवा नसल्याचे उघड झाले. आता त्याच्या पुढला टप्पा गाठला गेला आहे. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे अनेक जागी छापे घातले असता नव्वद स्फ़ोटाला सज्ज असलेले बॉम्ब पोलिसांच्या हाती लागले आहेत. थोडक्यात ही संघटना असल्याचाच नव्हे तर ती अत्यंत घातक असे बॉम्ब बनवून हिंसाचार हत्याकांड घडवत असल्याचा पुरावाच समोर आलेला आहे. तेव्हा त्याच कुणा मुस्लिम नेत्याने तपास यंत्रणांची माफ़ी मागण्याचे साधे सौजन्य दाखवलेले नाही.

   अर्थात कोण कशाला माफ़ी मागणार? पकडलेले आरोपी मुस्लिम असले आणि पुरावेही सापडलेले असले, म्हणून त्यात कोणी हिंदू नाही ही गृहमंत्र्यांची अडचण असावी. कारण तपासयंत्रणा व पोलिस खात्यावर अधिकार असलेल्या गृहमंत्र्यांना मुस्लिम दहशतवाद असतो वा र्त्याचा देशाला धोका आहे; असेच जर वाटर नाही. तर बाकीच्या पुराव्यासह आरोपी पकडून उपयोग तरी काय? असा गृहमंत्री जेव्हा आपल्याच पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करीत असतो; तेव्हा खरे जिहादी मोकाट सुटले तर कुठले नवल? एकाच जागी नव्वद सज्ज बॉम्ब तयार मिळावेत आणि त्यासाठी लागणारी स्फ़ोटके व टायमर वगैरे साधने साठवलेली असावीत, हे नवल नाही. जिथे अशा संशयास्पद हालचाली होत असतात, तिकडे संशयाने बघायलाच बंदी असेल; तर पोलिसांनी तरी काय करावे? मंगलोर व हैद्राबाद अशा दोन मोठ्या शहरात मोक्याच्या स्थळी हे बॉम्ब व त्याचे सुटे भाग साठवलेले आढळले. तर इतके दिवस स्थानिक पोलिसांना त्याचा थांगपत्ता कसा लागला नव्हता? ही सामग्री व साहित्य कुठून तरी तिथे आणले गेले आणि आसपासच्या लोकांनाही त्याची थोडीफ़ार माहिती असणार. पण त्याचा सुगावा पोलिसांना का लागला नाही? पोलिस त्याबाबतीत गाफ़ील का राहिले? ही खरी समस्या आहे. कितीही संशयास्पद हालचाली होत असल्या तरी मुस्लिमांकडे शंकेने बघणेच गृहमंत्र्याला आक्षेपार्ह वाटणार असेल; तर पोलिस त्याचा वास तरी कशाला काढणार? त्यापेक्षा पोलिस संघाच्या शाखेवर खेळ चालले असतील, परेड चालू असेल, त्यावरच पाळत ठेवणार ना? मग यासिन मोकाट व्हायचाच. आणि मुस्लिम नेते गृहमंत्र्यालाच दम देऊन विचारणार ‘कोणाला इंडीयन मुजाहिदीन म्हणता?’

   ज्या मालेगावच्या एकाच स्फ़ोटाचा गेली पाच वर्षे हिंदू दहशतवाद म्हणून बागुलबुवा माजवला जातो, त्याच्या नव्वद पटीने अधिक बॉम्ब एकाच जागी सापडले तरी त्याला कोणी इस्लामी दहशतवाद म्हणणार नाही. इतका आपला सेक्युलर विचार मानसिक विकार होऊन गेला आहे. तिथे यासिन व इंडीयन मुजाहिदीन यांना उद्या खास बॉम्ब व स्फ़ोटके निर्मितीसाठी एस ई झेड सारख्या स्पेशल झोनची व्यवस्था करून दिली तरी आश्चर्य मानायचे कारण नाही. कदाचित त्या स्फ़ोटके व बॉम्ब उत्पादन करण्यात व्यत्यय येऊ नये म्हणून वेगळे स्फ़ोटक सुरक्षा विधेयक सोनियांनी आणले तरी कोणी नवल वाटून घ्यायला नको. ज्या पक्षाचे सेक्युलर विचार लष्करे तोयबा व सईद हफ़ीजशी जुळणारे असतात, त्यांच्याकडून जनतेने कुठल्या सुरक्षेची अपेक्षा बाळगावी?

No comments:

Post a Comment