Sunday, August 30, 2015

आपण गुन्हेगारांना असे अभय देतो?




बळी पडलेल्याचे आप्तस्वकीय गुन्हेगाराला कसे अनवधानाने वा अतिशहाणपणा करून महत्वाची मदत करतात, त्याला हातभार लावतात, त्याचा सज्जड पुरावाच शिना बोराचा प्रियकर राहुल मुखर्जी याने सादर केला आहे. याक्षणी जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार इंद्राणी मुखर्जी हिने आपला गुन्हा जवळपास कबुल केला आहे. तिचा दुसरा पती खन्ना यानेही त्यात आपला सहभाग असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच शिनाचा भाऊ मिखाईल बोरा व प्रियकर राहुल मुखर्जी यांच्यावर खुनाचा आरोप कोणी करू शकणार नाही. पण शिनाची हत्या झाल्याचे रहस्य सव्वा तीन वर्षे उलगडले नाही, त्याला हेच दोघे सर्वाधिक जबाबदार आहेत हे मात्र नाकारता येणार नाही. कारण इंद्राणीने जे खोटेपणाचे जाळे विणले होते, त्याला याच दोघांचे मौन किंवा लपवाछपवी मोठा हातभार लावून गेली आहे. मात्र इतकी वर्षे पोलिस काय करीत होते, असा सवाल विचारला जातो. कारण ‘आम्ही सारे’ तत्वानुसार कुठलाही गुन्हा घडला तर त्याचा शोध पोलिसांनी घ्यायचा असतो आणि त्यात बाकी कुणाचीच काही जबाबदारी नसते. शक्य ती व आवश्यक मदत मोकळेपणाने तपासकामात पोलिसांना देणे, हे सामान्य नागरिकाच कर्तव्य असते आणि त्यापैकी कुठली माहिती निर्णायक ठरते वा नाही, याची अक्कल त्या नागरिकांनी वा आप्तस्वकीयांनी वापरण्याचे कारण नसते. अतिशय किरकोळ वाटतील अशा गोष्टी तपासात किती निर्णायक असतात, त्याचा दाखलाच शिना बोरा तपासाने समोर आणला आहे. कुठल्याही कायदेभिरू नागरिकासाठी हा तपास उत्तम पाठ ठरावा, असे हे प्रकरण आहे. म्हणूनच किळसवाणे असले तरी त्याचा उहापोह आवश्यक आहे. जी माहिती आता बाहेर आली आहे, त्यात मिखाईल व राहुल यांचा हलगर्जीपणा कसा इंद्राणीच्या गुन्ह्यावर दिर्घकाळ पडदा टाकू शकला, त्याचा खुलासा यातून होतो.

यातील शिनाचा भाऊ मिखाईल म्हणतो, की त्याच वेळी इंद्राणीने आपल्याला ठार मारले असते. पण संशय आल्याने आपण निसटलो. आईने आपल्याला वरळी येथील घरी आणुन ठेवले होते आणि दुसर्‍या पतीच्या मदतीने गुंगीचा पदार्थ पाजला होता. म्हणून तो काही तास गुंगीत होता. त्याच दरम्यान खन्ना व इंद्राणी शिनाला आणायला गेलेले होते. शुद्ध आली तेव्हा जीवाच्या भयाने आपण पळ काढला व आसामला निघून गेलो, असे मिखाईलने पोलिसांना सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे. किंबहूना तेव्हाच शिनाला मारण्यात आल्याची त्याची शंका त्याने कुणालाही बोलून दाखवली नाही. कशासाठी तो गप्प राहिला? तीन वर्षे गेल्यावर आता मिखाईल हे बोलतो आहे. निदान शिनाचा प्रियकर राहुल याला तरी मिखाईलने ही माहिती वा शंका कथन करण्यात कुठली अडचण होती? कारण शिनाचा शोध घेण्याचा प्रयास राहुल मुखर्जी करीत होता. शिना बेपत्ता झाल्यावर अल्पावधीतच राहुलने खार पोलिस ठाण्यात त्याची तक्रार दिली होती. पण खरेच शिना बेपत्ता असल्याचे पोलिसांना पटावे, असा कुठलाही पुरावा राहुल देवू शकला नव्हता. म्हणूनच मग पोलिसांनी त्याबाबतीत हलगर्जीपणा केला. पण त्याला मुळात मिखाईल जबाबदार ठरत नाही काय? त्याने २४ एप्रिलचा आपला अनुभव व शंका राहुलला सांगितली, असती तरी राहुलने ती पोलिसांना सांगून तक्रारीचा पाठपुरावा करायला भाग पाडले असते. पण मिखाईल गप्प राहिला आणि राहुल एकटा पडला. मात्र राहुलने प्रयास सोडलेले नव्हते. कारण खार पोलिस ठाण्यात दाद लागत नाही, म्हणून त्याने इंद्राणीचे निवासस्थान असलेल्या वरळी पोलिस ठाण्यातही शिनाच्या बेपत्ता होण्याची तक्रार तेव्हाच केली होती. पण त्याचाही उपयोग झाला नाही. कारण वरळी पोलिसांना थातूरमातूर उत्तर देवून इंद्राणी प्रकरण दाबू शकली. हे मिखाईलचे पापच नाही काय?



पण प्रश्न तिथे संपत नाही, की राहुलचे वागणे जबाबदार ठरत नाही. वरळी पोलिसांनी इंद्राणीच्या घरी जाऊन चौकशी केली, तेव्हा तिने शिना अमेरिकेला उच्चशिक्षण घ्यायला गेल्याचे सांगून तपासावर बोळा फ़िरवला होता. त्यावर पोलिसांनी कुठल्याही पुराव्याशिवाय शंका घेण्याचे कारण उरत नव्हते. आणि त्या चौकशीनंतर पोलिसांनी राहुलला तेच उत्तर देवून विषय संपवला होता. मग शिनाने नाते संपवल्याचे राहुलला संदेशही पाठवले आणि त्यानेही शिना अमेरिकेला गेल्याचे गृहीत धरले. शिनाचा शोध घ्यायची त्याची इच्छा मरून गेली. इथपर्यंत गोष्ट ठिक आहे. पण नंतर काही दिवसांनी त्याच्या रहात्या फ़्लॅटमध्ये त्याला शिनाचा पासपोर्ट मिळाला. त्याचा अर्थ शिना कुठेही परदेशी गेलेली नाही, याचा तो सज्जड पुरावाच होता. त्याचाच आणखी एक अर्थ असा होता, की घरी चौकशीला आलेल्या वरळी पोलिसांना इंद्राणीने दिलेले उत्तर चक्क खोटारडेपणा होता. हे वरळी पोलिसांना कसे कळणार? त्यांना पासपोर्ट दाखवून राहुलने सांगितले तर कळणार ना? पण शिनाला आपल्याशी संबंध तोडायचे आहेत असे एक गृहीत धरून राहुल गप्प बसला आणि बेपत्ता शिना बोरा हे प्रकरण धुळ खात पडले. मिखाईलचे मौन आणि राहुलचे गृहीत ह्या दोन गोष्टी त्यांच्यासाठी किरकोळ असतील. पण चौकशी व पोलिस तपासात त्यांना निर्णायक महत्व होते. कारण बेपत्ता शिनाच्या बाबतीत इंद्राणीने चालवलेला खोटारडेपणा त्यातून सिद्ध होऊ शकत होता. पासपोर्ट हाती असता तर शिना कुठल्या मार्गाने परदेशी वा अमेरिकेत शिकायला गेली, असा बिनतोड सवाल वरळी पोलिस पुन्हा जाऊन इंद्राणीला विचारू शकले असते आणि मग तिची बोबडी वळली असती. तिला शिनाचा ठावठिकाणा पोलिसांना द्यावा लागला असता किंवा गुन्हा कबुल करावा लागला असता. यापैकी काहीच झाले नाही, कारण मिखाईल व राहुल या दोघांनी पोलिसांना संपुर्ण माहिती देण्याची टाळाटाळ केली.

शिनाचा खुन झाला आणि तिच्या आईने अन्य कुणाच्या मदतीने खुन केला, हे निष्पन्न झाल्यावर आता जी माहिती आज अनेकजण पोलिसांना देत आहेत वा समोर आणत आहेत; त्यापैकी कोणी जरी हे काम तीन वर्षापुर्वी केले असते, तर शिनाच्या खुनाला वाचा फ़ुटायला इतका अवधी लागला नसता. सावध नागरिक म्हणून जे कर्तव्य असते त्यात कसूर करणार्‍यांनी पोलिसांवर दोषारोप करण्यात कुठला पुरूषार्थ? १) शिनाने आपल्या नोकरीचा तडकाफ़डकी व्यक्तीगत येऊन न दिलेला वा अन्य कुणामार्फ़त पाठवलेला राजिनामा, एक मोठी मान्यवर कंपनी निमूट स्विकारते. त्याविषयी कुठला चौकसपणा दाखवित नाही. २) रहात्या जागेचा भाडेकरार तसाच अन्य कुणामार्फ़त इमेल पाठवून शिना रद्द करते आणि तो घरमालक त्याविषयी काही चौकसपणा दाखवत नाही. ३) आपल्या जीवावर बेतलेले गुंगीचे पेय व त्यातून निसटल्याची भयकथा मिखाईल इतकी वर्षे गिळून गप्प बसतो. ४) शिनाचा पासपोर्ट हाती लागलेला असतानाही राहुल त्याबद्दल पोलिसांकडे जाऊन इंद्राणीला खोटारडी ठरवण्याविषयी उदास कशाला रहातो? यापैकी कोणाचीच गुन्ह्याच्या तपासासाठी काहीच जबाबदारी नाही काय? जाणिवपुर्वक, भयापोटी वा निव्वळ अनवधानाने हे लोक गप्प बसले असतील, तरीही व्यवहारात त्यांनीच इंद्राणीला एक भयंकर खुन पचवायला हातभार लावलेला नाही काय? अनेक गुन्ह्यात वा दाभोळकर पानसरे खुनाच्या बाबतीत असे दुवे नक्की असू शकतात, जे अजून पोलिसांना देण्यात हयगय झालेली असू शकते. याही प्रकरणात श्याम राय हा ड्रायव्हर भलत्याच प्रकरणात पकडला गेला आणि शिनाच्या हत्येविषयी बोलून गेला. त्यातून तपास सुरू झाला म्हणून खरे निर्णायक पुरावे समोर येत आहेत. पण तेच पोलिसांना आधी देण्यात हयगय झाली नसती, तर इंद्राणी एव्हाना शिक्षेच्या प्रतिक्षेत तरी दिसली असती. दोष पोलिसांच्या माथी मारण्याची फ़ॅशन अनेक गुन्हेगारांना कसे अभय देत असते, त्याचा हा नमूना आहे. म्हणूनच नवा तपशील येईल तसे त्याचे विवेचन करणे भाग आहे. त्यातून जबाबदार नागरिक घडवण्याच्या कामाला हातभार लागत असतो.

Saturday, August 29, 2015

‘सत्यमेव जयते’खाली गाडलेली शिना बोरा



कोण ही इंद्राणी मुखर्जी आणि कोण तिचा कितवा तो नवरा पीटर मुखर्जी? दोघेही मुंबईसह देशाच्या बड्याबड्या पार्ट्यांमध्ये मिरवणारी उच्चभ्रू प्रतिष्ठीत माणसेच आहेत ना? ज्यांना पेज-३ मान्यवर म्हणून ओळखले जाते. ज्यांच्या सोबत संध्याकाळ रंगवायला मिळावी म्हणून उतावळे संपादक, अधिकारी वा कलावंत धडपडत असतात. देशात वा कुठेही महत्वाची घटना घडली, मग त्यावर ज्यांची मते अगत्याने कॅमेरासमोर विचारली जातात, त्यातलेच हे दोघेजण होते ना? जे लोक डोळे दिपवणार्‍या मेजवान्या समारंभ साजरे करतात आणि त्याची झगमगित छायाचित्रे विविध वृत्तपत्रात झळकत असतात. त्याच समारंभात मागली कित्येक वर्षे इंद्राणी व पीटर मुखर्जी मिरवत होते. कदाचित त्यांनीच किती भव्य पार्ट्या दिल्या असतील? ज्यामध्ये समाजाचे नामवंत प्रतिष्ठीत अगत्याने हजर राहिलेले असतील आणि आपली जवळीक दाखवायला धडपडलेले सुद्धा असतील. अशा कोणाची मुलाखत २५ ऑगस्टनंतर कुठल्या वाहिनीने दाखवलेली आहे काय? आजवर त्यांच्या सहवासात राहिल्याने आपण कसे सोवळे वा शुचिर्भूत झालो, त्याची ग्वाही द्ययला कोणीच कसे पुढे आलेले नाही? कसाबने मुंबईवर हल्ला केला तेव्हा किंवा मल्टीप्लेक्स पटगृहात मराठी चित्रपट दाखवलेच पाहिजेत, असे सरकारने निश्चीत केल्यावर शोभा डे नावाची डुप्लीकेट इंद्राणी कशी मैदानात उतरली होती आठवते? तिच्या प्रतिष्ठीत मतांना प्रसिद्धी देण्यासाठी तमाम वाहिन्या कशा धडपडत होत्या आठवते? तिने वडापाव किंवा तत्सम गोष्टींची टवाळी करून किती प्रसिद्धी मिळवली होती? आज तिला कोणी या इंद्राणीच्या मैत्री वा प्रेमाच्या गोष्टीसाठी कशाला विचारपूस केलेली नाही? अर्थात त्यात एकटीच शोभा डे नाही. तुम्हीआम्ही नित्यनेमाने इंग्रजी वाहिन्यांवर ज्यांना समाजातील प्रतिष्ठीत म्हणुन बघत असतो, ती सर्व मंडळी कुठल्या बिळात दडी मारून बसली आहेत?

जिला आज पोलिस वा तपास अधिकारी एक भयंकर खलनायिका म्हणून पेश करीत आहेत, त्याच इंद्राणीच्या भोवताली मिरवलेली डझनावारी मंडळी आहेत. त्यातला कोणी राजदीप सरदेसाई असेल, कोणी बरखा दत्त असेल. कोणी वीर संघवी असेल तर कोणी प्रभू चावला असेल. महेश भट्ट वा अन्य कोणी निर्माते दिग्दर्शक असतील. यातल्या कोणीच आपल्या या प्रतिष्ठेचा भर चौकात लिलाव चालू असताना पुढे कशाला आलेले नाहीत? दिल्लीत वा मुंबईत गल्ली बोळातल्या घटनेनंतर राज्यात काय चालू आहे? देशात कायदा सुव्यवस्था उरलेली नाही. असे काही बोलून ज्यांना आपल्या समाजात वावरण्याची लाज वाटते, असे अभिमानाने बोलावेसे वाटत असते अशी ही मंडळी. सामान्य माणसाने काही वावगे केल्यावर त्यांची मान वारंवार खाली जात असते, इतके हे अब्रुदार लोक. निदान माध्यमांनी सतत आपल्यापुढे त्यांना तशाच भूमिकेत पुढे केलेले आहे ना? मग आज त्यांना इतक्या ‘महत्वाच्या विषयात’ मत मांडण्याची इच्छा कशाला झालेली नाही? आपण ज्या माणसात मोकळेपणाने वावरलो आणि त्यातच प्रतिष्ठा मानली, ते सराईत कारस्थानी खुनी आहेत, याची अशा प्रतिष्ठीतांना क्षणभरही लाज कशाला वाटलेली नाही? ज्याच्याशी त्यांचा कुठला संबंध येत नाही अशा सामान्य गुन्हेगारांच्या एखाद्या कृत्याविषयी त्यांना सतत शरम वाटत असते आणि ती शरम दाखवण्याचीही मोठी हौस असते. त्यांना आजकाल इंद्राणी मुखर्जीचे जे धिंडवडे निघत आहेत, त्यात प्रतिष्ठा वाढल्यासारखे वाटते काय? नसेल तर त्यातल्या कुणीतरी जाहिरपणे अशा लोकांच्या सहवासात कधीतरी होत याची माफ़ी मागण्याचे धाडस तरी नक्की दाखवले असते. पण चारपाच दिवसात तसे काहीही घडलेले नाही. कारण हे तथाकथित बेशरम लोक असतात, जे समाजाच्या शरमेची आपल्याला चिंता असल्याचे सराईत नाटक नित्यनेमाने रंगवत असतात.

तीन वर्षापुर्वी दिल्लीत एक मोठी घटना घडलेली आपल्याला आठवत असेल. निर्भया प्रकरण! एका तरूण मुलीवर धावत्या बसमध्ये तिच्या मित्रासमोर चौघांनी बलात्कार केला होता. अवघी दिल्ली त्यातून हादरून गेली होती. आधी जंतरमंतर येथे जमलेल्या लोकांमध्ये त्याचा प्रक्षोभ उमटला आणि मग देशभर त्याची संतप्त प्रतिक्रीया उमटली होती. त्यातले चौघेही आरोपी लगेच पकडलेले होते आणि त्यातल्या एका मुलाने ‘गलत काम’ किया असे अशी तात्काळ कबुली दिलेली होती. मुद्दा त्याच्याही पुढला आहे. जेव्हा त्या आरोपींना तिहार तुरूंगात ठेवण्यात आलेले होते, तेव्हा तिथल्या काही गुन्हेगार कैद्यांनी या बलात्कार्‍यांवर प्राणघातक हल्ला केला होता. आपण कैदी म्हणून इथे तुरूंगात खितपत पडलोय, याचे भान त्या अन्य कैद्यांना नव्हते काय? ते अन्य कैदी कोणी शुचिर्भूत पवित्र आत्मे नव्हते, तर कुठला तरी गुन्हा करूनच तिथे पोहोचलेले होते. पण त्यांच्यात किमान काही माणुसकी व सभ्यता शिल्लक असावी, की त्यांना आपल्या सोबत तुरूंगातही असे राक्षसी सैतानी कृत्य करणारे असू नयेत असे वाटले. त्यांनी ह्या बलात्कार्‍यांना इतके सतावले व मारले की त्यातल्या एका बलात्कार्‍याने कोठडीतच गळफ़ास लावून आत्महत्या केलेली होती. गुन्हेगार म्हणून ज्यांच्याकडे सभ्य समाज वा उर्वरीत जग घाणेरड्या तुच्छ नजरेने बघते, त्यांच्यातला हा सभ्यतेचा अंश आज पेज-३ म्हणून मिरवणार्‍या व वाहिन्यांवर सतत झळकणार्‍या अब्रुदारांमध्ये शिल्लक आहे काय? कधीतरी त्या इंद्राणीने शोभा डेच्या खांद्यावर हात ठेवला असेल, कधी कुठल्या समारंभात एखाद्या संपादक पत्रकाराशी तिने हस्तांदोलन केले असेल. त्यांना तो स्पर्श आठवून किळस येऊ नये काय? त्या स्पर्शाची यातना त्यातल्या कुणाला जरी असती तर त्यांनी कॅमेरापुढे येऊन इंद्राणी मुखर्जीशी आपला परिचय होता याची खंत व्यक्त केला असती.

आठवडा होत आला, पण कुणा प्रतिष्ठीताने आपल्या सभ्यतेची साक्ष दिलेली नाही. ही बया दोन नेटवर्कमध्ये मोठी अधिकारी म्हणून काम करत होती आणि एक पाशवी हत्या केल्यानंतर सव्वा तीन वर्षे उजळमाथ्याने प्रतिष्ठीत समाज घटकात वावरत होती. तिचे आपल्याच पोटच्या लेकीच्या रक्ताने माखलेले हात तिने ज्यांच्याशी मिळवलेले असतील, असे डझनावारी प्रतिष्ठीत आहेत. त्यांच्या मनाला किंचीत तरी लाज वाटली आहे काय? असेल तर त्याची प्रचिती बातम्यातून यायला हवी होती. पण कुठेही त्याचा लवलेश आढळून येत नाही. कुठल्या तरी नगण्य अनोळखी घरातील मातेने लेकीची हत्या केली असल्यासारख्या बातम्या झळकत आहेत आणि इंद्राणीशी आपला कुठला कधी संबंध आलाच नाही, अशा थाटात मुंबईतले शेकडो प्रतिष्ठीत आपापल्या कोषात मशगुल आहेत. जणू काही घडलेले नाही. कुठल्यातरी मालिकेत कथेला अनपेक्षित वळण आल्याच्या थाटात अलिप्तपणा साजरा होतो आहे. तिहार तुरूंगातल्या कैद्यांपेक्षा यांची नितीमत्ता किती ठिसूळ व दिखावू असते त्याचा हा पुरावा आहे. जे आपल्याला नेहमी माध्यमातून नैतिकतेचे व नितीमूल्यांचे पाठ देत असतात, त्यांचा हा खरा चेहरा आहे. हे रंगलेल्या मुखवट्यातले लोक प्रत्यक्ष जीवनात किती हिडीस चेहर्‍याचे विद्रुप व विकृत असतात आणि पाशवी जीवन जगत असतात, त्याची ही कहाणी आहे. गुन्हेगार कैद्यापेक्षा त्यांची नैतिक मूल्ये हीन दर्जाची असतात. मात्र उठसूट आपल्याला व सामान्य माणसाला तेच बेशरम उच्च नितीमूल्ये शिकवण्याचा आव आणला जात असतात. इंदाणी मुखर्जीने आपल्या पोटच्या मुलीची इतकी निर्घॄण हत्या केली, ते या जगातले वास्तव असते, तिथल्या दिखावू प्रतिष्ठेचा तोच खरा चेहरा असतो. जे खाप वा जातपंचायतीची खिल्ली उडवण्यात धन्यता मानतात. आठवते ‘सत्यमेव जयते’? त्यात आमिर खानने प्रेमी युगूलांना प्रतिबंध घालणार्‍या, मारणार्‍या पंचायतीवर प्रश्नचिन्ह लावले होते. त्याच कार्यक्रमाचा संयोजक, प्रक्षेपक असलेल्या वाहिनीचा मुख्याधिकारी हाच पीटर मुखर्जी होता आणि इंद्राणी त्याच नेटवर्कची म्होरकी होती ना? आठवतो आमिर एक गीताचे बोल ऐकताना डोळे पुसत होता? ते गीत आठवते? किती लोकांनी डोळे पुसत ते गीत आपल्या मोबाईलवर रिंगटोन म्हणून डाऊनलोड केले होते? काही आठवते? तेच तर शिना बोराचे गाणे होते ना मित्रांनो?

ओरी चिरैया, नन्हीसी चिडिया, अंगनामे फ़िर आजा रे..

हे गाणे ऐकलेले आठवते? कोणाचे गाणे? डोळे पुसून तुमच्या आमच्या भावनांचा बाजार करणारेच तिला मारत होते, ज्या मुलीचे नाव होते शिना बोरा. आठवा ‘सत्यमेव जयते’ आणि डोळे पुसणारा आमिर खान. मग विविध चॅनेलवर नित्यनेमाने होणारा तमाशा ‘आमिर का असर’. कधीची गोष्ट आहे मित्रांनो? वर्ष महिना काही स्मरते? मे महिन्यात आमिर खानची वाहिन्यांवरची पहिली एन्ट्री होती त्या मालिकेतून. त्यात दोनतीन भाग मुलींची गर्भातच हत्या, मुलींना खाप पंचायतींनी घातलेली बंधने. त्यांच्या प्रेमविवाहानंतर होणार्‍या हत्या, असेच विषय आमिरने रंगवले होते ना? कधीची गोष्ट? मे-जुन २०१२ दरम्यानचीच ना? आता थोडे आजच्या जमान्यात येऊन शिना बोरा व इंद्राणी मुखर्जीची कथा तपासा. शिना या आपल्या कन्येची हत्या इंद्राणीने केली कधी? २४ एप्रिल २०१२. त्यानंतर दिडदोन महिन्याभराने आमिर आपल्या डोळ्यात अश्रू आणुन मुलींना मारू नका असे नितीमूल्य आपल्याला शिकवत होता. कुठल्या वाहिनीवरून स्टार प्लस. ज्या नेटवर्कचा व वाहिनीचा माजी मुख्याधिकारी होता पीटर मुखर्जी. त्याची पत्नी इंद्राणी तेव्हा काय करून बसली होती? आपल्याच पोटच्या पोरीला प्रेमविवाहापासून परावृत्त करण्यासाठी शिनाचा मुडदा पाडून मोकळी झाली होती. अधिक कन्येच्याच रक्ताने माखलेले हात घेऊन तिच इंद्राणी तेव्हा ‘सत्यमेव जयते’च्या यशानिमीत्त योजलेल्या सोहळ्यात कोणाकोणाशी हस्तांदोलन करून मोकळी झाली असेल? आमिर खानही त्यातून सुटला असेल काय? शिनाच्या मुडद्यावर रंगलेल्या त्या मालिका व सोहळ्याची मजा कोणी कोणी घेतली असेल? आज त्यापैकी कोणाला आपले रक्ताने माखलेले हात धुवायचे प्रायश्चीत्त तरी घ्यावे असे कशाला वाटलेले नाही? जी नितीमूल्ये आमिर व पीटर मुखर्जी यांच्यासारखे प्रतिष्ठीत लोक आपल्याला शिकवतात ती त्यांना कधी समजली? शिनाचा मुडदा पडल्यावर? पण ‘सत्यमेव जयते’ हे सांगायला शिनाच्या मृतदेहाचेच अवशेष समोर आले ना?

Friday, August 28, 2015

शिना, इंद्राणी, पीटर, राहुल, मुखर्जी, मिखाईल..........



पोलिस तपास ही बातमीदारी किंवा टेलिव्हीजनचा शो नसतो. त्यात नुसत्या तर्काने कुणाला दोषी ठरवून फ़ाशी देता येत नाही, की गुन्हेगार सिद्ध करता येत नाही. तर कोर्टात कायद्याच्या निकषावर साक्षीपुरावे सादर करून गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडायची असते. म्हणूनच जे साध्या डोळ्यांना दिसते त्याच्याही पलिकडे जाऊन घटना व तिचे संदर्भ जोडून साक्षीपुराव्यांची संगतवार मांडणी पोलिसांना करावी लागते. त्यासाठी आधी रहस्यमय कोडे सोडवावे, तसे त्याच कोड्यातले विविध तुकडे व सुटे भाग गोळा करावे लागतात. पोरांच्या खेळात जसे सर्व तुकडे समोर असतात, तशी पोलिसांची चैन नसते. त्यांना आपल्या प्रयत्नातून कोड्याचे तुकडे गोळा करावे लागतात आणि त्यातून जे चित्र स्पष्ट होऊ लागते, त्याच्या आधारे उरलेले तुकडे शोधावे लागतात. तेही सहजगत्या बाजारात उपलब्ध नसतात. कसून शोध घेतला तरी मिळायला अवघड असतात. अनेकदा तर एक चित्र स्पष्ट होत असताना त्यातूनच भलतेच चित्र साकारू लागते आणि एका गुन्ह्याच्या जागी दुसर्‍याच अनुत्तरीत कोड्याचा रहस्यभेद होत जातो. इंद्राणी मुखर्जी व शिना बोरा हे त्याचे जळजळित उदाहरण आहे. उठसुट पोलिसांकडे इच्छाशक्ती नाही, सरकारला गुन्ह्यांचा शोध घ्यायचाच नाही, म्हणून जे ‘आम्ही सारे’ रस्त्यावर फ़लक घेऊन उभे असतात, त्यांना गुन्हेतपास म्हणजे काय याचा गंध नसतो, त्याचा हा पुरावा आहे. पण तिथेच ही तुलना संपत नाही शिना व इंद्राणी यांचा हा गुंता म्हणूनच मुळापासून समजून घेतला पाहिजे. ते करताना त्यांच्यातले नातेसंबंध व त्यातला गुंता अनावश्यक आहे. शिना नावाच्या तरूणीचा तीन वर्षापुर्वी निर्घृण खुन झाला आणि त्याचे धागेदोरे लपवणारी तिचीच आप्तस्वकीय निकटवर्तिय मंडळी आहेत. ही बाब सर्वाधिक महत्वाची आहे. म्हणून लक्ष केवळ खुनाच्या संदर्भावर केंद्रित करण्याची गरज आहे.

शिना ही इंद्राणीची मुलगी होती आणि ते सत्य लपवून तिने कागदोपत्री तिला आपली बहिण ठरवण्याचे कारस्थान यशस्वीरित्या राबवले होते. त्यात खुद्द शिना व तिचा भाऊ मिखाईल सहभागी होते. म्हणूनच त्यांनी इतके दिवस त्याविषयी मौन पाळले होते. मारली जाईपर्यंत शिनाने त्याचा कुठे गवगवा केला नाही, की आजपर्यंत मिखाईल त्याबद्दल कुणाला बोलला नाही. याचा अर्थ मुळात जी भामटेगिरी इंद्राणी करीत होती, त्याचे हे दोघेही भागिदारच होते. जेव्हा त्यांच्यात बेबनाव झाला, तेव्हा इंद्राणीने इतर कोणाच्या मदतीने शिनाचा काटा काढला. त्यामुळे आता मिखाईल म्हणतो, की मलाही आईने म्हणजे इंद्राणीने असेच संपवले असते. पण तशी भिती असूनही मिखाईल निदान तीन वर्षे गप्प होता. आज तो इंद्राणीवर खुनाचा आरोप करतो आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचा तर आपली बहिण शिना मागली तीन वर्षे बेपत्ता असताना त्याने मौन कशाला धारण केलेले होते? शिनाचा खुन माहित असून लपवाछपवी करणे गुन्हा नाही काय? तिसरा आहे इंद्राणीचा विद्यमान पती पीटर मुखर्जी. त्यालाही शिना बहिण की मुलगी याविषयी शंका होती. पण त्याने त्यात नाक खुपसले नाही. पण मागली तीन वर्षे ही मुलगी बेपत्ता होती आणि कुठल्याही संपर्कात नाही, तर त्याचे कुतूहल कुठे दडी मारून बसले होते? शिना अमेरिकेत आहे आणि तिथे दिवाळी करतानाची छायाचित्रे इंद्राणीने दाखवल्याचे पीटर सांगतो. इतक्या बड्या उद्योग समुहाच्या प्रमुखपदी विराजमान झालेला माणूस इतका भोळा असू शकतो? जो अकस्मात बेपत्ता झालेल्या सावत्र मुलगी वा मेहुणीबद्दल तीन वर्षे थाप ऐकून घेतो? त्याचेही या विषयातले मौन शंकास्पद नाही काय? कारण शिनाला शेवटचे ज्याने कोणी बघितले, त्यानंतर तिचा संपर्क नसल्याने मुंबईत खार पोलिस ठाण्यात ‘बेपत्ता’ व्यक्ती म्हणून तक्रार नोंदली गेली होती.

शिना बेपत्ता असल्याची तक्रार कोणी दिली होती? त्याचे उत्तर पोलिसांनी दिलेल्या बातमीत कुठे मिळत नाही. जर अशी तक्रार होती तर पोलिसांनी त्याचा तपास कुठवर केला होता? कोणा कोणाकडे शिनाबद्दल विचारपूस केली होती? पीटर म्हणतो की इंद्राणीने शिना अमेरिकेला गेली असल्याचे सांगितले व तसे फ़ोटोही दाखवले. तर त्याला बेपत्ता तक्रार ठाऊकच नव्हती का? तसे असेल तर बेपत्ता व्यक्तीविषयी पोलिसांनी कुठे तपास व चौकशी केली, असा प्रश्न उपस्थित होतो. जी व्यक्ती बेपत्ता आहे तिचे फ़ोटो इंद्राणी दाखवते, तर तिची जबानी तेव्हा पोलिसांनी घेतली होती काय? यातली आणखी एक शंकास्पद व्यक्ती आहे पीटरचा पुत्र राहुल मुखर्जी. त्याचे शिनाशी प्रेमप्रकरण होते आणि ते इंद्राणीला मंजूर नसल्याचे आता सांगितले जात आहे. आपली प्रेयसी तीन वर्षे संपर्कात नसताना व तिच्याविषयी खार पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार असताना राहुल काय करत होता? त्याने प्रेयसी शिनाला शोधण्यासाठी कसला पाठपुरावा केला? नसेल तर कशामुळे त्याने प्रेयसीविषयी इतकी अनास्था दाखवावी? पीटर आपल्या पुत्राच्या प्रेमप्रकरणाकडे अलिप्तपणे बघत होता. तरी त्यातली प्रेयसी बेपत्ता असावी आणि तिच पीटरच्या पत्नीची बहिण (वा कन्या) असावी हे पचणारे आहे काय? यातल्या प्रत्येकाला शिना वा तिच्या बेपत्ता असण्याविषयी इतकी अनास्था कशामुळे असावी? यातला कोणीही शिनाला शोधण्यात उत्सुक नव्हता, की कुठेही प्रयत्न करीत नव्हता. जणू तशी कोणी शिना आपल्या आयुष्यात आलीच नव्हती, असे या प्रत्येकाचे वागणे इंद्राणी इतकेच चमत्कारीक वाटणारे नाही काय? इंद्राणीने तर तिचा खुनच केल्याचा दावा आहे. तिची अनास्था वा लपवछपवी समजू शकते. पण यातले बाकीचे तिघेजण धुतल्या तांदळाइतके निर्दोष आहेत का? की आता प्रकरण उलटल्यावर प्रत्येकजण हात झटकतो आहे?

मुळात ह्याचा उलगडा पोलिसांनीही बेपत्ता व्यक्तीचा शोध म्हणून केलेला नाही. याच नाट्यातील एक महत्वाचे पात्र श्याम राय हे आहे. त्याला कुठल्या तरी भलत्याच प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले असताना तो जे काही बरळला, त्यातून शिना बोरा प्रकरण उजेडात आलेले आहे. म्हणजेच तो दुसर्‍या भानगडीत पकडला गेला नसता व बरळला नसता; तर पीटर, इंद्राणी, राहुल वा मिखाईल यांची नावे कुठे पुढे आलीच नसती की शिना बोराची हत्या झाली, त्याचा बोभाटाही झाला नसता. हे सारे उजळमाथ्याने उच्चभ्रू समाजात मिरवत राहिले असते. श्याम राय याच्याकडे संशयास्पद पिस्तुल पोलिसांना मिळाले आणि त्याचा पाठपुरावा करताना श्यामने शिनाची हत्या झाल्याचे ओकून टाकले. तिथून मग बेपत्ता शिना मेली असल्याचे पोलिसांना लक्षात आले आणि शिनाच्या बेपत्ता तक्रारीचा पुन्हा खार पोलिस ठाण्यातून शोध सुरू झाला. पण थोडा वेगळा विचार करा. जर पीटरने आपल्या मुलाच्या प्रेयसीच्या बेपत्ता होण्याचा किंवा राहुलने आपल्या प्रेयसीच्या अकस्मात गायब होण्याचा पाठपुरावा २०१२ मध्येच सुरू केला असता तर? म्हणजे पोलिसांना शिना कधीपासून कुठून व कशा परिस्थितीत गायब झालीय त्याचा तपशील देवून, शोध करण्यास भाग पाडले असते तर? तर श्याम रायने सत्य ओकण्यापर्यंत शिनाच्या हत्येवर पडदा पडून राहिला असता काय? इंद्राणीला तीन वर्षे उजळमाथ्याने मिरवता आले असते काय? या आप्तस्वकीयांची अनास्था किंवा लपवाछपवीच इंद्राणीला खुन पचवायला हातभार लावत नव्हती काय? परस्परातील संबंध, भांडणे, वादविवाद, मतभेद, रागलोभ यांचा सारा तपशील वेळीच पोलिसांना मिळाला असता, तर त्याच बेपत्ता व्यक्तीचा शोध घेताना शिनाच्या खुनाचा उलगडा कधीच होऊ शकला असता. पानसरे वा दाभोळकर प्रकरणात असे काही दुवे नक्कीच असतील, ज्यांचा त्यांच्या हत्याकांडाशी निकटचा संबंध असू शकतो आणि ज्याच्याअभावी पोलिस त्यात नेमक्या दिशेने तपास करू शकले नाहीत. किंवा तिथेच पोलिसांचे गाडे फ़सलेले असू शकते. पण शिनाप्रमाणेच याही दोन्ही प्रकरणात कोणीतरी श्याम राय असू शकतो, तो हाती लागेल, तेव्हा त्यातल्या इंद्राणीचा बुरखा टरटरा फ़ाट्ल्याशिवाय रहाणार नाही. या दोन्ही हत्याकांडातला खरा आरोपी व सुत्रधारही आजही उजळमाथ्याने समाजात प्रतिष्ठीत म्हणून इंद्राणीप्रमाणे वावरतो आहे. पण त्याचाही श्याम राय कुठेतरी असेल आणि तो लौकर पोलिसांच्या जाळ्यात अडकू देत, अशी प्रार्थना आपण करू या.

आम्ही सारे नावाचे पथ‘नाट्य’



कुठल्याही विवेकवादी वा बुद्धीजिवी चळवळीला संपवायचे असेल तर तिच्या विरोधात लढण्यापेक्षा त्यात सहभागी होऊन चळवळीचेच एक पाखंड उभे करायचे असते. मागल्या दोन वर्षात अंधश्रद्धा निर्मूलन आंदोलनाचे सोहळे किंवा इव्हेन्ट बघितल्या, मग त्याची खातरजमा करून घेता येते. आम्ही सारे दाभोळकर किंवा शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है असल्या घोषणा त्याच पाखंडाचे दाखले आहेत. यांना कसली शरम वाटते? ज्यांना खरा खुनी वा हल्लेखोर पकडण्याची इच्छाही नाही, की प्रयत्नही नाहीत, त्यांना शरम कशाला वाटते? म्हणून आधीच्या लेखात आम्ही चेंबुरच्या दुकानात जीव धोक्यात घालणार्‍या नासिरुद्दीन मन्सुरीचा दाखला दिलेला होता. त्याने कधी दाभोळकर वा पानसरे यांचे नावही ऐकलेले नसेल, की त्यांचे कार्य-तत्वज्ञानही मन्सुरीला ठाऊक नसेल. त्याने कधी हातात ‘आम्ही सारे’ असा फ़लकही धरलेला नाही. पण ज्या क्षणी या दोघांवर प्राणघातक हल्ले झाले, तेव्हा तिथे मन्सुरी असता, तर नक्कीच त्याने त्यांना वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला असता. पण आज जे कोणी ‘आम्ही सारे’ असे फ़लक घेऊन मिरवत असतात, त्यापैकी कोणी त्या प्रसंगी हजर असते, तर दाभोळकर पानसरेंच्या हल्लेखोराला रोखणे दुरची गोष्ट झाली, हेच ‘आम्ही सारे’ हल्ला निमूट बघत राहिले असते किंवा शेपूट घालून फ़रारी झाले असते. हा निव्वळ आरोप नाही की शंका नाही, ज्या मध्यमवर्गिय मानसिकतेतून असे लोक आलेले असतात, त्यांच्यात मुरलेला ‘मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा’ त्यांना तसे करायला भाग पाडत असतो. तेरा वर्षापुर्वी त्याची साक्ष अंबरीश मिश्र या पत्रकाराने कबुलीजबाब असल्यासारखी एका बातमीतून दिलेली आहे. समोर एका असहाय मुलीवर बलात्कार होताना त्यात हस्तक्षेप करायची हिंमत आपल्याला कशी झाली नाही, त्याची बातमी लिहीताना अंबरीश म्हणतो,

"आम्ही जे बघितले त्याने आम्ही बधीर होऊन गेलो. सलीमने त्या मुलीला खाली खेचले होते आणि तो तिच्यावर बलात्कार करीत होता. आपल्या मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणाच्या बोजाखाली दबलेले आम्ही शांत राहिलो, काहीही करू शकलो नाही." (टाईम्स ऑफ़ इंडीया)

 हा मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा किंवा शहाणपणा काय असतो? तर आपण दुसर्‍याच्या भानगडीत पडायचे कारण नाही. आपले जग आपल्यापुरते, बाकी कुठे कुणाचे काय होते, त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नसते. अगदी कत्तलखान्यातल्या बोकडासारखे आपले मध्यमवर्गिय शहाणपण असते. तिथे एका बोकडाच्या मानेवरून सुरी फ़िरवली जात असते आणि बाजूचा दुसरा बोकड शांतपणे चरत असतो. मरणार्‍याचे पाय झाडणे, रक्ताने माखणे चरणार्‍याला अजिबात विचलीत करत नसते. आजकाल समाज व त्यातले सुखवस्तू व मध्यमवर्गिय इतके आत्मकेंद्रित झाले आहेत, की त्यांना शेजारच्या घरातल्या नवविवाहितेच्या किंकाळ्यासुद्धा ऐकू येत नाहीत. आणि ऐकू आल्या, तरी त्यात पडायची इच्छा व हिंमत ते गमावून बसले आहेत. अंबरीश त्यालाच मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणाचा बोजा म्हणतो. त्या बोजाखाली दबलेले लोक कुठले आव्हान पेलणार आहेत? ते बघत बसतात. कधी ते रिंकू पाटिल या शाळकरी मुलीला जाळू देतात. कधी ते सांगलीच्या रस्त्यावर अमृता देशपांडेवरचा सुरीहल्ला होताना निमूटपणे बघतात. कधी बॉम्बे सेंट्रलला विद्या पटवर्धनवर रॉकेल ओतून तिला पेटवले जात असताना, स्तब्ध होऊन बघत रहातात. त्याला मध्यमवर्गिय जाणतेपणा किंवा व्यवहारी शहाणपणा म्हणतात. मात्र हेच लोक मोठ्या तावातावाने देशातला भ्रष्टाचार, वाढती असुरक्षितता, गुंडगिरी, काहीतरी करायला हवे; अशी चर्चा छान रंगवत असतात. पण हे सर्व शहाणपण, जाणतेपण प्रत्यक्ष संकटापासून मैलोगणती दुर असतानाचे असते. नेट प्रॅक्टीस म्हणतात तसे हे शहाणपण असते. ते कधीच खर्‍या कसोटी सामन्यात उतरत नाही. लोक टीव्हीसमोर बसून किंवा स्टेडीयमच्या गॅलरीत बसून, सचिन कुठे चुकला त्यावर बोलत असतात. त्यालाच अंबरीश मध्यमवर्गिय व्यवहारी शहाणपणा म्हणतो.

इथे मन्सुरी व अंबरीश यातला फ़रक लक्षात घेण्याची गरज आहे. कारण अंबरीश हा तुमच्याआमच्या सारखा एक मध्यमवर्गिय बुद्धीजिवी आहे. पोलिसाचे काम असल्याचे सांगत तोही ‘आम्ही सारे’ यांच्याप्रमाणे बलात्कार होऊ देतो आणि मग पोलिसात तक्रार नोंदवतो. मागल्या दोन वर्षात ‘आम्ही सारे’ काय करू शकलो? काहीच कशाला नाही करू शकलो? त्याचेही उत्तर अंबरीशने प्रामाणिकपणे दिलेले आहे. आपण वाचाळ बुद्धीवादी असतो आणि व्यवहारी जाणतेपणाचे गुलाम असतो. संकटाची घडी येते आणि परिक्षा घेऊ पहाते, तेव्हा आपले पोपटपंची करणारे तत्वज्ञान लुळेपांगळे होऊन जाते. ढुंगणाला पाय लावून ‘आम्ही सारे’ पळ काढतो, धोका संपला मग बिळातून बाहेर पडून पोलिस व सरकारला त्याच्या कर्तव्याविषयी शहाणपणाचे व्याख्यान देऊ लागतो. पण प्रत्यक्ष घटना घडत असताना मात्र त्यात हस्तक्षेप करायची हिंमत आम्ही गमावून बसलेलो असतो. ती अगतिकता व नाकर्तेपणा झाकण्यासाठी मग सोहळे व इव्हेन्ट साजर्‍या करतो. कसाबची टोळी मारली गेली, मग आम्ही गेटवे ऑफ़ इंडीयापाशी जमून मेणबत्त्या पेटवतो आणि त्यातच मोठा पुरूषार्थ असल्याचे पाखंड मिरवू लागतो. पण कसाब समोर असताना किंवा हल्लेखोर बलात्कारी समोर खडा उभा असताना आम्ही गर्भगळित होऊन जातो. कारण आम्ही सामान्य बुद्धीचे नासिरुद्दीन मन्सुरी नसतो की कसाबच्या अंगावर मरायला धावून जाणारे तुकाराम ओंबळेही नसतो. ‘आम्ही सारे’ बुद्धीजिवी असतो. आपल्या नाकर्त्या नपुंसकत्वाला पुरूषार्थ ठरवण्याचे पाखंड रंगवणारे पथनाट्य कलावंत असतो. आपल्यात मन्सुरी वा ओंबळेप्रमाणे पुढे सरसावण्याचे नसलेले बळ झाकण्याची केलेली केविलवाणी धडपड, मग एक सोहळा बनून जातो आणि बाहेर असे शेकडो खुनी, बलात्कारी, हल्लेखोर, मारेकरी आपल्या त्या तमाशाला फ़िदीफ़िदी हसत मोकाट फ़िरत असतात. कारण आपल्या पोकळ घोषणांच्या शब्दापेक्षा त्याच्या नुसत्या धमकीच्या शब्दातली ताकद त्याला पक्की ठाऊक असते.

तेरा वर्षापुर्वी चर्चगेट बोरीवली लोकलमध्ये दरवाजाच्या बाजूला असलेल्या सीटवर एक गुंड एका मतिमंद एकाकी मुलीवर बलात्कार करताना अलिकडल्या भागात बसलेल्या प्रवाश्यांना दिसला. तिचा टाहो ऐकून हे पाचजण तिथे धावले आणि तरीही तो गुंड क्षणभर विचलीत झाला नाही. त्याने या प्रवाश्यांना धावत्या गाडीतून बाहेर फ़ेकून देण्याची धमकी दिली आणि ते निमूट बाजूला झाले. त्याला बलात्कार करू दिला. मग तो पळून गेल्यावर याच प्रवाश्यांनी रेल्वे पोलिसांना खबर दिली आणि त्याला अटकही झाली. पण सवाल बलात्कार रोखण्याचा होता. पाचजण मिळून त्या नि:शस्त्र गुंडाला कशामुळे रोखू शकले नाहीत? ‘मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा!’ जो ‘आम्ही सारे’ असतात त्यांच्यात ठासून भरलेला असतो. म्हणूनच मग त्याच दुखण्यावर किंवा अगतिकतेवर बोट ठेवले तर त्यांच्यातला तोच बुद्दीजिवी न्युनगंड जणू नागाने फ़ुत्कार टाकावा तसा उफ़ाळून बाहेर येतो. पोलिस नाकर्ते असतील. पण पानसरे दाभोळकरांच्या खुन्यांना पकडण्यासाठी समर्थकांनी काय केले, असे विचारताच तो न्युनगंडाचा नाग फ़णा काढून पुढे आला आणि म्हणतो काय? ते पोलिसांचे काम आहे. पोलिस कशाला असतात? नासिरुद्दीन असे म्हणत नाही. कुठलाही जीव धोक्यात घालून मदतीला धावणारा असे ‘बुद्धीवादी विवेकी’ प्रतिसवाल करत नाही. कारण संकटात असलेल्याला मदत करायला धावणे किंवा सत्य प्रस्थापित करायला पुढाकार घेणे विवेकी नसेल कदाचित. पण माणूसकीचे कर्तव्य नक्कीच असते. उलट ‘मध्यमवर्गिय व्यवहारी जाणतेपणा’ दाखवून त्यापासून पळ काढणे मात्र विवेकवाद असत्तो. जो नासिरुद्दीन वा ओंबळे यांना ठाऊकच नसतो. पानसरे असोत किंवा दाभोळकर असोत, त्यांच्या चळवळी कार्यालाच पाखंड करून टाकण्याची यापेक्षा भीषण खेळी दुसरी कुठली असेल. अंबरीश मिश्र निदान प्रामाणिकपणे आपल्या अगतिकतेची कबुली देतो. पण ‘आम्ही सारे’ इतके बनेल असतो, की त्याच अगतिकतेला पुरूषार्थ ठरवण्याचे पथनाट्य मांडत असतो.

Wednesday, August 26, 2015

अंनिस ठाऊक नसलेला खरा दाभोळकर



एखाद्या अडाण्याला वा अशिक्षिताला जे समजावणे शक्य व सोपे असते, तितके बुद्धीमान असल्याच्या भ्रमात वावरणार्‍यांना समजावणे अशक्य असते. कारण अशी माणसे आपल्या अज्ञान वा निर्बुद्धतेलाच कुशाग्र बुद्धी समजून जगत असतात. मग त्यातून त्यांची ठाम मते व पुर्वाग्रह इतके पक्के झालेले असतात, की त्यांना साधा व्यवहारही उमजत नाही. उदाहरणार्थ पोलिस कुठल्याही गुन्ह्याचा शोध लावून गुन्हेगाराला तपासण्याला बांधील असतात. किंबहूना त्यासाठीच पोलिस खात्याची निर्मिती झाली आहे. पण म्हणून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे वा जे अन्यायग्रस्त व्यक्तीचे निकटवर्तिय आहेत, त्यांची काहीच जबाबदारी नसते काय? त्यांनी आपल्या परीने गुन्ह्याचा शोध घ्यायचाच नाही, असा काही नियम वा संकेत आहे काय? मग अशा पिडीताच्या आप्तस्वकीयांचे काम काय असते? पोलिसांच्या नावाने बोटे मोडत फ़िरणे व सरकारच्या नावाने शंख करण्याला त्यांचे कर्तव्य मानले जाते काय? तसे असेल तर कोणी आजारी असेल वा अपघातात सापडला असेल तर त्याच्यावर उपचार करणे हे डॉक्टरचे कर्तव्य आहे आणि तो पेशाच मुळात रुग्णाची वा जखमीच्या उपचारासाठी उदयास आलेला आहे. अशा वेळी अन्य कोणी काहीच करायचे नसते का? म्हणजे अपघात होतो तिथे जखमीच्या वेदना यातना बघत बसायच्या आणि पोलिसांच्या नावाने शंख करायचा एवढेच काम बाकीच्या समाजाने करायचे असते काय? सामाजिक कर्तव्य कशाला म्हणतात? असे कुठे काही घडले मग पोलिस वा डॉक्टरची प्रतिक्षा न करता धावत मदतीला जाणारे सर्वात नालायक नागरिक असेच म्हणायला हवे ना? दाभोळकर पानसरे यांच्या हत्याकांडानंतर त्यांच्या अनुयायांनी मांडलेल्या नाकर्त्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह लावल्यानंतर मिळालेल्या प्रतिक्रिया फ़क्त अविवेकी निर्बुद्धतेचीच साक्ष देणार्‍या आहेत.

खुन वा गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी आप्तस्वकीयांनी वा निकटवर्तियांनी प्रयत्न करणे, अशा अनुयायांना गैरलागू वाटते. याचा अर्थ काय लावायचा? उद्या त्यांच्या घरात वा शेजारी कुठे आगीचा भडका उडाला, तर हे लोक काय करतील? आग विझवण्याचे काम अग्नीशमन दलाचे आहे आणि त्यासाठीच त्याची नेमणूक झालेली असल्याने असे दाभोळकर-पानसरे अनुयायी नक्कीच अग्नीशमन दलाची प्रतिक्षा करत शांत बसून रहातील. मग आगीने त्यांची राखरांगोळी केली तरी बेहत्तर. कारण अग्नीशमन हे त्यांचे कामच नाही ना? ज्याचे काम आहे त्याने करावे. आपण जळून राखरांगोळी होणार असलो तरी काय फ़रक पडतो ना? याला म्हणतात बुद्दीचे अजीर्ण. यापैकी कोणी दाभोळकर वा पानसरे यांच्या हत्येच्या प्रसंगी तिथे हजर नव्हते, पण असते तरी काडीचा फ़रक पडला नसता. कारण त्याने बळी पडणार्‍याला वाचवण्याचा कुठला प्रयत्न नक्कीच केला नसता. कारण त्यांच्या लेखी अशा खुनात वा हिंसेत हस्तक्षेप करण्याचे काम पोलिसाचे असते. ते पोलिसानेच करायला हवे. आणि त्यात पोलिस नाकर्ते ठरले आणि परिणामी दाभोळकर यांची हत्या झाली तरी बेहत्तर. आपण उद्या पोलिसांना जबाबदार धरू, त्यांचा निषेध करू. बाकी आपण काहीही करण्याची गरज नाही. सरकारच्या व अन्य प्रशासन यंत्रणेच्या नावाने शंख करणे वा कुणाच्या तरी डोक्यावर खपर फ़ोडणे इतकेच बुद्धीमंत, विवेकवादी म्हणून आपले कर्तव्य आहे. आज जे कोणी पोलिसांच्या नावे शंख करीत आहेत आणि ‘आम्ही सारे’ नावाचे नाटक करीत आहेत, त्यातले एकदोघे जरी दाभोळकर पानसरे यांच्या समवेत त्या प्रसंगी असते, तर त्यांनी हल्लेखोरांना रोखायचा वा पकडण्याचा अजिबात प्रयास केला नसता, हे नक्की. यालाच ‘मध्यमवर्गिय शहाणपणा’ म्हणतात. जो चेंबूरच्या नासिरूद्दीन मन्सुरीपाशी नसतो आणि ‘आम्ही सारे’चा प्रयोग रंगवणार्‍यात ठासून भरलेला असतो.

दाभोळकर पानसरे यांचे मारेकरी व गुन्हेगार शोधून काढणे पोलिसांचे काम आहे, तसेच त्यांची हत्या होऊ नये हे देखील सरकारचेच कर्तव्य होते व आहे. पण प्रत्येक क्षणी प्रत्येक जागी सरकार हजर असू शकत नाही. जसे चेंबूरच्या त्या दुकानात पोलिस वा सरकार हजर नव्हते, पण नासिरूद्दीन मन्सुरी मात्र हजर होता. दुकानदाराला कोणी गुंड धमकावत आला आणि त्याने थेट तलवारीने हल्ला केला. अशावेळी तिथे ‘मध्यवर्गिय शहाणपणा’ अंगात मुरलेले विवेकवादी तिथे असते, तर त्यांनी पिडीत दुकनदाराला वाचवायला हस्तक्षेप करण्यापेक्षा आपला जीव वाचवायला पळ काढला असता किंवा दडी मारली असती. त्यात दुकानदार मारला गेल्यावर मात्र कॅमेरासमोर येऊन सरकारच्या नाकर्तेपणा व पोलिसांचा हलगर्जीपणावर व्याख्यान दिले असते. पण बिचारा नासिरुद्दीन मन्सुरी तितका बुद्धीमंत वा विवेकवादी नव्हता. म्हणूनच त्याने धाडस करून मारेकर्‍यावर चाल केली आणि त्याच्या हातातल्या धारदार तलवारीलाच रोखले. त्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. कोण कुठला एक दुकानदार त्याला वाचवण्यासाठी पोलिस यंत्रणा ‘सज्ज’ असताना मन्सुरीने केला त्याला आगावूपणा म्हणायचे की दिशाभूल म्हणायचे? की हा मन्सुरी पोलिसांच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालत होता? ‘आम्ही सारे’ नाटकाचे तत्वज्ञान व युक्तीवाद मान्य करायचा तर नासिरुद्दीन मन्सुरीने जे काही केले तो आगावूपणा ठरतो. कारण ते पोलिसांचे काम होते. जसे दाभोळकर पानसरे यांच्या हत्येनंतर त्यांचे मारेकरी शोधून काढणे हे पोलिसांचे काम आहे आणि त्यात कुठलीही मदत वा प्रयत्न करणे बाकीच्यांचे काम नाही. नागरिकाचे कर्तव्य पोलिसांच्या नावाने शिमगा करणे आणि गुन्हा घडत असताना नुसता तमाशा बघणे, याला विवेकवाद म्हणत असावेत. सामान्य माणसाच्या बाबतीत त्याला माणुसकी म्हणतात. जी नासिरुद्दीन मन्सुरी करू शकला.

याचे कारणही समजून घ्यावे लागेल. कोण हा नासिरुद्दीन मन्सुरी? त्याने कधी पानसरे वा दाभोळकरांचे नावही ऐकलेले नसेल. पण तो वागला मात्र अस्सल पानसरे दाभोळकरी शैलीत. अंधश्रद्धा वा तत्सम गोष्टीत ज्यांचे शोषण होते त्यातले किती बळी न्याय मागायला दाभोळकरांकडे आलेले होते? आणि आले असतील तर दाभोळकर यांनी त्यात पडायचे कारणच काय? ते काम फ़सवणूक या सदराखाली पोलिसांचे होते. गुन्हेगारांना उघडे पाडणे व त्यातली फ़सवणूक कोर्टात सिद्ध करणे याच्याशी दाभोळकरांचा काय संबंध होता? पण त्यांनी त्यात नाक खुपसले. कारण माणुसकीने विवेकाने त्यांना शांत बसू दिले नाही. पोलिसांचे काम म्हणून पळ काढून नुसतेच पोलिसांच्या नावाने गळा काढण्याला दाभोळकर शैली म्हणत नाहीत. तर अन्याय शोषणाचा बोभाटा करून त्याचे साक्षीपुरावे समोर आणून पोलिसांना कारवाईला भाग पाडण्याला दाभोळकर म्हणतात. हे नासिरुद्दीन मन्सुरीला दाभोळकर न भेटताच उमजले व त्याने योग्य क्षणी तशी कृती करून दाखवली. पण ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक झळकवणार्‍यांना अजून दाभोळकर म्हणजे काय त्याचा आशय विषय देखील उमजलेला नाही. याला खरी अंधश्रद्धा म्हणतात. ज्यात आशयाचा बळी देवून नुसत्या प्रतिकांचे उदात्तीकरण व थोतांड निर्माण केले जाते. न्यायासाठी हस्तक्षेप करण्याचा धोका पत्करण्याला जे तयार असतात, त्यांना दाभोळकर माहिती असण्याची गरज नसते, की ‘आम्ही सारे’ म्हणून मिरवण्याची गरज नसते. पण जे निव्वळ पाखंडवादी असतात त्यांना मात्र अशी नाटके देखावे करावे लागतात. ज्यांना दाभोळकर पानसरे यांचे मारेकरी शोधण्यासाठी आपले कर्तव्यच नाही असे वाटते, त्यांना सामान्य समाजातील अन्यायासाठी काही करण्याची इच्छा तरी कशी असेल? सगळा निव्वळ ‘मध्यमवर्गिय साळसूद शहाणपणा’ असतो आणि कसोटीच्या प्रसंगी तो षंढपणात परावर्तित होऊन खुद्द पानसरे व दाभोळकरांनाही वाचवू शकत नसतो. त्याचे विवेचन सत्यघटनेच्या संदर्भानेच पुढल्या लेखात करू.

पटेलांच्या मोदींना ‘हार्दिक’ शुभेच्छा



स्वातंत्र्योत्तर काळापासून गुजरातमध्ये राजकारणात पटेलांचाच वरचष्मा राहिला होता. जसा महाराष्ट्रात कुठलाही मुख्यमंत्री असला तरी मराठा जातीचेच वर्चस्व राहिले तसेच गुजरातमध्ये संख्येतील प्रमाणात पटेल समाज वरचढ राहिला. त्याला शह देण्याचा प्रयास कॉग्रेसनेही केला. पण १९७१ सालात मोरारजी देसाई यांचा गुजरातमधील प्रभाव खालसा केल्यापासून इंदिरा गांधींनी पद्धतशीर रितीने पटेल समाजाला राजकारणात खच्ची करण्याचा चंग बांधला. त्यासाठी १९८० नंतर माधवसिंह सोळंकी यांना नेतृत्व देण्यात आले. त्यांनी खाम नावाचे कडबोळे तयार केले. खाम हे इंग्रजी अध्याक्षरांनी तयार झालेले कडबोळे आहे. क्षत्रिय, हरीजन, आदिवासी व मुस्लिम असे समिकरण होय. त्यातून बहुसंख्य असूनही पटेल समाजाला दुय्यम बनवण्याचा घाट घातला गेला. त्याचा एक परिणाम असा झाला, की हा समाज कॉग्रेसपासून दुरावत गेला. तसे बघितल्यास सुखवस्तू अशीच पटेल समाजाची व्याख्या होऊ शकते. विविध क्षेत्रात आपल्या उद्यमशीलता व कल्पकतेमुळे आर्थिक यश संपादन केलेला हा वर्ग आहे. पण राजकारणात मात्र त्यांना तितके सन्मानाचे स्थान कायम नाकारले गेल्याची भावना रुढ झाली. सरदार वल्लभभाई पटेल हे नेहरूंना आपल्या नेतृत्वगुणांनी आव्हान होते. पण महात्मा गांधींमुळे पटेलांना देशाचे पहिले पंतप्रधान होण्याची संधी नाकारली गेली. देशातील बहुतांश कॉग्रेस कमिट्या सरदारांचे समर्थन करीत असतानाही केवळ महात्माजींच्या आग्रहाखातर पटेलांना आपला हक्क सोडावा लागला. ही धारणा आजही वेदनेप्रमाणे बोलून दाखवली जाते. तिथून जी सुरूवात होते ती थेट १९८० नंतरच्या काळात खाम कडबोळ्यामुळे वाळीत टाकल्यासारखी पटेल समाजाला मिळालेली वागणूक इथपर्यंत येते. आजच्या हार्दिक पटेल नामक चमत्काराकडे बघताना ही पार्श्वभूमी विसरून चालणार नाही.

इंदिरा गांधी यांनी खुलेआम पटेलांना दडपण्याचा प्रयत्न केला, त्याला पहिले आव्हान देणारा पटेलच होता हे विसरता कामा नये. १९७१ च्या प्रचंड यशावर स्वार झालेल्या इंदिराजींच्या श्रेष्ठी असण्याला पहिले आव्हान गुजरातचा नवा मुख्यमंत्री नेमताना चिमणभाई पटेल यांनी दिले होते. पक्षाचे बहुसंख्य आमदार कोंडून ठेवून मुख्यमंत्रीपद मिळवणारा पहिला नेता गुजरातचा होता आणि त्याचे नाव चिमणभाई पटेल. पण १९८० सालात पुन्हा इंदिराजी आणिबाणीचे प्रायश्चीत्त घेऊन राजकारणात परतल्या, तेव्हा त्यांनी पटेलांची मुस्कटदाबी आरंभली आणि तेच काम माधवसिंह सोलंकी यांच्यावर सोपवले. त्यांनीच मग खाम असे कडबोळे बनवून पटेल समाजाला गुंडाळून टाकले. त्याला शह देताना आपल्या पक्षबांधणीसा‍ठी भाजपाने पद्धतशीरपणे केशूभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली पटेल समाजाला पर्यायी राजकारणात उभे करण्याचा डाव खेळला. अन्य बारीकसारीक समाजाला सोबत घेऊन केशूभाई, वाघेला व नरेंद्र मोदी अशा संघ प्रचारकांनी हिंदूत्व या छत्रीखाली पटेल समाजाला एकवटण्याचे राजकारण केले. त्यातून एक गठ्ठा पटेल मतांची बेगमी भाजपाकडे झाली आणि इतर समाजगटांच्या सोबतीने कॉग्रेसचे खाम कडबोळे वीस वर्षापुर्वी मोडीत निघाले. पर्यायाने पटेल म्हणजेच भाजपा अशी एक राजकीय भूमिका तयार झाली आणि त्याच्या परिणामी तिथल्या भाजपात विविध गट केशूभाईंच्या पटेलनितीला आव्हान द्यायला उभे राहू लागले. त्यातून हे नवे राजकीय समिकरण ढासळू लागले आणि म्हणून त्यात कुठेही न बसणारा नरेंद्र मोदी हा पर्याय भाजपाने पुढे आणला. त्याने पटेल वा इतर गट बाजूला टाकून व्यापक हिंदूत्व उभे करताना मुस्लिम आक्रमक हिंसक राजकारणाचा बागुलबुवा यशस्वीरित्या उभा केला. त्यात पटेल अस्मिता मागे पडली तशीच इतरही लहानसहान अस्मिता निकालात निघाल्या होत्या.

२००२ नंतरच्या राजकारणात पटेलांची महत्ता कमी होतेय हे ओळखून केशूभाई हातपाय हलवू लागले होते आणि काही प्रमाणात त्यांनी आपल्या झडापिया यासारख्या हस्तकांमार्फ़त मोदींना आव्हान उभे करायचे मनसुबे राबवलेही होते. त्यांनी वेगळा पक्ष स्थापन करून कॉग्रेसशी हातमिळवणी करूनही बघितले. पण मोदींच्या हिंदूत्वापुढे त्यांची डाळ शिजली नाही आणि अखेरीस २०१२ च्या शेवटी खुद्द केशूभाईंना मोदीविरोधी आघाडी उघडावी लागली. तरीही ती निकामी ठरली. दरम्यान मोदी यांनीही आनंदीबेन पटेल यांनाच आपल्या विश्वासू सहाय्यक बनवून केशूभाईंना राजकीय शह दिला होता आणि त्यांनाच पुढे वारस म्हणून मुख्यमंत्री पदावरही बसवले. पण खरी सत्ता आजही मोदींच्याच इशार्‍यावर चालते आणि पटेलांना स्थान कमी अशी धारणा कायम आहे. त्याचा दुसरा भाग व्हायब्रंट गुजरात आहे. आजवर एकूण गुजरातच्या विकासात पटेल समाजाने बारीकसारीक उद्योग व्यापारात आपले वर्चस्व कायम राखले आहे. पण मध्यंतरीच्या दहा वर्षात मोदींनी परकीय व परप्रांतिय भांडवल आणून जो विकास घडवला; त्यातून मोठे उद्योग उभे रहाताना हजारो लघूउद्योग डबघाईला गेले. त्यात बहुतांश भरणा पटेलांचा आहे. विकासाच्या त्या गंगेत पटेल मागे पडले वा पडत चालले आहेत. त्यातून आलेली अस्वस्थता राजकीय नेत्यांना मोजता किंवा वापरता आली नाही. एका बाजूला व्यापार उद्योगात गुंतलेल्या पटेल समाजाने नोकरी चाकरीचा विचारही कधी केला नव्हता. पण विकासाच्या गंगेत वाहून गटांगळ्या खावू लागलेल्या त्याच पटेल समाजात गुजरात मॉडेलविषयी राग व प्रक्षोभ वाढतच गेला. आज नव्या हार्दिक लाटेमागचे तेच प्रमुख कारण आहे. त्याचा लाभ उठवायला अनेक राजकीय पक्ष व गट छुपेपणाने हजर असले व कॉग्रेस त्याचा आश्रयदाता असला, तरी त्यातली पटेलांची वेदना गैरलागू नक्कीच नाही. सरदार पटेलांपासून केशूभाईंपर्यंतची वेदना त्यात सामावलेली आहे. हार्दिकला मिळत असलेला प्रतिसाद म्हणूनच समजून घेतला पाहिजे व ओळखला पाहिजे.

आजच्या परिस्थितीत पटेल मुख्यमंत्री असतानाही गुजरातमध्ये एका कोवळ्या पोराला मिळणारा प्रतिसाद अनेक राजकीय हेतूंनी ग्रासलेला आहे आणि अनेक राजकीय हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. म्हणूनच ते मोदींना घरातूनच उभे राहिलेले आव्हान आहे, की मोदींची लोकप्रियता ओसरू लागल्याचे लक्षण आहे? त्याविषयी घाईघाईने निष्कर्ष काढणे उतावलेपणाचे होईल. निदान मी तरी अशी घाई करणार नाही. कारण आता मोदी गुजरातच्या मर्यादेतले राजकारणी राहिलेले नसून राष्ट्रीय राजकारणात एक महत्वाचे पात्र झालेले आहेत. त्याला गुजरातच्या सीमा बंदिस्त करू शकत नाहीत. याचे पहिले कारण म्हणजे राष्ट्रीय पातळीवर मोदींना आव्हान देवू शकेल, असा कोणी नेता आजतरी भारतीय क्षितीजावर दिसत नाही. पण बुडत्याला काडीचा आधार अशा मानसिकतेने मोदींना पाण्यात बघणार्‍यांना हार्दिक नावाची काडी मिळाल्याचे समाधान उपभोगायचे असेल, तर त्यात बिब्बाही घालण्याचे कारण नाही. मात्र या निमीत्ताने एक गोष्ट मोदींनाही लक्षात घ्यावी लागेल, की अमित शहांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात काय चुक झाली त्याचे मूळ यातून शोधायला हवे. ‘साडेपाच करोड गुजराती’ या भूमीवरून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात झेप घेतली, तीच भूमी ढासळू लागली आहे आणि राजकीय भूमी किती निसरडी अस,ते त्याचा बोध यातून घ्यायचा असतो. अवघे गुजराती एकदिलाने मोदींच्या पाठीशी नसतील तर सगळे भाजपाई सुद्धा तितके मोदीनिष्ठ असल्याच्या भ्रमात राहुन भागणार नाही. मग ज्याप्रकारची गुर्मी वा उद्दामपणा अमित शहा व अन्य भाजपाचे नेते दाखवतात, त्यांना वेळीच लगाम लावला नाही तर पुढला काळ अवघड असेल. हार्दिक पटेल हे मोदींसाठी राजकीय आव्हान नक्कीच नाही. पण खरे आव्हान केव्हाही उभे राहू शकते, याचा हार्दिक हा संकेत आहे. लोकसभेच्या यशानंतर शत-प्रतिशतचा नारा घेऊन मित्रांना शत्रू बनवण्याचा सपाटा अमित शहांनी लावला. त्याला येऊ लागलेली ही विषारी फ़ळे ओळखता आली, तरच मोदींना व त्यांच्या नेतृत्वाखालच्या भाजपाला दिर्घकाळ देशाच्या राजकारणात आपले बस्तान बसवता येईल. गुजराती वा अन्य कुठल्या एका जाती समाज गटाचा वरचष्मा फ़ारकाळ टिकत नाही, हाच धडा आहे. पटेलांनी देऊ केलेल्या ह्या हार्दिक शुभेच्छांतून मोदी-शहा धडा घेतील ही अपेक्षा करावी का?



Tuesday, August 25, 2015

दाऊदच्या गौप्यस्फ़ोटामागचा गर्भित डाव?



भारताच्या गुप्तहेर संस्थेने दाऊद कुठे रहातो याचे पुरावे गोळा केल्यावर त्याचा गवगवा केल्याने खेळी फ़सली आणि अशा गोष्टी उघड करायच्या नसतात. त्यासाठी मिरवायचे नसते, असे आपल्याकडल्या अनेक बुद्धीमंतांना वाटते. म्हणूनच दाऊदचा नवा फ़ोटो वा त्याच्या पत्नीशी झालेल्या संवादाचे मुद्रण ऐकवण्यात भारतीय हेरखात्याने कसा मुर्खपणा केला, त्याचे पांडित्य सांगितले गेले. पण ज्यांनी अशी बातमी देताना आपणच दाऊदच्या पत्नीशी संपर्क साधल्याचे कौतुक करून घेतले त्यांनाही अशा गोष्टी कशासाठी होत असतात, त्याचा पत्ता लागलेला नसावा. पहिली गोष्ट म्हणजे गुप्तहेर खाते वा त्याच्या कारवाया राजकारण व मुत्सद्देगिरीच्या पलिकडचा विषय असतो. व्यापक राजकारणातली व्युहरचना गुप्तहेरांच्या कारवाईतून होत असते. त्यामध्ये काही छुप्या खेळी असतात, तर काही उघड खेळी असतात. दाऊदचा नवा फ़ोटो वा त्याच्या पत्नीशी झालेल्या संवादाला प्रसिद्धी देण्यामागे अशीच काही खेळी असू शकते. मात्र त्याचा विचार करायचीही अनेकांना गरज वाटत नाही. आपल्या समजुती वा भूमिका याच्या पलिकडे जग चालते, त्याचाही अशा लोकांना गंध नसतो. म्हणूनच ऐन मोक्याच्या वेळीच दाऊदविषयी हा गौप्यस्फ़ोट कशाला करण्यात आला, ते त्यांना उमगतही नाही. किंबहूना त्यामागची रणनिती सरकार वा गुप्तहेर खात्याने पत्रकार परिषद घेऊन जाहिर करावी, अशी त्यांची अपेक्षा असावी. अन्यथा त्याच्या परिणामांचा विचार झाला असता. त्यावर वायफ़ळ पांडित्य सांगायची हौस भागवली गेली नसती. मात्र हे पांडित्य सांगून संपण्यापुर्वीच पाकिस्तानात पळापळ सुरू झाली आणि दाऊदला कराचीतील घरातून कुटुंबासह उत्तर पाकिस्तानात सुरक्षित जागी हलवण्यात आल्याची बातमी आली. त्यातून अशा खेळीमागचा डाव लक्षात येऊ शकतो. पण ज्यांना तो समजून घ्यायचा असेल, त्यांनाच तो बघावा असे वाटणार ना?

कुठल्याही गुतहेर खात्याच्या कामात नुसती माहिती काढणे वा घातपात करणे इतकेच काम नसते. मित्र व शत्रू देशातील गुप्तहेर खाती आपापल्या सरकारच्या धोरणाला पुरक ठरेल अशा खेळी करीत असतात आणि त्यानुसार हवी असलेली माहिती व साधनांचा उपयोग करून घेत असतात. सध्या भारताने पाकिस्तानला कोंडीत पकडण्याचे धोरण आखलेले आहे. त्याला पुरक होईल अशाच खेळी मुत्सद्देगिरी व गुप्तचर खात्याकडून खेळल्या जाणार ना? मग त्यात ठरलेली बोलणी फ़िसकटणे. पाकिस्तानने त्यातून माघार घेणे वा पाकिस्तानच्या अंतर्गत गोटात परस्पर शंका-संशयाचे वातावरण निर्माण होणे; अशा अनेक खेळी संभवतात. दाऊदची माहिती उघड करणे त्याचाच एक भाग असू शकतो. नुसता दाऊदचा पत्ता ठाऊक असल्याने त्याला तिथे जाऊन उडवणार असा होत नाही. तर तुम्ही ज्याला लपवून सुरक्षित जागी ठेवला असा दावा आहे. तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो, असे भासवून शत्रूची तारांबळ उडवून देण्य़ाचाही त्यामागे डाव असू शकतो. दाऊदच्या पत्नीचा फ़ोनवर बोलतानाचा व्हीडीओ त्यातला सूचक इशारा असू शकतो. कोणीतरी आतला माणूस फ़ितूर असल्याचे त्यातून भासवले जात असते. कडेकोट बंदोबस्तामध्ये असलेल्या व्यक्तीचे असले चित्रण तिथल्या बंदोबस्तातील त्रुटी सिद्ध करत असते. म्हणून तिथपर्यंत कोणी मारेकरी सहज पोचणे शक्य असते, असे अजिबात नाही. पण बंदोबस्त करणार्‍यांचा आत्मविश्वास खच्ची करायला अशी माहिती वापरण्याचा प्रयास असू शकतो. ती माहिती दाऊदपर्यंत पोहोचण्यासाठी अजिबात निरूपयोगी असली, तरी आत्मविश्वासाला खिळखिळा करायला उपयुक्त असते. नेमका तोच डाव साधला गेला आहे काय? कारण दोनच दिवसात दाऊदला कराचीतून अन्यत्र सुरक्षित जागी हलवण्याची बातमी आलेली आहे. ती बातमी खरी असेल तर ह्या गौप्यस्फ़ोटाचा हेतू सफ़ल झाला असेच म्हणावे लागेल.

दुसरी बाब अशी, की दाऊदला कराचीत आपण सुरक्षित ठेवू शकत नाही, हे पकिस्तानने कृतीतून मान्य केले, असाही या बातमीचा अर्थ होतो. पुन्हा अशा बातम्या खर्‍या असतील तर शत्रूच्या गोटात आणखी खळबळ उडवून देण्यास पुरेशा असतात. गुप्तहेर खात्याच्या कामात हिंसा वा धमाक्यापेक्षा संशयाची पेरणी अधिक स्फ़ोटक व घातक असते. कारण एकाच संस्था संघटनेतील लोकांमध्ये परस्परांविषयी संशय वाढवण्यास ती बातमी कारण होते. दाऊदला कराचीतून हलवल्याची बातमी खरी असेल, तर तो डाव यशस्वी झाला असेच मानावे लागेल. आणि अशी ही पहिलीच खेळी नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस वेदप्रकाश वैदिक नावाच्या तोंडपाटिलकी करणार्‍या ज्येष्ठ पत्रकाराच्या बाबतीत हेच घडले होते. एका पत्रकार पथकासोबत पाकिस्तानात सेमिनारला गेलेला हा वैदिक नावाचा पत्रकार, थेट तोयबाचा प्रणेता सईद हाफ़ीज याच्या घरापर्यंत जाऊन बोहोचला होता. सईदची भेट घेऊन त्याला भारतात येण्याचे आमंत्रण त्याने दिले होते आणि त्याबाबतीत त्याच्या सोबत पाकिस्तानात गेलेले बहुतांश पत्रकार अनभिज्ञ होते. किंबहूना ते अनेकदा तिथल्या आमंत्रणावरून पाकिस्तानला भेट दिलेले व तिथे अनेक मित्र असलेले मुरब्बी पत्रकार होते आणि त्यांनीच वैदिकला तिथे सोबत नेलेले होते. पण त्यांना अंधारात ठेवून वैदिकने केलेल्या कारवायांनी त्याच ‘मुरब्बी’ भारतीय पत्रकारांना चकीत व्हायची पाळी आलेली होती. पण वैदिकच्या त्या पराक्रमाला प्रसिद्धी मिळाली आणि इथल्या पाक-मित्र पत्रकारांची बोबडी वळली होती. तर तिकडे सईद हाफ़ीज पुढले दोन महिने कुठल्या कुठे गायब झालेला होता. मग अशा प्रसिद्धी व गाजावाजा करण्यामागची खेळी समजून घ्यायची असते. त्यामागे शत्रूच्या बालेकिल्ल्यात पुरेशी सुरक्षा नसल्याचे दाखवून खळबळ माजवच्याचा हेतू असतो. तो हेतू समजला तरच अशा खेळीची मजा लक्षात येऊ शकते.

दाऊद विषयीचा मागल्या आठवड्यातील गौप्यस्फ़ोट हा दोन देशातील बोलण्यांवर प्रभाव पाडण्याची खेळी नव्हती. तर पाकिस्तानला विचलीत करण्याची धुर्त खेळी होती. त्यात मग अर्णब वा टाईम्स नाऊ वाहिनीला साळसूदपणे वापरून घेतले जाते. त्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यांना आपणच धक्कादायक बातमी दिल्याची मर्दुमकी गाजवल्याचे समाधान मिळते. पण दुसरीकडे शत्रूला त्याच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणे किती सोपे आहे, त्याचा साक्षात्कार घडवून भयभीत करता येते. यात दाऊदचा नवा वयस्कर झालेला फ़ोटो कोणा निकटवर्तियाने घेतलेला असू शकतो. त्याचप्रमाणे घरात बंदिस्त असलेल्या दाऊदच्या पत्नीचा असा व्हीडिओही तिच्यापर्यंत पोहोचणे शक्य असल्याचे दाखवून देतो. पण तिथेच गोष्ट संपत नाही. असे चित्रण करणारा बाहेरचा कोणी असण्यापेक्षा आसपास वावरणार्‍यांपैकी असल्याचा संशय बळावतो. मग तिथे परस्परांना संशयाने बघणे सुरू होते. दुसरी गोष्ट नजरकैदेत असलेल्या दाऊदला हलवताना कितीही काळजी घेतली, तरी थोडीफ़ार माहिती फ़ुटतेच. आताही नुरी या जागी त्याला हलवल्याची बातमी खरी असेल, तर त्यातून आणखी संशयकल्लोळ उठणार आहे. त्यामुळे एकुण दाऊद प्रकरणातला गवगवा दोन देशातील बोलण्यांशी संबंधित नाही, हे लक्षात येऊ शकेल. त्या निमीत्ताने माजवलेला तो संशयकल्लोळ आहे. मुत्सद्देगिरी व गुप्तचर कार्य यातला हा फ़रक आहे. पण ते समजून घेण्यासाठी मुळात त्याचा अभ्यास करावा लागतो. त्यातले परस्पर पुरक काम आणि फ़रक दोन्ही लक्षात आले तर त्यामागचे हेतू उमजू शकतात. निव्वळ पुस्तकी पांडित्य त्यात कामाचे नसते. आपली यंत्रणा व सुरक्षा आतून किती पोखरली गेली आहे, याविषयी पाकच्या मनात शंका निर्माण करण्याचा तो डाव असू शकतो. त्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन सांगितली जात नाही, की धुर्त मुत्सद्देगिरीचे हेतूही जाहिरपणे सांगितले जात नाहीत.

Monday, August 24, 2015

आषाढी कार्तिकी भक्तजन येती?



इन्व्हेस्टीगेशन डिस्कव्हरी या वाहिनीप्रमाणेच ‘लाईफ़ ओके’ ही एक उपग्रह वाहिनी आहे. त्यावर अनेक मनोरंजक मालिका दाखवल्या जातात. त्यातच ‘सावधान इंडीया’ असाही एक सत्यकथा आधारीत कार्यक्रम आहे. भारताच्या विविध राज्यात घडलेल्या अतिशय रहस्यमय वाटणार्‍या गुन्ह्यांचा तपास त्यात दाखवलेला असतो. विशेष असे, की यातल्या कथांमध्ये प्रामुख्याने पोलिसांपेक्षा बळी पडलेल्यांच्याच कुणा आप्तस्वकीय वा मित्राने पुरावे शोधण्याचा पराक्रम दाखवलेला असतो. ही अत्यंत सामान्य घरातली वा कुटुंबातील माणसे असतात. पण आपल्या कुणाला हकनाक मारले गेले, पळवले गेले किंवा फ़सवले गेल्याने चिडलेल्या अशा लोकांनी सत्याचा वेध घेण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून गुन्ह्याचा गुंता उलगडला असेच दिसते. काही प्रकरणात तर पोलिस अशा आप्तस्वकीयांना हाकलून देतात आणि त्यांच्याशी संपुर्ण असहकार्य करताना दिसतात. तपास चालू आहे अशा नुसत्या आश्वासनावर पिडीतांची पोलिस बोळवण करताना दिसतात. म्हणजेच त्यांची व्यथा दाभोळकर पानसरे पाठीराख्यांपेक्षा किंचीतही वेगळी नाही. पण गुन्ह्याचा शोध घेण्याची दुर्दम्य इच्छशक्ती दोन बाजूंमध्ये जमिन अस्मानाइतकी भिन्न दिसते. इथे दोन वर्षे होऊन खुनी मिळत नाही म्हणून सरकार वा पोलिसांवर आरोप करण्यात दाभोळकर अनुयायी धन्यता मानताना दिसतात. त्याचा गाजावाजा करून राजकीय भूमिका मांडण्याची संधी त्यात शोधली जाते. पण त्यापलिकडे कुणाची मजल जात नाही. हा अजब विरोधाभास दोन बाजूंमध्ये आढळून येतो. तिथे सामान्य घरातली व सामान्य बुद्धीची माणसे आपल्या अपुर्‍या शक्ती व साधनांनिशी गुन्हेगाराचा वेध घेण्यासाठी अगदी जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करतात. रोजच्या रोज या वाहिनीवर तशा दोन तरी सत्यकथा दाखवल्या जातात. कोणीही त्या बघून आपले समाधान करू शकतो.

ज्यांना कुणाला डॉ. दाभोळकर वा कॉ. पानसरे यांच्याविषयी किंचीतशी आस्था असेल, त्यांनी मुद्दाम दोनचार दिवस वेळ काढून लाईफ़ ओके या वाहिनीवरचे ‘सावधान इंडीया’ मालिकेतील दोनचार भाग मुद्दाम बारकाईने बघावेत. मग गुन्हेतपास आणि त्यातले पुरावे शोधणे किती जिकीरीचे काम असते, त्याचा अंदाज येईल. किंबहूना गुन्ह्याची जी माहिती आपल्या समोर येत असते किंवा सांगितली जात असते; त्यापेक्षा सत्य किती भयंकर भिन्न असते, त्याची कल्पना येऊ शकेल. त्यात अनेकदा खुद्द गुन्हेगारच सगळ्या तपासाला कशा हुलकावण्या देत असतो ते लक्षात येऊ शकेल. पोलिसांच्या कुशाग्र बुद्धीलाही गुन्हेगार कशा झुकांड्या देतात, ते लक्षात येऊ शकते. पण त्याहीपेक्षा अशा गुन्ह्यात सामान्य बुद्धीची, पण आस्था असलेली जवळची माणसे गुन्ह्याचा छडा लावण्यात किती परिश्रम घेतात त्याची जाणिव होते. जर तुमच्या मनात बळी पडलेल्याविषयी तितकी आस्था असेल, तर तुम्ही पोलिसांवर खापर फ़ोडण्यात धन्यता मानत नाही, किंवा त्याचे भांडवल न करता खर्‍या गुन्हेगारापर्यंत कसे पोहोचू शकता. त्याचा अंदाज त्यातून येऊ शकेल. कालपरवाच एक मध्यप्रदेशातील एक अशी कथा बघण्यात आली. त्यात अतिशय कुटीलपणाने एक महिला विवाहित सहकार्‍याचा खुन पाडते आणि अगदी सहजपणे त्यातून निसटते. पण मृताची सामान्य पत्नी नुसत्या तर्काच्या आधारे पुरावे गोळा करून आपल्या पतीच्या बुद्धीमान खुनी महिलेला पोलिसांना पकडायला कशी भाग पाडते. त्याचे वास्तव बघायला मिळाले. यापैकी मागल्या दोन वर्षात काय होऊ शकले? पोलिसांना व सरकारला दोष देण्यापलिकडे दाभोळकर समर्थक काय करू शकले आहेत? त्यापैकी कोणालाच खरे खुनी ‘आपण सारे शोधू’ असे का वाटू शकलेले नाही? अनिवार इच्छा असण्यापेक्षा घडलेल्या भयंकर घटनेचे नुसते राजकीय भांडवल करण्याचा सोस कशाला?

उपरोक्त घटना भारतातल्याच आहेत आणि तिथेही तितक्याच पोलिसी अनास्था वा हलगर्जीपणाचा अनुभव सामान्य लोकांना नेहमी येत असतो. त्यापेक्षा दाभोळकर प्रकरणात काहीही वेगळे घडलेले नाही. मग अशी शंका येते, की खरे खुनी मिळण्यापेक्षा एका हकनाक हत्येचे नुसते राजकीय भांडवल करण्याचाच हेतू साधला जातो आहे काय? म्हणजे त्या हत्येचे सोहळे साजरे करण्यात रस असल्याने समर्थकांनाच खरे खुनी पकडले जाण्याची आवश्यकता वाटत नाही काय? असती तर त्यापैकी कोणी विविध मार्गाने खरे खुनी, हल्लेखोर, दुष्मन शोधण्याचा वा पुरावे गोळा करण्याचा कोणता प्रयत्न केला आहे? नसेल तर कशाला केलेला नाही? पोलिस नालायक जरूर असतील. पण तुम्ही किती प्रामाणिक आहात, त्याचा पुरावा कोणी द्यायचा? पोलिसांनी प्लॅन्चेट वापरल्यावरून काहुर माजवण्यात आले. कारण दाभोळकर वैज्ञानिक भूमिका मांडत होते. हरकत नाही, पण मग ज्या वैज्ञानिक भूमिकेचा आग्रह धरला जातो, त्याच मार्गाने कितीजण खुन्याचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावले? नुसता कालवा करण्यात सगळे पुढे आहेत. पण स्वत: काही करावे अशा इच्छेचा लवलेश नाही. मात्र सहा महिने आणि वर्षाने सोहळा करायला अगत्याने हजेरी लावली जाते. २० ऑगस्टला अगत्य दिसले. पण आता पुढे काय? एकदम २०१६चा २० ऑगस्ट? की २० फ़ेब्रुवारीचा पानसरेंचा स्मृतीदिन? मधला काळ कोणाला त्या दोघांचे स्मरण तरी होते काय? कशाला होत नाही? दोन तारखांपुरते हे लोक महत्वाचे होते आणि त्यांच्या हत्येला बाकी काहीच महत्व नाही काय? ‘आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान गे करीती’, या आरतीप्रमाणे हे दोन दिवस साजरे करण्यासाठी दोन चांगल्या माणसांचा बळी गेला आहे काय? जे कोणी अशा सोहळ्यात सहभागी होतात, त्यांनी जरा हे प्रश्न आपल्याच मनाला विचारून बघावेत.

पोलिस नालायक आहेत आणि राज्यकर्त्यांना दाभोळकर पानसरे यांचे मारेकरी शोधण्यात अजिबात रस नाही, हा आरोप मान्य केला. पण जे कोणी असा आरोप सतत करत आले, त्यांनी कोणी तपासासाठी आपल्या परीने काय केले आहे? काय काय करता येऊ शकेल? उपरोक्त वाहिनीच्या ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमात पिडितांनी केलेले प्रयास बघितले तर सामान्य माणूस किती बारकाईने शोध घेऊ शकतो, त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. किंबहूना या दोन हत्याकांडाचे राजकीय भांडवल करणार्‍यांनी काहीच तसे केलेले नाही, त्याचीही प्रचिती येते. कारण खुनाच्या वा अन्य कुठल्याही गुन्ह्यामागे नेहमी हेतू व लाभार्थी महत्वाचे दुवे असतात. दाभोळकर व पानसरे यांच्या हत्येचा शोध घेताना याच दोन गोष्टींकडे साफ़ पाठ फ़िरवण्यात आलेली आहे. केवळ राजकीय हेतूनेच त्यांच्या हत्या झाल्या, असे गृहीत पोलिसांच्या माथी मारून त्यांना वास्तविक गुन्ह्याचा मूलभूत तपासच करू दिलेला नाही. उपरोक्त गुन्ह्यांचा तपास लागू शकला व सामान्य लोकांनी लावला, त्याचे एकमेव कारण त्यात कोणाला कसला लाभ होऊ शकतो आणि कोणाचा त्यात हेतू असू शकतो, याचा कसून शोध घेतला गेला आहे. दाभोळकर पानसरे हत्याकांडात राजकीय हेतूपेक्षा अन्य काही हेतूही असू शकतात. त्याचा शोध खरे तर त्यांचेच निकटवर्तिय घेऊ शकतात. किंबहूना अशा जवळच्या लोकांपाशी असलेली बारीकसारीक माहिती खर्‍या गुन्हेगार खुन्यांपर्यंत घेऊन जाण्यास निर्णायक महत्वाची ठरू शकेल. पण त्यासाठी कोणी पुढाकार घेतल्याचे दोन वर्षात कुठे दिसले नाही. मग शंका येते, की यापैकी कोणाला शहीद झालेल्यांविषयी आस्था आहे की नुसते सोहळे करण्य़ातच त्यांना आस्था आहे? त्याची साक्ष आता पानसरे यांच्या स्मृतीदिनापर्यंत काय होते त्यातूनच लक्षात येऊ शकेल. कारण आता ‘आम्ही सारे’ २० फ़ेब्रुवारीपर्यंत काहीही हालचाल करणार नाहीत आणि तेव्हा पुन्हा एक सोहळा करून पोलिस व सरकारच्या नावाने गदारोळ केला जाईल. पुन्हा सर्वकाही शांत होईल, ते २० ऑगस्टपर्यंत.

अधू मेंदुचा मधू



नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुका जिंकल्या हा त्यांचा पराक्रम कोणी नाकारू शकत नाही. पण एकदा निवडणूका जिंकल्या, मग त्यांचे काम संपलेले होते. त्यांनी बाकीचे राजकारण सोडून मराठी शिकायला घेतले पाहिजे होते आणि शक्य तितक्या लौकर मराठीत अग्रलेख लिहून दैनिक ‘लोकसत्ता’चे गिरीश कुबेर यांना थोडी सवड द्यायला हवी होती. म्हणजे देशातील विविध समस्या व प्रश्नांची उत्तरे शोधत बसायची वेळ मोदींवर आलीच नसती. कारण जगातल्या कुठल्याही प्रश्नावर समस्येवर अक्सिर इलाज असलेला एकमेव हकिम-वैद्य आज पृथ्वीतलावर कोण असेल, ते गिरीश कुबेर होत. मग विषय याकुब मेमनला फ़ाशी वा अन्य कुठली शिक्षा देण्याचा असो किंवा पाकिस्तानशी बोलणी करण्याचा असो. तिथे काय करावे किंवा करू नये, याची योग्य माहिती व कृती फ़क्त कुबेरांनाच अवगत आहे. सहाजिकच निवडणूका जिंकल्यावर मोदींनी भारत सरकारचे कामकाज कुबेरांकडे सोपवून अग्रलेख लिहायचे काम हाती घ्यायला नको काय? पण मोदींना सत्तेचा हव्यास इतका, की पंतप्रधान पदाची शपथ घेऊन ते देशाचा कारभार हाकू लागले. आणि बिचार्‍या कुबेरांना इथे लोकसत्तेचे अग्रलेख लिहायची खर्डेघाशी करण्यात आपली बुद्धी व गुणवत्ता वाया घालवण्याचे बुरे दिन आले. अर्थात त्यामुळे कुबेरांचे कुठलेच नुकसान होणार नाही. नुकसान मोदींचेच होईल. कारण इतका कुशाग्र बुद्धीचा माणूस उपलब्ध असताना त्याच्यावर काम सोपवण्याचा विचारही मोदींनी केला नाही. अन्यथा एव्हाना पाकिस्तान कसा सुतासारखा सरळ आला असता आणि याकुबनेही दाऊदला आणून भारताच्या हवाली केले असते. कुठल्या वाटाघाटी वा अटीशर्थींची वेळही आली नसती. पण मोदींना नुसता चमकण्याचा हव्यास अधिक. त्यामुळे देशाचे भयंकर नुकसान झाले आहे. यापुढेही होणार आहे. ‘हात दाखवून’ अवलक्षण म्हणतात ते यालाच.

आता पाकिस्तानला भारताशी बोलणी वा वाटाघाटी करायला आवडत नाहीत तर त्याला तेच करायला भाग पाडणे म्हणजेच मुत्सद्देगिरी असते. हेच मोदींना ठाऊक नाही. कारण मोदी लोकसत्ता वाचत नाहीत. वाचत असते तर त्यांनी कधीच कुबेरांना आपल्या गुरूस्थानी नेमून बारामतीऐवजी लालबागच्या हनुमान गल्लीत जाण्याचे कष्ट घेतले असते आणि बारामतीच्या शरद पवारांना प्रतिमहिना फ़ोन करण्यापेक्षा कुबेरांचा दरमहा सल्ला घेतला असता ना? पण म्हणतात ना? घरकी मुर्गी दाल बराबर? कुबेरांचे तेच दुर्दैव आहे. तिकडे दूर पाकिस्तानात बसलेले राजकारणी, मुत्सद्दी कुबेरांच्या अग्रलेखाने नित्यनेमाने वाचन व परीशीलन करतात. म्हणून त्यांनाच हवे तसे जगातले राजकारण चालत असते. आपल्याला भारताशी बोलणी नकोच आहेत, हे कुबेरांना नेमके कळते हे लक्षात आल्यापासून पाकिस्तानात लोकसत्ताचा खप नि वाचक कमालीचे वाढले आहेत. किंबहूना आमच्या माहितीप्रमाणे पाकचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज कुबेरांशी नित्यनेमाने संपर्कात असतात. त्यांचा वेगवेगळ्या विषयावर सल्लाही घेत असतात. म्हणून तर उफ़ा येथील मोदी-शरीफ़ भेटीत ठरलेली बोलणी कशी बारगळावीत, त्याची योग्य पावले अझीज उचलू शकले. मोदींना तर कुठल्या शरीफ़ला भेटावे त्याचाही थांगपत्ता अजून लागलेला नाही. पाकिस्तानात जनरल राहिल शरीफ़ हा खरा सत्ताधीश आहे आणि नवाज शरीफ़ हा नामधारी सत्ताधीश पंतप्रधान म्हणून मिरवत असतो. त्यातल्या नवाजला भेटून बोलणी ठरवून काय व्हायचे होते? भेटायचे व बोलायचे तर हे राहिल शरीफ़शी बोलायला हवे. रशियात उफ़ा येथे जाण्यापुर्वी मोदींनी तशी मसलत कुबेरांशी केली असती, तर मुळात तिथे जाहिर झालेले संयुक्त निवेदन तरी कशाला प्रसिद्ध झाले असते? आणि प्रसिद्ध होऊनही त्यात कुठले मुद्दे आहेत, ते कुबेरांना कशाला दिसले नसते?



त्या उफ़ा येथील भेटीत दोन देशांच्या पंतप्रधानांनी एक संयुक्त निवेदन काढले आणि त्यात कुठेही काश्मिरचा उल्लेख नाही, म्हणून पाकिस्तानी राजकारणात गदारोळ माजला होता. याचा अर्थ निवेदनातले मुद्दे ठाऊक नसतानाच तिथे गदारोळ झाला असणार ना? जे मुद्दे भारताने लपवून ठेवले व त्याविषयी कोणाला विश्वासात घेतले नाही असे कुबेर म्हणतात, त्याचा अर्थ प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनाखेरीज त्यात अनेक छुपे मुद्दे असणारच. शिवाय ते कुबेरांना कळले नाहीत वा त्यांनी वाचले नसतील, म्हणजेच ते लपवलेले असणार. मग भले त्यावरून पाकिस्तानात काहुर माजलेले असो किंवा त्यामुळेच दोन्ही देशातल्या वाटाघाटी फ़िसकटलेल्या असोत. कुबेरांना ठाऊक नाहीत म्हणजे मुद्दे लपवलेलेच असणार. पण मग असा प्रश्न येतो, की पाकिस्तानातले लोकसत्ताचे चोखंदळ वाचक त्याच निवेदन व मुद्द्यावर इतके प्रक्षुब्ध कशाला झालेले होते? लपवलेले मुद्दे म्हणजे काय? कुबेर लिहीतात, ‘सोमवारपासून सुरू होणारी बैठक या उफा चर्चेच्या आधारे होणे अपेक्षित होते. परंतु उफा चर्चेत काय ठरले हेच आपण देशास सांगितलेले नसल्याने त्याबाबत आपण जे बोललो ते पाकिस्तानने खोडून काढले.’ सवाल इतकाच, की भले मोदी वा भारत सरकारने उफ़ाबद्दल कोणाला काही समजावलेले नसेल. पण मग पाकिस्तानात शरीफ़ यांनी तरी कोणाला काही समजावले की नाही? नसेल तर सीमेच्या अलिकडे व पलिकडे मागला महिनाभर या चर्चेविषयी धुमाकुळ कशाविषयी चालला होता? नवाज शरीफ़ यांच्यावर तिथले लष्करवादी व जिहादी कशाला तुटून पडले होते? शेवटच्या दिवसात पाक पत्रकार मायदेशीच्या सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांची खिल्ली कशाला उडवत होते? आणि कुबेरांना फ़डतूस वाटतात त्या भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांचे पकिस्तानात कौतुक कशाला चालले होते?

सगळा नरेंद्र मोदींचा मुर्खपणा आहे. पहिली चुक म्हणजे निवडणूका जिंकल्यावर त्यांनी कुबेरांना पंतप्रधानपदी नेमायला हवे होते. पुढे मुत्सद्देगिरीने पाकिस्तानला बोलणी करायला भाग पाडण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयही कुबेरांच्याच हाती असायला हवे होते आणि सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा असल्याने पंतप्रधान व त्याचा सल्लागार अशी दोन्ही पदे कुबेरांपाशीच असायला हवी होती. मग मुत्सद्देगिरीच्या नुसत्या शब्द व फ़टकार्‍यांनीच पाकिस्तानची इतकी घुसमट कुबेरांनी करून टाकली असती, की इथे सरताज व नवाजसह राहिल शरीफ़ही प्राणवायूच्या नळकांड्या शोधत गयावया करीत आले असते. कुबेरांनी दाऊदचा पत्ता वा पत्नीचे फ़ोटो दाखवण्यापेक्षा फ़ाशी झालेला याकुब मेमन इस्लामाबादला पाठवून भारत सरकार किती सशक्त आहे, त्याचाच पुरावा जगाला दाखवला असता. मग बिचारा दाऊद नाक मुठीत धरून शरीफ़ सरताज यांच्यासोबत प्राणवायु मिळावा म्हणून भारताला शरण आला असता. पण भाजपासह मोदींनी एकामागून एक मुर्खपणाचा सपाटा लावला. निवडणूकात बहुमत मिळवून पंतप्रधान होण्याचा हव्यास केला आणि पुढे परराष्ट्र खात्याचे निर्णय घेण्याचाही हव्यास मोदींनी केला. पाकिस्तानला भारताशी बोलणी नकोत तर त्याची इच्छा पुर्ण व्हावी अशीही चुक मोदींनी केली. खरे तर पाकिस्तानशी वाटाघाटी करण्यापेक्षा क्रिकेट खेळावे इतकी साधी गोष्ट मोदींना कळत नाही. त्यांना मुत्सद्देगिरी कशी उमजणार? ‘सर्व सूत्रे होती ती आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या हाती. ते थेट पंतप्रधान मोदी यांना उत्तरदायी आहेत. डोवल हे हेरगिरी व्यवस्थेत माहीर असतील. परंतु म्हणून त्यांना मुत्सद्देगिरी जमते असे मानणे दूधखुळेपणाचे. मुत्सद्देगिरीची पहिली अट म्हणजे आपण किती शूर आहोत याची छाती पिटायची नसते आणि शत्रुपक्षाची चौर्यकृत्ये कशी पकडली ते मिरवायचे नसते.’ इति कुबेर.

परराष्ट्र व्यवहार वा मुत्सद्देगिरीच नव्हेतर हेरगिरीतही कुबेर माहिर आहेत. म्हणूनच त्यांना स्वत:चा हा सशक्तपणा इतका सतावत असतो, की जगातले उर्वरीत सगळेच त्यांना अधूनमधून अशक्त वाटू लागतात. कधी फ़ासाची दोरी ओढणारा वा फ़ाशीची तारीख पक्की करणारा त्यांना अशक्त वाटतो. तर कधी फ़ाशी जाणारा व त्याला फ़ाशी देणाराही अशक्त वाटतो. आता कुबेरांना पाकिस्तानची कोंडी करणेही अशक्तपणाचे लक्षण वाटू लागले आहे. शौर्यासाठी मिरवायचे नसते असा नवा शोध त्यांनी लावला आहे. मग शौर्य गाजवले तर काय तोंड काळे करून दडी मारून बसायचे असते? मुत्सद्देगिरीत बहुधा तसे असावे. याचा अर्थ सहज उलगडणार नाही म्हणून आपण उदाहरण घेऊ. पाकिस्तानचे अवघे दहा ‘लढवय्ये’ समुद्र मार्गे मुंबईत आले आणि त्यांनी खुलेआम शेकडो लोकांची कत्तल केली. केवढे शौर्य गाजवले ना? परंतु पाकिस्तानने ते कधी मिरवले आहे काय? उलट त्याचे ‘श्रेय’ त्यांना भारत देत असतानाही पाकिस्तानने ते शौर्य नाकारलेले आहे. कसाब किंवा त्याच्या टोळीने केलेला पराक्रम पाकिस्तान आपले शौर्य म्हणून कायम नाकारत राहिला. याला ‘कुबेरी मुत्सद्देगिरी’ म्हणतात. नाहीतर आमचे मोदी नाहीतर डोबाल. मुत्सद्देगिरीच्या नावाने नुसता शिमगा. साधा दाऊदचा पत्ता मिळवला किंवा त्याच्या बायकोचे फ़ोनवरील संभाषण मुद्रीत केले, तर किती छाती फ़ुगवायची? बहुधा एवढ्यासाठीच पाकिस्तानचे जाणते राजकारणी व मुत्सद्दी हेर लोकसत्ताचे नित्यनेमाने वाचन करत असावेत. अन्यथा त्यांना कुठे मिरवावे आणि कुठे तोंड काळे करून बसावे, त्याचा अंदाज कशाला आला असता? असो, कुबेरांची सोमवारी जे काही पांडित्य, मुत्सद्देगिरी व बुद्धीमत्तेचे कौशल्य दाखवले, ते वाचून सहा दशकापुर्वी दैनिक ‘मराठा’त आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहीलेल्या एका सणसणित अग्रलेखाचे शीर्षक आठवले.

अधू मेंदुचा मधू

‘आम्ही सारे’ हातपाय का हलवित नाहीत?



देशात दोन दशकापुर्वी खाजगी वाहिन्यांचे पेव फ़ुटले आणि आता तर इंग्रजी व हिंदी वगळून अनेक प्रादेशिक भाषांच्याही कित्येक वाहिन्या सुरू झाल्या आहेत. त्यातून काय बघायचे व काय बघू नये, असाच प्रश्न प्रेक्षकाला सतावत असतो. शिवाय त्यातल्या प्रत्येक वाहिन्यांचा आपणच सर्वाधिक प्रेक्षकांची पसंती असल्याचाही दावा असतो. जसजसे वाहिन्यांचे पसारे वाढत गेले तसतसे त्यात विविधताही येत गेली. कौटुंबिक मालिका व वृत्तवाहिन्यांच्या पलिकडे विशिष्ट विषयाला वाहिलेल्या वाहिन्याही आल्या आहेत. त्यात इन्व्हेस्टिगशन डिस्कव्हरी ही पहिलीच गुन्हेतपास दाखवणारी एकमेव वाहिनी असल्याचा दावा केला जातो. त्यात बहुतांश अमेरिकेतील गुन्ह्यांचा तपास व पाठपुरावा असलेल्या सत्यकथा दाखवल्या जातात. काही प्रत्यक्ष चित्रण तर काही नाट्यरुपांतर असे त्याचे स्वरूप असते. पण त्यातून गुन्हेतपास, त्यामागची प्रक्रिया समजायला खुप मदत होते. त्यातही अमेरिकन गुन्हे तपासात कायद्याची काटेकोर बंधने असल्याने भक्कम पुरावे-साक्षी हाताशी नसताना कुणाला हात लावता येत नसल्याने किती सुक्ष्म तपास चालतो, त्याचीही जाण येऊ शकते. आपल्या देशात जशा वाहिन्या व वृत्तपत्रे बोंबा ठोकतात, तसाच तिथेही गदारोळ चालतो. पण म्हणून कुणालाही उगाच उचलून आत टाकले असे होत नाही. कित्येक प्रकरणे तर दोनतीन दशके अनुत्तरीत राहिलेली असतात आणि त्याचाही शोध अधूनमधून नवी माहिती आल्यावर नव्याने सुरू केला जात असतो. त्याच्याही गोष्टी या वाहिनीवर बघता येतात. ते बघितले, मग आपल्याकडे अशा अनेक प्रकरणात पोलिसांना आरोपी असल्यासारखे पेश करणार्‍या माध्यमे व पत्रकारांची खरेच कींव येते. कारण अशा चर्चा करणारे पत्रकार व शहाणे शुद्ध मुर्खपणा करत असतात. त्यांना गुन्हेतपास म्हणजे काय, त्याचा थांग लागलेला नाही याची स्पष्ट जाणिव होते.

अशाच एका सत्यकथेत कुठल्याशा अमेरिकन शहरामध्ये लागोपाठ महिलांच्या हत्या होत असल्याचे एक प्रकरण महिन्याभरापुर्वी दाखवले गेले. त्यातला प्रमुख डिटेक्टिव्ह जंग जंग पछाडतो, पण त्या सिरीयल किलरचे प्रकरण त्याच्या कारकिर्दीत अनुत्तरीतच रहाते. मात्र पोलिस सेवेतून निवृत्त झाल्यावरही त्या महिलांचे चेहरे त्याला सतावत असतात आणि त्या गुन्हेगाराला शोधून काढायची त्याच्या मनातली इच्छा मरत नाही. अकस्मात एके दिवशी आपल्या दिवंगत पित्याच्या जुन्या वस्तू व कागदपत्रांचा पसारा आवरत असताना त्या माजी डिटेक्टीव्हच्या हाती काही अशा गोष्टी लागतात, की त्याचे कुतूहल जागे होते. तो पुन्हा पोलिस ठाण्यात जाऊन नव्या तपास अधिकार्‍याला त्या दोन दशके जुन्या प्रकरणाचा तपास नव्याने सुरू करायचा आग्रह धरतो. हळुहळु ते प्रकरण प्रगती करू जाते आणि त्या जुन्या हत्याकांडाचे रहस्य उलगडू लागते. मात्र त्याचा उलगडा सर्वांनाच धक्कादायक असतो. कारण ह्या निवृत्त डिटेक्टीव्हचा मृत पिताच त्यातला हल्लेखोर असतो. आता त्याच्यावर खटला भरणे अशक्य असते. पण निदान सत्याचा शोध लागला याचे समाधान असते. आपलाच पिता इतका भयंकर मारेकरी असल्याची वेदना बोचरी असली तरी गुन्ह्याचा तपास पुर्ण केल्याचे समाधान मोठे असते. इथे हे सांगायचा मुद्दा इतकाच, की घटनाक्रम घडताना ज्या घरात डिटेक्टीव्ह रहात असतो, तिथेच मारेकरीही वास्तव्य करीत असतो. पण तरीही तपास करणार्‍याला त्याचा सुगावाही लागू शकलेला नसतो. गुन्ह्याचा तपास हा इतका गुंतागुंतीचा मामला असतो. पुस्तकातले किंवा परिक्षेतले गणित सोडवावे तसे गुन्ह्याचे रहस्य उलगडत नसते. त्यात अनेक रहस्ये व कोडी सोडवत जुळवाजुळव करावी लागत असते. त्याचे भान ज्यांना असेल, त्यांना दाभोळकर वा पानसरे यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात कोणती अडचण आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल.

अर्थात अमेरिकन व भारतीय गुन्हे तपासाची पद्धत भिन्न आहे. तसेच कायदेही भिन्न आहेत. आपल्याकडे पोलिस इतके उत्साहाने कुठल्या गुन्ह्याचा तपास करीत नाहीत आणि कुठल्याही पुराव्याशिवाय कोणालाही नुसत्या आरोपाखाली अटक करायची कायदेशीर तरतुद असल्याने शेकडो गुन्ह्याचा कधीच उलगडा होत नाही. ठराविक मुदतीपर्यंत संशयिताला गजाआड ठेवण्याची मुभा पोलिसांना असल्याने गदारोळ झाला, मग माध्यमांना शांत करण्यासाठी पोलिस तडकाफ़डकी कोणालाही अटक करून त्याच्यावर आरोप ठेवतात. पुढे तपासात त्याच्याविरोधात कुठलाही पुरावा नसल्याने व मुदत संपल्याने त्याला जामिनावर मुक्त करावे लागते. सहाजिकच पोलिसांना तपासापेक्षा माध्यमातील पोपटपंची व राजकीय गदारोळ थांबवण्याला प्राधान्य द्यावे लागते. परिणामी कोणालाही गजाआड टाकून विषय गुंडाळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. दाभोळकर पानसरे अशा दोन्ही गंभीर प्रकरणात नेमके तेच झालेले आहे. पोलिसांनी कोणतेही दावे करोत. ह्या गुन्ह्यांच्या तपासाचा आता पुरता बोर्‍या वाजला आहे. मात्र त्याचे खापर एकट्या पोलिसांवर किंवा सरकारवर फ़ोडता येणार नाही. ज्यांनी या दोन्ही हत्यांचे राजकारण करण्यात धन्यता मानली, तेच या अपयशाचे खरेखुरे धनी आहेत. कारण त्यांनी पोलिसी पद्धतीने व प्रक्रियेने गुन्ह्याचा तपास होऊ नये, याची पुरेपुर काळजी घेतली आहे. काही तासातच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नथूराम प्रवृत्ती यामागे असल्याचे विधान केले आणि मग तथाकथित पुरोगाम्यांनी हिंदूत्ववाद्यांच्या विरोधात राजकीय काहुर उठवले. मग पोलिसांवर यासाठीच दबाव आणला गेला, की दोन्ही प्रकरणातूल खरे मारेकरी वा खुनी शोधायचे नसून, त्यात हिंदूत्ववाद्यांना आरोपी बनवायचे आहे असे संकेतच पोलिसांना दिले गेले. तिथून हा विचका सुरू झाला. आणि त्याचा सगळा दोष त्याचे राजकारण करणार्‍यांना द्यावा लागेल.

दाभोळकर वा पानसरे यांची हत्या बघितली तरी एक गोष्ट स्पष्ट जाणवते, की त्यांना गोळ्या घालणारे कोणी हौशी लोक नाहीत. ते अत्यंत कुशल नेमबाज व व्यवसायी हल्लेखोर आहेत. ज्यांना गुन्हेगारी भाषेत शार्पशूटर म्हटले जाते. नेमक्या व मोजक्या गोळ्या झाडून झटपट निसटण्याची कला अवगत केलेले खुनी यात गुंतलेले होते व त्यांना पकडले असते तर त्यांना हे काम सोपवणार्‍या सुत्रधारापर्यंत पोहोचणे शक्य होते. त्यासाठी पोलिस नेहमी नाकाबंदी व अन्य ठराविक प्रारंभिक उपाय योजत असतात. इथे पहिल्या क्षणापासून सनातन वा अन्य कुणाला कधी पकडणार; असा ससेमिरा पोलिसांच्या मागे लावला गेला. त्यामुळेच नेहमीच्या पद्धतीने खुनाचा तपास होऊच शकला नाही. खुनी पकडण्यापेक्षा राजकीय आरोपबाजीला लगाम लावण्यात पोलिसांचा वेळ वाया घालवण्यात आला आणि ते काम स्वत:ला दाभोळकर वा पानसरे यांचे पाठीराखे म्हणवणार्‍यांनीच केले. पण त्यांच्या उत्साहाने वा मुर्खपणाने खर्‍या मारेकर्‍यांना निसटून जाण्यात यश मिळू शकले. की जाणिवपुर्वक तशी परिस्थिती निर्माण करण्यात आली? गुन्हे वा हत्या प्रकरणात दोन मुद्दे कळीचे असतात. हत्येचा हेतू व लाभार्थी. त्याचा मागोवाच पोलिसांना घेऊ दिला गेला नाही. मोक्याची वेळ निघून गेल्यावर असे तपशील हाती लागत नसतात. म्हणून शंका येते, की दाभोळकर-पानसरे यांच्याविषयी आस्था दाखवणार्‍यांना खरेच खुनी हवे होते, की खुन्यांना निसटून जाण्यात या लोकांना रस होता? असेल तर पोलिस बाजूला ठेवून त्या दोघांच्या पुरस्कर्त्यांनी हल्लेखोर शोधण्याचा किती व कोणता प्रयत्न केला? इच्छा असेल तर सामान्य माणूसही खतरनाक गुन्हेगार शोधू शकतो व पकडून देऊ शकतो. ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे मिरवणार्‍यांनी त्या दिशेने एकही पाऊल का टाकले नाही? फ़क्त इव्हेन्ट व सोहळा करण्यापलिकडे यातल्या कोंणीच काहीही हालचाल कशाला केलेली नाही? दाभोळकर पानसरे यांच्याविषयी खरी आस्था असलेले लोक काय करू शकले असते आणि पोलिसांपेक्षा हेच लोक खरा मारेकरी कसा शोधू शकले असते? पुढल्या भागात त्याचा आढावा घेऊ. (अपुर्ण)

Sunday, August 23, 2015

हे कोण कुठले सेवाभावी भामटे?



क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ मानला जातो. त्यात दोन संघ खेळत असतात आणि दोन पंच सामन्याचे नियोजन करत देखरेखही करत असतात. अशा सामन्यात अनेक निर्णय वादग्रस्त होत असतात आणि त्याची शेकडो उदाहरणे आहेत. अनेकदा तर अशा वादग्रस्त निर्णयांनी सामन्यात रसिकांनी दंगलीही केल्या आहेत. पण म्हणून दोन संघात हातघाईवर प्रकरण आल्याचे दिसत नाही. कारण या खेळात सहभागी होणार्‍याने सभ्यता राखावी असा अलिखीत संकेत आहे आणि त्याचे कितीही मोठ्या गाजलेल्या अपुर्व खेळाडूनेही पालन केल्याचे शेकडो दाखले आहेत. ऑस्ट्रेलियातील एका सामन्यात जमिनीला लागून हाती आलेल्या चेंडूला झेल ठरवणारा इशारा त्यांचा कर्णधार रिकी पॉन्टींग याने केला आणि पंचाने तो मान्यही केला होता. त्यानंतर समालोचन करणार्‍या सुनील गावस्कर याने संथगतीने चित्रण दाखवून त्यातला खोटेपणा उघड केला होता. बहूधा फ़लंदाज असलेल्या सचिनने निमूट तो निर्णय मान्य करीत मैदान सोडले होते. अशा खेळाडूंनी क्रिकेटची महान सभ्य खेळ म्हणून ख्याती निर्माण केली. निर्णय घेतला मग तो घेण्यासाठी ज्याची नेमणूक वा निवड झाली आहे, त्याचा शब्द मान्य करायचा मोठेपणा सभ्यतेचे लक्षण असते. निकाल दिल्यानंतर त्याबद्दल वा न्यायाधीशाबद्दल शंका व्यक्त करणे, हा सभ्यतेला फ़ासलेला हरताळ असतो. क्रिकेट प्रमाणेच लोकशाही सुद्धा सभ्यतेचा मामला आहे. त्यात जिंकला वा हरला हे सामान्य मतदार ठरवत असतो. त्याने ज्याला कौल दिला त्याच्याशी मतभेद असणे मान्य असले, तरी त्याला शत्रू ठरवून त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये अपशकुन करणे, हा असभ्यपणा होय. दुर्दैवाने आपल्या भारतीय लोकशाहीला त्याची बाधा अलिकडल्या काळात झाली आहे. अन्यथा सत्तांतरानंतर जो बुद्धीवादी चेहरा लावून तमाशा चालू आहे, त्याला असभ्यपणाचा कळस नाही तर काय म्हणायचे?

मागल्या काही महिन्यात प्रत्येक नव्या नेमणूकीवर आक्षेप घेतला जात आहे. तो घेताना मुद्दा एकच असतो, की अमुकतमूकाचा संघाशी संबंध आहे. पुण्यातल्या फ़िल्म इन्स्टीट्यूटचा संचालक म्हणून गजेंद्र चौहान याची नेमणूक झाली आणि तात्काळ तिथल्या विद्यार्थ्यांचा आडोसा करून विरोधाचे नाटक सुरू झाले. महाराष्ट्रातील फ़डणवीस सरकारने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर केल्यावर त्यांच्याविषयी चिखलफ़ेकीचे मोहोळ उठले. प्रसार भारती या केंद्र सरकारच्या एका संस्थेच्या संचालक मंडळात शेषाद्री चारी यांचे नाव येताच संघीकरण म्हणून तक्रार आली. ही काय भानगड आहे? संघप्रणित भाजपाचे सरकार बहुमत मिळवून सत्तेत आल्यानंतर त्यांनी अशा सरकारी अधिकृत वा अनुदानित संस्थांवर कोणाच्या नेमणूका कराव्यात, अशी अपेक्षा असते? कॉग्रेस वा समाजवादी, कम्युनिस्ट पक्षांची सत्ता राज्यात वा केंद्रात आल्यानंतर त्यांनी कधी संघाशी संबंधित विचारवंत पत्रकाराची अशा कुठल्या पदावर नेमणूक केल्याचे कोणाच्या ऐकीवात आहे काय? नसेल तर अशा कोणाच्या नेमणूका तथाकथित सेक्युलर पुरोगामी सत्ताधीशांनी केल्या होत्या? ज्यांची वैचारिक भूमिका कायम संघविरोधी व कडव्या विरोधाचीच राहिली आहे, अशाच लोकांना कॉग्रेस वा सेक्युलर सरकारने महत्वाच्या पदावर नेमलेले नाही काय? अशा कुठल्याही नेमणूकीच्या विरोधात भाजपा वा संघाने कधी किती वादळ उठवले होते? उठवले नाही, हे संघाच्या वा तत्सम विचारसरणीच्या लोकांच्या सभ्यतेचे लक्षण मानायला हवे. पण त्याचा अर्थ पुरोगाम्यांनी असा लावला आहे, की दुसरी कुठली विचारसरणी असू शकत नाही. म्हणूनच कुठलेही सरकार वा सत्ताधीश येवोत, त्यांनी विचारवंत प्रतिभावंत म्हणून पुरोगामी पट्टे गळ्यात बांधलेल्यापैकीच लोकांच्या नेमणूका महत्वाच्या पदावर केल्या पाहिजेत. नसेल तर आभाळ कोसळून पडणार आहे.

मागल्या दहा वर्षात केंद्र सरकारचा कारभार मनमोहन सिंग नावाचे पंतप्रधान करीत होते. पण त्यांच्या सरकारचे बहुतेक धोरणात्मक निर्णय सत्ताबाह्य राष्ट्रीय सल्लागार समिती नावाची संस्था करीत होती. त्यात कोणाचा सहभाग होता? सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या चालकांची ही समिती प्रत्यक्षात तथाकथित पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या टोळभैरवांची झुंड होती. त्यांनी रोजगार हमीविषयी धोरण बनवायचे आणि मनमोहन सरकारने ते नियम कायद्यात बसवून त्यावर संसदेत शिक्कामोर्तब करून घ्यायचे. अन्नसुरक्षा वा अणूविषयक धोरण असो किंवा आणखी शिक्षण सांस्कृतिक विषय असो, त्यात त्या समितीचा शब्द अखेरचा असायचा. निवडून आलेल्या व संसदेत बसलेल्या लोकांच्या प्रतिनिधींना कवडीची किंमत नव्हती. त्यातूनच मग एकूण कारभाराचा बट्ट्याबोळ होत गेला आणि त्याची किंमत लोकसभा निवडणूकीत कॉग्रेससहीत तमाम सेक्युलर पक्षांना मोजावी लागली. पण या दहा वर्षात अशा तथाकथित पुरोगामी सेवाभावी संस्थांना इतके डोक्यावर चढवून ठेवण्यात आले, की लोकमत वा निवडून आलेले सरकार नगण्य आणि आपला शब्द ब्रह्मवाक्य, अशी या लोकांनी स्वत:ची समजूत करून घेतली. म्हणूनच मग जेव्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सत्तांतर झाले, तेव्हा त्यांनी प्रथम ती सल्लागार समिती बरखास्त करून टाकली. कारण ती समिती व त्यातून पोसलेली बांडगुळे ही भारतीय लोकशाहीलाच पोखरून काढत होती. घटनात्मक लोकशाहीला निकामी करून या स्वयंघोषित सेवाभावी संस्थांना सरकारी खजीन्यातून करोडो रुपये अनुदान खिरापत म्हणून वाटण्याचे उद्योग चालू होते. त्यातून शिरजोर झालेल्यांचा हा तमाशा दिवसेदिवस उघडा पडत चालला आहे. किंबहूना देशात सत्तांतर झाले आणि जनतेने कॉग्रेसला नव्हेतर आपल्या पुरोगामी थोतांडाला नाकारलेले आहे, याची अक्कल यांना अजून आलेली नाही.

मागल्या सहा दशकात ज्यांना पुरोगामी म्हणून डोईजड करण्यात आले, त्यातून हा नवा वर्ग उदयास आलेला आहे. पुर्वापार अंगात भगवी वस्त्रे परिधान केलेल्या व्यक्तीला साधू समजले जाई, तसे आता पुरोगामी असे लेबल लावून कोणीही भामटे सेवाभावी म्हणून मिरवत असतात. आणि अशा टोळ्या मग आपापले स्वार्थ साधून घेण्याची भामटेगिरी करीत असतात. माळीण गावात दरड कोसळून डझनावारी गावकरी गाडले गेल्यावर यातला एकही सेवाभावी तिथे फ़िरकला नाही. उत्तराखंडात जी त्सुनामी आली त्यात शेकड्यांनी लोक मृत्यूच्या दाढेत ओढले गेले. त्यांना वाचवायला यातले किती सेवाभावी तिथे गेले? आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांपर्यंत यातला कोणी पोहोचत नाही. मग सेवाभाव म्हणजे काय? विविध संस्था व शासनांच्या अनुदानावर डल्ला मारणे, यापेक्षा कुठला सेवाभाव यांच्याकडून आपल्या अनुभवास आला आहे? जो निधी मिळवला जातो, त्याचे हिशोब देण्याला यांना सवड नसते आणि जिथे संकटांची मालिका असते तिथे फ़िरकायला वेळ नसतो. मग कुठली व कोणाची सेवा हे महानुभाव करतात? प्रेतावर ताव मारणार्‍या गिधाडांपेक्षा यातले किती सेवाभावी वेगळे काढता येतील? आणि जे खरेखुरे सेवाकार्य करीत असतात, त्यातल्या कोणाच्या सह्या वा विरोध अशा प्रकरणात दिसत नाही. देशातील सर्वात मोठी संघटित सेवाभावी संस्था रा. स्व. संघ हीच आहे आणि तिच्याशी संबंधित कोणाला कुठे महत्वाच्या पदावर नेमले, मग यांना पोटदुखी असते. यातच अशा सह्याजीरावांचे पितळ उघडे पडते. यांच्या नसलेल्या कामाचा गवगवा माध्यमांनी करायचा आणि संघाने डोंगराएवढे काम करूनही त्याच्यावर निव्वळ बदनामीचे आरोप करायचे, असा कारभार चालू आहे. पण व्यवहार व प्रत्यक्ष वस्तुस्थिती बघितली तर आजच्या समाजातील सर्वात असभ्य, असंस्कृत व विकृत मनोवृत्ती असेच या सेवाभावी लोकांविषयी म्हणता येईल.

ज्यांना तीस्ता सेटलवाडने दंगलग्रस्तांच्या नावाने आणलेल्या करोडो रुपयांच्या निधीतून चैन व ऐष केली, त्याविषयी एकदाही तोंड उघडून बोलता येत नाही, त्यांच्या अप्रामाणिकपणाची वेगळी साक्ष कोणी द्यायला हवी काय? ज्यांच्या संस्थांनी भारतीय गरीब पिडीतांसाठी कोट्यवधी रुपये परदेशातून निधी आणला व त्याचे कुठलेही कायदेशीर हिशोब देण्याची सभ्यता ज्यांना दाखवता येत नाही, हे कुठल्या अर्थाने समाजातील मान्यवर असू शकतात? त्यांच्या पापावर पांघरूण घालण्यात ज्यांची बुद्धी खर्ची पडते, त्यांना प्रतिष्ठीत कोणी ठरवले? देशातील दहा हजार अशा स्वयंसेवी संस्थांचे व्यवहार शंकास्पद आढळल्याने त्यांना मिळणार्‍या परदेशी निधीला रोखण्याची वेळ सरकारवर आली, त्यांना कोणी कशासाठी मान्यवर म्हणून कौतुक करायचे? पुरंदरे यांच्या पुरस्कारावर आक्षेप घेणार्‍यांनी कधी एकदा अशा बेहिशोबी निधीचा खर्च उधळपट्टीसारखा करणार्‍यांना दोन शब्दांनी जाब विचारण्याचा सभ्यपणा दाखवला आहे काय? थोडक्यात आज समाजात जे कोणी असे सेवाभावी वा समाजसेवी म्हणून मिरवत तमाशे करण्यात गर्क आहेत, त्यांना याच समाजात जितके म्हणून उघडे पाडणे शक्य असेल, तितके करणे हेच आता पवित्र कार्य होऊन बसले आहे. कारण त्यांच्या बेशरमपणाने शिरजोरी सुरू केली आहे. ती प्रवृत्ती वेळीच ठेचली गेली नाही, तर सभ्यपणे प्रामाणिक जगणे हाच गुन्हा ठरवला जाण्याचा धोका आहे. दहिहंड्या बांधून अंगविक्षेपाच्या नाचगाण्याला सामाजिक प्रबोधनाचे कार्य ठरवण्यापर्यंत आता मजल गेली आहे. उद्या बलात्कार म्हणजेच महिलांचे सशक्तीकरण ठरवले जाण्याचा धोका उदभवू शकतो. यालाच कंटाळून लोकांनी देशात सत्तांतर घडवले. मोदी लोकांना आवडत होते किंवा भाजपा चांगला पक्ष होता, असे अजिबात नाही. पण या पुरोगामी भंपक दिवाळखोर भामटेगिरीला भाजपा स्थान देणार नाही, अशा आशेवर लोकांनी सत्ता दिलेली आहे. हे विसरून मोदी वा भाजपा वागणार असतील, तर त्यांनाही कॉग्रेसप्रमाणे सत्तेबाहेरचा रस्ता दाखवायला मतदार मागेपुढे बघणार नाही.