आता सचिन तेंडुलकर लौकरच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, दोनशेवी कसोटी खेळून मुंबईतच तो खेळातून संन्यास घेणार आहे. अशा वेळी क्रिकेटच्या क्षितीजावर अनेक नवे तारे उगवत आहेत. मुंबईचाच रोहित शर्मा अलिकडल्याच कसोटीत चमकला आणि त्याच्या आधीपासून विराट कोहली नवे विक्रम साजरे करू लागला आहे. त्याच्याही आधी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेही अनेक विक्रम साजरे करीत आपली लोकप्रियता संपादन केलेली आहे. पण लोकप्रियतेच्या रिंगणात त्याला मागे टाकून विराट पुढे गेल्याच्या बातम्या आहेत. ही लोकप्रियता कशावर ठरत असते? तर आजकाल लोकप्रियतेचा वापर जाहिरातीच्या उद्योगात होत असतो आणि कुठल्या खेळाडू किंवा कलावंताला सर्वाधिक जाहिरातीचे मोल मिळते; त्यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा निकष काढला जात असतो. मग अशा लोकप्रिय व्यक्तीमत्वाला सल्ले देणारे पुढे येतात. असे म्हणतात, की आजकाल राजकीय नेते व पक्षांनाही अशी लोकप्रियतेची उंची गा्ठून देण्यासाठी सल्लागार उदयास आलेले आहेत. तशा व्यवसायात नाव कमावलेल्या कंपन्याही आहेत. अशा कंपन्या मग त्या व्यक्तीला लोकांसमोर कसे जावे, कुठले कपडे परिधान करावेत, काय बोलावे; याचेही बारीकसारीक मार्गदर्शन करीत असतात. पण असे सल्लागार वा कंपन्या कुठल्याही व्यक्तीला लोकप्रिय बनवू शकत नाहीत, हे तेवढेच सत्य आहे. पण कोण लोकांमध्ये लोकप्रिय होतोय व त्याला अधिक लोकप्रिय कसे बनवावे; याचे सल्ले हे लोक देऊ शकतात. म्हणूनच त्यांचा उद्योग चालतो आहे. एका बाजूला असा उद्योग वधारला आहे आणि म्हणूनच माध्यमातील अनेक आगंतुक सल्लागारही उदयास आले आहेत. मात्र अशा बिनबुलाया सल्लागारांना फ़ारसा कोणी दाद देत नाही.
सचिन असो किंवा धोनी, विराट; त्यांची गुणवता दिसल्यावर त्यांच्या लोकप्रियतेचे मोल मिळवून देणारे त्यांच्याकडे धावले. त्यांनी या लोकप्रिय खेळाडू वा कलावंतांना योग्य मोल मिळवून दिले आहे. पण जोपर्यंत ह्या व्यक्ती आपली गुणवत्ता दाखवून जनतेच्या मनात ठसल्या नव्हत्या; तोपर्यंत त्यांच्यातले गुण वा योग्यता यापैकी कोणीच सल्लागार ओळखूही शकला नव्हता, हे विसरता कामा नये. जेव्हा अशी व्यक्ती आपल्या गुणकौशल्यावर जनमानसात आपली एक प्रतिमा प्रस्थापित करते; तेव्हाच हे सल्लागार पुढे येत असतात. तसेच आज नरेंद्र मोदी यांना अनेकजण परस्पर सला देऊ लागले आहेत. जोपर्यंत मोदींनी आपली लोकप्रियता वा गुणवत्ता सिद्ध केलेली नव्हती; तोपर्यंत हे तमाम सल्लागार कुठे होते, हा खरे तर संशोधनाचा विषय आहे. उलट हेच तमाम अभ्यासू राजकीय सल्लागार; मोदी म्हणजे आपल्याच पक्षाच्या गळ्यातले लोढणे आहे, असे सांगण्यात आघाडीवर होते. किंबहूना त्यातल्या बहुतांश सल्लागारांनी मोदी हे कसे बदनाम आहेत, हेच सिद्ध करण्याचा उद्योग चालविला होता. त्यानंतरही मोदी यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली. मगच मोदींना पंतप्रधान व्हायचे असेल तर त्यांनी कोणती पथ्ये पाळली पाहिजेत; त्याचे सल्ले द्यायला हे राजकीय सल्लागार पुढे सरसावले आहेत. पण मोदी त्यापैकी कोणाला भिक घालताना दिसत नाहीत. कारण उघड आहे. अशा दिवाळखोरांचा सल्ला मानायचाच असता; तर एव्हाना मोदींना आत्महत्याच करावी लागली असती. दहा बारा वर्षे असल्याच सल्लागारांनी जी टिकेची व आरोपांची झोड उठवली होती, त्यांना खरे मानले असते; तर मोदींनी इतक्यात राजकारणातून संन्यास घेऊन टाकायला हवा होता. पण मोदींचे आजचे यश अशा सल्लागारांना नाकारल्यानेच साध्य झालेले आहे.
पंतप्रधान व्हायचे असेल तर मोदींनी सर्वसमावेशक व्हायला हवे. मोदींनी मुस्लिमांना विश्वासात घ्यायला हवे. मोदींनी गुजरात दंगलीसाठी माफ़ी मागायला हवी. मोदींनी अमूक किंवा तमूक करायला हवे, असले सल्ले नित्यनेमाने देणार्यांची प्रवचने आपण वाहिन्यांपासून, वृत्तपत्रात हल्ली वाचत असतो. लोकप्रिय होणे वा निवडणूका जिंकणे या सल्लागारांना इतकेच कळत असते; तर मोदी २००२ सालातली पहिलीच निवड्णूक हरले असते. पण मोदींच्या बाबतीत असा अनुभव आहे, की राजकीय अभ्यासक सांगतात, त्याच्या नेमके विरुद्ध वागूनच मोदींनी आजवरचा पल्ला गाठलेला आहे. सहाजिकच मोदींच्या भल्यासाठी सल्ले देणार्यांनी आधी आपल्या आजवरच्या सल्ले वा भाकितांची उजळणी केलेली बरी. मोदींना सल्ले देण्यापेक्षा अशा जाणकारांनी आपण आजवर कुठे व का चुकलो, त्याचाच अभ्यास केलेला बरा. कारण मोदी हा असा अजुबा आहे, की त्यांच्या बाबतीत जाणकार अभ्यासक व सल्लागारांनी दिलेले सर्वच सल्ले गैरलागू ठरलेले आहेत. थोडक्यात आजची जी लोकप्रियता मोदींनी संपादन केलेली आहे; तो मोदी ब्रांन्ड सल्लागारांचे यश नसून मोदींनी आपल्या बळावर संपादन केलेले ते यश आहे. आणि त्यात त्यांना जे कोणी अनामिक सल्लागार मदत करीत आलेत, त्यांनाच त्याचे श्रेय द्यावे लागेल. राजकीय अभ्यासक व पत्रकारांच्या सल्ल्याच्या विरोधात जाऊन मोदी इतकी मजल ज्या सल्लागारांच्या सल्ल्याने मारू शकले; त्यांच्यावरच विसंबून मोदींनी पुढली वाटचाल करणे शहाणपणाचे ठरेल. अडवाणी यांनी तीच चुक केलेली होती. रथयात्रेत त्यांनाही एक पत्रकार भेटले आणि त्यांचा सल्ला मानताना अडवाणींनी आपली दुर्दशा करून घेतली. मोदी ती चुक करताना दिसत नाहीत. कारण असे सल्लागार बुडवे असतात हे त्यांनी अडवाईंच्या अनुभवातून नेमके ओळखलेले दिसते. असे फ़ुकटचे सल्लागार भल्याभल्यांची लोकप्रियता मातीमोल करून टाकतात व नामानिराळे होतात.
No comments:
Post a Comment