Friday, November 22, 2013

निर्ढावलेले बेशरम अब्रुदार



  गेले दोनतीन दिवस वाहिन्यांवरून एका नावाजलेल्या संपादकाचे वस्त्रहरण चालू आहे. दहा पंधरा वर्षे आपल्या शोध पत्रकारितेतून एकाहून एक धमाकेदार गौप्यस्फ़ोट करणार्‍या या संपादक आणि त्याच्या समर्थकांना आता तोंड लपवून बसण्याची पाळी आली आहे. पत्रकारिता आणि बुद्धीवादी वर्ग म्हणजे सोवळेपणाचे पवित्र पुतळे, असे एक चित्र तयार करण्यात आले. अर्थात तसे चित्र ज्यांच्या हाती सत्ता व प्रसार साधने असतात; त्यांना सहज निर्माण करता येते. कारण बुद्धीमान व शक्तीशाली लोक म्हणून त्यांचा समाजात आधीपासून दबदबा असतो. त्यात पुन्हा अशा लोकांना मुठीत ठेवणारे कोणी संन्यासी साधू चारित्र्यवान समोर आले, तर बघायलाच नको. त्यांचा जनमानसावर मोठाच प्रभाव पडत असतो. गेल्या दोन दशकात पत्रकारिता व प्रसार माध्यमांचा दबदबा त्याच माध्यमातून; जनमत बनवण्यातून; इतका माजवण्यात आला, की कुठल्याही कायदा यंत्रणा वा माफ़िया गुंडांपेक्षा अशा बुद्धीवादी माध्यमांची एक दहशतच तयार झाली. मग त्यांच्या आशीर्वाद किंवा सहमतीशिवाय सत्तेलाही पुढे सरकणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे मग सत्शील वा चारित्र्यसंपन्न लोकांना या माध्यमातून बाहेर पडावे लागले किंवा तडजोड करायची पाळी आली. कुणालाही आयुष्यातून उठवायच्या वा कुणा चारित्र्यहीन व्यक्तीला आदर्श बनवण्याच्या या जादूई ताकदीच्या बळावर, माध्यमांचा भस्मासूरच उभा झाला. पण त्याला आव्हान देण्याची क्षमता कुणात राहिली नव्हती. आज पंतप्रधान पदाच्या उमेदवारीपर्यंत मजल मारणार्‍या आणि लोकप्रियतेचा कळस गाठणार्‍या नरेंद्र मोदी यांना संपवण्याचे हिंसक डाव याच माध्यमांनी मागल्या बारा वर्षात खेळलेले नाहीत काय? तरूण तेजपाल त्याच परिस्थितीचा एक नमूना आहे.

   ज्याने आजवर इतरांच्या गैरवर्तन वा पापाचे घडे उपडे केले आणि जगासमोर त्यांना नागडे केले; त्याचा त्यामागचा हेतू किती पवित्र होता? ही जनहिताची पत्रकारिता होती, की राजकीय डावपेचामध्ये एकाचे चारित्र्यहनन करून दुसर्‍या राजकीय पक्षाला बळ देण्यासाठी केलेली सुपारीबाजी होती? वाजपेयी सरकारच्या कारकिर्दीत भाजपाचा अध्यक्ष लाखभर रुपये कुठल्या कंत्राटासाठी खाताना छुप्या कॅमेरावर पकडून भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला. किंवा गुजरात दंगलीतील हिंसाचाराची कबुली छुप्या कॅमेराने टिपून उघड करणार्‍या याच ‘टहलका’वाल्यांना २जी, कोळसा घोटाळा, रेलेघोटाळा किंवा युपीए सरकारच्या कारकिर्दीतला एकही लहान घोटाळा कसा टिपता आलेला नव्हता? लाखभर रुपयाची लाच घेणार्‍याला भस्मासूर भासवणार्‍यांना अब्जावधी रुपयांचे घोटाळे करीत बेफ़ाम झालेल्या अन्य राजकारण्यांचे एकही प्रकरण कसे चित्रित करता आले नाही? पण सत्तांतर झाल्यावर याच टोळक्याची चंगळ झालेली असावी? त्यांनी पहिल्यापासून केली ती पत्रकारिता नव्हतीच. ज्याला इंग्रजीमध्ये ब्लॅकमेल म्हणतात, त्यातला तो प्रकार होता आणि सेक्युलर वा पुरोगामी बुद्धीमंतांनी त्याला प्रतिष्ठा बहाल केली, त्यातूनच ही पाप्याची पितरे पत्रकारिता व माध्यमात सोकावत गेली. अशा शोध पत्रकारितेचा उदगाता म्हणून नावाजलेल्या तरूण तेजपाल याचा बुरखा त्याच्याच वृत्तपत्रात काम करणार्‍या मुलीने फ़ाडला आहे. विशेष म्हणजे त्याच्या मित्राचीच ती मुलगी आहे आणि त्याच्या मुलीची मैत्रिण आहे. बालवयापासून पित्यासमान मानलेल्या या हैवानाने आपले खरे हिडीस रुप त्या मुलीला दाखवले आणि तिने ते जगासमोर आणले आहे. पण घडल्या घटनेत तेजपालपेक्षा आजकालच्या सेक्युलर माध्यमांचा हिडीस विकृत चेहरा मात्र समोर आलेला आहे.

   आपल्या मुलीसारख्या तरूणीवर ह्या नराधमाने एका लिफ़्टमध्ये बलात्काराचा प्रयास केला. त्यानंतरही तिला धमकावले आणि अगदी मोबाईलवर संदेश पाठवून धमकावण्यापर्यंत त्याने मारलेली मजल अधिक बोलकी आहे. फ़सलेला माणूस आपल्या पापावर पांघरूण घालायचा प्रयास करतो. पण इथे तेजपाल बिनदिक्कतपणे तिला संदेश पाठवून धमकावतो आहे. याचा अर्थच आजवर त्याने हेच उद्योग केले आहेत आणि ते पाप पचवले सुद्धा आहे. पाप करून पुन्हा अशा लेखी धमक्या देण्यापर्यंतची हिंमत त्याच्यात आहे, म्हणजेच आजवर त्याने अशा कितीतरी मुलींचा असाच बळी घेतलेला असणार. त्या बिचार्‍या मुलींच्या लाजेकाजेस्तव गप्प बसण्यातून त्याची मस्ती वाढलेली आहे. आणि तोच मस्तवालपणा पकडला गेल्यावरही तसूभर कमी झालेला नाही. म्हणूनच गोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवून लिफ़्टमध्ये घडलेल्या घटनेचे सीसीटिव्हीमध्ये चित्रित झालेला पुरावा मिळवला, त्यावर तेजपालची प्रतिक्रिया अतिशय उघड आहे. आपण पोलिसांच्या तपासाला संपुर्ण सहकार्य करू, असे सांगताना हा तेजपाल म्हणतो, पोलिसांनी ते चित्रण बारकाईने तपासावे. मग जबरदस्ती झाली की सहमतीने घडले, ते लक्षात येईल. यासारखा बेशरमपणा असू शकत नाही. पोटच्या कन्येची कोवळ्या वयाची मैत्रिण समोर आहे आणि ती तशी गैरलागू वागली असेल, तर तिला समजावून शुद्धीवर आणण्याला सभ्यता म्हणतात. त्याचा गैरफ़ायदा घेण्याला नव्हे. अर्थात असा एकटा तेजपालच नासलेला आंबा आहे, असेही मानायचे कारण नाही. कित्येक माध्यमात वा अन्य संस्थांमध्ये उजळमाथ्याने वावरणारे असे नरराक्षस आहेत. संस्थेची वा संघटनेची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांच्या पापावर पांघरूण घालण्याच्या बुद्धीवादाने अशी श्वापदे समाजाच्या सर्व क्षेत्रात बोकाळली आहेत. त्यामुळे निर्ढावलेला बेशरमपणा आज समाजाच्या सर्वच क्षेत्रात उजळमाथ्याने वावरताना दिसतो आहे.

1 comment:

  1. ब्लॅकमेलिंगसाठी त्याने आपल्या पत्रकारितेचा वापर केला असणारच. त्याशिवाय का त्याला आपल्या भानगडी दडपून टाकता आल्या.

    ReplyDelete