रविवारी सुट्टीचा दिवस असूनही राजधानी दिल्लीच्या कॉग्रेस बालेकिल्ला मानल्या जाणार्या परिसरात राहुल गांधी यांच्या भव्य मेळाव्याचा पुरता फ़ज्जा उडाला. त्यामुळे कॉग्रेस पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका चालू असून त्यात अखेरचे मतदान दोन आठवड्यांनी दिल्ली विधानसभेसाठीच व्हायचे आहे. त्यासाठीच पक्षाचे उपाध्यक्ष असलेल्या राहुलची मोठी जाहिरसभा कॉग्रेसने आयोजित केलेली होती. पण तिथे राहुल गांधी उशिरा पोहोचले आणि कशीबशी जमवलेली गर्दीही पांगू लागली. पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या भाषणातूनच लोक उठून जात असतील तर चिंता वाटणारच. कारण हल्ली सर्वत्र माध्यमांचे कॅमेरे पाळत ठेवून असतात. सहाजिकच लोटलेली गर्दी किंवा रिकामी मैदाने यांच्या तात्काळ बातम्या होतात. म्हणूनच ह्या सभेत राहुल गांधी यांचे भाषण सुरू होण्याआधीच लोक पांगू लागल्यावर; दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षित यांनी दहा मिनीटे तरी थांबा आणि राहुलचे चार शब्द ऐका; अशा गयावया करण्याची पाळी आली. तितकेच नाही, तर खुद्द राहुलनाही पांगणार्या गर्दीची दखल घेऊन अवघ्या पाचसहा मिनीटात भाषण आवरते घ्यावे लागले. दोन आठवड्यात मतदान व्हायचे असताना, राहुलच्या भाषणांना मिळणारा असा विपरित प्रतिसाद पक्षाच्या उमेदवार व नेत्यांना काळजी करायला लावणाराच असणार ना? कारण अशी दृष्य़े जनमानसावर प्रभाव पाडणारी असतात. पण तितकीच चिंता असती तरीही हरकत नाही. या घटनेनंतर अनेक उमेदवारांनी चक्क राहुल गांधी वा तत्सम बड्या कॉग्रेस नेत्यांच्या आपल्या मतदारसंघात सभाच नकोत; अशी विनंती पक्षाकडे केली, ही गंभीर बाब आहे. ज्यांना पक्षाचे सर्वाधिक लोकप्रिय नेता मानले जाते, तेच प्रचाराला नकोत?
मागल्या पाच वर्षात कॉग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पद्धतशीर रितीने आपले सुपुत्र राहुल गांधी यांना वडीलार्जित पंतप्रधानकीच्या जागेवर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा आटापिटा चालविला आहे. त्यासाठी त्यांच्या लोकप्रियतेचा डोलारा उभा करताना सर्व प्रयत्न व साधनांचा वापर केला आहे. पण या इतक्या संधी व हाताशी असलेली पक्षाची पुरातन संघटना व पुण्याई, यांच्या आधारावर राहुल गांधींना आपले बस्तान बसवता आले नाही. त्याची प्रचिती उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणूकीने दिली. तब्बल तीन महिने तिथेच मुक्काम ठोकून बसलेल्या राहुल गांधींची माध्यमातून इतकी टिमकी वाजवण्यात आली, की बहुधा दोन दशकांनंतर पुन्हा त्या राज्यात कॉग्रेस स्वबळावर बहूमत संपादन करणार असे वाटावे. मात्र निकाल लागले तेव्हा माध्यमांच्या असल्या प्रचाराचा फ़ुगा फ़ुटला आणि राहुलना तोंड लपवून बसण्याची पाळी आलेली होती. तिथेच त्यांचे भवितव्य ठरून गेले होते. तसे ते अनपेक्षित नव्हते. कारण तोच प्रयोग राहूलनी बिहारमध्ये एक वर्ष आधी करून फ़सलेला होता. त्यावर पांघरूण घालण्यासाठी मग कर्नाटकात कॉग्रेस हमखास जिंकणार तिथे राहुलना महिनाभर मुक्काम ठोकायला लावून तिथल्या यशाचे बाशिंग त्यांच्या डोक्याला बांधण्याचे नाटक रंगवण्यात आले. पण वास्तवात राहुल गांधी यांच्याकडे जनमानसापवर प्रभाव पाडण्याची कुठलीही गुणवत्ता नाही आणि अन्य पक्षापाशी ताकदवान नेता असेल, तर त्यासमोर राहुल फ़िके पडतात, हेच वास्तव होते. तेच विविध विधानसभांच्या निवडणूकीत वारंवार सिद्ध झाले. भाजपाच्या नाकर्तेपणाने मिळणार्या कर्नाटकच्या यशाचे उसने अवसान राहुलमध्ये चमत्कार घडवू शकत नव्हते. त्याचीच प्रचिती आता येत आहे. तीच चिंता आजवर भाटगिरी करणार्यांना भेडसावते आहे.
राहुलच्या भाषणातून लोकांनी उठून जाणे किवा त्यांना ऐकायला लोकांची गर्दी न लोटणे; इतकेच कॉग्रेसजनांच्या चिंतेचे कारण नाही. नेमक्या त्याच दरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देशव्यापी दौरे करून मोठमोठ्या सभा घेत आहेत आणि त्यांना बघायला व ऐकायला लाखोंची गर्दी लोटते आहे. हे कॉग्रेस नेत्यांच्या चिंतेचे खरे व वास्तविक कारण आहे. राहुलकडे लोकांनी पाठ फ़िरवणे आणि मोदींसाठी गर्दी लोटणे; याचा जनमानसावर पडणारा प्रभावच कॉग्रेसविरोधी लोकमत बनवायला उपयुक्त ठरणार आहे. याची जाणिवच त्या पक्षाच्या नेत्यांना सतावते आहे. दिल्लीच्या अनेक कॉग्रेस उमेदवारांनी नेमक्या त्याच गोष्टीकडे पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधले आहे. आपल्या स्थानिक लोकप्रियता व कामाच्या बळावर निवडून येण्य़ाची शक्यता असताना, पक्षाच्या नाकर्तेपणाने आपल्या यशाला बाधा येऊ शकते; ही त्या उमेदवारांची भिती आहे. राहुल वा सोनियाच नव्हेतर मनमोहन सरकारच्या नाकर्तेपणाचा बोजा घेऊन कॉग्रेसच्या उमेदवारांना लढावे लागते आहे. आपल्या भाषणातून खोचक भाषेत मोदी नेमके त्याच दुखण्यावर बोट ठेवतात आणि त्याची प्रचिती श्रोते उठून जाण्यातून येऊ लागली. मग घरोघरी टिव्ही बघणारेही आपल्याला मते देणार नाहीत, अशी भिती त्या उमेदवारांना सतावणे स्वाभाविक आहे. थोडक्यात काय? कॉग्रेसचा सर्वात लोकप्रिय नेताच आज त्या पक्षाच्या उमेदवारांना बोजा वाटू लागला आहे. ज्याने चार मते मिळवून द्यावीत किंवा वाढवावित अशी अपेक्षा असते, तोच मिळू शकणारी मते तोडण्याच्या भयाने पक्षाला भंडावून सोडले आहे. पण हे सत्य बोलायचे कोणी व कोणासमोर? राहुल व मोदी यांची भाषा व मुद्दे वेगळे असतील, पण दोघेही कॉग्रेसला लोकसभा निवडणूकीत धाराशायी करायचे समान काम करीत असल्याचा यापेक्षा वेगळा पुरावा द्यायला हवा काय?
No comments:
Post a Comment