It's been a great half century of long 50 years! Thanks for being a part of it.
गेले दोन आठवडे सतत विविध मित्रांनी फ़ेसबुकवर मावळत्या वर्षाच्या महानतेबद्दल अनेक मते व्यक्त केली. इथपर्यंत ठिक होते. पण त्या एकसुरी पोस्टींमध्ये त्या वर्षाचे भागिदार म्हणून माझेही आभार मानले. माझे म्हणजे अर्थातच फ़ेसबुकी मित्रांनाही भागिदार करून घेतले. त्याची मला खुप मौज वाटली. खरेच हे वर्ष इतके महान होते काय? माझा तरी अनुभव तसे म्हणत नाही. उलट मागल्या अर्धशतकातले प्रत्येक वर्ष माझ्यासाठी तितकेच महान होते, जितके २०१४. त्यातले जे कोणी माझ्या संपर्कात आले, त्यापैकी कोणी कधी अमूक एक वर्ष महान असल्याचा दावा कधीच केला नव्हता. अलिकडे जुन्या वर्षाला निरोप देतानाचे अगत्य अथवा नव्या वर्षाच्या स्वागताचे कौतुक मात्र नवा अनुभव आहे. म्हणूनच एकसुरी पोस्ट टाकण्यापेक्षा दोन शब्द यासंबंधाने लिहावेत असे वाटले. अर्धशतक वा पन्नास वर्षे एवढ्यासाठी, की मला मॅट्रीक होऊन आता नेमकी पन्नास वर्षे होतील. त्या काळात मॅट्रीक होण्याने शहाणपण येते, अशी एक समजूत होती आणि १९६५ साल माझ्या मॅट्रीकचे वर्षे होते. पुढल्या जून महिन्यात त्याला अर्धशतक पुर्ण होईल. ते माझ्या आयुष्यातील आजच्या इतकेच महान वर्ष होते. अजून बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करायला दिड वर्षाचा अवधी शिल्लक होता आणि बेस्टच्या बसचे किमान तिकीट अवघे सात पैसे होते. ट्राम नुकतीच बंद झाली होती आणि गरीबाचे वाहन सरकारने हिरावून घेतल्याच्या तक्रारी चालूच होत्या. शाळेत नवी पुस्तके घेण्याची ऐपत मोजक्या मुलांकडे वा पालकांकडे होती आणि शाळेला अनुदाने मिळत नव्हती. सरकारला मोफ़त पुस्तके व गणवेश वाटण्याइतकी श्रीमंती आलेली नव्हती. मग आम्ही मागल्या वर्षीची जुनी पुस्तके अर्ध्या-पाव किंमतीत घेऊन अभ्यास करायचो. प्रवेशासाठी दर्जेदार शाळेत देणगी मागायची आधुनिकता आलेली नव्हती. उलट महिन्याची फ़ी भरताना पालक मेटाकुटीला येत आणि परिक्षेची फ़ॉर्म फ़ी देखील पालकांना महाग वाटत असे. गणवेश सोडून मुलांकडे अन्य रंगाचे कपडेही नसत. कमावत्या गृहस्थाचे ७०-८० टक्के पगाराचे पैसे घरच्यांना पोटभर अन्न खाऊ घालण्यातच संपायचे. म्हणून अर्धवट शिक्षण सोडणार्यांची संख्या मोठी असायची. पगार वा उत्पन्नातील पाच टक्के रक्कम मुलांच्या शिक्षणावर खर्च करणेही चैन होती आणि कुठल्याही कुटुंबाच्या मासिक वार्षिक खर्चात मुलांचे शिक्षण हा बजेटमध्ये शेवटचे प्राधान्य असलेला विषय होता. शिक्षकांचा पगार हे फ़ी जमा होण्यावर अवलंबून होता आणि शाळांना देणग्या मागण्या इतका दर्जा प्राप्त झालेला नव्हता. त्याहीपेक्षा मागासलेपणा म्हणजे अभ्यासात कच्चा असलेल्या मुलांनाच ट्युशन लावली जायची. गाईड दफ़्तरात असणे हा गुन्हा मानला जायचा. आपल्या वर्गातला विद्यार्थी कच्चा राहिला, याची शिक्षकांना शरम वाटायची. हुशार विद्यार्थ्यांचे क्लासेस तेव्हा जन्माला यायचे होते. फ़ार कशाला केजी नावाची कल्पनाही कुणाला ऐकायला मिळालेली नव्हती. पाच सहा वर्षाचे मुल झाले, मग महापालिकेच्या शाळेत दाखला घ्यायचे. त्यातून पार केल्यासच पाचवी वा आठवीपर्यंत मजल जायची. पालिकेच्या शाळा सातवीपर्यंत होत्या आणि आठवीनंतर खाजगी शाळेत दहा पंधरा टक्के मुले पोहोचायची.
आर्टस, सायन्स किंवा कॉमर्स असे कॉलेजचे अभ्यासक्रम होते आणि तिथपर्यंत पोहोचणे म्हणजेच आभाळाला हात लागले असे मानले जाई. त्यातला कोणी इंजीनियर डॉक्टर व्हायचे स्वप्न बघायचा, म्हणजे थेट राजकन्येलाच मागणी घालायला निघाला असेच वाटायचे. एकूण कनिष्ठ मध्यमवर्गात मॅट्रीक होणे म्हणजे ‘शिक्षान पुरे झाला’ कामधंदा शोधा, अशी मानसिकता होती. कुठेतरी टॅक्सी दिसायची आणि अजून टांग्यांच्या जमाना संपलेला नव्हता. शाळेतही प्रवासभाड्यापुरते पैसे घेऊन सहली निघायच्या आणि खाण्यापिण्यासाठी मुले घरातूनच पुरीभाजीचे डबे आणायची. मुक्कामाची सहल असली तर एक वाटी तांदूळ, दोन वाट्या पीठ, दोन कांदे, दोन बटाटे अशी सहलीची वर्गणी शिक्षक मागायचे. आज रुपयाचे निकेलचे नाणे आहे, त्याच आकाराचा नया पैसा नव्याने व्यवहारात आलेला होता. दशमान पद्धती प्रचलीत होऊ लागली होती. व्यवहार आण्यात व्हायचे आणि त्यात त्या इवल्या तांब्याच्या नया पैशाला खुप मोल होते. एक आण्याचे सहा पैसे होत आणि चार आण्यासाठी पंचवीस पैसे मोजावे लागत. म्हणून लोक दोन आण्याची वस्तू दोनदा घेऊन २४ पैशाचा व्यवहार करीत. तीन आण्याचा व्यवहार केल्यास एकोणिस पैसे मोजावे लागत. अशा सहा व्यवहारात पैसा वाचवला तर एक आणा म्हणजे सहा नये पैसे बचत होत असे. आज सायनला गुरूकृपा नावाचे प्रसिद्ध हॉटेल आहे, त्याचा मूळ मालक त्या काळात तिथल्या निर्वासित सिंधी वस्तीतला धडपड्या माणूस होता. धर्मप्रकाश विद्यालयासमोर एका छपरीत तो परातभर रगडा घेऊन बसायचा आणि दोन पैशात बशीभर धट्ट रगडा द्यायचा. घरात कुठे तरी पडलेले असे दोन पैसे जमा झाले, की आम्ही रगडा खाण्याची चैन करायचो. कधी चौकोनी आकाराचे पाच पैशाचे नाणे हाती लागले तर विचारू नका. काय श्रीमंती होती तेव्हा पैशांना. नववीत असताना अवघ्या अडीच रुपयात दोन दिवसाची लोणावळा सहल अनुभवली होती. मॅट्रीक झाल्यावर प्रथमच हक्काची फ़ुलपॅन्ट अंगावर आली. कॉलेजच्या त्या काळात म्हणजे १९६५ च्या मध्याला उडीपी हॉटेल नव्याने प्रस्थापित होऊ लागली होती आणि साधारण दहा किंवा पंधरा पैशात इडली डोसा वगैरे मिळायचे. खिशात रुपया असेल, तर मित्रांना पार्टी देण्याची उधळपट्टी शक्य असायची. पण पालकांकए रुपया मागण्याची बिधाद किती कॉलेज विद्यार्थ्यांकडे होती? मग सुखवस्तू विद्यार्थ्यांकडून प्रथमच पॉकेटमनी असा शब्द ऐकायला मिळाला. आमच्या पाटलोणीला पॉकेट म्हणजे खिसे होते, पण त्यामध्ये पैशाचे पाकीट बाळगण्याची औकात नव्हती. प्लास्टीकच्या कव्हरमध्ये रेल्वेचा कन्सेशनमध्ये मिळणारा पास तेवढा असायचा. बाकी ३०-४० पैशाचा खुर्दा नुसता खुळखुळणारा. तो खर्चायची हिंमत नसे. कारण तेवढीच त्या काळातली सगळी पुंजी असायची. १९६५ साल लक्षात राहिले ते बेस्टच्या एका योजनेमुळे. एक रुपयाचे तिकीट घेतले, मग बसने दिवसभर कुठेही कसेही फ़िरायची मुभा होती. माझ्या मावस बहिणीचे लग्न होते आणि मावसभावाच्या सोबत आम्ही दोन रुपयात ७० हून अधिक नातेवाईकांना घरी जाऊन पत्रिका वाटल्या होत्या. रुपया किती श्रीमंत होता त्याचा दाखला यातून मिळेल. त्या मस्तवाल एक रुपयाची नोट खिशात असण्याची उब, आज हजाराची तांबडी नोट खिशात असताना मिळत नाही. असे ५० किंवा ७५ पैसे जमा होऊ शकले तर मॅटिनीचा स्वस्तात सिनेमा बघणे शक्य असायचे. अशा नव्याने मध्यमवर्ग होऊ लागलेल्यांच्या चैनीसाठी तेव्हा दुपारी ११ किंवा १२ वाजता जुन्या चित्रपटांचे शो होत. असे होते पन्नास वर्षापुर्वीचे नवे उगवलेले १९६५ साल. पण तेव्हा त्याचे स्वागत केल्याचे वा मावळत्या १९६४ सालाला निरोप दिल्याचे मात्र स्मरत नाही. कॅलेंडर बदलले आणि तारखा बदलत गेल्या. बाकी त्या वर्षांना आपली नेमकी काय ओळख होती, तेच आज आठवत नाही. वार होते, तारखा होत्या, आठवडे होते. बाकी आजच्या सारखीच ती सुद्धा वर्षे आणि दिवस होते.
२०१४ ग्रेट वर्ष असेल तर मग मागली पन्नास वर्षे नगण्य होती का? मागल्या पंधरा दिवसात मला पडलेला हा यक्षप्रश्न आहे. किती बदललो आपण? किती काळ बदलला? परिस्थिती किती बदलली? कोण कोण होते माझ्या आयुष्यात आलेले लोक या पन्नास वर्षातले? ते तितकेच महान नव्हते का? ही सगळी वर्षे सुखातली होती की दु:खातली होती? सुखाचे माहित नाही, पण दु:ख वा तक्रारी मात्र या अर्धशतकात जशाच्या तशा आहेत. दुखणी तीच तशीच्या तशी आहेत. बाळसाहेबांचे तेव्हा काढलेले हे व्यंगचित्रच त्याची साक्ष देणारे आहे. १९६४ हे मावळते वर्ष काय वेगळी वेदना व्यक्त करते आहे २०१४ पेक्षा?