Thursday, December 11, 2014

पुरोगाम्यांच्या नथूराम-लिला



जुन्या घरात कोपर्‍यात कुठेतरी देवघर असायचे. त्यात समई असायची आणि ती संध्याकाळी प्रज्वलीत केली जायची. रात्रभर देवापाशी दिवा असावा, म्हणून समईच्या वाती जळत ठेवल्या जायच्या. अर्थात समईमध्ये इंधन म्हणून तेल आवश्यक असायचे. घरात सामसूम झाली, मग त्या घरात उंदिर खुडबुडायला लागत. हे उंदिर वाटेल त्या उचापती करीत. त्यातून मग समईची पेटलेली वात तोंडात धरून उंदराने अनेक घरांना आगी लावण्याचे प्रकार घडायचे. पेटलेली वात घेऊन मोकाट सुटलेला उंदिर कुठल्या तरी ज्वलनशील पदार्थाच्या जवळ गेला, मग वातीची ज्योत लागून तो पदार्थ वस्तू पेट घ्यायच्या. पण घरात सगळे झोपलेले व सामसूम असल्याने, आगीचा भडका उडण्यापर्यंत कोणाला जाग येत नसे. अशारितीने घराला आग लागली, तर मग दोष कोणाला द्यायचा? देवापाशी समई लावणारा गुन्हेगार असतो, की समईतली वात घेऊन घरभर फ़िरणारा गुन्हेगार असतो? अर्थात ज्या काळात अशा घटना घडायच्या, त्या कालखंडात आपल्या समाजात विचारवंत कमी होते आणि त्यांना उंदराच्या असल्या उचापतींनी उदभवलेल्या उत्पातांवर बौद्धीक उहापोह करण्याइतकी चैनही परवडत नसे. म्हणून अशा गोष्टीत कोणी त्या घरातल्या कुटुंबाला किंवा तिथे वास्तव्य करणार्‍यांना दिवेलागण केली, म्हणून गुन्हेगार ठरवण्यापर्यंत आपली अक्कल पाजळत नव्हता. आता अनेक साधने आलेली आहेत, शिक्षणाचा प्रसारप्रचार वाढला आहे आणि संपर्काच्या दुरगामी व्यवस्था झालेल्या असल्याने नव्या उंदरांची एक जमात त्यातून उदयास आलेली आहे. सहाजिकच अशा आगी नुसत्या घरापर्यंत मर्यादित रहात नाहीत, तर वस्त्या आणि शहरे व गावांनाही सहजगत्या आगी लावल्या जाऊ शकतात. कधीकधी तर संपुर्ण जिल्हा किंवा राज्यालाही आगडोंबात ढकलून देण्याइतकी आजच्या नव्या उंदरांची ‘कार्यक्षमता’ विस्तारलेली आहे.

यातली गोष्ट बाजूला ठेवून त्यातली समई कुठली आणि पेटलेली वात कुठली त्याचा आपण शोध घेऊ. मग त्यात्ले आधुनिक उंदिर कोण त्याचा थोडाफ़ार उलगडा होऊ शकेल. गुजरातमध्ये बारा वर्षापुर्वी साबरमती एक्सप्रेस रेलगाडीचा डवा पेटवला गेला आणि त्यात ५९ लोक जिवंत जाळले गेले. खरे तर ही गुजरातच्या एका शहरापुरती घटना होती आणि सरकार त्यावर उपाय योजायला भक्कम होते. पण तिथे काही उंदिर घुसले आणि त्यांनी आपल्या कॅमेरा व तंत्राच्या आधारे ती रेलडबा नामक पेटलेली वात तोंडात धरून देशभर फ़िरायला सुरूवात केली. त्याचा परिणाम मग एकदोन दिवसातच संपुर्ण गुजरात राज्यात दिसू लागला. डबा कोणी पेटवला, त्यामध्ये जळून कोण मेले वा मारले गेले, त्याचा तपशील देणार्‍या त्या पेटल्या वातीने गुजरातच्या अनेक शहरात दंगलीचा आगडोंब उभा केला. पुढले तीन महिने ती आग शमत नव्हती. जे काही घटले ती स्थानिक घटना होती आणि तिचे निराकरण स्थानिक पातळीवर होऊ शकले असते. पण माध्यमातल्या आधुनिक उंद्ररांनी राज्यभर त्या आगीचे लोण पसरवण्याचे काम केले. सत्यकथन करणे एक गोष्ट आहे आणि त्यातून आग सर्वत्र पसरवणे दुसरी बाब आहे. आपण जी बातमी देतोय तिची दाहकता ओळखली असती, तर तशा बातम्या आग पसरवू शकतात, इतके नक्कीच बातम्या देणार्‍यांना लक्षात आले असते. मध्यंतरी मुंबईच्या एका कॉलनीमध्ये फ़टाके मजा म्हणून लावले गेले, त्याच्या ठिणग्या नजिकच्या एका स्टुडिओत पोहोचल्या आणि त्या किरकोळ ठिणग्यांनी तिथला सुसज्ज सेटच पेटवून दिला. किरकोळ ठिणगी मोठ्या स्फ़ोटकाच्या ढिगार्‍याला क्षणार्धात भस्मसात करू शकते, याचे भान सुटले मग अशा आगी लावल्या जात असतात. किंबहूना अशा आगी लावून नामानिराळे रहाता येत असते. गेल्या दोनतीन दशकात याप्रकारे आगी लावणार्‍या उंदरांचा सुळसुळाट झालेला आहे

आज असेच काही उंदिर मोकाट सुटले आहेत. त्यातून मग भगवदगीता, नथूराम किंवा धर्मांतराचा विषय स्फ़ोटक बनलेला दिसतो आहे. या घटना जिथे घडल्या तिथे त्या हजार बाराशे लोकांपर्यंतही पोहोचल्या नसत्या. पण कुठल्या क्षुल्लक समारंभात सुषमा स्वराज काही बोलल्या आणि त्याची सनसनाटी माजवण्याच्या नादात पत्रकार म्हणवून घेणार्‍यांनी ती पेटलेली वात देशभर नेली. त्याचे पडसाद मग देशाच्या संसदेतही उमटले. दुसरी कोणी साध्वी मंत्री आहे, तिने रामजादे हरामजादे असले शब्द वापरले आणि त्याचीही पेटली वात देशाच्या कानाकोपर्‍यात कोणी नेली? अशा वक्तव्ये किंवा त्यामागचे हेतू कसलेही असोत, त्यातून लाखो करोडो लोकांच्या भावनेला हात घातला जात असतो. म्हणून त्याची जाहिर वाच्यता करणारा बेभान असला, तर शहाण्यांनी त्याचा प्रसारप्रचार होऊ नये म्हणून सावधानता बाळगायला हवी ना? ती जागरूकता आजच्या माध्यमात कितीशी दिसते? साध्वी वा स्वराज यांच्या विधानाने असे कोणते आभाळ कोसळले होते? ज्या मर्यादित लोकांपुढे अशी वक्तव्ये केली जातात, तेवढ्यापुरती ती मर्यादित राहिल्यास काही शेकडा वा दोनचार हजार लोकांवरच त्याचा विपरीत परिणाम संभवतो. पण विनाविलंब देशव्यापी त्याचा गवगवा केल्यास उंदराने समईच्या वातीशी खेळून घराला आग लावावी, तसे परिणाम वाट्याला येतात. मजेची गोष्ट अशी असते, की स्वत:ला अत्यंत जबाबदार व विचारवंत मानणारेही त्या उंदरांच्या धावपळीत सहभागी होऊन लागणार्‍या आगीला फ़ुंकर घालून त्याचा वणवा व्हायला हातभार लावत असतात. आग लागण्याचा ओरडा करताना त्यातच तेल ओतण्याचा हा अजब प्रकार त्यामुळे वारंवार होऊ लागला आहे. आग रोखताना जिथे पेट घेतला आहे, तिथून ती पसरू नये, याची पहिली काळजी घेतली जात असते. पण इथे आगीचा धोका सांगणारेच ती दूरदूर पसरावी यासाठी आटापिटा करताना दिसतात.

पुण्यात कुठल्या इवल्या कार्यक्रमात कोणी गांधीहत्येचा आरोपी नथूराम गोडसे याचे उदात्तीकरण केले. त्याला हजारभर लोकही उपथित नव्हते. पण त्यावरून इतकी व्यापक चर्चा माध्यमातून झाली, की करोडो लोकांपर्यंत ते उदात्तीकरण जाऊन पोहोचले. यामध्ये हजारो असे लोक असतात, ज्यांना गांधींपेक्षा गोडसे मोठा वाटत असतो. पण त्यांना आपल्यासारख्या समविचारी लोकांपर्यंत पोहोचणे शक्य नसते. त्यांना एकत्र आणायला यातून हातभार लावला जात नाही काय? पुण्यातल्या इवल्या बंदिस्त जागेतील कार्यक्रमाने जितके गोडसेचे उदात्तीकरण झालेले नव्हते; त्याच्या शेकडो पटीने माध्यमांनी नथूरामाचे रामायण घराघरात नेऊन पोहोचवले. ज्यांच्या मनात त्याविषयी शंका असतील, त्याही दूर करण्याची संधी नथूराम भक्तांना कोणी दिली? ज्यांच्या कार्यक्रम भाषणांना हजारभर लोक जमताना मारामारी असते, त्यांना आयता लाखो श्रोत्यांचा समूदाय कोणी उपलब्ध करून दिला? गेल्या काही वर्षात सेक्युलॅरिझम, पुरोगामीत्व, गांधीवाद यांचे थोतांड इतके अतिरेकी झाले, की त्यालाच लोक कंटाळलेले आहेत. त्याचा परिणाम अलिकडल्या मतदानातून दिसला आहे. ती प्रतिक्रीया केवळ मतदानापुरती नाही. काही प्रमाणात या थोतांडाची किळस लोकांना आलेली आहे आणि त्याची प्रतिक्रीया म्हणून हिंदूत्ववादाला प्रतिसाद मिळू लागला आहे. सहाजिकच तो अतिरेक करणार्‍यांनी आपली चुक ओळखून अतिरेकाला आवर घातला, तरी मोठे सत्कार्य होऊ शकेल. सहा दशकात लोकांना नथूराम ठाऊक आहे तो गांधीप्रेमींमुळे. अन्यथा गांधीविरोधक या कालखंडात उजळमाथ्याने गोडसे समर्थन करायला धजावत नव्हते. आज ते धाडस येते आहे, कारण लोक गांधीवादाच्या पाखंडाला विटले आहेत. त्याची प्रतिक्रीया म्हणजे गोडसेभक्ती नव्हे. पण यापुढेही उंदरांचे उपदव्याप असेच राहिले, तर गोडसेला दैवत्व प्राप्त होणे अधिक सोपे होऊन जाईल आणि त्याचे श्रेय या अतिरेकी बेगडी गांधीप्रेमाला असेल.

1 comment:

  1. pan bhau he vaat gheun firnare undir pan sadge sudhe nahit...ek cabinate minister sushma ani dusari rajya mantri sadvi....,yana kalat nahi ka...

    ReplyDelete