गेल्या ८ डिसेंबरला चार राज्यातल्या विधानसभांचे निकाल लागले होते आणि त्यापैकी तीन जागी भाजपाने दैदिप्यमान यश मिळवले होते. पण तात्कालीन माध्यमांचा आढावा घेतला, तर त्याहीपेक्षा मोठा विजय दिल्लीत दुसर्या क्रमांकावर यश मिळवलेल्या आम आदमी पक्षाचा होता असेच वाटेल. त्यातून मग अरविंद केजरीवाल यांना अशी काही झिंग चढली होती, की जग जिंकायला दोनच पाऊले शिल्लक राहिली, असेच बोलले जात होते. अवघी माध्यमे मोदींचा विजयरथ आता केजरीवालच रोखणार अशी भाषा बोलत होती. अशा कालखंडात मी माझ्या ब्लॉगवर जे काही सतत्याने लिहीत होतो, ते अनेक ‘आप’ समर्थकांना नावडणारे असेच होते. कारण सोपे होते. सलग पाच महिने मी अनेक लेख लिहून व वेगवेगळे संदर्भ देऊन आम आदमी पक्ष व त्याच्या समर्थकांचा भ्रमनिरास कसा होईल, हे सांगत होतो. मोदी नावाच्या वादळापुढे आपचा पालापाचोळा होणार, असे माझे विश्लेषण होते. सहाजिकच ते केजरीवाल भक्तांना नावडले तर नवल नव्हते. पण त्यातून मला आप समर्थकांना नामोहरम करायचे नव्हते, किंवा भाजपाचे समर्थनही करायचे नव्हते. भाजपा मोदींच्या नेतृत्वाखाली कसा जिंकू शकतो, त्याचे बारकावे मी मांडत होतो. त्यातला मतितार्थ समजून घेतला असता, तर केजरीवाल भक्तांना त्याच चुका सुधारता आल्या असत्या आणि इतका मोठा धक्का सोसायची वेळ आली नसती. पण यशाची झिंग इतकी भीषण असते, की आपण खड्ड्यात जातो असे कोणी सांगितले आणि ते वास्तव असले, तरी पटत नसते. अगदी डोळ्यांना सत्य दिसत असते, पण डोळ्यांना दिसणारे पटवून घ्यायला बुद्धीच तयार होत नसते. त्यामुळे मग अशा झिंगलेल्यांचा र्हास वेगाने होत असतो. अवघा देश जिंकायला निघालेल्या केजरीवाल आणि आम आदमी पक्षाची दुर्दशा आज काय आहे, ते नव्याने सांगण्याची गरज आहे काय?
माझ्या ब्लॉगवर हे सगळे डझनावारी लेख आजही उपलब्ध आहेत. ज्यांना उत्कंठा असेल त्यांनी ते जरूर वाचावेत. किंबहूना आज माझे लिखाण ज्यांना अस्वस्थ करते किंवा पक्षपाती वाटते आहे, त्यांनी आजचे लिखाण वाचण्यापेक्षा मुद्दाम हे वर्षभर जुने लेख आवर्जून वाचावेत. त्यातून मोदी वा भाजपाची भलावण मी करीत नव्हतो, तर आम आदमी पक्ष किंवा कॉग्रेसला त्यांच्या वाटेतले संभाव्य धोके दाखवून देत होतो. त्यांनी धोके टाळावेत म्हणून सावध करीत असताना, त्यांच्या मुर्खपणाचे लाभ मोदी वा भाजपाला कसे मिळू शकतात, त्याचे सविस्तर विवेचन त्या लिखाणातून केलेले होते. एकाचा लाभ दुसर्याच्या मुर्खपणातून होत असतो. राजकारणात अनेकदा खुळा आत्मविश्वास मुर्खपणा करायला भाग पाडत असतो. मग अशा मुर्खपणाचा तुमचा शत्रू वा प्रतिस्पर्धी किती चतुराईने वापर करील, त्यावर त्याचा लाभ अवलंबून असतो. राजकारण हे पटावरच्या खेळासारखे असते. पटावर एक सोंगटी वा मोहरा चुकीची चाल करून हलवला, तर त्यातून आपणच आपल्याला शह देण्याची संधी प्रतिस्पर्ध्याला देत असतो. राजकारणात एक चुकीची चाल वा खेळी तुमच्या प्रतिस्पर्ध्याला मोठी अपुर्व संधी देऊन जात असते. त्यातही उतावळेपणा वा अतिउत्साह तर आत्मघातकी असतो. केजरीवाल यांचा उतावळेपणा आत्मघातकी ठरला. दिल्लीत सत्ता राबवण्याची उत्तम संधी मिळाली असताना, त्यांनी उतावळेपणाने संधीच मातीमोल करून टाकली. आणि ती संधी मातीमोल करण्यालाच ते आपला मुत्सद्दीपणा ठरवून नाचत होते. दुसरीकडे कॉग्रेसने आपल्या आत्मघातकी अतिरेकाने नामोहरम झालेल्या भाजपाला एक नवा नेता व चेहराच पुरवला. सततच्या मोदीविरोधी विखारी आरोपातून, भाजपाचा एक प्रादेशिक नेता राष्ट्रीय व्यक्तीमत्व बनवून देण्याचे पाप कोणाचे होते? अशा चुका आत्मघातकी असतात.
मी त्याच चुकांवर बोट ठेवून कॉग्रेस व सेक्युलर मंडळींना इशारे देत होतो. तुम्हीच मोदींना मोठे व राष्ट्रीय नेता बनवा आहात, असा धोका दाखवत होतो. पण त्यातले गांभिर्य कोणी लक्षात घेतले होते? भाऊ मोदींचे समर्थन करतात व मोदींचे प्रवक्ते झालेत, इथपर्यंत माझ्यावरच आरोप करण्याची मजल गेली होती. मला दोष देऊन वा माझ्यावर शंका घेऊन कॉग्रेस वा आप समर्थकांचे कुठले कल्याण झाले? त्यांच्या पक्षाचे काय भले झाले? त्यांच्या पक्षाचे व्हायचे ते नुकसान मात्र होऊन गेले. शिवसेना भाजपा युती तोडताना भाजपाने तात्पुरता लाभ बघितला आणि बाळासाहेबांच्या मागे शिवसेना पांगळी व नेतृत्वहीन झाल्याच्या समजूतीने स्वबळावर लढायचा जुगार खेळला. त्याचे तात्कालीन लाभ भाजपाला नक्कीच मिळाले आहेत. पण एका निवडणूकीपुरता विचार भाजपा करणार असेल, तर गोष्ट वेगळी. दिर्घकालीन राजकारणाचा विचार करायचा, तर भाजपाने आपले सर्वात मोठे नुकसान महाराष्ट्रात करून घेतले आहे. कारण त्या पक्षाने शिवसेनेला आपली प्रादेशिक ताकद तपासण्याची अपुर्व संधी उपलब्ध करून दिली. गेल्या पंचवीस वर्षातल्या युतीचे सर्वात मोठे गुपित म्हणजे सेनेला तिच्या राज्यव्यापी शक्तीचे कधीच भान वा ज्ञान नव्हते. आज लोकप्रिय पक्ष व नेता यांच्या विरोधात जाऊन सेनेने मिळवलेल्या जागा व मते, ही तिची किमान ताकद आहे. ती लाटविरहीत भाजपापेक्षा मोठी ठरू शकण्याइतकी आहे. त्यातून शिवसेनेला आपल्या बळावर राज्यव्यापी लढण्याचा आत्मविश्वास आला. ती भाजपाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. राज्यव्यापी पक्ष होऊन पंचवीस वर्षे उलटली, तरी सेना कधी एकट्याने लढायचा विचार करू शकली नाही. आणि त्याच बाबतीत सेनेला पांगळे ठेवण्याचा प्रमोद महाजन यांनी खेळलेला डाव, त्यांच्याच वारसांनी उधळून लावला. एका उत्साहाच्या भरात भाजपाने केलेली ती सर्वात मोठी चुक आहे. तिचे परिणाम पुढल्या राजकारणात दिसतील.
युतीत असताना लोकसभेत मिळालेली मते युती तोडल्यावर विधानसभेत शिवसेनेने कायम राखली आहेत. म्हणजेच मोदीलाटेला थोपवण्याची कुवत आपल्यात असल्याचे उद्धव ठाकरे सिद्ध करू शकले. त्या अननुभवी नेत्याला आपल्या बळावर इतके मोठे यश मिळवायची संधी देऊन, भाजपाने राज्यात आपलाच प्रतिस्पर्धी निर्माण केला. बाळासाहेबांच्या छायेत कायम राहिलेल्या या पक्षप्रमुखाला स्वयंभू होण्याची संधी तो तसाच युतीत राहिला असता, तर मिळूच शकली नसती. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ शकला नसता. विधानसभा निवडणूकीत जागा किती मिळाल्या, त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना मिळालेला आत्मविश्वास, ही सर्वात मोठी कमाई आहे. आणि भाजपाने दिलेली ती सर्वात मोठी अनमोल भेट आहे. जसा कॉग्रेसने निराश हताश भाजपाला मोदी नावाचा नवा चेहरा व नेता बहाल केला, तसाच राज्यात भाजपाने विस्कटल्या शिवसेनेला खंबीर नेता दिला व त्याच्यात आत्मविश्वासही निर्माण करून दिला. आज त्याची किंमत भाजपाला कळणार नाही. गेल्या तीन वर्षात कॉग्रेसला तरी मोदींच्या बाबतीत आपण चुक करतोय याचे कुठे भान होते? परिणाम दिसल्यावर मे महिन्यात त्याचे भान आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. युती तोडण्याच्या भाजपा प्रयत्नांच्या विरोधात लिहून मी नेमकी तीच चुक मांडत होतो. पण स्वबळाची झिंग भाजपाला सत्त्य कुठे बघू देत होती? पित्याच्या छायेतून बाहेर पडलेला उद्धव ठाकरे किती मोठे आव्हान आहे, ते आज उमगणार नाही. लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी उडाली तोपर्यंत भाजपा विरोधकांना तरी मोदींचे आव्हान कुठे उमगले होते? माझ्या लिखाणातून तेच मी तीन वर्षापुर्वीपासून सांगत होतो. २०१२च्या मध्यापासून मी दाखवत असलेले धोके मोदी विरोधकांना उमगण्यासाठी २०१४चा मे महिना उजाडावा लागला. आजसुद्धा मी लिहीतो आहे, ते धोके दाखवणे आहे. त्याचे परिणाम उमजायला दिडदोन वर्षे उलटावी लागतील.
No comments:
Post a Comment