Thursday, December 11, 2014

अर्थमंत्र्यांनी सुरूवात तर झकास केली



युती तुटल्यापासून भाजपाच्या अनेक कुलंगड्यांना वाचा फ़ोडायचेच व्रत घेतल्यासारखे आम्ही लिहीत आलो. अनेक भाजपावाले त्यामुळे आमच्यावर नाराज असले तर आश्चर्य नाही. त्यामुळे मग आमच्यावर शिवसेनेचे पक्षपाती असल्याचा आरोप सरसकट झाला. त्याला पर्यायच नव्हता. जेव्हा आरोपांना द्यायला उत्तर नसते आणि खुलासा करायला जागा नसते; तेव्हा कोणीही प्रत्यारोपाचाच मार्ग स्विकारत असतो. त्यातून भाजपा समर्थक अपवाद कसे असतील? युती तोडण्याचे कारणच मुळात जागावाटपातील मतभेद नव्हते. तर भ्रष्टाचाराच्या मोठ्या घोटाळ्यातील राष्ट्रवादी व भाजपा युती जपण्याचा हेतू त्यामागे होता. आणि सातत्याने आम्ही त्यावरच शरसंधान केलेले आहे. युती तुटल्यावर विनाविलंब राष्ट्रवादीने कॉग्रेससोबतची आघाडी तोडली. पुढे राष्ट्रवादीने भाजपाला दुबळ्या जागी घाऊक संख्येने उमेदवार पुरवले. शेवटी त्यानेही हेतू साधला गेला नाही तर निकाल पुर्ण होण्याआधीच भाजपाला बाहेरून पाठींबाही जाहिर करून टाकला. पण जसजसे त्याचे पदर उलगडत गेले, तसतशी भाजपाची राष्ट्रवादीशी असलेली व्याभिचारी युती उघडी पडत गेली. त्यातून आपली सुटका करून घेण्यासाठी मग शिवसेनेला ‘कुंकवाचा धनी’ म्हणून युतीमध्ये पुन्हा आणायची कसरत नव्या मुख्यमंत्र्यांना करावी लागली. मात्र इतके होऊनही हा व्याभिचार भाजपाची पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळेच मग आता कुठल्याही मार्गाने राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेतेपदी बसवण्याची केविलवाणी कसरत सुरू झाली आहे. विरोधी पक्ष राष्ट्रवादीला कशाला व्हायचे आहे? भाजपालाही विरोधी नेतेपदी राष्ट्रवादीवालाच नेता कशाला हवा आहे? सगळ्या व्याभिचाराचे रहस्य त्यातच दडले आहे. आणि त्याला वाचा फ़ोडण्याचे पहिले पाऊल नवे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उचलले असेल, तर त्यांचे स्वागत नको करायला?

दोन दिवसात एक बातमी अचानक आली आणि बिचार्‍या मुख्यमंत्र्यांना पुन्हा शब्दांची केविलवाणी कसरत करावी लागली. अर्थमंत्री झाल्यावर मुनगंटीवार तिरूपतीच्या दर्शनाला सहकुटुंब गेले. त्याबद्दल कोणी आक्षेप घेऊ शकत नाही. कुठल्याही व्यक्तीला आपल्या श्रद्धा असण्याला वा व्यक्त करण्याला कायदा निर्बंध घालत नाही. म्हणूनच अर्थमंत्री झालेले मुनगंटीवार तिरूपतीला गेल्यास आक्षेप घेता येणार नाही. त्यांनी सोबत कुटुंबाला नेल्यानेही बिघडत नाही. पण कोणत्या मार्गाने त्यांनी जावे आणि तो खर्च कुठून झाला, ह्याला महत्व येणारच. सरकारी गाडी घेऊन वा अगदी विमानाने तिरूपतीला जाण्यात गैर काहीच नाही. तीच तर प्रवासाची साधने आहेत. पण त्याचा आर्थिक बोजा कुणी उचलावा? मंत्री म्हणून असा बोजा सरकार उचलत असते. पण मंत्र्याच्या खर्‍या कुटुंबापलिकडे गोतावळा असेल, तर त्याचा बोजा जनतेच्या माथी मारणे गैर आहे. पण तोच बोजा सरकारच्या खात्यावर पडणार नसेल, तर त्याबद्दल गवगवा व्हायचेही काही कारण नाही. अन्य कोणी खर्च करीत असेल तर मुनगंटीवार यांचे दूरदूरचे नातेगोते तिरूपतीला त्यांच्या समवेत गेले असते, तरी चालले असते. पण मुनगंटीवार यांचे सासुसासरे व कुटुंबिय एका खाजगी विमानाने तिथे गेले आणि तो खर्च रामाराव नावाच्या एका खाजगी व्यक्तीने उचलला. सरकारच्या माथी तो बोजा आला नाही, याचे म्हणून स्वागत करायला हवे. पण मग रामारावने तो बोजा कशाला उचलावा? इथे सगळी गडबड आहे. हा रामाराव महाराष्ट्रात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यातला एक प्रमुख ठेकेदार आहे. ज्या सिंचन घोटाळ्याचे भाजपाने गेल्या तीन वर्षात अहोरात्र भांडवल केले, त्याच घोटाळ्यातला एक प्रमुख ठेकेदार मुनगंटीवार यांना तिरुपती यात्रा कशाला घडवतो? जो घोटाळा झाला, त्याचे प्रायश्चित्त म्हणून रामारावने ही तिर्थयात्रा केलेली आहे काय?

गोसी खुर्द नावाचा एक मोठा सिंचन प्रकल्प गेली कित्येक वर्षे हजारो कोटी रुपये फ़स्त करून निकामी पडलेला आहे. त्यावर इतकी अफ़ाट रक्कम खर्च होऊनही त्याचे एक थेंब पाणी कुठल्या शेताला भिजवायला पोहोचू शकलेले नाही. त्याच प्रकल्पात अवाढव्य सिंचन घोटाळा झाला, म्हणुन मागली दोनतीन वर्षे भाजपाने आजचे बहुतेक मंत्री विधीमंडळात घुमाकुळ घालत होते. याच सिंचन घोटाळ्याचे हवाले देऊन भाजपाचे दिग्गज नेते, तेव्हा अजितदादा व सुनील तटकरे यांना गजाआड टाकायची वचने मतदाराला दोनतीन महिन्यापासून प्रचारातून देत होते. अशा घोटाळ्यात गुंतलेले नेते एकटेच घोटाळा करू शकत नसतात. त्यांना त्यात असलेल्या ठेकेदारांचे सहकार्य घ्यावे लागते. अशा एका ठेकेदाराने मुनगंटीवार यांच्या सेवेत आताच रुजू कशाला व्हावे? इतकी वर्षे तो इथे ठेकेदारी करतो आहे आणि इतकी वर्षे मुनगंटीवार झुंजार नेता आहेत. मग तेव्हा त्यांना सहकुटुंब तिरूपतीच्या दर्शनाला घेऊन जाण्याची सुबुद्धी या रामारावाला कशाला झालेली नव्हती? भाजपाचे सरकार येऊन मुनागंटीवार अर्थमंत्री झाल्याशिवाय त्यांचे तोंड बघायचे नाही; अशी अट तिरूपती बालाजीने घातली होती काय? नसेल तर रामाराव इतकी वर्षे थांबला कशाला? मुनगंटीवार त्यासाठी इतका विलंब लावून कसली प्रतिक्षा करत होते? या ठेकेदाराने या तिरूपती यात्रेसाठी तब्बल पंधरा लाख रुपये खर्च केल्याचा गवगवा म्हणूनच झाला आहे. त्यावर मग बिचार्‍या मुख्यमंत्र्यांची तारांबळ उडाली आणि त्यांनी त्यावर सारवासारव केली आहे. हा खर्च कुणा ठेकेदाराने केलेला नाही, तर मुनगंटीवार यांचा तिरूपती यात्रेचा खर्च पक्षाने आपल्या तिजोरीतून केला असे फ़डणवीस यांनी जाहिर केले आहे. थोडक्यात सरकार वा ठेकेदाराने तो खर्च उचलला नाही म्हणताना, देवेंद्रनी आणखी एक प्रश्न उभा केला आहे. अशा यात्रेसाठी राजकीय पक्षाला पैसे खर्च करण्याची मुभा आहे काय?

सोनिया गांधी व राहुल गांधी संचालक असलेल्या एका कंपनीला काही कोटी रुपये कॉग्रेसच्या तिजोरीतून दिल्याचा एक खटला सध्या गाजतो आहे. त्यात पक्षकार्यासाठी जमा केलेल्या देणगीच्या रकमेतून कसा व कोणत्या कारणासाठी खर्च करावा, असा प्रश्न कोर्टाच्या विचाराधीन आहे. त्याचा संदर्भ लक्षात घेतला, तर पक्षाच्या नेत्याची देवस्थानाला सहकुटुंब भेट हा राजकीय पक्षाच्या कार्याचा मामला असतो काय; असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे देवेंद्र फ़डणवीस यांनी केलेला खुलासा मुनगंटीवारांच्या तिर्थयात्रेचे बालंट संपवण्यापेक्षा, नवीच भानगड उघड करणारा ठरू शकेल. पण त्यालाही आज महत्व नाही. मुनगंटीवार यांनी अशा तिर्थयात्रेतून गेल्या काही वर्षात झालेल्या सिंचन घोटाळ्यातील भागिदार भाजपाचा चेहरा समोर आणला आहे. ह्या घोटाळ्याशी संबंधित निर्णय जरूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व मंत्र्यांनी केलेले असतील. पण त्यांची चौकशी व त्यावर कठोर कारवाई होऊ नये, यासाठीची काळजी विरोधात बसलेल्या भाजपाने पुर्णपणे घेतली होती. कारण या प्रत्येक घोटाळ्यात राष्ट्रवादी व भाजपाचे नेते सारखेच गुंतलेले आहेत. त्यातले अनेकजण भाजपाचे विधान परिषद, राज्यसभेचे सदस्यही आहेत. त्यामुळेच अशा घोटाळ्यातल्या भागिदारांच्या सोबत रहाणे भाग आहे. तो भागिदार शिवसेना नसेल, तर तिला हटवणे आणि राष्ट्रवादीला पाठींब्यात वा विरोधात मोक्याच्या जागी बसवणे, भाजपाला भाग आहे. त्याची साक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी तिर्थयात्रा करून दिली आहे. आपले पाठीराखे कोण व कुठल्या घोटाळ्यातले आहेत, त्याची इतकी झकास साक्ष दिल्याबद्दल त्यांचे आभार मानायला नकोत का? येत्या दिडदोन वर्षात अशा अनेक साक्षी व पुरावे समोर येणार आहेत. शिवसेनेवर दुगाण्या झाडून भाजपाला आपला चेहरा साफ़ व स्वच्छ करता येणार नाही. म्हणून जे प्रामाणिक भाजपावाले असतील त्यांनी त्यासाठी तयारीला लागावे. दोन वर्षे संपायला फ़ार वेळ लागत नाही.

2 comments:

  1. Bhau...apratim....jagata pahara
    sarvsamanyancha sahara

    ReplyDelete
  2. All political parties and their leaders are same as far as corruption issue is concerned except few exceptions.The rule is proved by exception.That is why everybody is after for particular portfolios in the ministry.

    ReplyDelete