दै. सामना (१/१२/९६) या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी पुढील शब्दप्रयोग केले आहेत. ‘काही मतलबी गिधाडांनी (सध्याची परिस्थिती निर्माण केली)’, ‘आधी किणी मुडद्याची संधी (मिळाली होती)’, ‘म्हणजे लघवी केल्यानंतर एक असा फ़ेस येतो ना, तो आता खाली बसलाय, ते आता परत मुततील की नाही.’ तुम़चे दाढीवाले कोण ते जैन’. ‘लोकसत्ताचे संपादक अरूण टिकेकर जे आहेत, ते फ़ोरास रोडला जातात, तिकडे त्यांची एक रखेलीही आहे, तिथेच ते दारू पिवूनही झोपतात.’ इ.
ही केवळ रांगडी, रोखठोक भाषा नाही. ती जाणूनबुजून वापरण्यात येणारी अशिष्ट, वाह्यात, काहीशी विकृत अशी भाषा आहे. रमेश किणी या मृत व्यक्तीचा निर्देश ठाकरे ‘मुडदा’ असा करतात. आपण सर्वच मरणार आहोत आणि सर्वांचेच मुडदे होणार आहेत, हे ठाकरेंना माहिती नाही काय? काही क्षुद्र माणसे मेल्यावर त्यांचे मुडदे बनतात आणि श्रेष्ठ माणसांची प्रेते किंवा पार्थीव बनते, असा तर फ़रक नाही? एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, श्री अरूण टिकेकर यांच्यावरील जे आरोप वर उघृत केले आहेत, ते श्री ठाकरे यांनी त्यांच्यावर प्रत्यक्षात केलेले नाहीत. आपल्यावर आणि शिवसेनेवर बिनबुडाचे अनेक आरोप केले जातात, हा मुद्दा मांडताना असे आरोप बेछूटपणे कोणावरही करता येतील, हे दाखवून देण्यासाठी उदाहरणादाखल ते दिलेले आहेत. पक्षीय राजकारणाच्या धुमाळीत शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करण्यात येत असतीलही. पण शिवसेनेवर किंवा युती सरकारवर करण्यात आलेले सर्व आरोप केवळ निराधार आहेत असेही नाही. चौकशीअंती ते खोटे ठरतीलही. पण ज्यांच्या संदर्भात नि:पक्षपाती चौकशी व्हावी असे ते आरोप आहेत. हे तटस्थ माणसे प्रथमदर्शनी मान्य करतील. उदा. रमेश किणी यांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या बाबतीत नेटाने, व्यवस्थितपणे चौकशी झाली, सर्व शक्यता पडताळून पहाण्यात आल्या असे दिसत नाही. किंवा मायकेल जॅक्सन प्रकरणाच्या संदर्भात कार्यक्रमापासून जो तोटा आला असे सांगण्यात येते, तो केवळ कारभाराच्य गलथानपणामुळे झाला, की तोटा झालाच नाही? खरे हिशोब दाखवण्यात येतच नाहीत, असे आहे. या गोष्टी हव्या तितक्या स्पष्ट नाहीत. तेव्हा ठाकरे यांच्यावर किंवा शिवसेनेवर केवळ बेछूटपणे आरोप करण्यात येतात हे खरे नाही. बेछूटपणे आरोप करायचेच तर इतरांवर कोणते आरोप करता येतील त्याची उदाहरणे देण्याची संधी विरोधकांनी ठाकरे यांना दिलेली नाही.
ठाकरे अशी भाषा का वापरतात? समाजाच्या काही थरात शिव्यागाळी माणसांच्या तोंडात बसलेल्या असतात. संबोधने, विशेषणे, क्रियाविशेषणे व क्रियापदे म्हणून त्यांच्य बोलण्यात शिव्या सतत येत असतात. सततच्या वापराने त्या झिजून गुळगुळीत झालेल्या असतात. त्या शिव्या अशा वाटतच नाहीत. तो केवळ त्यांच्या आत्माविष्काराच्या शैलीचा भाग असतो. अशा माणसांवर जेव्हा शिव्या देण्याचा प्रसंग ओढवतो, तेव्हा त्यांना खास कल्पकता दाखवावी लागते. त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातील शिव्या केवळ उत्स्फ़ुर्त असतात. ठाकरे वापरत असलेली अशिष्ट भाषा अशी उत्स्फ़ुर्त नाही. ती त्यांनी कमावलेली, अंगी बाणवून घेतलेली भाषा आहे, असे दिसते. त्या भाषेद्वारा ते कोणता संदेश आपल्या अनुयायांना आणि इतरांना देत असतात?
एक संदेश असा की, हे जे माझे विरोधक आहेत, ज्यांच्या संदर्भात मी शिवराळ भाषा वापरतो, ते क्षुद्र आहेत. क्षुल्लक आहेत. त्यांची मला पर्वा नाही, ते माझ्या खिजगणतीत नाहीत. ज्यांच्याविषयी सभ्य भाषा वापरावी, अशा लायकीचे हे लोक नाहीत. मी वाघ्याला वाघ्या म्हणणारा आहे. दुसरा संदेश असा की, मी सरळ प्रामाणिक माणूस आहे. माझ्यापाशी आडपडदा नाही. मला जे सत्य वाटते ते मी निर्भीडपणे सांगतो. आत एक आणि बाहेर एक असे माझे नाही. आपण सभ्यपणे बोलतो-वागतो असा दावा जे करतात ते ढोंगी असतात. ते सत्य झाकून ठेवतात. मी तसे करत नाही, सत्य तसेच नागडेउघडे असते. सत्य जसे असते तसे मी सांगतो. म्हणून माझी भाषाही उघडीनागडी असते.
मराठी समाजाच्या एका मोठ्या विभागातील तरूणांना ठाकरे यांची ही भूमिका पटलेली आहे आणि मान्य आहे. पौगंड वयात अनेकदा मुलांना सभ्यपणा हे ढोंग वाटते. माणसाच्या लैंगिकतेची चाहुल त्यांना लागलेली असते. त्याचा अनेकप्रकारे स्वत:ला अनुभव येत असतो. या स्वरूपाच्या व्यवहारात प्रौढ माणसे गुंतलेली असतात. पण आपल्या जीवनाची ही बाजू ते झाकून ठेवतात. जणू काही आपण त्या गावचेच नाही, असा आव आणतात. असे त्यांचे प्रौढांविरुद्धचे गार्हाणे असते. या ढोंगाचा प्रत्यय त्यांना स्वत:मध्येही येत असतो. लैंगीक जीवनाविषयी असलेली उत्कट आस्था, कुतूह्ल. या व्यवहारात गुंतण्याची तीव्र इच्छा सभ्यपणाच्या संकेताच्या दडपणाखाली त्यांना स्वत:लाही झाकून ठेवावी लागते. त्या कोंडीतून सुटण्याचा एक मार्ग म्हणजे लैंगिकतेला भाषेच्या माध्यमातून वाट मोकळी करणे. एकमेकांसोबत रांगड्या अश्लील, इ. शब्दप्रयोगांचा वापर करून बोलण्यातून लैंगिक उर्मीचे काही प्रमाणात समाधान होते असा अनुभव तर येतोच, पण असे बोलून आपण प्रौढांच्या दांभिकतेविरुद्ध आणि त्यांनी आपल्या केलेल्या गळचेपीविरुद्ध बंड करीत आहोत असे समाधानही मिळते. मुले वाढतात, जबाबदार सामाजिक व्यवहारात सहभागी होतात, सभ्यतेच्या संकेतांची अनिवार्यता त्यांच्या गळी उतरते आणि हा ‘विद्रोह’ शमतो. पण काही माणसे जन्मभर पौगंडावस्थेच्या मानसिकेतून बाहेर येत नाहीत.
सभ्यपणे बोलण्याचे-वागण्याचे जे संकेत समाजात रुढ असतात, तो ढोंगाचा प्रकार नसतो. आपण इतरांशी सभ्यपणे वागतो तेव्हा तुमच्या प्रतिष्ठेची कदर मी करतो, तुमच्याशी सामंजस्याने, सुसंवादाने वागावे अशी माझी इच्छा आहे, असा संदेश आपण त्यांना देत असतो. दोन माणसे परस्परांशी सभ्यतेने वागत असली तर त्यांच्यात मतभेद होऊ शकेल, वाद होईल, पण भांडण होणार नाही. भांडताना जाणूनबुजून अपशब्द वापरण्यात येतात. हे शब्द वर्णनपर म्हणून घेतले तर बहुतेकदा ते अयथार्थ ठरतील. पण वर्णन करणे हा त्यांच्या वापरामागील उद्देशच नसतो. आपण भांडणाच्या पवित्र्यात आहोत, भांडायला सज्ज आहोत, हे जाहिर करणे एवढाच त्याचा हेतू असतो. सभ्यपणाचे संकेत पाळण्यात जी समंजस, संवादी वृत्ती व्यक्त होत असते; ती केवळ लोकशाहीलाच नव्हे ते सामाजिक एकतेला, समाज हा समाज म्हणून एकत्र रहायला आधारभूत असते. माणसाच्या शारिरीक बाजूचा शारिरीक प्रक्रियांचा निर्देश करण्याविषयीचे जे भाषिक संकेत असतात, त्यांनाही काही अर्थ आहे. त्यातून माणसाच्या खाजगीपणाविषयी कदर व्यक्त होते. माणूस म्हणजे केवळ शारिरीक प्रक्रियांची व्यवस्था नव्हे, त्याच्यापलिकडे जाणारे मानसिक जीवन जगणारी व्यक्ती आहे, आणि त्याच्यात तिची त्याची प्रतिष्ठा आहे. हा भावही त्यात अभिप्रेत आहे. त्यामुळे शिव्या या बहुतेकदा शारिरीक प्रक्रियांच्य वर्णनावर आधारलेल्या असतात. एखाद्याला शिवी देऊन त्याला केवळ एक पशू या पातळीवर आपण आणतो; त्याचे मानवी व्यक्तीमत्व हिरावून घेत असतो. ठाकरे हे कितीही प्रांजळ, सडेतोड, रोखठोक, इ. असले तरी आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला ‘तुला मुतायचे असेल तर पलिकडे सोय आहे’ असे म्हणणार नाहीत. इतकी खात्री आपण बाळगू शकतो.
समाजात जेव्हा एखादा वरीष्ठवर्ग, अभिजनवर्ग असतो, तेव्हा त्याचे सदस्य एकमेकांशी वागताना अतिरेकी सभ्यतेचे संकेत पाळताना आढळतात. याची उलट बाजू अशी की, या वर्तुळाच्या बाहेरच्या व्यक्तीशी, कनिष्ठ व्यक्तीशी वागताना ते जाणूनबुजून असभ्य रितीने वागतात. सामाजिक समतेच्या दिशेने वाटचाल करताना, या कृत्रीम सभ्यतेवर अणि कृत्रीम असभ्यतेवर आघात करावेच लागतात. अधिकाधिक व्यक्तींना सभ्यतेच्या परिघात आणावे लागते आणि कृत्रीम सभ्यपणा अधिक सुटसुटीत करावा लागतो. या प्रक्रियेत एकेकाळी असभ्य मानल्या गेलेल्या वागण्याच्या रिती सभ्य म्हणून स्विकारल्या जातात. पण याचा अर्थ असा नव्हे की, सभ्यतेचा दंडकच झुगारून देण्यात आलेला असतो. समाजातील व्यक्ती एकमेकांची कदर करीत सामंजस्याने, सुसंवादाने एकत्र रहायची असली तर समाजात सभ्यतेचे दंडक असावेच लागतील. समाजात असे दंडक आहेत याचा अर्थच असा की, समाजातील बहुसंख्य माणसे बहुसंख्य प्रसंगी ते दंडक पाळतात. शिवाय त्याचा अर्थ असा की, जबाबदारीने वागणारा माणूस हे दंडक सर्व प्रसंगी पाळण्याचा सतत प्रयत्न करीत असतो.
आपल्या विरोधकांशी वागताना ठाकरे या दंडकांचा जाणूनबुजून भंग करतात. यातून ते आपल्या अनुयायांना असे सांगतात की, आपले विरोधक, म्हणजे जे आपल्या मतांवर धोरणांवर कार्यपध्दतीवर टिका करतात, भिन्न मते मांडतात, ते सारे आपले शत्रू आहेत. त्यांना नेस्तनाबुत केले पाहिजे. निदान हतवीर्य केले पाहिजे. आणि हे करणे कठीण नाही. या लोकात दम नाही. मोठ्या संख्येने तरूणात ही वृत्ती फ़ैलावणे सामाजिक स्वास्थ्याला तर घातक आहेच, पण ते विशेष करून लोकशाहीला घातक आहे. कारण यातून केवळ गुंडगिरी फ़ैलावते, एवढेच नव्हेतर तिला राजकीय प्रामाण्य आणि प्रतिष्ठा लाभेल. आजच ही गोष्ट लक्षणिय प्रमाणात घडून आलेली आहे. ती लोकशाहीला घातक आहे ते स्पष्ट आहे, कारण लोकशाही सामंजस्य आणि संवाद ह्यांच्यावर आधारलेली असते. विधीमंडळात ज्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींचे बहूमत असेल त्याच्यावर सरकार बनवण्याची आणि कारभार करण्याची जबाबदारी सोपवण्यात यावी हा लोकशहीचा केवळ एक व्यावहारिक संकेत आहे. ते लोकशाहीचे सार नव्हे. प्रत्येक व्यक्तीला सारासार विचार करून स्वत:चे मत बनवण्याशी शक्ती असते, असे मत बनवण्याचा तिला अधिकार असतो. आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य तिला असले पाहिजे. मतदार म्हणून राजकीय प्रक्रियेत तिला इतर प्रत्येका बरोबर समान स्थान असले पाहिजे. व्यक्ती म्हणून तिला असलेल्या स्वातंत्र्याचा आणि इतरांशी समानतेने वागवले जाण्याच्या तिच्या हक्काचा योग्य कारणाशिवाय संकोच करणारा कायदा किंवा कृत्य अन्याय व अप्रमाण असते. इत्यादी तत्व आणि मूल्ये लोकशाहीला प्राणभूत असतात. त्या मूल्यांनी आणि तत्वांनी भारतीय राज्यघटनेला तिचा आशय दिला आहे. आणि सरकारचा कारभार राज्यघटनेने घालून दिलेल्या मर्यादेत चालतो किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार आणि जबाबदारी तिनेच स्वतंत्र अशा न्यायसंस्थेवर सोपवली आहे.
हे सर्व तत्वज्ञान ठाकरे यांना नक्कीच माहिती असणार. पण त्यांची राजकीय शैली या तत्वज्ञानाला विरोधी आहे. त्यांची भूमिका अशी दिसते की शिवसेनेला (आणि भाजपाला मिळून) बहूमत मिळाले आहे. आपण शिवसेनेचे सर्वश्रेष्ठ आणि एकमेव नेते आहोत. तेव्हा लोकशाहीच्या तत्वाप्रमाणे आपल्या हाती सत्ता आलेली आहे. प्रत्यक्षात लोकशाहीच्या संकेतांना आणि घटनेला अनुसरून युतीचे सरकार स्थापन झाले आहे आणि एकंदरीत ते घटनेप्रमाणे चाललेही आहे. पण सत्ता आपल्या हाती आहे आणि आपण नेमलेले आपल्या आदेशानुसार चाललेले हे सरकार आहे असा ठाकरे यांचा सार्वजनिक पवित्रा असतो. रिमोट कंट्रोलचा ते अनेकदा ते अनेकदा जो निर्देश करतात त्यात हेच अभिप्रेत असते. लोकांच्याच पाठींब्यावर विधायक आणि लोककल्याणकारी हुकूमशाही प्रस्थापित करावी आणि त्यातून लोकांचे हित साधावे, हे उद्दीष्ट त्यांनी आपल्या अनुयायांपुढे ठेवलेले दिसते. काही प्रमाणात ते साध्य झाले आहे असे या अनुयायांना वाटावे अशी परिस्थिती आहे. पण कितीही चांगल्या उद्दीष्टाने स्थापन झालेली हुकूमशाही विधायक आणि कल्याणकारी रहात नाही आणि ती स्थापन करण्याचे मार्ग विधायक असू शकत नाहीत, हा इतिहासाचा दाखला आहे. अनेक शिवसैनिक ध्येयवादाने प्रेरीत झाले आहेत यात शंका नाही. त्यांनी अंतर्मुख होऊन आपण कोणत्या मार्गाने कोठे चाललो आहोत याचा विचार करावा.
ठाकरे यांच्या बाजूने काही म्हणता येईल. त्यांची शैली ओबडधोबड, रांगडी आहे यात शंका नाही. सार्वजनिक जीवनात सभ्यतेची मर्यादा संभाळली जावी असा ज्यांचा आग्रह असतो, त्यांना ती निश्चीत खुपेल. पण इतर प्रतिष्ठीत राजकीय नेत्यांविषयी जे म्हणता येणार नाही ते ठाकरे यांच्याविषयी किंवा ते दुरून नियंत्रित करीत असलेल्या युती राजवटीविषयी किती म्हणता येईल? युती राजवट ही कॉग्रेसच्या अगोदरच्या राजवटीपेक्षा अधिक भ्रष्ट आहे असे म्हणायला काही आधार नाही. सरकारी अधिकार्यांचा भ्रष्टाचार आधी चालत होता आजही चालू आहे. मंत्र्यांच्या पातळीवर होणारा भ्रष्टाचार पुर्वीही होता आणि आजही असणार असा लोकांचा समज आहे. याबाबतीतले सबंध सत्य पुराव्यानिशी कधी बाहेर येणार नाही. आता न्यायालयानेच पुढाकार घेतल्यामुळे देशाचे पंतपधान हे पद भूषवलेल्या नेत्याने केलेले (कथीत) भ्रष्टाचार बाहेर येत आहेत. असे आरोप झाल्याने एखादा नेता सार्वजनिक जीवनातून उठून गेला असे होत नाही. असे आरोप करणे हा राजकीय डावपेचाचाच एक भाग आहे असे त्याच्याकडे पाहिले जाते. त्या परिस्थितीत ठाकरे किंवा त्यांचे कुटुंबिय यांनी गैर मार्गाने संपत्ती गोळा केली असे आरोप करण्यात आले तर त्याच्यात गांभिर्य रहात नाही. ठाकरे हे एक घटनाबाह्य सत्ताकेंद्र झाले आहे असा आरोप करण्यात येतो. पण मग संजय गांधींचे काय? पण ठाकरे यांच्यावर रास्तपणे टिका करणारे संपादक इंदिरा गांधींच्या कर्तबगारीची जोरदारपणे भलावण करताना आढळतात. ठाकरे लोकशाहीच्या मार्गाने ठोकशाही आणू पहातात असा आरोप आहे. पण संसदीय राजकारणात भाग घेणार्या मार्क्सवादी पक्षाचे ते अधिकृत तत्वज्ञान आहे. श्रमजिवीवर्गाची हुकूमशाही स्थापन करून क्रांती घडवून आणण्याचे उद्दीष्ट आणि ते साधण्यासाठी श्रमजिवीवर्गावर कम्युनिस्ट पक्षाची एकाधिकारशाही ही कार्यपद्धती त्यांनी सोडून दिली आहे काय? तसेच लोकशाहीवादी म्हणवणार्या (आणि असणार्या) समाजवाद्यांचे काय? त्यांना ठाकरे यांची शैली आणि कार्यपद्धती पसंत नाही. लल्लूप्रसाद यांची आहे काय? लल्लूप्रसाद यांच्यावर सी.बी.आयने भ्रष्टाचाराचे आरोप ठेवल्यावर आपले निरपराधीत्व सिद्ध करण्यासाठी त्यांनी जनता रस्त्यावर आणली. शिवाय शिक्षा झाली तरी आपण मुख्यमंत्री म्हणून कारभार पहात राहू असे जनतेला आश्वासन दिले. हे सर्व ‘जनते’च्या म्हणजे मागास जातींच्या नावाने होत असल्यामुळे समाजवाद्यांना ते खपवून घ्यावे लागते. पण त्यामुळे ठाकरे किंवा शिवसेना यांच्यावर टिका करण्याचा नैतिक अधिकार ते गमावून बसतात. त्यांची टिका पक्षीय राजकारणाचे एक साधन बनते. लोकांना हे सर्व दिसत असल्यामुळे कितीही आवेशाने धारदार शब्दात केलेली टिका बोथट बनते. तिच्यामुळे लोकशिक्षणाचे कार्य साधत नाही.
सुदैवाने आपण राज्यघटनेचा भंग केला तर राजकीय पक्ष म्हणून आपले प्रामाण्यच संपुष्टात येईल आपण केवळ गुंड म्हणून उरू हे जाणण्याइतके व्यवहारिक शहाणपण सर्व पक्षांनी दाखवले आहे. राज्यघटना शाबुत आहे तोपर्यंत लोकशिक्षण करून लोकशाही सकस करायला वाव आहे.
(‘नवभारत’ जाने-फ़ेब्रु १९९७. पुनर्मुद्रण ‘आपलं महानगर’, २२ मार्च १९९७ आणि ‘महाराष्ट्र टाईम्स’ २३ मार्च १९९७)
===================================================
प्रसिद्ध विचारवंत प्रा. मे. पुं रेगे यांचा अठरा वर्षे जुना पण खुपच उदबोधक असा लेख. मुद्दाम टाईप करून इथे टाकला आहे. त्या निमीत्ताने अनेक प्रचलीत घडामोडींचा उहापोह करता येऊ शकेल. म्हणून मित्रांनी तो काळजीपुर्वक वाचावा ही विनंती.
H
ReplyDelete