Wednesday, December 10, 2014

भाजपाच मोदीमंत्र विसरतोय



आठदहा महिन्यापुर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली २७२+ ही प्रचारमोहीम सुरू केली, तेव्हा त्यांनी एक महामंत्रच आपल्या भाषणातून अवघ्या भारतीयांना देण्याचा सपाटा लावला होता. त्यांच्या शब्दांचा भारतीयांवर चांगलाच प्रभाव पडला. तसे नसते तर भाजपाला इतका मोठा पल्ला गाठून स्वबळावर लोकसभेत बहूमताचे गणित सोडवणे शक्य झाले नसते. पण सामान्य भारतीयाला जो महामंत्र उमगला, तो खुद्द भाजपाच्या कार्यकर्ते नेते व अनुयायांना कितीसा कळला आहे; त्याची दाट शंका येते. निदान आज अतिउत्साहात मस्तवाल भाषा बोलणार्‍या भाजपाच्या अनेक अनुयायांना त्याचा मागमूस कळलेला नसावा, एवढे नक्की. काय म्हणाले होते मोदी तेव्हा? सामान्य गरजू किंवा उतावळा शेतकरी झटपट येणारे पिक घेतो. तेव्हा तो येऊ घातलेल्या दोनतीन महिन्याचाच विचार करत असतो. तर त्याच्यापेक्षा दुरगामी विचार करणारा शेतकरी सातआठ महिन्यात वा वर्षभरात हाताशी येणार्‍या नगदी पिकाकडे वळतो. त्याला चांगली सुबत्ता वाट्याला येत असते. पण जो शेतकरी भविष्याचा विचार करून शेती करतो, तोच फ़ळबगायती करतो. जी पुढल्या दोन पिढ्यांची बेगमी असते. मोदींचे ते शब्द सामान्य भारतीयाला भावले होते. म्हणूनच त्याने ताबडतोब अनुदान देऊन श्रीमंतीचे स्वप्न दाखवणार्‍या अनेक पक्षांकडे पाठ फ़िरवून दिर्घकालीन राष्ट्रीय भवितव्याचा विचार करू शकणारा नेता म्हणून भाजपाला वा मोदींना मत देण्याचा कौल दिला होता. पण ज्याप्रकारे लोकसभा निकालानंतरचा भाजपा वागत आहे, तो दिर्घकालीन व पुढल्या पिढीतल्या आपल्याच कार्यकर्त्यांच्या बेगमीचा विचार आहे काय? की आजच काय ते फ़ळ व पीक हवा असलेला उतावळा कार्यकर्ता आहे? लोकसभेनंतर ज्याप्रकारचा सत्तेचा हव्यास भाजपा नेत्यांनी दाखवला आहे आणि त्यासाठी जी पावले उचलली आहेत, ती दुरगामी भविष्याचा पाया घालणारी आहेत काय?

इतक्या वर्षानंतर भाजपाला देशव्यापी लोकप्रिय चेहरा मिळाला. त्याचा लाभ उठवण्याच्या नादात भाजपाने शत प्रतिशत सत्ता मिळवण्याचा आटापिटा सुरू केला आहे. त्याचा आरंभीचा लाभ त्याला लगेच झालेल्या महाराष्ट्र व हरयाणा या राज्यात मिळालेलाही दिसतो आहे. पण हे यश मिळवण्यासाठी भाजपाने तिथे आपली संघटना वा पक्षाचा विस्तार मशागतीने केला आहे काय? मध्यप्रदेश, गुजरात किंवा राजस्थानातील भाजपाचे यश दुरगामी धोरणात्मक राजकारणाला आलेले फ़ळ आहे. अनेक पिढ्या राबलेल्या कार्यकर्त्यांच्या मशागतीतून तिथे पक्षाची पाळेमुळे इतकी रुजली आहेत, त्याचाच लाभ तिथे भाजपाला मिळाला. पण महाराष्ट्र व हरयाणामध्ये भाजपाने मोठ्या प्रमाणात अन्य पक्षातले कार्यकर्ते नेते आयात करून झटपट यश मिळवले आहे. मात्र तीच आपली शक्ती वा विस्तारलेली शक्ती आहे, अशा भ्रमात भाजपावाले आज सर्वत्र गुरगुरताना दिसतात. त्यांचे असे यश त्यांना सुखावणारे जरूर आहे. पण मग असे यश गेल्या तीनचार दशकात कॉग्रेसने अनेकदा मिळवलेले होते. जनता पक्ष वा जनता दलाचा प्रयोग यापेक्षा वेगळा नव्हता. तिथेही अनेक लहानमोठे पक्ष एकत्र येऊन एका पक्षाची मोट बांधलेली होती आणि त्यात आपोआप अनेक स्वयंभू नेतेही सहभागी झालेले होते. त्याच्या परिणामी १९७७ किंवा १९८९ अशा सार्वत्रिक निवडणूकीत जनता प्रयोगाला खुप मोठे लक्षणिय यश मिळवणे शक्य झालेले होते. आजच्या भाजपाचा प्रयोग तितका घाईगर्दीचा म्हणता येणार नाही. पण कॉग्रेसविरोधी लाटेची चाहुल लागलेले अनेक गट व नेते भाजपाच्या जवळ येत गेले वा भाजपात सहभागी होत गेले. त्याचा एकत्रित लाभ त्या पक्षाला मिळालेला आहे. पण तेच राजकारण खरेच पाचसात निवडणूका फ़ळ देऊ शकेल, इतके सुदृढ आहे काय? मोदींच्या महामंत्रानुसार निघालेले हे पिक आहे काय?

घाऊक प्रमाणात कॉग्रेस राष्ट्रवादी वा अन्य पक्षातून भाजपात आलेल्या संधूसाधू नेत्यांच्या व्यक्तीगत शक्तीचा लाभ या निवडणूकीत मिळवताना भाजपाने महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा पल्ला गाठला. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकणार नाही. पण ते उद्दीष्ट गाठताना त्याने अनेक मित्रपक्ष गमावले आहेत. खरोखरच सत्तासंपादनासाठी इतकी घाई व उतावळेपणा करताना दिर्घकालीन राजकारणाचा पाया त्या पक्षाने घातला काय? आपल्या लोकप्रियतेचा लाभ उठवताना इंदिरा गांधींनी १९७० नंतरच्या काळात कुठल्याही पक्षातल्या नेत्यांना, उमेदवारांना सोबत घेताना कसला विधीनिषेध बाळगला नव्हता. त्यामुळे त्यांना झटपट आपली राष्ट्रीय प्रतिमा उभी करून प्रत्येक राज्यातही इंदिरानिष्ठांची सत्ता प्रस्थापित करण्याचा मार्ग सुकर झाला होता. पण असे झटपट यश कितीकाळ टिकले होते? अवघ्या तीनचार वर्षात इंदिराजींची प्रतिमा ढासळत गेली आणि १९७५ सालात त्यांना आपल्यावर प्रेम करणार्‍या जनतेलाच लोकशाहीपासुन वंचित करण्याची वेळ आली. तिचे पर्यवसान पुढल्या काळात त्याच इंदिराजींच्या भरवश्यावर निवडणूका जिंकणार्‍या पक्षाला दारूण पराभवाचे तोंड बघण्याची वेळ आली. त्याचे प्रमुख कारण मशागतीने पक्षाची संघटना उभी करण्यापेक्षा येईल त्याला पक्षात पवित्र करून घेण्याची घाई इतकेच होते. काही महिन्यात मिळणारे व भरघोस पैसा देणारे पीक काढण्याची मानसिकताच इंदिरा लाटेला संपवून गेली होती. त्याच अनुभवातून मग राजीव गांधी गेले. अगदी त्याच अनुभवातून जनता पक्ष वा जनता दलाचीही सुटका झाली नाही. आजचा भाजपा त्यापेक्षा किंचितही वेगळा वागणार नसेल, तर त्याचे भवितव्य तरी त्यापेक्षा वेगळे कसे असू शकेल? ज्या महामंत्रावर मोदींनी नव्या भाजपाच्या यशाची पायाभरणी केलेली होती, तिचा त्याच पक्षाला व नेतृत्वाला विसर पडला असेल, तर परिणाम भिन्न कसे असतील?

कोणीही कुणाकडून आता शुद्धतेची वा पावित्र्याची अपेक्षा करत नाही. कारण बाजारीकरणाने शुद्धतेची महत्ता संपवली आहे. म्हणूनच समाजकार्य वा राजकारणात शुद्धता असेल, अशी अपेक्षा करता येणार नाही. पण निव्वळ भेसळच मिळेल असाही हटट कोणी करू नये. भेसळ किती व कुठवर करावी, याच्याही मर्यादा असतात. जिथे मूळ वस्तू वा पदार्थ शिल्लकच उरणार नाही, तिथे त्याचे बाजारमूल्य आपोआप संपत असते. थोडक्यात दूधात पाणी घातलेले लोक नाकारत नाहीत. पण निदान दूध हे दूधच दिसावे, इतकी अपेक्षा बाळगतात. पाण्यात दूध घालण्याइतकी भेसळ होते, तेव्हा लोक त्याकडे पाठ फ़िरवू लागतात. अशी भेसळ कितीकाळ मग चालणार? महाराष्ट्रातल्या युतीचा विचका झाल्यानंतर हा प्रश्न भाजपासाठी अधिक गंभीर झाला आहे. कारण आता सत्तेच्या हव्यासाने धावत सुटलेल्या नेत्यांना थोडेफ़ार यश मिळाले असताना आणि अपेक्षित हेतू साधला गेला असल्याने, पक्ष संघटना दुय्यम झाली आहे. परिणामी भाजपाची वाटचाल इंदिराजींच्या कॉग्रेसचे अनुकरण करताना दिसते आहे. आणि पंतप्रधानांच्या व्याख्येत सांगायचे, तर आजचा भाजपा काही महिन्यात भरघोस पीक देणार्‍या शेतकर्‍यासारखा लोभी झाला आहे. त्याला दिर्घकालीन राजकीय पायावर ठामपणे उभे रहाण्याची गरजही वाटेनाशी झाली आहे. गेल्या दोन महिन्यातले भाजपाचे राजकारण त्याचीच साक्ष देणारे आहे. त्यातून मग या पक्षाने आपल्याच विरोधातील संयुक्त प्रयासांना चालना दिलेली आहे. आज यशाच्या मस्तीत अशा प्रयत्नाची खिल्ली उडवणे सोपे असले, तरी त्याचे परिणाम थांबत नसतात. जनता दलाचे तुकडे एकत्र यायची महत्ता इतक्यात कळणारी नसते. पण ज्यांना लोकसभा जिंकून देणारा आपलाच महामंत्र आठवत नाही, त्यांना इतक्या दूरच्या परिणामांवर काही सूचावे, अशीही अपेक्षा कोणी बाळगू शकणार नाही.

2 comments: