Monday, December 8, 2014

अफ़जलखानाच्या फ़ौजेत मावळे?



सध्या शिवसेनेचे मावळे अफ़जलखानाच्या फ़ौजेत दाखल झाल्याची भाषा सातत्याने ऐकू येत आहे. कुरापती करण्यासाठी अशी भाषा व शब्द उपयुक्त असतात. पण खरेच त्या शब्दांचा अर्थ व संदर्भ किती लोकांना माहिती असतो? अर्थात शिवसेनेला व तिच्या अस्वस्थ कार्यकर्त्यांना खिजवण्य़ासाठी त्याचा खुप उपयोग होत असतो. पण जे लोक असे शब्द वापरतात, त्यांना असे शब्द किती व कसे उलटू शकतात, त्याचे भान नसावे का? अन्यथा इतक्या सरसकट त्या शब्दांचा वापर होऊ शकला नसता. उदाहरणार्थ अफ़जलखानाशी तह, अशी एक मल्लीनाथी करण्यात आली. त्या घटनेला ऐतिहासिक संदर्भ आहे. त्याचे भान कोणाला आहे काय? आजही अफ़जलखानाचा उल्लेख होतो, तेव्हा कमालीचा तणाव निर्माण होतो. पाच वर्षापुर्वी मिरज सांगली येथे ऐन गणेशोत्सवात दंगल उसळली होती. तिचे कारण काय होते? गणेश विसर्जन मिरवणूकीच्या स्वागतासाठी उभारलेल्या एका कमानीवर अफ़जलखान व शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटलेले होते. त्यात ही दोन ऐतिहासिक व्यक्तीमत्वे परस्परांना भेटतानाचे रेखाटन होते ना? ते दृष्य दोघांमधल्या तहाचेच चित्रण होते ना? त्यावरून दंगलीपर्यंतचे रणकंदन माजण्याची काय गरज होती? त्या इतिहासाचा जो संदर्भ आहे, त्यातून ही दंगल उसळली. तोही अफ़जलखानाशी शिवरायांनी केलेला तहच होता. पण पुढला इतिहास तहाच्या परिणामांचा आहे. तो तह शरणागतीचेच चित्र दाखवणारा होता. पण प्रत्यक्षात इतिहास शरणागतीचा नसल्याचाच दाखला देतो. मुद्दा इतकाच, की जर शिवाजी महाराज तहाचा पवित्रा न घेताच लढत राहिले असते, तर पुढला इतिहास आज आपण वा़चतो वा ऐकतो तसाच घडला असता काय? तह झालाच नसता आणि गळाभेट करायची स्थितीच आली नसती, तर इतिहास वेगळा घडला नसता काय? पुढे घडला तो इतिहास होता तरी काय?

मिरजेत जे चित्र लावले होते, तो तहाचा प्रसंग होता. पण तहाच्या गळाभेटीचे जे परिणाम झाले, त्याच्याशी निगडीत होता. त्या परिणामांचा अभिमान शिवप्रेमी मानतात, मग त्याच परिणामाला कारणीभूत असलेल्या अफ़जलखानाशी झालेल्या तहाला शरमेची गोष्ट म्हणून चालेल काय? कारण तहाची बोलणीच झाली नसती, तर गळाभेट झाली नसती. मग ज्याचा अभिमान बाळगावा, असा इतिहास तरी मराठ्यांच्या वाट्याला आला असता काय? इतिहास तुम्ही कुठला व कितीसा बघता त्यावर त्याचे परिणाम उलगडत असतात. शिवरायांनी अफ़जलखानाच्या अफ़ाट शक्ती व सैन्यबळापुढे शरणागत होऊन तहाचा पवित्रा घेतला नसता, तर लढाईतून यशाची कुठलीही हमी नव्हती. पण तहाच्या रुपाने जो सापळा लावला, त्यातच अफ़जलखान फ़सला होता ना? तह हाच शह नव्हता काय? अर्थात ज्यांना तहाचा पवित्राच बघून पुढला इतिहासच जाणुन घ्यायचा नसेल, त्यांनी अफ़जलखान जिंकला म्हणून आनंदोत्सव करायला कोणाची हरकत आहे? तसा आनंदोत्सव तेव्हा करणार्‍यांना आज त्या तहाची नुसती आठवणही अस्वस्थ करून सोडते. चित्रातही त्या तहाचा प्रसंग पाहून त्या आनंदोत्सव करणार्‍यांचे आजचे वंशजही खवळून उठतात. किती मजेशीर इतिहास असतो ना? नुसत्या तहाची स्विकृती झाली, इतका इतिहास एका बाजूसाठी आनंदोत्सवाची पर्वणी होती. पण तहाचा परिणाम त्यांच्या कित्येक पिढ्यांना रडवेला करणारा आहे. तेव्हाचे जे कोणी शिवरायांचे सहकारी असतील, त्यांनी आपल्या सेनापती राजाच्या तहबाजीला हिणवले असते आणि त्याच्यावरला विश्वास उडाला असता, तरीही पुढल्या इतिहासाचे ते साक्षिदार होऊ शकले नसते. तह करायचा म्हणून शिवरायांना आपल्या उंच किल्ल्यावरून पायथ्याशी यावेच लागले होते. कारण त्यांना अफ़जल खानाला संपवायचा होता. आपल्या मागण्या व आग्रह सोडणे हा गनिमीकावा असू शकतो, याची ती अपुर्व साक्ष आहे.

दुर्दैव असे की शिवराय व त्यांनी घडवलेल्या इतिहासाचे प्रेमी त्यातल्या नेमक्या अशा बारकाव्यांना विसरून जातात. समर्थक असोत की विरोधक, इतिहास काय शिकवतो, त्याचा धडा घ्यायला तयारच नसतात. तह म्हणजे शह नसतो आणि तहाला शह ठरवणे हा केविलवाणा युक्तीवाद असतो, असे सांगणारे थोडेथोडके नाहीत. कारण त्यांना अफ़जलखानाशी झालेल्या तहाचा पुढला भाग ऐकायचा नसतो किंवा त्याविषयी अज्ञान असते. असा येऊन गळाभेट घे मग तुझा कोथळाच बाहेर काढतो, असा निरोप शिवराय देऊ शकत होते काय? जे करायचे होते त्यासाठी गळाभेटीची गरज होती आणि ती शक्य होती केवळ तहाच्याच नाटकाने. जगाने त्याकडे शरणागती म्हणून बघितले तरी व्हायचे ते चुकले नाही. तहाचा पवित्रा घेतला म्हणूनच शिवराय अफ़जलखानाचा कोथळा बाहेर काढू शकले होते. तहाला हसणार्‍यांना त्याचा अर्थ तेव्हा लागला नव्हता आणि आजही लागलेला नाही. म्हणूनच इतक्या उत्साहात अनेकजण शिवसेनेची व उद्धव ठाकरे यांची हेटाळणी करीत अफ़जल्याच्या फ़ौजेत मावळे अशी टिंगल करीत खुश असतात. कोथळा काढला जाईपर्यंत अफ़जलखान तरी कुठे शांत बसला होता? आपणच बाजी मारली म्हणून अफ़जलखान खुशच होता ना? त्याने खुश व बेसावध रहाण्यातच खरी गंमत असते. शिवाजी हरला असे भासवण्यातच खरा पेच असतो. पण अनेकांना तो उमजायला शतके खर्चावी लागतात. त्यापासून शिकणे तर दूरची गोष्ट झाली. म्हणूनच सध्याच्या राजकारणात जे सेनेला खिजवण्यात गर्क आहेत, त्यांच्या सुखात मीठाचा खडा टाकण्यात अर्थ नाही. त्यांनी आनंदात मशगुल रहाण्यातच सेनेचे यश असेल, तर नसती हुज्जत शिवसैनिकांनी तरी कशाला करावी? जिंकलेल्या अफ़जलखानाचे स्वत:ला चहाते समर्थक समजणार्‍यांना सेनेच्या समर्थकांनी आणखी प्रोत्साहन देण्यातच शहाणपणा नाही काय?

इथे इतिहासाचा एक नेमका क्षण लक्षात घेणे अगत्याचे आहे. जोपर्यंत अफ़जलखानाचा कोथळा काढला गेला नव्हता, तोपर्यंत कोणी त्याची वाच्यता केली नव्हती. म्हणून खान विजयाच्या मस्तीत होता. खानाचे सहकारी जिंकल्याचा उन्मादात होते. कुणा मावळ्याने वा खुद्द शिवरायांनी त्यांना हिणवले होते काय? त्यांच्यापुढे आपणच हरलो असा देखावा यशस्वीपणे रेखाटला नव्हता काय? म्हणून तो खरेच पराभव होता काय? इतिहासाची इतकी छाननी वर्तमानात आवश्यक नाही. कारण आजची सेना म्हणजे शिवराय नव्हेत, की भाजपा हा अफ़जलखान नव्हे. पण ज्यांना त्याच इतिहासाचे दाखले देऊन सेनेची खिल्ली उडवण्याची सुरसुरी आलेली आहे, त्यांनी आपल्या इतिहासची जाण विचारात घ्यावी, म्हणून इतके सविस्तर विश्लेषण करावे लागले. मुद्दा इतकाच, की अफ़जलखानाच्या फ़ौजेत मावळे दाखल म्हणून खिल्ली उडवली जाते त्यावर जे अस्वस्थ होतात, त्यांनीच मुळात भाजपाला अफ़जलखान संबोधलेले आहे. तर निदान तो इतिहास शिवसैनिक म्हणवून घेणार्‍यांनी तरी जाणून घ्यावा ना? नुसती ऐतिहासिक भाषा व पल्लेदार शब्द बोलल्याने इतिहास घडत नसतो. ते शब्द परिणामकारक असावे लागतात आणि त्या शब्दांची जाणही असावी लागते. आज सेना भाजपामध्ये जे शाब्दिक युद्ध झुंजले जात आहे, त्यातल्या शब्दांचे भान दोन्ही बाजूंना पुरेसे दिसत नाही. म्हणून आधी एकाने अफ़जलखानाचा दोषारोप केला आणि आता दुसरा तितक्याच खुळेपणाने त्याच संज्ञा पुढे घेऊन अतिशहाणपणाचे प्रदर्शन करतो आहे. वास्तवात कुणालाही अफ़जलखानाचा इतिहास उमगला असे वाटत नाही. फ़ुशारक्या मारणार्‍यांचे काही जात नसते. कोथळा काढला जातो त्याच्या वेदना त्यालाच ठाऊक. आणि त्या यातना पिढ्यानुपिढ्यांच्या असतात. मिरजची दंगल त्यापेक्षा अन्य कसली साक्ष आहे?



5 comments:

  1. सुशिल बसवंतेDecember 9, 2014 at 4:26 AM

    एकदम बरोबर आहे सर....

    ReplyDelete
  2. भाऊ, शिवसैनिकांसाठी खास शिकवण!

    ReplyDelete
  3. एकदा सैनिकांनी आणि नमो भक्तांनी आपला ब्लॉग वाचला तर त्यांच्या वाद घालण्याच्या पद्धतीत नक्कीच फरक पडेल.
    -मिताली

    ReplyDelete