उत्तर प्रदेशात चौथ्या क्रमांकावर फ़ेकल्या गेलेल्या भाजपाला थेट पहिल्या क्रमांकावर आणून लोकसभेत त्या पक्षाला प्रथमच स्वबळावर बहूमताची मजल मारायला हातभार लावणारे अमित शहा; आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या बातम्या आहेत. त्याच्याही आधी, म्हणजे नव्या मोदी सरकारचा शपथविधी होण्यापुर्वीच त्यांना पुढल्या विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी महाराष्ट्रात पाठवावे, अशी मागणीही झाल्याचे आठवते. थोडक्यात अमित शहा यांच्यापाशी कुठलीही मते फ़िरवण्याची क्षमता असल्याचा एक समज भाजपाच नव्हेतर एकूणच राजकीय अभ्यासकात निर्माण झालेला दिसतो. अन्यथा आता विधानसभेच्या आगामी निवडणूकीत भाजपा ‘शत प्रतिशत लढणार’ असल्याच्या बातम्या मराठी माध्यमात आल्या नसत्या. अर्थात अशी स्थिती वा अशा बातम्या केवळ महायुतीच्याच गोटातून येत नाहीत. याच लोकसभा निवडणूकीत सडकून मार खाल्लेल्या सत्ताधारी आघाडीतही धुसफ़ुस असल्याच्या बातम्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलून मतदानापुर्वी आघाडीला पोषक ठरेल, असे नेतृत्व पुढे आणायचा आग्रह कॉग्रेस पक्षात होताच. पण त्यासाठी मित्रपक्ष राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनीही जोर लावला होता. पण त्याचा उपयोग झाला नाही. सोनियांनी पवारांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची उमेदवारी टाकून, त्यांचे मनसुबे खच्ची केले. दुसरीकडे मार खाल्लेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली उमेदवारी घोषित केली आहे. तर युतीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्येष्ठ सहकार्यांकडून आपली उमेदवारी घोषित करून बसले आहेत. थोडक्यात आता विधानसभेच्या निवडणूकीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार; हा कळीचा मुद्दा होत चालला आहे. त्यात भाजपाने दिल्लीत नरेंद्र मुंबईत देवेंद्र; अशी पुडी सोडून रंगत आणली आहे. पण एकूण रागरंग पहाता, चारही प्रमुख पक्ष स्वबळाची कसोटी लावण्याला उत्सुक दिसतात.
१९९९ नंतर मागल्या पंधरा वर्षात पवारांना स्वबळावर लढायची हिंमत झालेली नव्हती. यावेळी लोकसभेत कॉग्रेसला सर्वत्र दणका बसल्याने त्यांना नव्याने आपले प्रस्थ वाढवण्याची संधी दिसते आहे. गेल्या पंचवीस वर्षात शिवसेनेचा दुय्यम मित्र म्हणून धुसफ़ुसत राहिलेल्या भाजपालाही स्वतंत्र होण्याची ही सुवर्णसंधी वाटते आहे. कारण शिवसेनेत आता बाळासाहेबांसारखे उत्तुंग व्यक्तीमत्व नाही आणि यावेळची लोकसभा मोदींच्याच लोकप्रियतेवर जिंकता आली, हे सगळेच बोलतात. त्यामुळे आता भाजपाला सेनेची गरज नाही, असे वाटत असेल तर नवल नाही. त्यातच कॉग्रेस गळपटलेली आणि राष्ट्रवादी गोंधळलेली असल्याचा लाभ उठवून सेनेशिवाय मैदानात उडी घ्यायचा जुगार; भाजपाच्या डोक्यात असेल तर नवल नाही. मात्र अजून तितका अत्मविश्वास असलेला नेता भाजपाला राज्यात सापडलेला नाही. म्हणूनच त्या पक्षात घालमेल चालू आहे. स्वबळावर म्हणजे शिवसेना वगळून व इतर लहान युतीपक्षांना सोबत घेऊन जाण्याचा भाजपाचा बेत दिसतो. युतीमध्ये नेहमी विधानसभेच्या अधिक जागा सेनेच्या वाट्याला गेलेल्या आहेत. तेच याहीवेळी झाले, तर स्वबळावर बहूमताचा पल्ला अशक्यच आहे. त्यामुळे जागांची हिस्सेदारी वाढवून मिळावी, असा भाजपाचा प्रयास आहे. त्यासाठी हुज्जत केली, मग आपोआप उद्धव ठाकरे यांची उमेदवारी मागे पडते. शिवाय तिथेच अडवणूक केली आणि त्यातून सेनेने डोक्यात राख घालून घेतली, म्हणजे युती सेनेने तोडली म्हणायला मोकळीक रहाते. खरेच सेना भाजपा युती तुटली, तर काय स्थिती असेल? रिपाई, शेतकरी संघटना व जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष; यांना सोबत ठेवून भाजपा काय साधू शकतो? सेनेच्या वाट्याला जाणार्या निम्मे जागा इतर पक्षांशी वाटून घेताना अधिक उदारहस्ते वाटप होऊ शकेल. शिवाय शिवसेना बाजूला झाल्यास मनसे महायुतीत येऊ शकते. १८०-१९० जागा आपल्याला घेऊन भाजपा उरलेल्या शंभरच्या आसपास जागा मित्रांना देऊ शकतो ना?
लोकसभेत मार खाल्लेली मनसे ५० जागांवर समाधान मानू शकेल. त्या जागांपेक्षा युतीतून सेनेला डच्चू दिला गेला, म्हणूनच राज ठाकरे विजयाचा आनंद साजरा करू शकतील. बाकी छोट्या पक्षांना भाजपा दहा पंधरा जागांवर समाधानी करू शकतो. शिवाय आज तरी त्यांच्यापाशी लोकप्रिय पंतप्रधानाचा चेहरा उपलब्ध आहेच. म्हणजेच युती मोडण्यात भाजपाचा लाभ असला तरी बाळासाहेबांच्या मागे आधीच दुबळी झालेली शिवसेना अधिकच दुबळी एकाकी होऊन जाईल. त्याचा दोष अर्थातच भाजपावर टाकता येणार नाही. त्यासाठीच सेनेला डिवचण्य़ाचे व त्यातून युतीत सेनेने मोडता घालण्याचे डावपेच खेळले जात आहेत काय? निदान तशी शंका घेण्याला वाव आहे. अशी युती तुटली, तर भाजपाचेही नुकसान होणार नाही काय? तशा स्थितीत सत्ताधारी आघाडी कितपत टिकू शकेल? युती तुटल्यास त्याचा लाभ उठवण्यासाठी राष्ट्रवादी स्वबळावर मैदानात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. युपीए व कॉग्रेसमुळे राज्यात आपल्याला पराभव पत्करावा लागला, असा पवारांचा दावा आहे. पण युतीच्या एकत्रित ताकदीमुळे वेगळे होण्याची हिंमत त्यांच्यात नाही. युती तुटल्यास तेही वेगळे होण्याचे धाडस करू शकतील. थोडक्यात युती तुटली, तर प्रथमच राज्यात चौरंगी लढती होण्याची शक्यता दिसते. कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाप्रणित युती अशी ही चौरंगी लढत असू शकेल. म्हणजे स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेचे स्वप्न भाजपा बघतो आहे, त्याची अशी व्युहरचना असू शकते. अशा चौरंगी लढतीमध्ये भाजपाला नक्कीच सर्वांना मागे टाकून मोठे यश संपादन करणे शक्य आहे. त्यासाठी युती आपण तोडली नाही, तर सेनेच्या आडमुठेपणामुळे युती भंगली; असा देखावा मात्र निर्माण करावा लागेल. आजवरच्या घडामोडी बघता सेनेतले काही तोंडाळ नेते तरी त्यात फ़सताना दिसतात. असे सेना नेतेच युतीत दुफ़ळी माजवण्याचे कारण व्हावेत, असा भाजपाचा डाव असू शकेल.
मनसेच्या उमेदवारांनी सर्वत्र मार खाल्ला हे खरे असले, तरी राज ठाकरे यांनी आधीपासून मोदींचे समर्थन केलेले आहे. त्यामुळेच त्यांचा मतदार लोकसभेसाठी युतीकडे झुकलेला असला, तरी युती मोडल्यास तो माघारी मनसेकडे फ़िरू शकतो. त्याचप्रमाणे तेव्हा जसा नाराज मतदार मनसेकडे पाठ फ़िरवून युतीकडे झुकला होता, तसाच आता सेनेने युती मोडल्याच्या रागाने मतदार सेनेकडे पाठ फ़िरवू शकेल. थोडक्यात युती मोडल्याने मनसे युतीत आल्यास मनसेचा मोठा राजकीय लाभ होऊ शकेल. याचा अर्थ असा, की भाजपा दोन भावांमध्ये बेबनाव असल्याचा राजकीय लाभ उठवायच्या प्रयत्नात आहे. अशावेळी साहेबांच्या अनुपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी आधी सेनेत स्थिरस्थावर व्हायला प्राधान्य दिले पाहिजे आणि जुना फ़ॉर्म्युला कायम राहिल, यावरच लक्ष केंद्रीत करायला हवे. विधानसभेच्या अधिक जागा सेनेला आणि ज्याचे अधिक आमदार, त्याचा मुख्यमंत्री हाच तो फ़ॉर्म्युला आहे. त्याच्या पुढे जाऊन आधीपासून भाजपाने सेनेचा उमेदवार मुख्यमंत्री पदासाठी स्विकारण्याचा आग्रह घातक ठरू शकेल. जसा त्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे, तसाच राष्ट्रवादी पक्षही सेनेने वेगळे होण्यासाठी उत्सुक आहे. कारण त्यामुळेच त्याही पक्षाला आघाडीतून बाहेर पडण्य़ाचे बळ मिळणार आहे. युती फ़ुटल्याने दुर्बळ कॉग्रेसला राज्यात मागे टाकण्याचा राष्ट्रवादीचा मनसुबा आहे. मात्र अशा सर्वच गुंतागुंतीच्या राजकारणात एकमेव अपवाद आहे, तो नरेंद्र मोदी यांचा. लोकसभेतील त्यांच्या यशानंतर जी प्रतिमा उभी राहिली आहे, तिचा लाभ त्यांनी प्रचार केलेल्या पक्षाला, युती आघाडीला मिळणार आहे. तो उठवायचा की वाचाळ नेते व तोंडपूज्यांच्या नादाला लागून सेनेच्या लोकसभा यशालाला मातीमोल करायचे, हे उद्धव ठाकरे यांना येत्या काही दिवसात ठरवावे लागणार आहे. त्यावर पुढील मोठे राजकारण अवलंबून असेल.
भाऊ,
ReplyDeleteभाजप मधे आपापले पक्ष विलीन करून महाराष्ट्रातील सेना नामक राजकीय शक्तीने आपापसात भांडून व्यर्थ न दवडता राज्याला स्थैर्य व सुबत्ता मिळायला हातभार लावला तर ज्या एका विशिष्ट परिस्थितीत शिवसेना निर्माण झाली होती थी परिस्थिति आता न राहिल्याने व स्वतःचे असे कुठलेच ध्येय धोरण नसल्याने आगामी निवडणुकांच्या निमित्ताने गाशा गुंडाळला तर आब ही राहील व सत्तेच्या पोळीत तुकडा ही मिळेल. अन्यथा दोन्ही सेना पक्षांना आपले अस्तित्व टिकवणे जड जाणार नाही काय? आपले विचार वाचायला आवडतील...
मोदींना विरोध केल्याने नितीशकुमार संपले. ज्या क्षणी उध्ज मोदींचे ऐकत नाहीत असा संदेश लोकांपर्यंत जाईल तेव्हापासून सेना संपायला लागेल.
ReplyDeleteनितीशकुमार मुख्यमंत्री होते. ११४ आमदारांचे पाठबळ होते तरी त्यांची अशी अवस्था झाली त्यातून काहीतरी शिकले पाहिजे. बाळासाहेब असतानाची गोष्ट वेगळी होती.
आपण बाळासाहेब नाही यास्तव त्यांच्या बोलण्याचे व शैलीचे अनुकरण करून मोदींशी पंगा घेण्याचे टाळावे हेच त्यांच्या हिताचे ठरेल.
बाळासाहेबांच्या पश्चात सेनेने छोट्या भावाच्या भूमिकेत राहून भागिदारीत सत्ता मिळवणे व सत्ता मिळवल्यावर लोकांच्या लक्षात राहील अशी कामे करून आपली शक्ती वाढवत नेणे हा लांब पल्याचा पण भरवशाचा मार्ग आहे असे वाटते. उद्धवजींचे वय पाहाता हा लांबचा पल्लाच जास्त हिताचा ठरू शकतो.
मला माझे वरील विचार बदलायची वेळ आलिये खरी. उध्दवजी मुरलेल्या राजकीय भिडूप्रमाणे पावले उचलताना दिसताहेत.
ReplyDeleteआता असे वाटतेय कोणिही येवो पण त्यांच्याकडून या महाराष्ट्राचे भले होओ.
भाऊ तुम्हाला सलाम.
भाऊ, आपण जे लिहले आहे, ते तंतोतंत खरे ठरले आहे! एकच गोष्ट अजून होणे बाकी आहे, ती म्हणजे राज ठाकरे काय करतात हे. ते जर भाजप बरोबर गेले तर तुमचे १००% खरे होईल! ते होऊ नये आणि त्याबाबतीत तरी तुमचे खोटे ठरावे अशी मनोमन इच्छा आहे. कधीकधी वाटतेकी भाऊंचे लेख वाचून तर हे पक्ष निर्णय घेत नाहीत ना?
ReplyDeleteरामदास पवार,
ReplyDeleteमला नाही वाटंत तसं. जर राज ठाकरे भाजपबरोबर गेले तर जनतेला तो खाजगी सूड उगवण्याचा डाव नक्कीच वाटेल. अशाला का मत द्यायचं?
येती विधानसभा निवडणूक चौरंगी वा पंचरंगी आहे. यातील प्रमुख भिडू म्हणून दावा केला जातो तो खेळाडू (= मोदी) महाराष्ट्राबाहेरचा आहे. ही निवडणूक मोदींप्रमाणे चेहऱ्याची निवडणूक होणार असा रागरंग दिसतोय. आज केवळ शिवसेनाच महाराष्ट्रातला चेहरा देऊ शकते.
जिंकल्यावर फक्त एक काळजी घ्यायला हवी. उद्धव ठाकऱ्यांनी प्रशासनावर घट्ट मांड ठोकायला पाहिजे.
आपला नम्र,
-गामा पैलवान
गामा पैलवान साहेब, आता सर्वच समिकरणे बदलली आहे. राज भाजप बरोबरतर गेले नाहीतच. उलट ते निवडणूकीनंतर शिवसेने सोबत येऊ शकतात. असे ते स्वत: च म्हणाले आहेत. पाहुयात! चार दिवसांवर मतदान आले आहे.
ReplyDeleteआत्तापर्यंत उद्धवजींच्या खेळ्या योग्य होत होत्या. मात्र उध्दवजी मोदींविरूध्द का बोलायला लागलेत समजत नाही. फार मोठी चूक होतीय ती.
ReplyDeleteमोदींना इथली भाजपाची तोळामासा प्रकृती माहितेय. म्हणून तर सर्वांनी आपल्या विरोधात लढावे बोलावे हीच तर त्यांची रणनीती असणार आहे.
असे असताना उध्ववजी स्वत:हून सापळ्यात का शिरताहेत कळत नाही?