माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या गुढ मृत्यूचे रहस्य सहा महिने उलटून गेल्यावरही प्रश्नचिन्ह बनून राहिले आहे. मध्यंतरी लोकसभा निवडणूकीचे इतके मोठे रणकंदन माजले होते, की त्यात कोणालाच या रहस्यमय मृत्यूचे स्मरणही उरले नाही. वास्तविक अशा गोष्टींचा नको तितका वापर राजकारणात होऊ शकला असता. निदान यावेळी ज्या थराला प्रचाराची पातळी पोहोचली होती, त्यात पुष्कर मृत्यू एक मुद्दा नक्कीच होऊ शकला असता. पण विरोधी पक्ष भाजपा वा त्याचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरवापर केला नाही, याचेच नवल वाटते. कारण याच निवडणूकीत मोदींच्या वैवाहिक जीवनाचा नको इतका उहापोह झाला होता. त्याला उत्तर म्हणून मोदींनी पुष्कर प्रकरणाचा वापर केल्यास कोणी गैर मानले नसते. मोदींचा विवाह झाला असला, तरी त्यांनी कधीच वैवाहिक जीवन जगलेले नाही. बालवयीन विवाहानंतर ते विरक्तीमुळे संसारात पडले नाहीत आणि त्यांच्या पत्नीनेही त्याबद्दल तक्रार केली नाही. दोघेही आपापले जीवन स्वतंत्रपणे जगले. त्यांची तक्रार नव्हती, की वाच्यता सहसा झालेली नव्हती. मोदींनी आजवर कधी पत्नीचा उल्लेखही कुठे केला नव्हता. पण यावेळी निवडणूक आयोगाच्या सक्तीमुळे त्यांनी पत्नीच्या नावाचा उल्लेख आपल्या प्रतिज्ञापत्रात केला. तेवढ्यावरून काहूर माजवण्यात आलेले होते. जणू मोदींनी आपल्या पत्नीवर मोठाच काही अत्याचार केला; असा गदारोळ कॉग्रेसने उठवला होता. इतक्या थराला मोदी विरोध गेला असताना, मोदींनी पुष्कर मृत्यू प्रकरणाचा वापर हत्याराप्रमाणे केल्यास कोणी गैर मानले नसते. कारण जशोदाबेन व मोदी यांच्यात कुठलाच व्यक्तीगत बेबनाव नव्हता. तर थरूर व पुष्कर यांच्यातले वैवाहिक संबंध विस्कटले होते. अशा पार्श्वभूमीवर सुनंदाचा मृत्यू संशयास्पद असेल, तर कॉग्रेसला नामोहरम करण्यास त्याचा वापर का करू नये?
निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जशोदाबेन या विषयावर अनेक वाहिन्या व माध्यमातून काही दिवस चर्चा होत राहिली. त्यात कॉग्रेसजन अगत्याने भाग घेत होते. मग त्यांना सुनंदा पुष्करची फ़िकीर का नसावी? सुनंदाचा मृत्यू अतिशय गुढ होता. एकतर तो आकस्मिक होता आणि कारणेही शंकास्पद होती. मृत्यूच्या दोनच दिवसपुर्वी या महिलेले आपल्या पतीच्या चारित्र्याबद्दल शंका घेतली होती. एक पाकिस्तानी महिला पत्रकार आपल्या पतीला जाळ्यात ओढाय़चे उद्योग करते आहे आणि तीच महिला पाक हेरखात्याची हस्तक आहे, असा गंभीर आरोप सुनंदाने सोशल मीडियातून केलेला होता. थरूर व ही पाक पत्रकार यांच्यात प्रेमाचे संवाद होत असल्याची तक्रार होती आणि पुरूषांच्या प्रामाणिकपणाचा आपल्याला विश्वास नाही, असेही सुनंदाने खुलेआम लिहीलेले होते. इथे सुनंदाचा पती कोणी सामान्य गृहस्थ नाही, तर भारत सरकारचा एक मंत्री होता, हे विसरता कामा नये. एका भारतीय मंत्र्याला पाकिस्तानी हेर महिला आपल्या जाळ्यात ओढायला बघते आहे, असा पत्नीचा आरोप त्यांच्यातली खाजगी बाब उरत नाही. तो राष्ट्रीय सुरक्षेचा विषय होत असतो. म्हणूनच मोदी वा भाजपानेच त्यावर बोलणे पुरेसे नव्हते. सरकारनेही आपल्या अशा मंत्र्याच्या वर्तनाचा गंभीरपणे तपास करणे आवश्यक होते. तेवढेच नाही, सुनंदाने आपल्या पतीसाठी आपण किती सहन केले, याबद्दलही जाहिरपणे वाच्यता केली होती आणि पुढे जाऊन आपण इंडीयन प्रिमीयर लीगच्या व्यवहाराच्या भानगडी उघड करणार असल्याचेही सुचित केले होते. संशयास्पद मृत्यूच्या केवळ दोन दिवस आधी सुनंदाने अशा अनेक गंभीर विषयांना वाचा फ़ोडलेली होती. म्हणूनच तिचे व शशी थरूर यांच्यातील भांडण त्यांच्या वैवाहिक जीवनापुरता मर्यादित विषय होऊ शकत नाही. पण जशोदाबेन-मोदी यावर रसभरीत चर्चा करणार्यांना सुनंदा प्रकरणात बोलायची इच्छाही असू नये हे चमत्कारिक नाही काय?
आयपीएल या देशांतर्गत होणार्या क्रिकेटस्पर्धेच्या संघ मालकीचा विषय मुळात गाजला, म्हणून सुनंदा व शशी थरूर यांना विवाहित व्हावे लागले होते. दोन वर्षापुर्वी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारात भाषण करताना थरूर यांचे नाव न घेताच मोदी यांनी पन्नास कोटीची गर्लफ़्रेन्ड; असा टोमणा कॉग्रेसी मंत्र्याला मारला होता. त्यातूनच गवगवा झाल्यावर थरूर यांनी सुनंदासाठी दहा मंत्रीपदे कुर्बान करू अशी भाषा केली होती. मग अशा निष्ठावान प्रिय पतीबद्दल वर्षभरातच सुनंदाने चारित्र्याचा संशय कशाला घ्यावा? ज्या आयपीएल स्पर्धेतील संघाच्या खरेदी किंमतीबद्दल थरूर यांनी हस्तक्षेप केल्याचा बोलबाला झाला, म्हणून त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. त्याबद्दल सुनंदा कोणता असा गौप्यस्फ़ोट करणार होती? सुनंदाच्या अशा गुपिते उघड करण्यामुळे कोण इतके विचलित झाले होते? आपल्या प्रेमसंबंधांचे जाहिरपणे प्रदर्शन मांडायची एकही संधी थरूर सोडत नव्हते. मग त्यांच्या वैवाहिक जीवनात असे कोणते वादळ आलेले होते, की सुनंदाने त्यांच्याविषयी जाहिर तक्रारी सुरू केल्या होत्या? शिवाय त्या तक्रारी खाजगी स्वरूपाच्या नव्हत्या, तर राष्ट्रीय सुरक्षेची चिंता वाढवणार्या होत्या. असे असूनही माध्यमांनी सुनंदा प्रकरणात मौन धारण करणे थक्क करणारे नाही काय? प्रामुख्याने जशोदाबेन या महिलेच्या वैवाहिक जीवनासाठी चिंतातूर असलेल्या कॉग्रेस पक्षाने थरूर यांच्या विस्कटलेल्या वैवाहिक जीवनाची किती काळजी घ्यायला हवी होती ना? उलट खालपासून वरपर्यंत नुसती झाकपाक करण्यासाठीच प्रयत्न झाले. आपल्या प्रचारसभेत खुद्द राहुल गांधींनी अनेकदा मोदी यांच्या पत्नीचे नाव लपवल्याबद्दल सवाल केले होते. त्यांनी तरी सुनंदाच्या वैवाहिक जीवनाची किती फ़िकीर केली? नसेल तर कशाला केली नव्हती? त्याच प्रकरणी आता एम्स या सरकारी रुग्णालयातील पोस्टमार्टेम म्हणूनच राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे.
आता सहा महिने होत आल्यावर ते पोस्टमार्टेम करणार्या पथकाचा प्रमुख म्हणतोय, की मृत्यूचे खरे कारण लपवण्यासाठी आपल्यावर तेव्हा सरकारी दबाव आला होता. नुसता दबाव असा गोलमाल खुलासा या डॉक्टरने केलेला नाही. त्याने शशी थरूर व तेव्हाचे आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी दबाव आणल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. त्यामुळे ती बाब नुसती संशयास्पद उरत नाही. तिला सुनंदा पुष्कर यांची तात्कालीन विधाने, आरोप व खुलासे धमक्या जोडल्या, तर हा विषय राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असल्याचे लक्षात येऊ शकते. पाकिस्तानी हेरखात्याची हस्तक एका मंत्र्याला आपल्या जाळ्यात ओढू बघतेय असे सुनंदा म्हणतात, तेव्हा त्यांची चिंता व्यक्तीगत असेल. पण तो पती भारत सरकारचा मंत्री असल्याने असा संशय राष्ट्रीय सुरक्षेला चिंतेत टाकणारा असतो. अशा पार्श्वभूमीवर अत्यंत सुरक्षित स्थळी म्हणजे पंचतारांकित हॉटेलच्या एका दालनात दिवसाढवळ्या सुनंदाचा शंकास्पद गुढ मृत्यू कसा होऊ शकतो? मुळात हे सर्व भांडण चालू असताना आपला मंत्रीनिवास सोडून मंत्री महोदय हॉटेलात कशाला मुक्कामाला येतात? आले तरी त्यांच्या पत्नीला तिथे पोलिस सुरक्षा कशी असू शकत नाही? यासारखे शेकडो प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण यापैकी कुठलेही प्रश्न तेव्हा विचारले गेले नाहीत. मोदी जशोदाबेन यांच्यात कुठलीही कुरबुर नसताना त्याबद्दल देशव्यापी चिंता व्यक्त करणार्यांना, इथे देशाच्या सुरक्षेशी थेट संबंध असलेल्या व बिघडल्या वैवाहिक संबंधाविषयी मौन कशाला धारण करावे लागते? तेव्हाच्या सत्ताधार्यांना पोस्टमार्टेम रिपोर्ट म्हणजेच डॉक्टरांनी केलेल्या शवचिकित्सेत इतका कशाला रस असू शकतो? नैसर्गिक मृत्यू असा अहवाल देण्यासाठी सरकारच दबाव कशाला आणते? सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू हे इतिहासात मोठमोठे गौप्यस्फ़ोट घडवून आणणारे रहस्य आहे, इतकेच आज सांगता येईल. कारण त्याचे धागेदोरे खुप दूरवर पसरले आहेत, इतके निश्चीत.
No comments:
Post a Comment