(१९७७ च्या संपुर्ण क्रांतीतले तीन तरूण लालू यादव, शरद यादव आणि रामविलास पासवान. नितीश त्यांनाही दुय्यम होते त्या काळात)
कुठल्याही व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल, तर त्याला आपल्या बलस्थानापेक्षा आपल्या त्रुटी व दोषांचे भान असावे लागते. जेव्हा त्याचे भान सुटते, तेव्हा आपल्या ताकदीचा भ्रम त्याला भरकटत घेऊन जातो. बिहारचे यशस्वी मुख्यमंत्री नितीशकुमार हे त्याचे ताजे उदाहरण होय. १९७७ च्या जनता लाटेने किंवा त्याच्या आधीच्या जयप्रकाशांच्या संपुर्ण क्रांती आंदोलनाने जी नवी राजकीय नेतृत्वाची फ़ळी निर्माण केली, त्यात नितीशकुमार यांचा समावेश होता. बाकीच्या देशात जसे तरूण नेतृत्व त्या चळवळीने उभे केले, असेच बिहारमध्ये एक नवीच नेत्यांची फ़ळी पुढे आणली. त्यात प्रामुख्याने डॉ. राममनोहर लोहियांचे समाजवादी अनुयायी अधिक होते. त्यात लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान व नितीशकुमार यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आरंभी कर्पुरी ठाकूर यांच्यासारखा समर्थ नेता असल्याने नव्या पिढीला थेट नेतृत्वाची संधी मिळाली नव्हती. जनता प्रयोग फ़सल्याच्या नंतर लौकरच पहिली फ़ळी काळाच्या पडद्याआड गेली आणि त्या चळवळीचे म्होरकेपण दुसर्या पिढीच्या हाती आले. त्यात जॉर्ज फ़र्नांडीस एकमेव जुन्या पिढीचे होते. पण १९९० च्या सुमारास ही पिढी पुढे आल्यावर त्यांनी विचार व तत्वज्ञान गुंडाळून सत्तेच्या आहारी जाण्याचा कळस गाठला. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या रुपाने नवा उद्धारक जनता पक्षाला मिळाला. पण त्याच्याकडे ह्या शिंगे फ़ुटलेल्यांना हाताळण्याचे कौशल्य नव्हते. त्यामुळे अकस्मात हे नवखे लोक ज्येष्ठ होऊन बसले आणि त्यांनी आधीच्या भ्रष्ट कॉग्रेसला लाजवील असे पराक्रम केले. जगन्नाथ मिश्रा यासारख्या कॉग्रेसी नेत्याने तिथला पक्ष धुळीस मिळवला होता. म्हणूनच पुढल्या काळात कॉग्रेस बिहारमध्ये पुरती नामशेष झाली. पण तिची जागा घेणार्या जनता दलाने लालुंच्या रुपाने अधिकच अराजक बिहारच्या नशीबी आणले. शेवटी त्याच्या विरोधात जॉर्ज फ़र्नांडीस यांनाच दंड थोपटून उभे रहावे लागले.
लालूंची दादागिरी इतकी जालीम होती, की आयुष्यभर ज्या संघ-भाजपाच्या विरोधात फ़र्नांडीस लढले होते, त्याच भाजपाची मदत लालूविरोधात घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. तिथून मग नितीशकुमार यांचा राजकीय उदय खर्या अर्थाने झाला. विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या अस्तानंतर जनता दलाचे तुकडे पडले आणि लालूंनी पक्षाला आपल्या गोठ्यातली म्हैस बनवून टाकले. सत्तेला सवकलेले बहुतेक लोक त्यांच्यासोबत गेले आणि फ़र्नांडिस यांना नव्या तरूणांना घेऊन उभे रहाताना राजकीय पाठबळ हवे होते. लालूंच्या विरोधात दंड थोपटून उभे रहाण्यासाठी त्यांना मग भाजपासोबत जाण्याची वेळ आली. लालूंनी जनता दलातून हद्दपार केलेल्या या गटाने समता पक्ष नावाचा नवा तंबू ठोकला. त्याला पक्ष म्हणूनही उभे रहाता येत नव्हते. अशावेळी भाजपाने त्यांना साथ दिली आणि लालूंचा नि:पात करण्यासाठी नितीशकुमार मग भाजपाच्या मदतीने नेता म्हणून पुढे आले. १९९८ सालात त्यांनी भाजपाशी युती केली आणि १९९९ सालात लालूंच्या दहशतीला कंटाळलेले शरद यादव व पासवानही त्यांच्या गोटात दाखल झाले. या जुन्या सहकार्यांनी मग समता पक्ष गुंडाळून संयुक्त जनता दल स्थापन केले. त्यालाच आज जनता दल युनायटेड म्हणून ओळखले जाते. त्या पक्षाची स्थापना वा वेगळा तंबू कशासाठी स्थापन झाला होता? बिहारमधून लालूंचे जंगलराज संपवण्यासाठी. हळुहळू लोकही लालूंच्या गुंडगिरीला वैतागून पर्याय शोधू लागले होते. पण भाजपा-जदयु कितीकाळ एकत्र टिकतील याची काही हमी नव्हती. अशावेळी लालूंना शह देण्याच्या भूमिकेत भाजपाने अधिक ताकद असून नितीश व जदयुला मोठेपणा दिला. त्यांचे आमदार व मते कमी असूनही राज्याचे संयुक्त नेतृत्व त्यांच्याकडेच सोपवले. थोडक्यात नितीशकुमार यांना राज्याचा बलवान नेता बनवण्याचे काम भाजपाने आपला तोटा सोसून पार पाडले.
त्या युतीला यश मिळताना दिसल्यावर लालूंकडे नाराज असलेले अनेक जुने समाजवादी व जनता नेते जदयुमध्ये एकत्र होत गेले. त्यातून मग नितीशकुमार बिहारचे मोठा नेता होत गेले. त्यासाठी राजकीय त्याग भाजपाने सोसला. तसे बघितल्यास संघटनात्मक ताकद भाजपाकडे होती आणि त्याच बळावर ही आघाडी यशस्वी होत गेली. पण लालूंचे जंगलराज संपवण्यासाठी भाजपाने ती झीज सोसली होती. २००५ मध्ये त्या आघाडीने लालूंचा निर्णायक पराभव केला आणि सत्ताही मिळवली. मग संयुक्त सरकार चालवताना उत्तम कामगिरी करून लोकांचा विश्वासही संपादन केला. त्याचा परिणाम २०१० मध्ये दिसला आणि लालूंसह तमाम विरोधक या आघाडीने सफ़ाचाट केले. पण त्या मोठ्या यशाने आपण बिहारचे अनभिषीक्त सम्राट झाल्याचा भ्रम नितीश यांना झाला आणि त्यांनी जुन्या मित्राला लाथा मारण्याचा पराक्रम केला. त्यांना पंतप्रधान होण्याचे डोहाळे लागले आणि त्यातून त्यांनी भाजपाच्या होऊ घातलेल्या बड्या नेत्याशी उघड वैर पत्करले. गुजरातची दंगल हे निमीत्त करून ते मोदी विरोधात गरळ ओकू लागले, वास्तवात दंगल झाली तेव्हा नितीश भाजपासोबत होते आणि त्याच काळात गुजरातला जाऊन मोदींचे गुणगान करून आलेले होते. उलट त्याच काळात व त्याच कारणास्तव तेव्हा पासवान यांनी भाजपाची साथ सोडली व केंद्रातील मंत्रीपदही सोडले होते. पण तेव्हा सत्तेच्या खुर्चीला चिकटून बसलेले नितीशकुमार यशस्वी मुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर मोदींना अकारण लक्ष्य करू लागले. स्वबळावर बिहार जिंकण्याची कुवत नसलेला हा नेता, थेट पंतप्रधान पदाची स्वप्ने रंगवू लागला आणि तिथून त्याची घसरण सुरू झाली. त्याचे पर्यवसान अखेरीस भाजपाशी असलेली आघाडी तोडण्यात झाले आणि आज आपले बिहारमधले अस्तित्व टिकवण्याची केविलवाणी कसरत नितीश यांना करावी लागते आहे. त्यासाठी लालूंचे पाय धरायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.
लोकसभा निवडणूकीत दणदणित पराभव झाल्यानंतर पक्ष व सत्ता टिकवण्यासाठी नितीशना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. मग पक्षाचे अधिकृत उमेदवार राज्यसभेत निवडून यावेत, म्हणून लालूंची मनधरणी करावी लागली. कारण यापुढे नितीशच्या करिष्म्यावर जिंकणे अशक्य असल्याची खात्री झालेले त्यांच्याच पक्षाचे आमदार बंड पुकारून सतावत आहेत. त्यांना वेसण घालणे शक्य राहिलेले नाही, की पक्षशिस्त म्हणून हाकलूनही देता येत नाही. लालूंनी समान शत्रू म्हणून भाजपाविरोधात नितीशना राज्यसभेत मदत केली आणि आता लौकरच होऊ घातलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणूकीत दोघांनी एकत्र यायचे ठरवले आहे. ज्या भाजपा आमदारांची लोकसभेवर निवड झाली, त्यांच्या जागा भरण्यासाठी या निवडणूका व्हायच्या असून, त्यासाठी लालू व नितीश एकत्र येत आहेत. अर्थात आता जातीयवाद्यांना दूर ठेवण्यासाठी असा डंका नितीश पिटणार आहेत. पण सामान्य मतदाराला तो कितपत पटाणारा असेल? कारण दोन दशकांपुर्वी हेच नितीश लालूंचे जंगलराज संपवायला त्याच जातीयवादी भाजपा सोबत गेले होते. तेव्हा भाजपा जातीयवादी नव्हता, की लालूंचे जंगलराज संपून आता लालू माणसाळले आहेत? नितीशना याचे लोकांना पटणारे उत्तर द्यावेच लागेल. पण मुळात अशी पाळी नितीशवर कशाला आली? त्यांनी मोदीद्वेषाच्या आहारी जाऊन आघाडी मोडली नसती, तर आज कदाचीत भाजपाला बिहारमध्ये इतक्या जागा मिळाल्या नसत्या आणि बहूमतही थोडक्यात हुकले असते. पासवान मोठे झाले नसते आणि मोदींना नितीशची मर्जी जपावी लागली असती. पण आपल्यापाशी नसलेल्या शक्तीचा भ्रम उरात घेऊन त्यांनी जे डावपेच खेळले, तेच त्यांच्यावर उलटले आहेत. आता लालूंना सोबत घेऊन आपली उरलीसुरली विश्वासार्हताही ते संपुष्टात आणणार आहेत. कदाचित दोनचार जागा ते वाचवूही शकतील. पण पुढल्या वर्षीच्या विधानसभा निवडणूकीत त्यांचा पक्ष कितीसा शिल्लक राहील? थोडक्यात लालूंना त्याचा लाभ होऊन त्यांचा पक्ष तग धरू शकेल. आपले राजकीय स्थान निर्माण करताना लालूंना संपवले, त्यांनाच जीवदान देऊन नितीशचा राजकीय अस्त होण्याची शक्यता अधिक आहे. यालाच इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ना?
सत्तेच्या अफूवर माजल्यावर हेच होणार, अजुन काय? मोदी नामक वावटळाचा अंदाजा अजुनही बर्याच राजकीय नेत्यांना आलेला नाही. आणि त्या सगळ्यांना हे वावटळ गिळंकृत करणार एवढ नक्की.
ReplyDelete