Saturday, July 12, 2014

भुजबळांची गद्धे पन्नाशी ?



   १९९१ सालात शिवसेना पंचवीस वर्षाची झाली होती. तेव्हा प्रथमच शिवसेना विधानसभेत मोठ्या संख्येने निवडून आलेली होती. त्यात छगन भुजबळ यांचा मोठा वाटा होता हे कोणी नाकारू शकणार नाही. कारण भुजबळ हे तुलनेने दुसर्‍या पिढीतले सेनानेते असले, तरी त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात सेनेच्या वतीने रान उठवण्याची बहुमोल कामगिरी पार पाडली होती. पण जेव्हा विधानसभा निवडणूका संपल्या आणि निकाल लागले; तेव्हा मागल्या विधानसभेतले झुंजार एकमेव आमदार म्हणून विरोधी नेतेपदावर भुजबळांचीच वर्णी लागणार अशीच सर्वांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही आणि पुन्हा एकदा रिवाजाप्रमाणे शिवसेनाप्रमुखांनी मनोहरपंत जोशी यांनाच विरोधी नेतेपदावर बसवले होते. परिणामी भुजबळ नाराज निराश झाल्यास नवल नव्हते. पण त्यांना बाळासाहेबांनी वेगळे बक्षिस दिले. अवघ्या सहा वर्षात भुजबळ मुंबईचे दुसर्‍यांदा महापौर झाले. (दोनदा मुंबईचे महापौरपद खुप पुर्वी कॉग्रेसचे स. का. पाटिल यांनी भुषवले होते. त्यामुळे त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राटही म्हटले जायचे. त्यानंतर तो मान संपादन करणारे भुजबळ एकमेव दुसरे महापौर, ज्यांना दोनदा तो सन्मान मिळाला.) तितकेच नाही, भुजबळ हे आमदार असूनही त्यांना मागल्या १९८५च्या महापलिका निवडणूकीला उमेदवार व्हायची संधीही सेनाप्रमुखांनी दिलेली होती. असा तो शिवसेनेतला पहिला सतासंघर्ष मानायला हरकत नसावी. भुजबळांना महापौर पदावर बसवून साहेबांनी त्यांना विधानसभेपासून दुर राहण्यात यश मिळवले, म्हणून भुजबळांची महत्वाकांक्षा संपलेली नव्हती. विरोधी नेतेपदावर आरुढ होऊन शरद पवार यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला राजकारणात शह देण्य़ाचा भुजबळांचा मनसुबा कायम होता. महापौरपदी बसूनही ते विरोधी नेतेपदाचे स्वप्न बघतच होते. म्हणूनच १९९१ सालाच्या पुर्वार्धात महापौर पदाची दुसरी मुदत संपल्यावर भुजबळांनी विरोधी नेतेपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. काही पत्रकारांना हाताशी धरून तशा बातम्याही रंगवल्या जात होत्या.

   अशाच एका पत्रकार ‘संवादात’ भुजबळांनी विरोधी नेतेपद सुद्धा महापौराप्रमाणे दरवर्षी बदलणारे असावे, अशी पुस्ती जोडली होती. मग त्याचेच भांडवल करून सेनेमध्ये गटबाजी असल्याच्या बातम्या रंगू लागल्या. विरोधी नेतेपदासाठी भुजबळांचा ‘गट’ सक्रिय असल्याचा गवगवा वृत्तपत्रातून सुरू झाला. धुसफ़ुस पत्रकारांना खाजगी चर्चेत कानी पडत होती. पण खुलेआम कोणी काही बोलत नव्हते. त्या बातम्यांचा जोर वाढला, तेव्हा अंधेरी येथील एका कार्यक्रमात बाळासाहेबांनी भाषणातच जाहिरपणे भुजबळ यांना विचारले, तुमचा सेनेत कुठला गट आहे? त्यानंतर भुजबळ यांनी तात्काळ सावरासावर केलेली होती. त्याचजागी त्यांनी आपण विरोधी नेतेपदाच्या बाबत बोललो, हा ‘आपला गाढवपणा’ होता असे सांगुन टाकले. हा सर्व घटनाक्रम मला आजही आठवण्याचे कारण म्हणजे, त्यासंदर्भात मी तेव्हाच ‘दैनिक ‘नवशक्ती’च्या ऐसी अक्षरे रसिके या रविवार पुरवणीत लेख लिहीला होता. त्याचे शीर्षकच होते, ‘शिवसेनेची गद्धेपंचवीशी’. तात्कालीन संपादकही शिर्षकाने विचलीत झाले होते. पण लेख प्रसिद्ध झाला आणि अनेकांना आवडलाही होता. शिवसेना तेव्हा पंचविशीची झाली होती आणि याच वयात तरूणांकडून गाढवपणा होतो, असे मानले जाते. नेमक्या त्याच वयात सेनेचा झुंजार नेता ‘गाढवपणा’ केला म्हणतो, अशी गंमत मी लिहीली होती. पण तो मुद्दा महत्वाचा नाही. पुढला घटनाक्रम ऐतिहासिक आहे.

   साधारण मे जुन महिन्याच्या आसपासचा तो घटनाक्रम आहे. आणि त्याच वर्षाच्या अखेरीस नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन चालले होते. तिथे भुजबळांनी आपला गाढवपणा सिद्ध करून दाखवला होता. ६ डिसेंबर १९९१ रोजी मुंबईत महानिर्वाणदिन म्हणून चैत्यभूमीत बाबासाहेबांच्या अनुयायांची गर्दी लोटली असताना, तिथे नागपुरात शिवसेनेचे १८ आमदार फ़ुटल्याची बातमी मुंबईत येऊन थडकली होती. चारच महिन्यापुर्वी आपला कुठला गट शिवसेनेत नसल्याचे सांगून विरोधी नेतेपदाचा वाद काढल्याला गाढवपणा संबोधणारे छगन भुजबळ सेनेतून बाहेर पडले होते. थोडक्यात भुजबळ गाढवपणा अत्यंत विचारपुर्वक व योजनाबद्ध रितीने करतात, याचाच तो पुरावा होता. पुढल्या काळात मग भुजबळ कॉग्रेसमध्ये गेले आणि मंत्रीही झाले. त्याला आता बावीस तेवीस वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. पुढल्या विधानसभा निवडणूकीत भुजबळ आपल्या माझगाव मतदारसंघात, त्यांच्याच तरूण पाठीराख्या शिवसैनिक बाळा नांदगावकर याच्याकडून पराभूत झाले. पण भुजबळ इतिहासजमा झाले, असे वाटत असताना पवारांनी त्यांना पुन्हा विधान परिषदेत निवडून आणले आणि त्यांच्याकडेच तिथले विरोधी नेतेपद सोपवले. विधानसभेच्या विरोधी नेतेपदापासून सुरू झालेला हा प्रवास मग सेनेच्या विरोधात विधान परिषदेतले विरोधी नेतेपद मिळवण्यापर्यंत येऊन पोहोचला. भुजबळांनी १९८५ ते १९९० जसे पवार विरोधात राज्यामध्ये काहूर माजवले होते, तसाच मग १९९६ ते १९९९ ठाकरे विरोधात गदारोळ उठवण्यात पुढाकार घेतला. अखेरच्या क्षणी पवारांनी कॉग्रेस पक्षात फ़ुट पाडल्यावर भुजबळांनी पवारांना साथ दिली आणि १९९९ साली उपमुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. अधिक गृहखातेही मिळाले. मग त्यांनी बाळासाहेबांना अटक करण्यापर्यंतचा ‘गाढवपणा’ करून दाखवला होता.

   एक गोष्ट मान्य करावी लागेल. जितक्या आवेशात भुजबळांनी १९८५ नंतर शिवसेनेला खेड्यापाड्यापर्यंत घेऊन जाण्यात पुढाकार घेतला, तितक्याच जोशात त्यांनी १९९६ नंतर शिवसेना भाजप युतीच्या विरोधात राज्यभर रान पेटवण्याची मेहनत घेतली होती. मात्र पवार यांनी अजितदादांना वारस म्हणुन पुढे आणल्यावर भुजबळ मागे पडत गेले आणि तीन वर्षापुर्वी अशोक चव्हाण यांची उचलबांगडी झाली, तेव्हा अपमानास्पद रितीने भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावरून तडकाफ़डकी बाजूला करण्यात आले. आदर्श घोटाळा उघडकीस आल्यावर कॉग्रेसने नेतृत्वात बदल केला. त्याची प्रक्रिया चालू असताना भुजबळांना राष्ट्रवादीत नेताबदलाचा प्रशन विचारण्यात आलेला होता. पण भुजबळांनी तशी शक्यता साफ़ फ़ेटाळून लावली होती. पण दोनच दिवसात त्यांना त्या पदावरून बाजूला होऊन उपमुख्यमंत्रीपद अजितदादांना हस्तांतरीत करावे लागले होते. तिथून मग भुजबळ कायम निराश व नाराजच राहिले. पण करायचे काय? कारण उघड आहे. भुजबळांना आता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात भवितव्य उरलेले नाही. शरद पवार यांच्यावर विसंबुन त्या पक्षात आलेल्या भुजबळांचा नव्या नेतृत्वाशी तितका घरोबा नाही. आज खरे तर खुद्द शरद पवार यांनाही राष्ट्रवादी पक्षात किती स्थान आहे, याचीच शंका आहे. मग त्यांच्यावर विसंबुन तिथे असलेल्या भुजबळांना कुठले भवितव्य असू शकते?

   गेल्या दोन दिवसापासून भुजबळ पुन्हा शिवसेनेत येण्याच्या बातम्या झळकू लागल्या आहेत. त्यासाठी सुत्रांचे हवालेही दिले जात आहेत. पण खुद्द भुजबळांनी असल्या सर्वच बातम्यांचा साफ़ इन्कार केला आहे. अर्थात १९९१ सालाच्या पुर्वार्धातही विरोधी नेतेपद मिळाले नाही, म्हणून आपण नाराज असल्याच्या वृत्ताचा भुजबळांनी असाच इन्कार केलेला होता. नुसता इन्कारच नव्हेतर आपला शिवसेनेत वेगळा गट असल्याचाही इन्कार करताना ‘गाढवपणा’ केल्याचेही सांगून टाकले होते. मग आताचा इन्कार बघितल्यावर भुजबळ पुन्हा नवा ‘गाढवपणा’ करायच्या मनस्थितीत आहेत की काय; अशी शंका येते. तसे खरेच झाले तर त्याला काय ‘गद्धे पन्नाशी’ म्हणायचे?

1 comment:

  1. लय भारी ! भुजबळ यांनी शिवसेना सोडल्या नंतरचा काळ आठवला. भुजबळ कसे शिवसैनिकांना घाबरून लपून बसले होते असे आठवते. आता त्यांची शिवसेनेबरोबरची नाळ पूर्ण तुटली आहे. ते आता भाजपात गेले तर सांगता येत नाही.

    ReplyDelete