Monday, July 14, 2014

मोदी-शहा रणनितीचे रहस्य




   याच आठवद्यात केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येण्याची बातमी वाचनात आली. याचा अर्थच राज्य विधानसभेच्या निवडणूकांचे वेध लागले आहेत. साधारणपणे संसदेचे अधिवेशन संपताच आठवडाभरात त्या निवडणूक वेळापत्रकाची घोषणा होऊ शकेल. कारण त्यापेक्षा विलंब करण्यासाठी आयोगाकडे सवडच नाही. मतदानाच्या वेळा व दिवस ठरवताना विविध समाजघटकांचे सण व शाळा, अधिक निसर्गाची लहरही लक्षात घ्यावी लागत असते. डिसेंबरपुर्वी विधानसभेची मुदत संपत असल्याने त्यापुर्वी हे मतदान उरकावे लागेल. त्यात पुन्हा नवरात्र व दिवाळी या सणांचे दिवस टाळावे लागणार. त्यातच शाळांच्या सहामाही परिक्षांकडे डोळेझाक करता येणार नाही. म्हणजेच आक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान मतदानाचे वेळापत्रक आखण्यापासून सुटका नाही. त्याचा दुसरा अर्थ असा, की ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरू करावी लागेल. ती करायची तर तिची घोषणा ऑगस्ट महिन्यातच करावी लागणार. म्हणजे संसदेचे अधिवेशन संपून व स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उरकताच, वेळापत्रकाची घोषणा अपेक्षित आहेत. त्याची जाणिव असल्यानेच राज्यातील बहुतेक प्रमुख राजकीय पक्षात निवडणूकीची सज्जता आतापासून सुरूच झालेली आहे. सत्ताधारी आघाडीत, प्रेमात पडण्यापुर्वीची धुसफ़ुस सुरू आहे तर विरोधी युतीमध्ये जागांसाठी हाणामारी आतापासून आरंभली आहे. पक्षांच्या असल्या कसरती चालू असताना स्थानिक पातळीवर अनेक मातब्बर व इच्छुक नेते तळयात मळ्यात खेळू लागले आहेत. पक्षांतराला जोर आला असून पक्षनेतेही विजयाची खात्री देणारे उमेदवार शोधण्यात गर्क झाले आहेत. एकूणच सर्वांना निवडणूकीचे वेध लागलेत म्हणायला हरकत नाही. पण त्याचवेळी देशात मोठे सत्ता परिवर्तन घडवणार्‍या भाजपा पक्षाच्या स्थानिक मराठी नेत्यांना आपल्या वाढल्या शक्तीचे प्रदर्शन मांडायचा मोह आवरेनासा झाला आहे.

   गेल्या महिनाभरात भाजपाच्या गोटातून अनेक उलटसुलट बातम्यांच्या फ़ैरी झडत आहेत. त्यात स्वबळावर निवडणूक लढवण्यापासून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारापर्यंतचे अनेक मुद्दे आहेत. त्यात आता पक्षाचे नवे अध्यक्ष अमित शहा यांच्या जादूगारी किमयेचीही भर पडली आहे. कालपरवाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फ़डणवीस यांनी उत्तरप्रदेशच्या व्युहरचनेचा उल्लेख करून त्यात अमित शहांचे नाव घेतले. जणू अमित शहा कुठल्याही विपरित परिस्थितीवर मात करून बहूमत जिंकू शकतात, अशी़च इथल्या भाजपावाल्यांची समजूत झालेली दिसते. कारण त्यांनी अमित शहांच्या उत्तरप्रदेशातील कामगिरीचा बारकाईने अभ्यास केलेला नसावा. गेले वर्षभर शहांनी तिथे जाऊन मुक्काम ठोकला होता. त्यांच्या हाती त्या राज्यातील पक्षाच्या संघटनेची सुत्रे सोपवल्यानंतर घडला तो चमत्कार हे कोणी नाकारू शकणार नाही. पण केवळ शहा यांच्या हाती सुत्रे आल्याने लोकमत इतके फ़िरलेले नाही. त्याला अनेक इतर महत्वाचे घटक कारणीभूत झालेले आहेत. त्यापैकी प्रमुख राजकीय घटक म्हणजे उत्तरप्रदेशातील तमाम जुन्याजाणत्या स्थानिक भाजपा नेत्यांच्या तोंडपाटिलकीला लावण्यात आलेला लगाम होय. गेल्या जानेवारीपासून उत्तर प्रदेशात मोदींनी आपली प्रचार मोहिम सुरू केली आणि शहांनी आपले संघटनाकौशल्य पणाला लावायचे काम हाती घेतल्यावर; कुठल्याही स्थानिक भाजपानेत्याला जाहिरपणे मतप्रदर्शन करायची मोकळीक राहिली नव्हती. कल्याणसिंग, विनय कटीयार, लालजी टंडन, कलराज मिश्रा यांच्यापासून उमा भारतीपर्यंत कुणालाही पक्षाच्या वतीने पांडीत्य करायची मुभा शहांनी दिलेली नव्हती. ह्या सर्व नेत्यांना त्यांनी आपल्या प्रचार कार्यात सहभागी करून घेतले होते, पण वाचाळतेला कुलूप ठोकले होते. त्याचेच थक्क करणारे परिणाम मतमोजणीतून समोर आले. महाराष्ट्रात तसे घडताना दिसते आहे काय?

   उदाहरणार्थ कॉग्रेसचे प्रवक्ते व डुमरियागंजचे तात्कालीन खासदार जगदंबिकापाल यांच्या पक्षांतराच्या बातम्या फ़िरत होत्या. पण त्यावर कुठल्या भाजपा स्थानिक नेत्याने प्रतिक्रियाही दिलेली नव्हती. अपना दल नावाच्या किरकोळ पक्षाला सोबत घेण्य़ाचा गाजावाजा अजिबात झाला नाही, की कुठले मतप्रदर्शन झाले नाही. असल्या घटना अमित शहा घडवून आणत होते. पण त्याबद्दल स्थानिक नेत्यांनी आपली अक्कल पाजळायचे शौर्य गाजवले नव्हते. बिहारमधल्या रामविलास पासवान यांना भाजपाच्या गोटात आणायचे डावपेच बिहारी नेत्यांना बाजूला ठेवून कोणी उरकले? अशा सर्वच बाबतीत शहांनी स्थानिक नेत्यांना जाहिर मतप्रदर्शन करण्यास मोकळीक दिली नव्हती. गोष्ट वा घटना घडण्यापुर्वीच तिचा गाजावाजा होऊ द्यायचा नाही, असा शहानितीचा खाक्या आहे. त्यात महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना कितीसे स्थान आहे? काहीही करण्याच्या आधीच त्याचा गवगवा करण्याची हौस असलेल्या नेत्यांना शहानितीने काम करता येईल काय? असते तर गेले महिनाभर वाचाळतेचा जो महापूर आलेला आहे, त्यात भाजपा न्हावून निघाला असता काय? पंजाबात अकाली दल, बिहारमध्ये पासवानांचा पक्ष, आंध्रात तेलगू देसम अशा पक्षांशी स्थानिक पातळीवर बेबनाव झाल्याचे कुठे निदर्शनास तरी आले काय? त्याच्या नेमकी उलट स्थिती महाराष्ट्रात दिसते. इथे भाजपामध्ये वाचाळवीरांची तुडूंब गर्दी झालेली आहे. आणि प्रत्येक नेता आपणच पक्षाचे अंतिम धोरण ठरवतो, अशा थाटात भाष्य करीत असतो. त्यामुळे लोकसभेत सर्वात मोठा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी राज्यातच भाजपाचे सातत्याने खटके उडताना दिसतात आणि विसंवाद रंगलेला असतो. उत्तरप्रदेशसारख्या मोठ्या राज्यातही इतका विसंवाद वर्षभरात कधी ऐकू आला नाही. त्याचे प्रमुख कारण अमित शहा-निती होय. महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना ती निती पचवता येणार आहे काय?

   नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या हाती आता देशाची सत्ता व भाजपाची सुत्रे आहेत. त्यांच्या बळावर उड्या मारणार्‍यांनी त्या दोघांची कार्यशैली समजून घेण्याची गरज आहे. निव्वळ हे दोन यशस्वी नेते आपल्या बाजूला आहेत, म्हणून कुठलीही निवडणूक जिंकता येणार नाही, की सत्ता बळकावता येणार नाही. त्यांनी यश मिळवण्यासाठी जो संयम दाखवला व ज्या मर्यादा स्वत:वरच घालून घेतल्या; त्यांचेही अनुकरण करावे लागेल. प्रामुख्याने अमित शहा यांचा मितभाषी असण्याचा गुण मोलाचा ठरेल. त्याचे तर महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांमध्ये दुर्भिक्ष्यच दिसून येते. अनेकदा तर कारण नसताना फ़ुशारक्या वा वल्गना करण्याची स्पर्धाच स्थानिक भाजपा नेत्यांमध्ये लागलेली दिसते. संसदेच्या चालू अधिवेशनापुर्वी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरजकुंड येथे शिबीर आयोजित केलेले होते. तिथे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी दिलेला उपदेश राज्यातील भाजपा नेत्यांनीही मनावर घ्यायला हरकत नसावी. उगाच येताजाता माध्यमांशी बोलण्याची गरज नाही. आपण किती व काय बोलतो, याचे भान ठेवा, असा आग्रह मोदींनी धरला. नवे पक्षाध्यक्ष त्याचा नमूनाच आहेत. इतका मोठा चमत्कार उत्तरप्रदेशात घडवल्यानंतरही अमित शहा यांचे बोलणे किती मोजके व मर्यादित आहे, त्याचे अनुकरण इथल्या बोलघेवड्या भाजपा नेत्यांना कधी सुचणार आहे? मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ राज्यात महायुतीला मिळाला यात शंकाच नाही. पण ती लोकप्रियता वाचाळतेतून आलेली नाही, तर मोजक्या शब्दातून मिळवलेली आहे. ती टिकवण्यासाठी किमान आपल्या वाचाळतेला लगाम लावणे, तर स्थानिक नेत्यांच्या हाती नक्कीच आहे. तरच येत्या विधानसभा निवडणूकीचा किल्ला यशस्वीपणे लढवता येईल. रोजच्या रोज माध्यमांशी संवाद केल्यामुळे निवडणूका जिंकता येत नाहीत. उलट मिळणारे यश हातचे जाते. हीच मोदी-शहा रणनिती इथल्या भाजपा नेत्यांनी जरा समजून घ्यावी.

No comments:

Post a Comment