गेल्या लोकसभा निवडणूकीत मोदी लाटेमुळे शिवसेनेलाही मोठे यश मिळाले. आजवरच्या सर्वाधिक जागा सेनेने जिंकल्या. मात्र इतके असूनही त्यांना दिल्लीत किंमत नाही. म्हणूनच सेनेच्या वाघाचे दिल्लीत मोदींनी मांजर करून टाकले, अशी खिल्ली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उडवली आहे. अशा टिंगलीला सडेतोड उत्तर देण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख समर्थ आहेत. पण आपण काय बोलत आहोत व त्याचे अर्थ काय संभवतात, त्याचाही अजितदादांनी विचार करू नये काय? शिवसेनेचे मांजर केले म्हणजे काय केले? तर सेनेला अधिक जागा हव्या होत्या आणि त्या नाकारल्या. दुसरी गोष्ट सेनेला एकच व तेही नगण्य मंत्रालय मिळाले, यालाही अजितदादा अपमानच समजतात. त्यांचेच निकष मान्य केले तरी त्यांच्या काकांचा मागल्या दहा वर्षात दिल्लीमध्ये जो सन्मान चालू आहे; त्याबद्दल काय म्हणायचे? पवार अर्धशतकाहून अधिक काळ राजकारणात आहेत आणि त्यांच्या हाताखालून गेलेल्यांना दिल्लीत सन्मानित केले जात असताना सोनियाजींनी शरद पवारांना कितीसे सन्मानित केले? २००४ च्या लोकसभा निवडणूकीत पराभूत होऊनही शिवराज पाटील यांना देशाचा गृहमंत्री होण्याचा बहुमान मिळाला. त्याचवेळी मान खाली घालून त्याच सोनियांचे नेतृत्व स्विकारल्याची कोणती किंमत पवार साहेबांना मिळाली? त्यांच्या वाट्याला कृषीमंत्रीपद आले. तब्बल चोवीस वर्षापुर्वी देशाच्या पंतप्रधान पदावर दावा करायला दिल्लीवर झेपावलेल्या पवार साहेबांचा वाघ आज कुठे आहे? त्याची भिगी बिल्ली सोनियांनी करून टाकली नाही काय? महाराष्ट्राच्या या बारामतीकर वाघाचे मांजर झाले की मांजराचा वाघ झाला असे अजितदादा म्हणणार आहेत? भाजपाने वा मोदींनी शिवसेनेला सत्तापदे वा मंत्रीपदे देण्यात कंजूषी केल्याने सेनेचे मांजर होते. मग त्यापेक्षाही लज्जास्पद अशी अवहेलना पवारांची होते तेव्हा काय म्हणायचे?
लोकसभेचे निकाल लागल्यापासून राष्ट्रवादी पक्ष व पवार साहेब महाराष्ट्रात नेतृत्व बदलावे म्हणून आक्रमक पवित्रा घेऊन उभे ठाकले होते. आता पृथ्वीराज बाबा चालले, असेच महिनाभर आधी वातावरण निर्माण झालेले होते. खुद्द राष्ट्रवादीच्या वाघानेच गुरगुरून तसे वातावरण निर्माण केले होते ना? त्यानंतर जागा वाढवून मागण्य़ाचे किती युक्तीवाद अजितदादाच करीत आहेत. जागा वाढवून मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढायची भाषा दादांचीच ना? मग त्याला कुठूनही दाद मिळत नसताना पुन्हा त्याच मागणीचा वाडगा घेऊन फ़िरण्याला ‘मांजराचा वाघ’ होणे म्हणतात काय? ताज्या निवडणूक निकालांनी दोन्ही कॉग्रेसची जी अवस्था केलेली आहे त्याच्याकडे गंभीरपणे बघायची इच्छा कशी होत नाही? कॉग्रेस हा फ़क्त मराठवाड्यापुरता पक्ष राहिला आहे, तर राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्रातल्या चार जिल्ह्यात. याला अजितदादा वाघ होणे समजत असतील तर त्यांचे कल्याण व्हावे. कारण शिवसेनेला आपल्या कर्तबगारीवर इतके मोठे यश मिळाले नाही, यात शंकाच नाही. किंबहूना भाजपाला जे यश मिळाले आहे, त्याचेही श्रेय त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना घेता येणार नाही. याचा अर्थ सगळेच श्रेय मोदींना एकट्याल देता येईल असेही नाही. दिसायला प्रचाराचे नेतृत्व मोदींनी केले व तेच पंतप्रधान झालेत. पण त्यांच्या या दैदिप्यमान यशात अनेकांचे श्रेय सामावलेले आहे. त्यात खुद्द अजितदादांचा समावेश आहेच. गेल्या दहा पंधरा वर्षात ज्या पद्धतीचा कारभार त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, त्याचे पाठबळ नसते, तर मोदी नावाचा गुजराती नेता महाराष्ट्रामध्ये इतके अफ़ाट यश मिळवू शकला असता काय? मराठी मतदाराने मोदी हवे म्हणून मते देण्यापेक्षा दादा-बाबा यांच्या तावडीतून सुटण्यासाठी केलेल्या प्रयासाचे फ़ळ मोदींच्या पारड्यात पडले आहे. मग त्याला दादांचा वाघ झाला म्हणायचे की मांजर झाले म्हणायचे?
सेनेला मांजर म्हणून हिणवण्यापेक्षा आपल्यावर अशी पाळी कशामुळे आली, त्याचे थोडे आत्मपरिक्षण अजितदादांनी करायला हरकत नसावी. प्रदेश कॉग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी तिकडे लक्ष वेधलेले आहेच. ज्या शब्दात दादांनी सेनेची खिल्ली उडवली, तशीच माणिकरावांनी दादांच्या अधिक जागा मागणीला अक्षता लावताना दादांची हेटाळणी केली आहे. कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ताकद पणाला लावली, म्हणून ‘बारामती’ची जागा निघाली, असे माणिकराव म्हणतात. अशा प्रकारे एकत्र सत्ता भोगणार्यांनी एकमेकांची उणीदुणी काढण्यातून आगामी विधानसभेच्या निवडणूका जिंकता येतील अशा भ्रमात दोन्ही पक्ष दिसतात. म्हणूनच ज्या भाषेने लोकसभेला दणका दिला, तीच तशीच्या तशी वापरली जात आहे. तो फ़टका किती मोठा आहे त्याचीही शुद्ध माणिकराव वा अजितदादांना दिसत नाही. महायुतीला लोकसभेत मिळालेल्या मतांची टक्केवारी तब्बल ५१ टक्के इतकी आहे. म्हणजेच निर्विवाद मतांनी मराठी जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्याचे प्रत्यक्षातले आकडेही डोळे पांढरे करणारे आहेत. सत्ताधारी आघाडीला पावणे दोन कोटीपेक्षा कमी तर महायुतीला अडीच कोटीहून कमी अशी मते मिळाली आहेत. त्याचा व्यवहारी अर्थ अजितदादांनी जरा समजून घेतला तर त्यांना कुणाचे मांजर झाले आहे त्याचा अंदाज येऊ शकेल. महायुतीला २ कोटी ४० लाखाच्या घरात मते मिळाली, याचा अर्थ सरसकट २४० विधानसभा जागी युतीला एक लाख मते मिळाली आहेत. उरलेल्या ४८ जागी त्यांना शून्य मते धरली तरी २४० जागी युतीची सरशी साध्या डोळ्यांनी दिसणारी आहे. दोन्ही कॉग्रेस पक्षांची एकत्रित मते १ कोटी ६६ लाख आहेत. याचे साधे गणित महायुतीकडे एकूण ७५ लाखाहून अधिक मताधिक्य आहे. विधानसभेच्या अडिचशे जागी युतीने आघाडी घेतली होती. तिथे खरी झुंज द्यावी लागणार आहे याचे भान तरी कुठे अजितदादांच्या वक्तव्यात दिसते काय?
लोकसभा निकालाचे आकडे बघितले तर महायुती वा मोदींपेक्षा आजच्या सत्ताधीशांच्या विरोधात लोकांनी दिलेला तो कौल आहे. जर असा कौल लोकसभेसाठी मतदार देत असेल, तर विधानसभेच्या वेळी तोच मतदार किती चेव आल्यासारखा सत्ताधार्यांना धडा शिकवायला बाहेर पडेल? कोणाचे मांजर होते वा कोणाचा वाघ होतो, याची आज अजितदादांनी फ़िकीर करायचे कारण नाही. मतदाराने साळसूदपणे आपल्याला उंदिर केले आहे, ते ओळखण्याची गरज आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीतला अपरिहार्य पराभव किती कमी केविलवाणा होऊ शकेल, त्यासाठी प्रयत्नशील होण्याची गरज आहे. ज्या प्रकारचा लाजिरवाणा पराभव लोकसभेत झाला, त्यापेक्षा थोडेफ़ार चांगले यश मिळाले तरी खुप झाले. कारण मतदाराने कोणाला जिंकून देण्यासाठी आपला कल दाखवलेला नाही, इतका सत्ताधार्यांना नामोहरम करण्याकडे आपला कल दाखवला आहे. धनंजय मुंडे वा राहुल नार्वेकर यांना फ़ोडण्याचा जमाना आता संपला आहे. कुठले नेते संघटना फ़ोडून वा प्रतिस्पर्ध्याला दगाफ़टका करून यश संपादन करण्याचा जमाना मागे पडला आहे. म्हणूनच सेनेचे मांजर झाले किंवा कुणाचा उंदिर झाला, असल्या टिवल्याबावल्या करण्यात दवडायला वेळ शिल्ल्क उरलेला नाही. मात्र अजितदादांचे वर्तन दिवसेदिवस राहुल गांधी यांच्याप्रमाणे बेफ़िकीर व पक्षाला अधिक गाळात घेऊन जाणारे भासू लागले आहे. शिवसेना भाजपाचे नेते इतक्या मोठ्या यशानंतर जशी दर्पोक्ती करीत नाहीत, तशी अजितदादांची भाषा ऐकली मग म्हणूनच नवल वाटते. आता समोरचे भाट असल्या आक्रमक भाषेला दाद देतील वा टाळ्याही वाजवतील. पण निकालानंतर मांजर कोणाचे होईल? त्याचा विचार करायची हीच वेळ आहे. शिवसेनेचे व्हायचे ते होईल. आपली अवस्था भिगी बिल्लीसारखी होऊ नये याची तरी काळजी घ्याल की नाही?
भाऊ, आपण मागे लिहाल्याप्रमाणे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल या दोन दिवट्यांनी मोदींच्या विजयात हातभार लावला. तसाच विधानसभेसाठी एक दिवटा तयार झाला आहे. आता बस काँग्रेसकडून एक दिवटा येणे बाकी आहे. त्यासाठी मी पुढील नावे सुचवितो. यांपैकी कोणालाही काँग्रेसचे प्रचारप्रमुख बनवावे.
ReplyDelete१. दिग्विजय सिंग - यांचे कार्य मोठे आहे. खुप सुसंस्कृत माणुस आहे, आतंकवाद्यालाही 'जी' म्हणून बोलतो. तसेच नक्षलवाद्यांना निवडणुकित आश्वासन दिले होते की 'छत्तीसगड, ओडिशामध्ये निवडणूक जिंकायला कॉंग्रेसला मदत करा, तर निवडून आल्यावर, त्या भागातून सुरक्षा बल कमी करू.' तसेच हिंदूंच्या विरोधात बोलण्यात यांचा हात कोणी धरु शकत नाही. आठवा करकरे बद्दल वक्तव्य, कोल्हापूर दंगल वक्तव्य.
२. अशोक चव्हाण - आदर्श घोटाळ्यात नाव असले म्हणून काय झाले लोकसभेत काँग्रेसच्या दोन्ही जागा त्यांनीच निवडून आणल्या आहेत. तसेच पैसे देवून आपल्याबाबत चांगल्या बातम्या छापून आणणे याचा यांना चांगला अनूभव आहे. त्याला 'पेड न्यूज़' असे काहीतरी म्हणतात असे ऐकिवात आहे.
३. सुशिलकुमार शिंदे- खोटी जरी असलीतरी आश्वासनं देण्यात यांचा हातखंडा आहे. 'लोकं सगळेकाही विसरून जातात' असं यांचं 'ठाम मत' आहे. त्यामुळे हे काँग्रेसपक्षाचे सर्व भ्रष्टाचार, पापे लोकांना विसरायला लावतील.
अजित सारख्या लोकांचे मगरुरीचे कारण
ReplyDelete१. त्यांना वाटते की महाराष्ट्राचे लोक बाय डिफॉल्ट कॉंग्रेस ला मत देतात (जे की पूर्वी खरे होते).
२. सहकाराचे जाळे, जिल्हा परिषदा हातात असणे, पतपेढ्या, महिला गट अमुक तमुक
३. मोदींना निवडून दिल्या नंतर आता लोकांचा रोष कमी झाला असेल असा समज. जनता मुळात कॉंग्रेसप्रती क्षमाशील असल्याने यावेळी सुद्धा कॉंग्रेसला निवडून देतील अशी आशा.
४. मोदी फॅक्टरचा व भाजप शिवसेनेकडे भक्कम नेतृत्वाचा अभाव
यात काही प्रमाणात तथ्य असले तरी या गोष्टी १५ वर्षांचा असंतोष थोपवू शकत नाहीत.
वरील विश्लेषणातून असे वाटते की येत्या निवडणूकीनंतरचे चित्र. राष्ट्वादी २०, कांग्रेस १५, शिवसेना ५३, मनसे ४०,अन्य १० व भाजपाच्या हाती १५० जागा याव्यात अशी व्यूह रचना करायची सुरुवात झाली असावी. आपले विचार समजून घ्यायला आवडेल.
ReplyDelete