बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुफ़ान फ़टकेबाजी केली. त्यापैकी लोकसभेत त्यांच्या दिड तासाच्या भाषणात अखंड व्यत्यय आणला जात होता. पण त्यांनी कुठलीही दाद न देता आपले भाषण खड्या आवाजात पुर्ण केले. त्यातून त्यांनी कॉग्रेस व विरोधकांवर यथेच्छ तोफ़खाना चालवला. राज्यसभेतही त्यांनी तासापेक्षा अधिक भाषण केले आणि तिथेही लक्ष्य विरोधकच होते. मात्र लोकसभेपेक्षा राज्यसभेत बरी शांतता होती. त्याची दोन कारणे संभवतात. लोकसभेतील व्यत्ययामुळे सोशल मीडियात आलेल्या विपरीत प्रतिक्रीयांमुळे बहुधा कॉग्रेसने आपला धिंगाणा आवरता घेतला होता आणि तिथे दस्तुरखुद्द सभाध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हेडमास्तर बनून वर्गावर देखरेख करीत होते. त्यांनी बेशिस्त खपवून घेण्य़ास अजिबात नकार दिल्याने तुलनेने राज्यसभेत मोदींचे भाषण छानपैकी ऐकले गेले. तरीही त्यात अधूनमधून व्यत्यय आणायचा आगावूपणा चाललेला होता. तर त्यालाही लगाम लावण्याचा व्यंकय्यांनी प्रयास केला. एका प्रसंगी कॉग्रेसच्या महिला सदस्या व माजी मंत्री रेणुका चौधरी यांनी सर्व सभ्यता झुगारून खिदळण्याचा विक्रम केला. तेव्हा त्यांना सभापतींनी अतिशय कठोर शब्दात समज दिली. मोदींचे भाषण अत्यंत हास्यास्पद व विनोदी असल्याचा आभास चौधरी यांना उभा करायचा असावा. पण पुढला घटनाक्रम असा सरकला, की त्यांच्यावरच हास्यास्पद ठरायची वेळ आली. कुठलाही अतिरेक वाईट असतो याची जाण त्यांना झाली असेल अशी मात्र अपेक्षा करता येत नाही. कारण त्यांनी नंतर एका महिलेचा मोदींनी अपमान केल्याचा कांगावा सुरू केला आहे आणि आजच्या पुरोगामी राजकारणात त्यांना अनेक रेणुकाभक्तांची साथही मिळालेली आहे. महिलेचा सन्मान राखला जायला हवा यात शंका नाही. पण पंतप्रधानांचा अवमान करण्याचा विशेषाधिकार कुणा महिलेला मिळालेला असतो काय?
सभ्यतेची अपेक्षा त्याने करावी, जो आपण आपल्या वागण्यातून सभ्यतेचे काटेकोर पालन करीत असतो. रेणुका चौधरी ज्या पद्धतीने नेहमी बोलतात व वागतात, ती सभ्यता असल्याचे कोणी म्हणू शकेल काय? त्याही प्रसंगी त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणात व्यत्यय आणणे वा विकट हास्य करून आवाज काढणे, सभ्यतेचे लक्षण होते काय? त्यामुळे भले मोदी विचलीत झाले नसतील, पण खुद्द सभापती कमालीचे संतापलेले होते. रेणुका चौधरींना समज देताना व्यंकय्या नायडूंनी बोललेले शब्द अधिक बोचरे आहेत. ‘तुमची तब्येत ठिक नसेल, तर जाऊन डॉक्टरांचे उपचार घ्या’, असे शब्द सभापतींना वापरण्याची पाळी ज्या महिलेने आणली, तिने महिलांची प्रतिष्ठा वगैरे बोलणे शोभते काय? खरोखरच अपमान शोधायचा असेल तर या शब्दांमध्ये पकडला पाहिजे. पण कोणीही त्याविषयी अवाक्षर बोलायला तयार नाही. खुद्द रेणुका चौधरी सभापतींच्या टिप्पणीविषयी कुठे तक्रार करताना दिसल्या नाहीत. पण त्यांना पंतप्रधानांची टिप्पणी रडकुंडीला आणणारी ठरलेली आहे. कारण कुठलाही अपशब्द वा अचकट विचकट हावभाव न करता, मोदींनी या महिलेला तिची योग्य जागा दाखवून दिलेली आहे. भाषणाला, त्यातील मुद्दे युक्तीवादाला शब्दांनी प्रतिसाद दिला जात असतो. त्याला सभ्यता म्हणतात. हे दिर्घकाळ संसदेत वावरलेल्या रेणुका चौधरींना अन्य कोणी सांगायला हवे काय? त्यांना हे ठाऊक असते, तर रेणुकांनी असले विचित्र आवाज काढून इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा आततायी पोरखेळ केलाच नसता. आपल्या विकट हास्यातून त्या मोदींना विनोदी ठरवून हास्यास्पद बनवायचा प्रयास करीत होत्या. तर त्यांचा तो केविलवाणा प्रयासही किती हास्यास्पद आहे, ते पंतप्रधानांनी मोजक्या शब्दात सांगून टाकले. उपस्थितांना ते उमजले आणि लाईव्ह प्रक्षेपण बघणार्या कोट्यवधी लोकांनाही कळले. कळले नाही ते फ़क्त पुरोगामी शहाण्यांना.
मोदींनी एका महिलेचा अपमान केला आणि तितक्या खालच्या पातळीवर आपण उतरणार नाही, अशी प्रतिक्रीया नंतर रेणूकाजींनी पत्रकारांसमोर दिली. पण मुळातच त्यांनी कुठल्या पातळीवर राज्यसभेला नेवून ठेवले आहे? गल्लीतला डोंबार्याचा खेळ किंवा मदार्याचा खेळ आणि संसदेचे कामकाज यात काही फ़रक उरला आहे काय? ज्याला सभापतींनी वेळ दिला आहे, त्याचे ऐकून घेणे आणि नंतर त्याचे मुद्दे खोडून काढण्याला संसदीय कामकाजाची पातळी म्हणतात. अन्य कोणी नव्हेतर देशाचा पंतप्रधान बोलत असताना विचित्र आवाज काढण्य़ाला उच्चपातळी म्हणत नाहीत. रेणुकाजी असे आवाज काढून राज्यसभेच्या प्रतिष्ठेलाच कलंक लावत होत्या. म्हणूनच त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय, अशी शंका खुद्द सभापतींनीच तेव्हा व्यक्त केली आणि त्यांना डॉक्टरांचे उपाचार घेण्यास सुचवलेले होते. त्यापेक्षा मोदींनी सभ्यपणे आपली सौम्य प्रतिक्रीया दिली. उलट मोदींनी रेणूकाजींना प्रोत्साहन देण्याचाच पवित्रा घेतला होता. सभापतींनी रेणूकाजींला हटकू नये, असे दुर्मिळ हास्य रामायण मालिका संपल्यावर दिर्घकाळ ऐकू आलेले नाही, हे मोदींचे शब्द होते. त्याला पातळी म्हणतात, रेणूकाजी! अपमान केला तरी शब्दांचा दर्जा घसरू दिला नव्हता. कारण मोदी पुरोगामी नाहीत की मणिशंकर अय्यर यांच्यासारखे उच्चविद्याविभूषित नाहीत. म्हणूनच त्यांना आपली पातळी सोडता येत नाही. सभ्यतेची पायमल्ली करण्याचा खास अधिकार फ़क्त पुरोगाम्यांसाठी राखून ठेवला आहे ना? कपील सिब्बल, मनिष तिवारी वा सोनियाजी यांना ती पातळी गाठण्याची मुभा आहे आणि मोदी आपली लायकी ओळखून असल्याने तितक्या ‘उच्च’ पातळीवर जात नाहीत. म्हणून तर त्यांनी बोचर्या पण सभ्य शब्दात आपली प्रतिक्रीया दिली. पण किती भिडणारी होती ना? मोदी यांनी कुठले नाव घेतले नाही वा अपशब्दही उच्चारला नाही. पण दुखायचे तिथे दुखलेच ना?
शब्द आणि बुद्धीचे सामर्थ्य साळसूदपणात सामावलेले असते. रेणूका वा तत्सम कॉग्रेसजनांना त्याचे भानही आज राहिलेले नाही. त्यांना राजकीय सभ्यतेची पातळी सोडून म्हणूनच खाली उतरावे किंवा घसरावे लागत असते. झाला प्रकार पुरेसा ठरवून त्यावर मौन पाळण्यात शहाणपणा होता. पण डाव मोदींवर उलटवण्याची अतिरेकी घाई आणखीच अंगाशी आली. मोदींनी फ़क्त रामायण मालिकेतील हास्याविषयी सांगितले होते आणि त्या मालिकेत कोणी एकच महिला पात्र हसलेले नाही. त्यामुळे मोदींनी रेणूकांना अमूक उपमा, दिली असा आक्षेप कोणी घेऊ शकत नाही. पण प्रथम रेणूकांनी प्रतिक्रीया देताना अपमान झाल्याचा कांगावा केला आणि त्यांच्या मागे उभे रहाताना विरप्पा मोईली या नेत्याने शुर्पणखाची उपमा कशाला द्यायची, असा सवाल करून आणखी हसे करून घेतले. मोदींच्या विधानातला संदर्भ अनेकांना कळला नव्हता. तो मोईलींनी उघड करून सांगितला. रामायणाचे उदाहरण द्यायला हरकत नाही. पण सीतेचे द्यावे, असे मोईली म्हणतात. पण मोदींनी कुठल्या महिला पात्राचे नावच घेतलेले नाही. त्यांना शुर्पणखा म्हणायचे होते, असे मोईलींना का वाटले? रेणुकांना आपली बरोबरी शुर्पणखेशी झाल्याची टोचणी कशाला लागली आहे? रेणूकांचे हसणे खरोखरच महिला सभ्यतेशी जुळणारे असते, तर त्यांनाही रामायणातील सीतेचेच स्मरण झाले असते. त्यांना शुर्पणखा आठवली, कारण त्या कशा आवाजात हसत होत्या. ते नेमके त्यांनाच ठाऊक होते. म्हणजेच त्यांच्या मनात शुर्पणखा असेल, तर त्याचा दोष मोदींच्या माथी मारता येणार नाही. मनि वसे तेस वनी दिसे म्हणतात, तसा हा खेळ आहे. आपणच रचलेल्या सापळ्यात कसे फ़सावे, ते आजकाल राहुलच्या कॉग्रेसी नेतृत्वाकडून शिकण्यासारखे आहे. रेणुका चौधरी व अन्य नेते त्याची सातत्याने प्रात्यक्षिकेच घडवीत असतात. आपणच आपल्यासाठी खड्डे खणून ठेवत असतात.
तुम्ही सभ्य वागत असाल, तर समोरच्यालाही तुमच्याशी सभ्य वागावेच लागते. पण तुम्ही सभ्यपणे वर्तन करत नसाल आणि तुमच्या मनात चोर असेल, तर त्याचे प्रतिबिंब तुम्हाला प्रत्येक जागी दिसू लागते. भाजपाचे अन्य नेते भले सभ्य असतील गप्प बसत असतील. पण मोदी हा माणुस अशी कुठलीही संधी सोडणारा नाही. तो अशा संधीची वाट बघत असतो. म्हणूनच प्रसंग आला तेव्हा मोदींनी रेणूकांसह अवघ्या कॉग्रेस पक्षाची जगासमोर पुरती नाचक्की करून टाकलेली आहे. त्यामुळेच चुक झाली म्हटल्यावर त्यावर पांघरूण घालून विषय संपवायचा असतो. पण अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणतात, तशी आजच्या कॉग्रेसची दुर्दशा झालेली आहे. अशा चुका करतात आणि मग त्या उलटल्यावर त्याचेच भांडवल करायचा कांगावा करून अधिक अडचणीत येतात. खरेतर हा प्रकार घडल्यावर रेणूकांचे कान उपटून कॉग्रेस नेतॄत्वाने तिच्यासह बाकीच्यांना समज द्यायला हवी होती. जसे तात्काळ मणिशंकर अय्यर यांना पक्षातून हाकलण्याचे नाटक रंगवण्यात आले होते. त्यापेक्षा रेणूकांचा खुळेपणा किंचीतही वेगळा नाही. पण इथे कॉग्रेसने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. कारण निवडणूका वाहिन्यांच्या चर्चेतून वा माध्यमातील बातम्यांनी जिंकता येत नसतात. जनमानसातील तुमची प्रतिमा व लोकांच्या भावना, हाच निवडणूकीत मते मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यात रेणूका चौधरींनी कॉग्रेसला तोंडघशी पाडलेले आहे आणि मोदींनी अकस्मात आलेल्या त्या संधीचा सोन्यासारखा उपयोग करून घेतला आहे. त्यातून मोदींनी दिलेला संदेश सामान्य लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा मुर्खपणा असे विषय वाढवून होत असतो. पण हे नव्या रेणुकाभक्तांना कोणी सांगायचे? रेणूकाभक्ती म्हणजे काय, ते इथे सांगणे प्रस्तुत नाही. ज्यांना तितकी हौस व जिज्ञासा असेल, त्यांनी रेणूकादेवी विषयक शोध घ्यावा.
Mastach bhau.modiji vaijpeyi kiva Anya kuni mahit the modi ahet he Congress LA ajun kalalele disat nahi.renuka tar ashrasha radlya camerasamor.
ReplyDeleteया क्रियेला 'खिंकाळणे' हा शब्द जास्त योग्य आहे
ReplyDeleteअनेक दिवसात न वापरलेला वा ऐकलेला पण लहानपणी नियमित ऐकलेला शब्द तुम्ही सुचवलात, धन्यवाद
Deleteबहोत खूब, सुधीरजी!
Deleteतुम्ही म्हणता ते खरं आहे कारण एका हिंदी वाहिनीवर सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया याविषयी घेतल्या तेव्हा त्यांचे मते मोदींचे काही चुकलेले नाही असंम्हणणंपडलं.
ReplyDeleteमोदींनी तसेही कोणाचे नाव घेतले नव्हते, त्यामुळे ताबडतोब सीता माते ची उपमा दिली म्हणुन धन्यवाद मानता आले असते. पण आपण राक्षसी हसलो हे त्या बयेने पुढे कृतीतुन मान्य केले.
ReplyDeleteरामायण मधल्या त्या शूर्पणखा झालेल्या नटीचे नावसुद्धा रेणुका चौधरी आहे असे कुठल्यातरी च्यानेलवर दाखवत होते.तसे असेल तर केवढा मोठा योगायोग.
ReplyDeleteमोदींचे काही चुकले नाहीच.
ReplyDelete