कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचे पुढे काय झाले? आता त्या घटनेला तीन वर्षे उलटून गेली आहेत. पण सुनावणी सुरू होऊन खर्या गुन्हेगारांना शिक्षा होण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. जे पानसरे हत्येचे तेच डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येचे झाले आहे. त्या घटनेला साडेचार वर्षे उलटून गेली आहेत आणि कुणालाही त्याविषयी काही फ़िकीर असल्याचे जाणवत नाही. कारणही स्पष्ट आहे. ‘आम्ही सारे’ दाभोळकर किंवा ‘आम्ही सारे’ पानसरे असे नाटक रंगवणार्यांना त्याविषयी कधीच आस्था नव्हती. आपला राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी हा सगळा तमाशा चाललेला होता आणि कर्नाटकात कलबुर्गी यांची हत्या तशीच झाल्यावर, त्याच तमाशाचे नवे कानडी प्रयोग जोरात झालेले होते. आता अलिकडे काही महिन्यांपुर्वी बंगलोर येथे गौरी लंकेश या महिला पत्रकाराची तशाच पद्धतीने हत्या झाल्यावर त्यापेक्षा मोठा तमाशा रंगवण्यात आला. सुदैव इतकेच की तो निव्वळ तमाशा आहे, असे सांगायला गौरीचा भाऊ तरी पुढे आला. हा सगळा निर्ढावलेला घटनाक्रम बघितला, मग दोन दशकापुर्वीच्या रमेश किणी प्रकरणाची आठवण येते. त्याही वेळेस असाच माध्यमातून मोठा तमाशा रंगलेला होता. पण त्याच्या हत्येचे रहस्य उलगडण्याची उत्सुकता त्यापैकी कोणालाही नव्हती. जेव्हा ते प्रकरण घडले त्यावेळी रमेशची पत्नी शीला किणी यांना घेऊन फ़िरणार्यांना नंतरच्या काळात त्याच महिलेचे निधन कधी झाले व तिच्या न्यायाचे पुढे काय झाले, त्याची गंधवार्ताही नव्हती. पण आरंभीच्या काळात युती सरकारच्या विरोधात राजकीय मुद्दा म्हणून रमेश किणी हत्याकांडाचा डंका नित्यनेमाने पिटला जात होता. अगदी आताच्या हत्याकांडाप्रमाणे त्याही संशयास्पद मृत्यूचे राजकीय भांडवल करण्यात आलेले होते. गिधाडांनाही लाजवणारे हे नाटक किती किळसवाणे आहे, त्याची जाणिव व्हावी म्हणूनच उजळणी करणे भाग आहे.
दादरच्या हिंदू कॉलनी भागातील एका जुन्या इमारतीतला रहिवासी रमेश किणी याने जागा रिकामी करावी म्हणून घरमालक त्याच्या मागे लागला होता. त्यासाठी त्यांनी शिवसेनेचे तात्कालीन तरूण नेते राज ठाकरे यांना मध्यस्थी करायला सांगितले होते. त्याप्रमाणे राजनी किणी यांना बोलावून चर्चा केली होती. पुढल्या दिवसात किणी यांचा मृतदेह पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये आढळला आणि अफ़वांचे रान उठवण्यात आले. विधान परिषदेतील विरोधी नेता असलेल्या छगन भुजबळ यांनी त्याचे काहुर माजवले. तो मृत्यू संशयास्पद होता, यात शंकाच नाही. पण किणी यांनी डायरी लिहून ठेवली, त्यात राजच्या भेटीचा संदर्भ आल्यामुळे त्या मृत्यूमध्ये राज यांचाच हात असल्याचे आरोप सुरू झाले. पोलिस व गुन्हे अन्वेषण खात्याने तपास करूनही काही हाती लागलेले नव्हते. पण राज ठाकरे यांच्यावर बेछूट आरोप प्रत्येक माध्यमातून चालले होते. अगदी हायकोर्टात जाऊन सीबीआय चौकशीची मागणी झाली आणि ती मंजूरही झाली. पण त्याही तपासात राज विरोधात काही सापडले नाही आणि विषय धुळ खात पडून गेला. नंतर युतीची सत्ता गेली आणि कोणालाही रमेश किणीचे स्मरण राहिले नाही. जनता पक्षाच्या पुरोगामी प्राध्यापिका पुष्पा भावे त्या कालखंडात सर्व कामे बाजूला ठेवून रमेशची विधवा पत्नी शीला किणी यांना एका कोर्टातून दुसर्या कोर्टात फ़िरवण्यासाठी अहोरात्र राबत होत्या. दरम्यान राज यांचा एक सहकारी आणि घरमालक पितापुत्र शहा यांना त्यात आरोपी बनवले गेले. दिर्घकाळ ते गजाआड जामिनाशिवाय खितपत पडलेले होते. पण पुरावे किंवा तपासात काहीही सापडले नाही आणि अखेरीस त्या सर्वांना कोर्टाकडून निर्दोष सोडण्याची नामुष्की आली. पुरावेच नव्हते किंवा सिद्ध होणारे पुरावे नव्हते, तर मुळात अटक कशाला झाली? जामिन का नाकारला गेला आणि त्यांना तुरूंगात खितपत कशाला डांबले गेले?
दाभोळकर पानसरे प्रकरणातील विविध आरोपी व संशयितांची कहाणी काडीमात्र भिन्न नाही. फ़रक किरकोळ आहे. किणीच्या प्रकरणात खटला चालला आणि आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. या दोन्ही प्रकरणात नुसताच धुरळा उडवला गेला आहे. पण खटला चालविण्याइतकेही पुरावे तपासात मिळालेले नाहीत. त्याचेही कारण समजून घेण्यासारखे आहे. दाभोळकर वा पानसरे यांच्या प्रकरणात कुणालाही न्याय नको आहे. न्याय म्हणजे खरे खुनी पकडून त्यांना शिक्षापात्र ठरवणे होय. परंतु इथे कोणाला न्याय हवा आहे? त्यासाठी घसा कोरडा करणार्यांना या निमीत्ताने आपला राजकीय अजेंडा पुढे रेटायचा आहे. तेव्हाही कथा वेगळी नव्हती. राज ठाकरे किंवा त्यांच्या आडोशाने शिवसेनेला गोत्यात घालण्यासाठी किणी मृत्यूचा उपयोग केला जात होता. त्याला किंवा त्याच्या पत्नीला न्याय देण्याची कळकळ कोणालाच नव्हती. म्हणून तर राजला अटक होत नाही, हे बघितल्यावर ‘आम्ही सारे किणी’ थंडावले होते आणि त्यावर धुळीचे थर चढत गेले. पुढे युतीची सत्ताच संपुष्टात आली आणि कोणालाही किणीचा मृत्यू स्मरणातही राहिला नाही. दाभोळकर वा पानसरे कथा वेगळी नाही. त्या हत्यांचा राजकीय अजेंडा बनवण्यात आला. तरीही भाजपाने निवडणूक जिंकली आणि ‘आम्ही सारे दाभोळकर’ थंडावले. मग पानसरे हत्याकांड झाले आणि त्याचाही भाजपा सरकारच्या विरोधात जोशाने वापर झाला. त्यात खरे आरोपी किंवा खुनी पकडण्याची मागणी कोणीच करीत नव्हता. पहिल्या दिवसापासून सनातन या हिंदू संघटनेला आरोपींच्या पिंजर्यात उभे करण्यापुरती ही लढाई होती. म्हणून पोलिसांनीही सनातनशी संबंधित दोघांना अटक केल्यावर ‘आम्ही सारे’ सुखावले आणि विषय विस्मरणात गेला. आता त्य दोन्ही आरोपींच्या विरोधात कसलेही सज्जड पुरावे नाहीत म्हणून त्यांनाही जामिन मिळाला आहे. पुढे काय?
किणी प्रकरणाचा एक दुवा इथे मुद्दाम सांगितला पाहिजे. त्यात ज्या पत्राच्या आधारे राज ठाकरेंना संशयित बनवण्याचा आटापिटा चालला होता, ते पत्र किणीची सही असली तरी लिहिले होते त्याच्या पत्नीने! आपल्या विमनस्क मनस्थितीतील पतीने आपल्याला सांगितले आणि आपण डायरीत लिहून ठेवले, असा शीला किणींचा दावा होता. त्याविषयी अधिक तपास कधीच झाला नाही. जी पत्नी मृत्यूनंतर इतके आकाशपाताळ एक करीत होती, तिनेच पतीने आत्महत्येचे विचार डोक्यात घोळत आहेत असे म्हटल्यावर लिहून ठेवले. पण त्याची कुठे वाच्यता केली नाही? जणू पतीच्या आत्महत्येनंतर उपयोगात येणारे पुरावेच शीला किणी जमा करत होत्या. पण आत्महत्येपासून पतीला परावृत्त करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत मागितली नाही की पुष्पा भावे यांनाही मदतीला बोलावले नाही. भुजबळांना मध्यस्थीला घेतले नाही. आत्महत्येची प्रतिक्षा करण्यात दिवस घालवले? ही शंकास्पद बाब कुठेही का तपासली गेली नाही? तेव्हा तपास वा मागणी राज ठाकरेंच्या अटकेची होती आणि ती होत नसल्याने ‘आम्ही सारे’ त्यातून दुर झाले. आताही सनातनच्या कोणाला तरी अटक होण्याशी मतलब होता आणि तसे डमी पोलिसांनी अटक केल्यावर हिंदूत्ववादी संघटनांवर आरोप करण्याची बेगमी झाली. कोणाला खरे मारेकरी हवे असणार? तमाशाचा गाशा गुंडाळला गेला. सनातनवाला नसेल, तर अन्य कोणी भलत्या कुठल्या हेतूने दाभोळकर पानसरे यांच्या हत्या करू शकतो काय? याचा विचार का होत नाही? तसा माग कशाला काढला जात नाही? तसे केल्यास खरे मारेकरी सापडतील आणि हिंदूत्ववादी संघटनेला क्लिन चीट मिळण्याची भिती सतावते ना? कारण यापैकी कोणालाही अशा हत्येविषयी कसलीही अनुकंपा नाही की दु:ख नाही. त्यांच्यासाठी या हत्या निव्वळ राजकीय भांडवल आहे ना? म्हणून ‘आम्ही सारे’ हाताची घडी घालून, तोंडावर बोट ठेऊन गप्प बसले आहेत.
भाऊ खरच आपला देश रामभरोसेच चाललाय ........... माणसच सिस्टीम बनवतात आणि माणसच किडलेली आहेत आपल्या देशात, सिस्टीम किडणारच कितीही फवारणी केली तरी.
ReplyDeleteउद्या जर दाभोलकर किंवा पानसरे ह्यांचे मारेकरी खरोखरच सापडले तर त्याचा सर्वात जास्त मानसिक क्लेश पुरोगाम्यांना होईल कारण त्यांच्या इंव्हेनटरी मधला एक अत्यंतिक नकदी आणि गर्दी खेचणारा मुद्दा कमी होईल.
ReplyDeleteWow, what an analysis.
ReplyDelete