Monday, February 5, 2018

आयडिया ऑफ़ कॉग्रेस

संबंधित इमेज

जे कोणी इंग्रजी वाहिन्यांवरील चर्चा ऐकत असतील वा इंग्रजी वर्तमानपत्रे चाळत असतील, त्यांना सतत एक शब्दावली कानावर पडत असते. ‘आयडिया ऑफ़ इंडिया’. त्याचा अर्थ असा, की हे मुठभर शहाणे लोक नेहमी भारताची वा इंडियाची संकल्पना किती धोक्यात आहे, त्यावरून बोलत असतात. त्याचीच चिंता करत असतात. पण दरम्यान खर्‍याखुर्‍या भारताची व भारतीयांची काय स्थिती आहे, याची त्यांना फ़िकीर नसते. कालपरवा पद्मावत नावाच्या चित्रपटावरून अशा लोकांना राज्यघटनेने बहाल केलेल्या अविष्कार स्वातंत्र्याच्या गळचेपीने भयभीत केलेले होते. पण त्याच राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला सुखरूप जगण्याचा अधिकारही बहाल केलेला असताना नित्यनेमाने बलात्कार व हत्याकांडे घडत असतात, त्याची यांना अजिबात भिती वाटलेली नाही. अर्थात त्यावरही असे लोक अधूनमधून बोलत असतात. पण पहिली गोष्ट नुसती कल्पना आहे आणि दुसरे भौतिक वास्तव आहे. यातला फ़रक त्यांना तितका उमजत नसावा. असो, असा बुद्धिजिवी वर्ग ज्या देशात वा समाजात असतो, त्याला कधीही नेमके मार्गदर्शन होऊ शकत नाही. वास्तव जीवनात त्याला कोणी दिशा दाखवू शकत नाही. अशी़च एक कल्पना आहे, कॉग्रेस नामक पक्षाची! जे लोक इंडियाच्या कल्पनेत रममाण झालेले असतात, त्यांच्या वास्तव जीवनातही अनेक कल्पनांवरच विश्वास असतो. त्या कल्पनांवरच ते अधिक विश्वास ठेवतात. पण ती कल्पना प्रत्यक्षात समोर आली, तर हेच लोक भयभीत होऊन पळ काढत असतात. कॉग्रेस नावाचा पक्ष ही अशीच एक कल्पना आहे. ती कुठली विचारधारा किंवा संघटना नाही. देशातील विविध समाजघटक व विचारांच्या गटांना एकत्र करून, त्यांच्या सहमतीने चालणारा कारभार वा पक्ष, असे त्याचे मूळ स्वरूप आहे. आज समोर दिसणारा आजचा कॉग्रेस पक्ष त्या संकल्पनेत बसणारा नाही. त्या संकल्पनेने आता नवे नाव किंवा रुप धारण केलेले आहे. पण कल्पनाविलासातून शहाणे बाहेर पडले तर ना?

स्वातंत्र्यपुर्व काळात ब्रिटीश सत्तेला आव्हान देणारे व एतद्देशीय जनतेचा आवाज उठवणारे म्हणून जे विविध गट उभे रहात गेले, त्यांचा महासंघ तयार झाला. त्यालाच तेव्हा भारतीय राष्ट्रसभा किंवा कॉग्रेस संबोधले जाऊ लागले. त्यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कम्युनिस्ट वा समाजवादी चळव्ळी उदयास येत गेल्या. अशा विभिन्न मतप्रवाह किंवा वैचारिक भूमिकांना कॉग्रेसने आपल्यात सामावून घेतलेले होते. ती कुणा एका घराणे खानदान वा नेत्याची मक्तेदारी नव्हती. किंबहूना कॉग्रेसची म्हणून काही उजवी-डावी विचारधारा नव्हती. सर्वसमावेशक हा कॉग्रेसचा निकष होता. आज ती वा तशी कॉग्रेस शिल्लक राहिली आहे काय? नसेल, तर त्या कॉग्रेसपाशी जुन्या स्वातंत्र्य चळवळ किंवा लढ्याचा वारसा असल्याचा दावा ही शुद्ध दिशाभूल असते. अर्थात हा जुना वाद आहे. खुद्द महात्मा गांधींनी ब्रिटिश भारत सोडून गेल्यानंतर कॉग्रेस विसर्जित करण्याचा विषय मांडलेला होता. पण त्याला तात्कालीन कॉग्रेस नेत्यांनी झुगारून लावले होते. कारण जुन्या कॉग्रेसच्या पुण्याईवर त्यांना नव्या सत्तेत यश मिळणार होते. त्यामुळे नाव स्वातंत्र्य लढ्याचे लावण्यात आले. पण क्रमाक्रमाने कॉग्रेस एककल्ली होत गेली. विचारधारेला बांधील होत गेली आणि एका घराण्याकडे गहाण पडली. तरीही तिला पर्याय उभे राहू शकले नाहीत. आरंभीचा म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांचा जमाना मागे पडत गेला, तसतसे कॉग्रेमध्ये सत्तापिपासू भामटेही एकत्र होत गेले आणि त्या पक्षाला विविध पर्याय समोर येत गेले. आरंभीच्या काळात समाजवादी व कम्युनिस्ट असे डाव्या बाजूला झुकणारे पर्याय होते, तसाच संस्थानिक व सरंजामदार भांडवलशाहीला मानणारा एक तिसरा पर्याय होता. स्वतंत्र पक्ष वा जनसंघ, असे त्यातून पुढे आलेले दोन पक्ष होते. पण १९७० नंतर स्वतंत्र पक्ष बरखास्त झाला. तो भांडवलदारांचा असला तरी आजच्या कॉग्रेस वा साम्यवादी लोकांपेक्षा अधिक प्रामाणिक होता.

१९७१ नंतरच्या काळात इंदिराजींनी समाजवादाची कास धरली आणि राज्यघटनेत समाजवाद हा शब्द समाविष्ट केला. त्याचे दोन परिणाम झाले. प्रत्येक नोंदणीकृत पक्षाला आपण समाजवादी भूमिकेला बांधील असल्याचे कबुल करावे लागत असल्याने, स्वतंत्र पक्षाने आपला गाशा गुंडाळला. त्याला तत्वत:च समाजवाद मान्य नव्हता. तर त्याने पक्षच बरखास्त करून टाकला. त्यातले अनेकजण मग इतर पक्षात सहभागी झाले. काहीजण जनसंघात गेले तर काहींनी कॉग्रेसचा मार्ग चोखाळला. स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत कॉग्रेस समाजवादी पक्ष नव्हता. पण लोहिया, जयप्रकाश, नरेंद्र देव असे काही समाजवादी विचारांचे लोकही कॉग्रेस सोशलिस्ट गट कॉग्रेसमध्ये चालवित होते. तर हिंदूमहासभा मानणारेही कॉग्रेसच्या सोबतच असायचे. आज केरळचे मुख्यमंत्री असलेले मार्क्सवादी नेते विजयन हे मुळातच चरखा मंडळातून राजकीय क्षेत्रात आले. इतकी विविधता कॉग्रेसमध्ये होती आणि अनेक गट संभाळून कॉग्रेस चालत होती. जोपर्यंत अशा स्वरूपात कॉग्रेस चालली होती, तोपर्यंत तिला राजकीय आव्हान उभे राहू शकले नव्हते. पण १९७० नंतरच्या कालखंडात कॉग्रेस नेहरू-गांधी घराण्याची बटीक बनली आणि त्या पक्षात अन्य कोणाला स्थान राहिले नाही. अन्य गटांना वाव राहिला नाही. सहाजिकच त्यापासून विभक्त होत अनेक पक्ष व प्रादेशिक पक्ष उदयास येत गेले. नेमक्या त्याच कालखंडात जनसंघ म्हणून राजकारणात बस्तान बसवू बघणार्‍या राजकीय गटाने स्वातंत्र्यपुर्व कॉग्रेसचा वारसा कृतीतून जोपसण्याचा वसा घेतला होता. आज ज्याला आपण भाजपा म्हणून ओळखतो, तो जुना जनसंघ होय. एका बांधील विचारात व बंदिस्त संघटनेमुळे आपल्याला सर्वसमावेशक होता येणार नसल्याची जाणिव त्या पक्षाच्या नेतृत्वाला १९८० च्या दशकात झाली. तिथून त्यांनी कॉग्रेसला पर्याय होण्याचा चंग बांधला. आज तमाम पुरोगामी व कॉग्रेसजन ज्याच्या नावाने नाक मुरडतात, तो भाजपा असा आजच्या युगातली कॉग्रेस झालेला आहे. कारण तोच आयडिया ऑफ़ कॉग्रेस घेऊन आपला विस्तार करत चालला आहे.

आजच्या पिढीतल्या अनेकांना व प्रामुख्याने अनेक कॉग्रेसजनांना आपलाच पुर्वेतिहास ठाऊक नाही. देशाची फ़ाळणी झाली, तेव्हा एका बाजूला कॉग्रेस पक्ष होता आणि दुसर्‍या बाजूला मुस्लिम लीग होती. तेव्हा कॉग्रेसला हिंदूंचा पक्ष मानले जात होते आणि हिणवलेही जात होते. अगदी त्या पक्षात अनेक ज्येष्ठ जाणते मुस्लिम नेते असतानाही कॉग्रेस हिंदूंचा पक्ष ठरवलेला होता. नेमके शब्द काय असतील ते समजून घ्यायचे असेल, तर आज भाजपाला हिंदू पक्ष ठरवण्यासाठी जी भाषा वापरली जाते, तेच शब्द तेव्हाही होते आणि ते कॉग्रेससाठी वापरले जात होते. त्यात तथ्यही होते. बहुसंख्य असूनही हिंदू समाज धर्मांध नसल्याने त्याने उदारमतवादी कॉग्रेसला आपला नेता मानलेले होते. पण १९७० नंतरच्या काळात कॉग्रेसला आपण हिंदूंच्या हिताचे राखणदार असल्याचा विसर पडत गेला आणि तिथून हिंदू समाजात वेगळा विचार मूळ धरू लागला. किंबहूना त्यामुळे सर्वसमावेशक पण हिंदूंच्या विरोधात असलेला पक्ष अशी कॉग्रेसची प्रत्तिमा होर्त गेली. याची जाणिव हिंदू बहुसंख्यांकामध्ये वाढीस लागली. नेमक्या त्याच कालखंडात भाजपानेही आपले हिंदूत्व वा एकांगीपणा सोडूना सर्वसमावेशक होण्याचा पवित्रा घेतला. पर्यायाने कॉग्रेसपासून दुरावणारा हिंदू समाज वा वर्ग भाजपाकडे आकर्षित होऊ लागला. पण मुस्लिम मतपेढीच्या आहारी गेलेल्या कॉग्रेसने अधिकाधिक मुस्लिम लांगुलचालन करून भाजपाच्या विस्ताराला हातभार लावण्याचे कार्य केले. मोदींच्या रुपाने खंबीर नेता भाजपाला मिळाल्यावर भाजपाची कॉग्रेस होण्याच्या कामाला गती मिळाली. आज कुठल्याही पक्षातून वा विचारधारेच्या संघटनेतून भाजपामध्ये कार्यकर्ते व नेते सहभागी होत गेलेले दिसतात. त्याचे हे़च कारण आहे. १९४७ नंतर २००० पर्यंत हेच कॉग्रेसच्या बाबतीत चालले होते आणि आता ते़च भाजपात घडताना दिसत आहे.

भारतातले राजकीय अभ्यासक वा जाणकार मात्र हा फ़रक बघू शकलेले नाहीत, की त्या रुपांतराचा अर्थ समजून घेऊ शकलेले नाहीत. किंबहूना भारतीय विचारक्षेत्रातील लोक अजून १९७० च्या दशकात अडकून पडलेले आहेत. त्यांच्या लेखी अजून भाजपा म्हणजे संघाच्या गणवेशातील स्वयंसेवक आहे आणि कॉग्रेस आजही नेहरूंच्या युगात आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. आज नेहरू पटेल वा इंदिराजी राहिलेल्या नाहीत, की त्यांच्या कालखंडातल्या कॉग्रेसचे कुठलेही लक्षण आजच्या राहुल सोनिया कॉगेसमध्ये आपल्याला शोधून सापडणार नाही. त्यांच्यापाशी अजून ते तिरंगी लेबल जरूर आहे. पण बाटलीतला माल भलताच आहे. मग त्याच भेसळयुक्त दारूचे घुटके घेऊन तथाकथित अभ्यासक विश्लेषण करीत असतात. पण वास्तवात आज भाजपाही मुळचा जनसंघ राहिलेला नाही. त्याचे रंगरूपही आमुलाग्र बदलून गेलेले आहे. हेमंत बिश्वशर्मा किंवा रिटा बहुगुणा यांच्यासारखे पट्टीचे कॉग्रेसजन भाजपात मिसळून गेले आहेत आणि रंगनाथन कुमारमंगलम यांच्यासारखे हाडाचे कम्युनिस्टही सहज भाजपात सहभागी झालेले होते. त्याची मिमांसा यापुर्वीच व्हायला हवी होती. स्वातंत्र्याच्या पहिल्या अर्धशतकात मध्यवर्ति कॉग्रेस पक्ष आणि भोवताली लहानमोठे व प्रादेशिक पक्ष; अशी देशाची राजकीय रचना होती. आजही ती कायम आहे. फ़क्त कॉग्रेस नावाचा पक्ष नामशेष होत चालला असून, त्याचीच कामगिरी भाजपाने पुढे चालविली आहे. आता भाजपा हा देशातील मध्यवर्ति पक्ष झालेला असून, बाकीच्या पक्षांना त्याच्या भोवताली फ़िरावे लागते आहे. कधी त्यातले अन्य पक्ष भाजपासोबत येतात, तर कधी कंबर कसून विरोधात उभे ठाकतात. यात मध्यवर्ति स्थान कॉग्रेसने कधीच गमावले आहे. पण त्याची जागा भाजपाने संपादीत करण्यास विलंब झाल्याने कोणाला त्याचे भान आलेले नसावे. वाजपेयींच्या कारकिर्दीत सुरू झालेले चक्र मोदींनी २०१४ सालात पुर्ण केले.

म्हणूनच १९७७ वा १९९१ सालात कॉग्रेस पुन्हा सत्तेपर्यत पोहोचली, त्याची तुलना सोनियांनी कॉग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्याशी होऊ शकत नाही. कारण २००० पर्यंतचे सर्व राजकारण कॉग्रेस भोवती फ़िरत होते आणि कॉग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवणे, हा बहुतेक उजव्या डाव्या पक्षांचा अजेंडा होता. त्यासाठी आपापल्या विचारधारा बाजूला ठेवून सर्व बिगरकॉग्रेस पक्ष विचार करायचे आणि भूमिका घ्यायचे. २००० नंतरच्या काळात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची भूमिका पटलावर आली आणि भारतीय राजकारणाचा निकष बनली. तिथेच कॉग्रेस संपलेली होती. म्हणून तर इतिहासात प्रथमच सोनियांच्या नेतृत्वाखाली २००४ व २००९ सालात कॉग्रेसने देशातील अनेक लहानमोठ्या पक्षांशी जागावाटप व सत्तेत भागिदारी करण्यापर्यंत माघार घेतलेली होती. इंदिराजींनी १९८० सालातही एकाकी लढत दिली होती आणि अल्पमतात असतानाही नरसिंहराव यांनी पाच वर्षे कुठल्याही पक्षाला सत्तेतला हिस्सा दिल्याशिवाय सरकार चालविले होते. मनमोहन सिंग यांना ममता, लालू वा द्रमुकलाही वेसण घालता आलेली नव्हती. आता तर कुठल्याही पक्षाशी युती आघाडी करण्यापर्यंत कॉग्रेस लुळीपांगळी झालेली आहे. कारण कॉग्रेसने मध्यवर्ती पक्ष असण्याचा जमाना संपुष्टात आलेला आहे. १९८० ते २०१४ पर्यंत इतर पक्षांना सोबत घेऊन आपली राजकीय बाजू बळकट करण्याच्या स्थितीत तेव्हा भाजपा होता. नेमकी तशा स्थितीत आजची कॉग्रेस आलेली आहे. खेरीज तेव्हाचा भाजपा जसा बिगरकॉग्रेसी राजकारणाने प्रेरीत झालेला होता, त्याच भूमिकेत आताची कॉग्रेस येऊन ठेपलेली आहे. कॉग्रेस स्वबळावर उभी करणे, हा विषय कोणी कॉग्रेसमध्ये बोलतही नाही. भाजपाला रोखणे वा पराभूत करणे, ह्यासाठी कॉग्रेस कोणाशीही तडजोडीला सज्ज आहे. तर भाजपाने शत प्रतिशत भाजपा अशी भूमिका पुढे रेटलेली आहे.

आशय इतकाच आहे, की आता भाजपा हीच एकविसाव्या शतकातली कॉग्रेस आहे. १९५० सालातली कॉग्रेस जसा हिंदू धर्माच्या आहारी न गेलेला, पण हिंदूंचा पक्ष होता आणि सर्वसमावेशक होता, तसे आजच्या भाजपाचे स्वरूप आहे. तो १९६० मधला जनसंघ राहिलेला नाही, की १९९० मधला मंदिराचे राजकारण करणारा हिंदूत्ववादी पक्ष राहिलेला नाही. भारतीय राजकारणाचे मध्यवर्ति केंद्र, हे आजच्या भाजपाचे मुख्य स्वरूप आहे आणि मोदींनी जाणिवपुर्वक भाजपाला त्या रुपात आणलेले आहे. हिंदूत्व हे मनात ठेवायचे, पण अन्य धर्मियांना सापत्न भावनेने वागवायचे नाही. ही त्याची मुळ संकल्पना आहे. स्वातंत्र्यपुर्व काळातही तशीच कॉग्रेस होती आणि स्वातंत्र्योत्तर आरंभीच्या काही वर्षात ते़च कॉग्रेसचे स्वरूप होते. आजची कॉग्रेस तर पाकिस्तानी भूमिकेचेही समर्थन करण्यापर्यंत घसरून गेलेली आहे. आजच्या कॉग्रेस नेतृत्वाला तर आपलाच ऐतिहासिक वारसाही आठवेनासा झाला आहे. मजेची गोष्ट म्हणजे आयुष्यभर कॉग्रेसविरोध वा बिगरकॉग्रेसी राजकारण केलेल्या अन्य पक्षांनाही आपला जुना काळ आठवताना दिसत नाही. समाजवादी, कम्युनिस्ट वा प्रादेशिक पक्ष जसे दोनतीन दशकापुर्वी भाजपाशी हातमिळवळी करीत होते, तशीच आज कॉग्रेसशी करताना दिसतात. पण त्यांना कॉग्रेस आणि भाजपाचे बदलले रूप मात्र ओळखता आलेले नाही. ही खरे तर कॉग्रेस आणि अशा अन्य पक्षांच्या राजकीय समजूतीची शोकांतिका आहे. म्हणूनच समाजवादी वा कम्युनिस्ट पक्ष व चळवळी अस्ताला लागलेल्या आहेत. जग भाजपाच्या जमान्यात आले आहे आहे आणि पुरोगामी पुढारी व राजकीय अभ्यासक मात्र आजही आयडिया ऑफ़ कॉग्रेसच्या अस्तंगत संकल्पनेत मशगुल होऊन राहिलेले आहेत. वास्तवात भाजपाने ती संकल्पना काबीज केली असून, तोच पक्ष आता विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील कॉग्रेसचा वारसा पुढे घेऊन चालला आहे.

4 comments:

  1. अप्रतिम लेख भाऊ....

    ReplyDelete

  2. https://en.wikipedia.org/wiki/Ship_of_Theseus

    ReplyDelete
  3. भाऊ मि आपल्या मताशी सहमत नाही यांनी 70 वर्षात हिंदुना षंड करायचे काम केलय पूर्वी शाळेत दांडपट्टा तलवारबाजी लाठी सारखे शिक्षण दिले जात होते हे आता सर्व बंद केलय जिहादिना मात्र कोठलेही बन्धन नाही

    ReplyDelete