Thursday, February 15, 2018

पाकची भिस्त अय्यरवर

manishankar in pakistan के लिए इमेज परिणाम

संजुआन या जम्मूतील एका लष्करी तळावर अतिरेक्यांनी हल्ला केला आणि त्यात सात जवान शहीद झाल्यावर भारतात नेहमीच्याच प्रतिक्रीया उमटल्या. त्यावरून राजकारण सुरू झाले आणि जोवर भारताच्या संरक्षण मंत्रालयाची प्रतिक्रीया नव्हती, तोवर पाकिस्तानने त्याची दखल घेतली नव्हती. पण संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीनगरला जाऊन मतप्रदर्शन केले, तेव्हा पाकिस्तानची झोप उडालेली आहे. योग्य उत्तर देऊ इतकेच सीतारामन म्हणाल्या. पण पाकने युद्धाला उत्तर देण्यास आपण समर्थ असल्यापर्यंत टोकाची भाषा केलेली आहे. भारताने कधी युद्धाचा पवित्रा घेतलेला नाही, की तशी भाषाही वापरलेली नाही. मग पाकिस्तानला असे शब्द व भाषा कशाला वापरावी लागत असेल? तर त्याची मदार सेनादलावर नसून लढण्याचे काम पाक सेनादलाने अलिकडे अतिरेक्यांवर सोपवलेले आहे. पाकिस्तानी सेनादल आजकाल अंतर्गत नागरी सुरक्षा करण्यापुरते मर्यादित झाले आहे. तहरिके तालिबान किंवा अन्य जे लहानसहान जिहादी घटक आहेत, त्यांचा बंदोबस्त करताना पाक सेनेची दमछाक होते आहे. सहाजिकच त्यांना खुलेआम युद्ध नको आहे. जिहादी घातपाताच्या पलिकडे युद्धाची व्याप्ती जाऊ नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. भारताने तसे काही पाऊल उचलले तर पाकिस्तान नावाचा पत्त्याचा बंगला कोसळायला वेळ लागणार नाही. याची तिथल्या राज्यकर्त्यांसह सेनाधिकार्‍यांनाही खात्री आहे. म्हणूनच युद्धाचा विषय निघाला तरी त्यांना घाम फ़ुटत असतो. वाजपेयींच्या जमान्यात पाकिस्तानकडे अणुबॉम्ब होता. पण तशी धमकी देण्यापेक्षा अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या मध्यस्थीने कारगिल युद्ध गुंडाळण्याच्या गयावया कराव्या लागलेल्या होत्या. आज त्यापेक्षाही वाईट स्थिती आहे. सहाजिकच संजुआनच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्य़ासाठी भारताने काही केले तर, या शंकेने पाकची झोप उडालेली आहे.

सर्जिकल स्ट्राईक वगैरे काही करायला गेलात तर मोठी किंमत मोजावी लागेल, असा धमकीवजा इशारा देण्यात आलेला आहे. खरेच त्यात किती दम आहे? पाकची तेवढी हिंमत व क्षमता असती, तर उरीनंतरच्या सर्जिकल स्ट्राईकला चोख प्रत्युत्तर पाकिस्तान देऊ शकला असता. पण तो सर्जिकल स्ट्राईक उरकल्यावर आणि भारताने तशी घोषणा केल्यावरही पाकला उत्तर देता आले नाही. म्हणून मग असा कुठलाही स्ट्राईक झालेला नाही, हे भासवण्यासाठी परदेशी पत्रकारांना विमानातून अन्य भागामध्ये फ़िरवून पाकने सारवासारव केलेली होती. अगदी अलिकडे पाक प्रदेशात घुसून तशीच कारवाई झाली, त्यानंतरही पाकने कुठली हिंमत दाखवलेली नाही. पण तोंडाच्या वाफ़ा दवडण्याला मात्र मर्यादा नसते. तरीही एक प्रश्न असा उदभवतो, की अशी भाषा तिकडून कशाला वापरली गेली आहे? त्याचे उत्तर भारतीय प्रदेशात जमवाजमव हेच आहे. त्याचा तपशील पाकिस्तानकडेही असतो. सीमापार होणार्‍या लष्करी हालचाली अदृष्य़ असू शकत नाहीत. त्याची खबरबात कमीअधिक प्रमाणात शेजारी देशाला मिळतच असते. शस्त्रसामग्री व चिलखती दळांच्या हालचाली लपून रहात नाहीत. भारतीय हद्दीत तशा हालचाली होत असतील, तर दिल्ली मुंबईपेक्षा व्याप्त काश्मिरातील पाकिस्तानी सेना चौक्यांना त्याची आधी खबर लागते. सहाजिकच तशी खबर खिशात ठेवली जात नाही, तर वरीष्ठांना कळवली जाते. ती खबर मिळाली, मग प्रत्युत्तराची तयारी करायची असते किंवा इशारे द्यावे लागत असतात. पाकची इशारेवजा भाषा म्हणूनच भारतीय हद्दीत सीमेच्या अलिकडल्या हालचाली सांगणारी वाटते. व्याप्त काश्मिरात घुसण्याची तयारी भारताने चालवली असल्याशिवाय पाकिस्तान अशी भाषा करणार नाही. प्रश्न इतकाच असतो, की शत्रू प्रदेशात कसे जाणार व कोणती कारवाई करणार?

अशी कारवाई करताना प्रत्येक बाजू आपली किमान जीवितमत्ता हानी व्हावी अशा प्रयत्नात असते. म्हणूनच यात आकस्मित हल्ला हा जमिनीवरून होत नाही, तर हवाई मार्गाने हल्ला केला जातो. तितकेच नाही तर अन्य ठिकाणी कुरापती काढून इतरत्रचे सैन्य खर्‍या रणभूमीवर आणले जाऊ नये, अशीही पुर्वतयारी केली जाते. असे काहीतरी भारतीय काश्मिरात शिजत असणार. दोन वर्षापुर्वी भारतीय सेनादलाने पहिला सर्जिकल स्ट्राईक म्यानमारमध्ये जंगलात केला होता आणि त्यात उल्फ़ाचे काही गनिम ठार मारलेले होते. तेव्हाही पाकिस्तानातून पहिली प्रतिक्रीया आलेली होती. पाकिस्तान हा म्यानमार नाही, इथे पाकभूमीत घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. चोख उत्तर दिले जाईल आणि शत्रूला पाणी पाजू; अशा वल्गना झाल्या होत्या. पण खराखुरा सर्जिकल स्टाईक दिड वर्षापुर्वी झाला, तेव्हा शेपूट घालून पाकिस्तान गप्प बसला होता. तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात, तशी त्यांची नाचक्की झालेली होती. किंबहूना काही वर्षापुर्वी लपवून ठेवलेल्या ओसामा बिन लादेनला अमेरिकन कमांडो पथकाने पाकभूमीत घुसून मारले होतेच. त्याच्या पत्नीसह अनेक गोष्टी हेलिकॉप्टरने उचलून नेलेल्या होत्या. शेजारी वसलेल्या पाकसेना छावणीला जाग येण्यापुर्वीच अमेरिकन कमांडी सुखरूप निघून गेलेले होते. यातून पाकिस्तानी सैन्याची लढण्याची क्षमता व सज्जता लक्षात येऊ शकते. त्या घटनेने पाकसेनेची जगात पार बेअब्रू झालेली होती आणि स्वदेशातही त्यांची प्रतिष्ठा अस्ताला गेलेली होती. त्यामुळेच भारतानेही सर्जिकल स्ट्राईक करून दणका दिल्याचे मान्य करण्याचेही धैर्य पाकसेना व राज्यकर्त्यांपाशी उरलेले नव्हते. अशा लोकांनी भारताला चोख उत्तर देण्याच्या डरकाळ्या फ़ोडून काय उपयोग? पण घाबरलेला माणूस जसा मोठ्या आवाजात धमक्या देतो व आवेशपुर्ण बोलतो, तशी काहीशी स्थिती आहे.

भारताचा चांगुलपणा व युद्ध नको ही भारतीय मनस्थिती, ही पाकिस्तानची सर्वात मोठी ताकद आहे. त्यामुळेच सतत भारताला युद्ध व हानीची भिती घालणे हीच पाकिस्तानची रणनिती होऊन बसलेली आहे. तिला प्रभावी बनवण्यासाठी मग जिहादी घातपाती पाठवून हिंसाचार घडवला जातो. त्याच्या जोडीला भारतातील पत्रकार व बुद्धीमंतांना विकत घेऊन भयगंड निर्माण करण्यात पाकिस्तानने मोठी गुंतवणूक केलेली आहे. मणिशंकर अय्यर वा काश्मिरी हुर्रीयतचे समर्थक पोसण्याला पाकची रणनिती म्हणावे, इतकी गुंतवणूक झालेली आहे. भारत सरकारने व भारतीय सेनेने ती बौद्धिक वेसण झुगारून लावायचे ठरवले, तर पाकिस्तानपाशी प्रत्यक्ष लढणारी खरीखुरी फ़ौज नगण्य आहे. जी फ़ौज आहे, तिला लढण्यापेक्षा दरमहा पक्क्या पगाराशी मतलब आहे. अशा पार्श्वभूमीवर भारताने युद्धाची घोषणा केली वा खरोखरीचे युद्ध पुकारले, तर पाकिस्तानचा पालापाचोळा व्हायला वेळ लागणार नाही. तेच सप्टेंबर २०१६ मध्ये झाले आणि नाचक्की झालेली होती. आताही मोदी सरकारने अधिक खोलवर घुसखोरी करून हल्ला चढवला, तर दोन हात करण्याच्या भितीने पाकला भेडसावलेले आहे. त्यातून मोठे युद्ध होण्याची भिती म्हणून घातली जात आहे. परंतु प्रत्यक्षात घाम फ़ुटला आहे. मोदी हा माणूस कुणाची पर्वा करत नाही आणि अकस्मात हल्लाही करू शकेल, अशा भयाने पाकला पछाडलेले आहे. मात्र त्याच भारताची वा मोदींची खोड काढण्याचे थांबवणेही पाक राज्यकर्त्यांच्या हाती राहिलेले नाही. जिहादींचे अनेक गट व त्यांना समर्थन देणारे विविध इस्लामी कट्टरपंथी नेते, यामुळे पाक राज्यकर्ते व सेनाधिकार्‍यांचीही हुकूमत पाक सेनेत उरलेली नाही. मग भारताच्या हल्ल्याला एकमुखी उत्तर कसे आणि कोण देणार? हा चिंतेचा विषय आहे. सवाल फ़क्त मोदी सरकार इथल्या पाक हस्तकांच्या आवयांना कधी झुगारून देते इतकाच आहे.

5 comments:

  1. 'भारताला युद्ध व हानीची भिती घालणे हीच पाकिस्तानची रणनिती होऊन बसलेली आहे. तिला प्रभावी बनवण्यासाठी मग जिहादी घातपाती पाठवून हिंसाचार घडवला जातो. त्याच्या जोडीला भारतातील पत्रकार व बुद्धीमंतांना विकत घेऊन भयगंड निर्माण करण्यात पाकिस्तानने मोठी गुंतवणूक केलेली आहे. मणिशंकर अय्यर वा काश्मिरी हुर्रीयतचे समर्थक पोसण्याला पाकची रणनिती म्हणावे, इतकी गुंतवणूक झालेली आहे.'
    सबब पाकिस्तानच्या या गुंतवणूकिला लगाम ताबडतोब घालायला हवा. सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या साहेबांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावयास हवा कारण कालचे वक्तव्य भारताच्या पाक संबदातील रण नीती विरुद्ध होते म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावयास हवा.

    ReplyDelete
  2. भाऊ मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये एक पाकिस्तानी जाणते पत्रकार मुनीर सामी यांनी सांगितलेल्या गोष्टी खूप सूचक होत्या.

    १. जी कारवाई (सर्जिकल हल्ला) भारताने केली ती आधी झाली नव्हती आणि ते जर भारत सारखं सारखं करायला लागला तर आपल्याला थकवेल.
    २. पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांचं दुकान पूर्ण भारत विरोधी गोष्टींवर चालतं आणि तसेच त्यांच्या जनतेला सुद्धा त्याच गोष्टींवर मोठं केलं आहे. त्यामुळे जनतेला कळलं कि सर्जिकल हल्ला झाला तर ते त्यांना जाब विचारतील की तुम्ही हे होऊन कसं दिलं? हा फास आता पाकिस्तान च्या गळ्यात अडकला आहे.

    त्या मुलाखतीचा दुवा देत आहे.

    https://www.youtube.com/watch?v=yx2YZ2LyHiY

    ReplyDelete
  3. पाकिस्तान बरोबर युद्ध करण्या आधी भारतातील मणी सारख्या बेअक्कल लोकांना सोलून काढले पाहीजे..

    ReplyDelete
  4. युद्ध केल्यास आधीच जेरीस आलेला पाक पुन्हा बळकट होईल, कारण युद्ध देशातील नागरिकांना एकत्र आणते!

    ReplyDelete
    Replies
    1. ह्यात आपला देश बळकट होईल हे ही नसे थोडके!! 2019 च्या वाऱ्यात जर मध्येच युद्धाचे वादळ भलेही १-२महिन्यासाठी आले तर ......!! इस्राईल रणनीती बद्दल परवाच भाऊंनी लेख पोस्ट केला होताच की!

      Delete