Wednesday, February 7, 2018

२०१९ चे रणशिंग

Image result for modi attack on congress in rajyasabha

नेत्याला कुठे बोलावे आणि काय बोलावे याचे भान असावे लागते. नेत्याला जनतेचे मन जिंकायचे असते आणि जनमानस भारावून टाकायचे असते. तसे केल्यासच त्याच्या हाती असलेली सत्ता दिर्घकाळ टिकण्याची शक्यता असते. अर्थात शंभरातल्या शंभर लोकांना खुश करणारा कुठलाही निर्णय घेता येत नसतो. सहाजिकच नेहमी अधिकाधिक लोकांना खुश करणारा नाही, तरी सुसह्य ठरणारा निर्णय घेण्याची गरज असते. किमान लोक रागावतील व बहुतांश लोक नाराज होणार नाहीत, याविषयी सावध असणारा नेता जनतेच्या मनावर राज्य करत असतो. ज्याला हे रहस्य गवसले आहे, तोच जनतेला भारावून टाकत असतो आणि त्या भारावलेपणाच्या आधारे राज्य करू शकत असतो. हाताशी सत्ता आली, मग प्रशासन व शश्त्रास्त्र बळही उपलब्ध होत असते. पण बंदुका रोखून सत्ता टिकवता येत नाही, तर आपल्यामुळेच न्याय मिळू शकेल व आयुष्यला स्थैर्य येईल, असा आशावाद जो नेता निर्माण करू शकतो, त्याला मोठ्या लोकसंख्येवर राज्य करता येते. ही गोष्ट नरेंद्र मोदी यांनाही नेमकी उमजलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्यासारखा जनमानस जिंकू शकणारा दुसरा कोणी नेता समोर उपलब्ध नाही, तोपर्यंत नाराज जनताही सत्तेत बदल करणार नसल्याची अशा नेत्याला पुरेपुर खात्री असते. यासंदर्भात लोकसभा निवडणूकपूर्व काळात विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांनी केलेले एक विधान आज आठवते. अर्थात ते विधान त्यांनी ज्याच्या प्रश्नाला उत्तर देताना केलेले होते, त्याच्या डोक्यात ते शिरले नव्हते, की त्याचा आशय त्याला समजून घेता आला नाही. त्याचे नाव होते राहुल कन्वल. इंडिया टूडे या वाहिनीचा संपादक असलेल्या राहुलने मोदी किती लोकप्रिय आहेत, असा प्रश्न विचारला होता आणि त्याचे उत्तर देताना सिंघल म्हणाले होते, मोदी हे वाजपेयींसारखे नसून नेहरूंसारखे लोकप्रिय आहेत.

एका हिंदूत्ववादी नेत्याने नेहरूंची व वाजपेयी यांची लोकप्रियता यातला भेद नेमका कथन केला होता. कदाचित आपल्याला तो मुर्खपणा वाटेल. पण तरीही त्याला नेमके काय म्हणायचे आहे, ते समजून घ्यावे आणि मग तर्कबुद्धीने त्याला खोटेही ठरवायला हरकत नसावी. पण तिथेच आपल्या माध्यमातले मुखंड तोकडे पडतात. त्यांना समोरचा बोलण्यापुर्वीच तो काय बोलणार हे ठाऊक असते आणि त्याने त म्हणण्यापुर्वीच ते ताकभात समजून मोकळे होतात. राहुल कन्वल त्याला अपवाद नव्हता. म्हणून तर त्याने सिंघल यांनी कथन केलेल्या खुलाश्याची गंभीर दखल घेतली नाही, की मोदींनी लोकसभा जिंकण्यापर्यंत त्त्याला मोदींच्या लोकप्रियतेचे रहस्य उलगडले नाही. किंबहूना आजही अनेकांना ते रहस्य उलगडलेले नाही. पण त्यांना हे रहस्य का उलगडत नाही, त्याचीही मिमांसा आपल्याला सिंघल यांच्या त्या खुलाश्यात मिळू शकते. वाजपेयींची लोकप्रियता मोदी संपादन करू शकतील काय, असा राहुलचा सिंघल यांना विचारलेला प्रश्न होता. तर त्याला उत्तर देताना सिंघल म्हणाले होते, की मोदी वाजपेयींसारखे लोकप्रिय नाहीत, तर नेहरूंसारखे लोकप्रिय आहेत. त्यावर पुन्हा प्रश्न विचारला गेल्यावर सिंघल म्हणाले वाजपेयी हे जनतेत लोकप्रिय नाहीत, ते तुम्हा पत्रकार विचारवंतांमध्ये लोकप्रिय आहेत. निवडणूका जिंकण्यासाठी जनतेत लोकप्रिय असावे लागते. नेहरूंवर माध्यमातून व चर्चासत्रांमध्ये कितीतरी कडवी टिका झालेली होती, तरी तिचा मागमूस कुठे जनमानसात उमटत नव्हता. म्हणूनच सामान्य माणूस नेहरूंना भरभरून मते देत होता. मोदींची कहाणी नेमकी तशीच आहे. ते जनतेत लोकप्रिय व बुद्धीजिवी वर्गात नावडते आहेत. पण तीच त्यांची शक्ती असून वाजपेयींप्रमाणे मोदींनी स्वत:ला बदलत नेले, तर त्यांना जनतेची मते गमवायची पाळी येईल. निवडणूका जिंकण्यासाठी नेहरूंसारखी लोकप्रियता आवश्यक असते.

बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या भाषणाचे आभार मानणार्‍या प्रस्तावावर बोलताना मोदींचा डोळा नेमका त्याच जनमानसावर होता. आपण लोकसभेत बोलत आहोत आणि राष्ट्रपतींच्या भाषणाचे आभार मानण्य़ाचा प्रस्ताव आहे, याचे पुर्ण भान मोदींना होते. पण हेच भाषण थेट प्रक्षेपणातून देशाच्या कानाकोपर्‍यात सर्व वाहिन्यांच्या प्रसारणातून जात असल्याचेही त्यांना पक्के ठाऊक होते. सहाजिकच समोर कॉग्रेस वा विरोधी सदस्य किती गोंधळ घालत आहेत, त्याची मोदींना फ़िकीर नव्हती. तर आपल्या डोक्यातले मुद्दे सामान्य मतदारापुढे थेट व जसेच्या तसे पाठवण्याला प्राधान्य असल्याचे ओळखून मोदींनी लोकसभेत भाषण केले. सलग ९० मिनीटांचे हे भाषण प्रत्यक्षात २०१९ सालच्या लोकसभा निवडणूकीचे बिगुल होते. त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे, केलेले आरोप वा अन्य कुठल्या आरोपांना दिलेली उत्तरे; थेट लोकांपर्यंत पोहोचण्यातला परिणाम महत्वाचा होता. समोर कॉग्रेसजन व्यत्यय आणत आहेत आणि काही ऐकूनही घेत नाहीत, अशा पार्श्वभूमीवर मोदींनी आपली बाजू समर्थपणे मांडून घेतली. त्याची चिरफ़ाड व पोस्टमार्टेम नंतर अनेक माध्यमे करणार याचीही मोदींना जाणिव आहे व असते. पण ती चिरफ़ाड जितक्या लोकांना समजते किंवा जितक्या लोकांपर्यंत जाणार; त्यापेक्षा थेट पोहोचलेले भाषण अधिक प्रभावी असते. कारण भाषण एकच आहे आणि टिकाटिप्पणी विविध वाहिन्या, वर्तमानपत्रे व संपादक यानुसार भिन्न असणार. त्यांच्यातली विविधता आणि मोदींची ‘एकवाक्यता’ यातला फ़रक मोठा निर्णायक असतो. आपण जनतेसमोर उपाय व पर्याय मांडत आहोत आणि इतरेजन नुसतेच दोष दाखवणार आहेत, हे मोदी ओळखून असतात. सहाजिकच लोक टिका ऐकतात, पण पर्याय व उपाय निवडतात, हे मोदींना ठाऊक आहे. मोदी त्याच मतदाराला थेट संबोधित करीत होते. आपल्या कारभारात कॉग्रेस फ़क्त व्यत्यय आणते, याचेही प्रात्यक्षिक त्यातून घडवत होते.

राजकारणातला माणूस कोणी साधूसंत नसतो. तो मतलबी वा स्वार्थी नसेल. पण त्यागीपुरूष नक्की नसतो. सत्ता मिळवणे व टिकवणे हाच मुळात स्वार्थ असतो. मग मिळवलेली सत्ता टिकवणे हाही हेतू राखावा लागतो. ती सत्ता सभ्यमार्गाने टिकणार नसेल, तर आवश्यक तिथे लबाडी व डावपेचांना पर्याय नसतो. तत्वज्ञानाच्या गोष्टी बोलायला खुप छान असतात. पण व्यवहारात ठकास महाठक असावेच लागते. सहाजिकच जनतेच्या भल्यासाठी काम करायचे अ़सेल, तर निखळ चांगुलपणा उपयोगाचा नसतो. सत्ता हे साधन असल्याने जनतेचे भले करण्यासाठी सत्ता हाती घेतल्यावर ती टिकवण्याला प्राधान्य असावे लागते. ती सरळ मार्गांनी टिकणार नसेल वा मिळत नसेल, तर आवश्यक तिथे तडजोडी व अन्य मार्ग स्विकारणे भाग असते. ते वाजपेयींना जमले नाही. पण नेहरूंनी अतिशय धुर्तपणे अन्य मार्गांचाही अवलंब करूनही आपली लोकप्रियता टिकवण्याच्या कसरती केलेल्या होत्या. त्याबाबतीत बुद्धीजिवी वा जाणत्यांचे शिव्याशापही नेहरूंनी निमूट सोसले व प्रसंगी त्याकडे काणाडोळा केला होता. ते वाजपेयींना कधी साधले नाही. त्यांचा चांगुलपणा हा भाजपासाठी शाप ठरला होता आणि तितका चांगुलपणा दाखवण्याची हौस मोदींनी कधीच दाखवलेली नाही. हाताशी असलेली साधने व साहित्य कसे व कुठे प्रभावीपणे वापरावे, याची कला मोदींना अवगत आहे. त्यामुळेच ते आपल्या विरोधकांना व विरोधालाही राजकीय खेळात सहजगत्या वापरून घेत असतात. लोकसभेत त्यांनी केलेले भाषण प्रत्यक्षात अर्थसंकल्प वा राष्ट्रपतींच्या भाषणाशी किती संबंधित होते, हा प्रश्न म्हणूनच गैरलागू आहे. मोदी जर देशभरच्या मतदाराला संबोधित करण्यासाठीच बोलत असतील, तर त्याचा परिणाम वा प्रभाव त्याच निकषावर मोजला पाहिजे. पण आशय शोधण्यापेक्षा फ़क्त विषयात गुरफ़टून पडणार्‍यांना कोण समजावू शकतो?

10 comments:

  1. Rahul swatach mhanla ki the pracharache bhashan hote. Anakhi Kay have.

    ReplyDelete
  2. भाऊ अप्रतिम विश्लेषण मनःपूर्वक आभार

    ReplyDelete
  3. तुम्ही खूपच छान एरियल व्युव घेतलात सर.

    ReplyDelete
  4. मस्त पटणारे ' विश्लेषण ' !!

    ReplyDelete
  5. भाऊ, कोणीतरी म्हटलंय की गुंड हा वाईटच पण सज्जन गुंड जास्त खतरनाक.(माफी गुंड म्हटलं म्हणून, पण असे बोलले जाते)

    ReplyDelete
  6. PM ni atyant sadetode aani muddesud bhashan kele. Te Nehrunvishayi je bolale tasa samajat ek undercurrent aahech. Nehru aani Gandhiji he sant mahatme navtech. Tyani Savarkar Netaji Ambedkar aani Patel ya sarvana sidetrack kele he nakarne awaghad aahe.
    Aani khup varshanantar evdha direct bilnara neta sansdemadhe disla.

    ReplyDelete