Sunday, February 11, 2018

अतिशहाणा, तोच बैल रिकामा

अमित शहा पकोडा के लिए इमेज परिणाम

समोरचा माणूस काही सांगत असतो आणि त्याचे ऐकून घेतल्याशिवाय त्याला उलटे प्रश्न विचारणे, हा कुठल्याही अर्थाने शहाणपणा असू शकत नाही. पण आजकाल सोशल मीडिया व वाहिन्यांच्या जमान्यात त्याचे भान कुणालाच राहिलेले नाही. सहाजिकच समोरच्याला प्रश्न विचारायचा आणि त्याने दोन शब्द बोलण्यापुर्वीच त्याला अडवून चुकीचा ठरवण्याची स्पर्धा चालत असते. विषयाला महत्व राहिले नाही, की प्रश्न व उत्तराला अर्थ राहिलेला नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या गोंगाटालाच आता चर्चा किंवा संवाद मानले जाऊ लागले आहे. त्याने मनस्ताप होतो, तितकेच मनोरंजनही होत असते. पकोडा बनवूनही रोजगार मिळू शकतो, असे नरेंद्र मोदी वा अमित शहा म्हणाल्यावर पकोडा शब्द कमालीचा गाजू लागला आहे. पकोडा वा भजी तळणे वा विकणे हा कसा रोजगार नव्हे, त्यावरून बरेच ज्ञान पाजळण्याची स्पर्धा सोशल मीडियात सुरू झाली. त्याच्या मागून फ़रफ़टणार्‍या इतर माध्यमातही तेच पेव फ़ुटले. पण मोदी शहांची त्यावरून टवाळी करायला निघालेल्यांना मनरेगा हा मात्र महान क्रांतिकारी रोजगार वाटलेला असावा. अन्यथा तेव्हाही असेच प्रश्न विचारले गेले असते. पण तसे झाले नव्हते. उलट मनरेगाला संसदीय मान्यता मिळवून झाल्यावर राहुल अगत्याने अशा कामांच्या जागी जायचे. आपल्याही मानेवर उकरलेल्या मातीचे घमेले घेऊन कष्टाचे काम उपसण्यात रोजगार असल्याचे फ़ोटो काढून दाखवत होते. आज पकोड्याची टवाळी करणारे त्याच राहुलच्या हमालीचे कौतुक करण्यात मग्न झालेले होते. तेव्हा रोजगाराची व्याख्या काय होती? आणि आज रोजगाराची नवी व्याख्या काय आहे? व्याख्या, आशय व संदर्भ कसे आवडी निवडीनुसार बदलत जातात, त्याचा हा उत्तम दाखला आहे. कालपरवा या संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर टाकली, तेव्हा सुशिक्षीतांनीही वडापाव विकायचा काय, असा प्रश्न मलाही विचारला गेला.

सुशिक्षीत होऊन लोक बेकार असतात, ही कल्पना भारतात नवी नाही आणि मागल्या अर्धशतकात ती सातत्याने राजकारणात खेळवली गेलेली आहे. पण तो विषय बाजूला ठेवून मी चार महिन्यांपुर्वी लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली एक बातमी मुद्दाम माझ्या फ़ेसबुक वॉलवर टाकली. त्याचा अर्थ किती लोकांनी समजून घेतला ठाऊक नाही. ती लोकसत्तेत प्रसिद्ध झालेली बातमी लंडनमध्ये अकस्मात बेकारीत ओढल्या गेलेल्या दोन सुशिक्षीत मराठी तरूणांची होती. उच्चशिक्षीत व चांगल्या पगाराची परदेशी नोकरी करणार्‍या या मुलांवर काही वर्षापुर्वी बेकारीची कुर्‍हाड कोसळली. गाशा गुंडाळून मायदेशी परत येण्याखेरीज त्यांच्यासमोर अन्य पर्याय नव्हता. तिथे नुसते नोकरीची प्रतिक्षा करीत थांबायचे, तरी घरभाडे व पोटाची भुक भागवायलाही मुठभर पैसे खिशात नव्हते. अशावेळी त्यांनी परक्या देशात वडपाव विकायची कल्पना शोधली आणि अन्य कुणाच्या हॉटेल दुकानात एक कोपरा घेऊन आठदहा फ़ुटाच्या जागेत वडापाव विकायला सुरूवात केली. आज ते कोट्याशीश झाले आहेत. मुळात अशा गोष्टी एखाद्या वर्तमानपत्रात छापायच्या कशाला? वडापाव त्या मुलांनी शोधून काढलेला खाद्यपदार्थ नाही, किंवा बेकारीवरचा उपाय म्हणून त्यांनीच प्रथम अशा वडापावच्या उद्योगाला आरंभ केलेला नव्हता. मुद्दा इतकाच होता, की अतिशय प्रतिकुल परिस्थितीत व परक्या देशात कुठलाही आधार नसताना, त्यांनी बेकारीवर मात करण्याची हिंमत दाखवली. तिथेच राहून प्रतिकुल परिस्थितीचा सामना केला. त्यात त्यांनी मिळवलेले यश इतरांना प्रोत्साहन व प्रेरणा देऊ शकेल, अशा कल्पनेने ही बातमी कोणी छापत असतो. तर त्यातला आशय समजून घेण्यापेक्षा आणि त्यापासून काही प्रेरणा घेण्यापेक्षा, त्याची टवाळी करण्याला बुद्धीमत्ता समजले जाते आहे. ही बुद्धीमत्ता नव्हेतर पराभूत मानसिकता असते. ती कुठून येते आणि तीच अहंकार कसा बनतो, त्याचे नवल वाटते.

आम्ही हातात वाडगा घेऊन नोकरीची भीक मागत आहोत आणि आमच्या सुशिक्षीतपणाचा मान राखून आम्हाला नोकरी कोणीतरी दिली पाहिजे. ती नोकरी कोणीतरी निर्माण करावी लागते, याचे भान आपल्याला कितीसे उरले आहे? सुशिक्षीत झालो आणि म्हणून आम्ही कुठले कष्टाचे काम करणार नाही. तर बंदिस्त व वातानुकुलीत जागेमध्ये आरामशीर बिनकष्टाचे काम आम्हाला मिळाले पाहिजे. ते काम महत्वाचे नसून त्यासाठी मिळणारा जाडजुड पगार अगत्याचा आहे. असे ऐषारामी काम व त्यासाठी भरपूर पगार देण्याची सोय कोणीतरी केली पाहिजे. ते करू शकेल, तोच देशाचा नेता असू शकतो. आम्ही कुठलीही कल्पकता दाखवणार नाही किंवा लोकांना उपयुक्त ठरेल अशी कुठलीही कुशलता आमच्यापाशी नाही. पण आम्ही अमुक एक वर्षे शाळेत कॉलेजमध्ये खर्ची घातली आहेत. आमच्या जन्मदात्यांनी कुठून तरी पैसे आणुन आमच्या शिक्षणात गुंतवणूक केलेली आहे. तेव्हा त्याची हप्तेबंद परतफ़ेड सरकारने केली पाहिजे. त्या व्यवस्थेला रोजगार असे आज नाव मिळालेले आहे. इतके पैसे पगार घेऊन त्याच्या बदल्यात समाजाला वा सरकारला आम्ही काय देणार, याचे उत्तर कोणापाशी नाही. पंतप्रधान वा सत्ताधारी होण्याची ज्यांना हौस आहे, त्यानेच हे कोडे सोडवले पाहिजे आणि कुठल्याही मार्गाने आमच्या खिशात भरपूर पैसे टाकणारा रोजगार दिलाच पाहिजे. नसेल तर तो राज्य करण्यास नालायक आहे. त्याला हाकलून लावला पाहिजे. पण मग त्याच्या जागी दुसरा कोण आणणार? असा कोणी बदलून आणला तर तो कुठला रोजगार देणार आहे? पुर्वी कोणी असे रोजगार दिलेले आहेत काय? नसतील तर रोजगाराची ही नवी व्याख्या कुठून आली आहे? त्या स्टार्ट अप, मेक इन, स्किल इंडिया वगैरे थापांचे काय झाले? त्यातून कुठले रोजगार निर्माण झाले? झाले असतील तर आम्हाला अजून जाडजुड पगाराची आरामदायी नोकरी कशाला मिळालेली नाही?

हे सगळे महान बुद्धीवादी प्रश्न आहेत. पण त्यासाठी चालणार्‍या बुद्धीला यापुर्वी माती उकरणे वा खड्डे खोदून डोक्यावरून माती वाहून नेण्यालाही रोजगार वाटत होता. आज अचानक व्याख्या बदललेली आहे. लंडनमधल्या त्या दोघा मुलांनी आपला बेकारीचा प्रश्न सोडवताना, आणखी शेदिडशे लोकांसाठी नवा रोजगार निर्माण करून दिला, ते हमाल असतात. त्यांनी तळण्याचे व कष्टाचे काम हाती घेतले नसते आणि त्यासाठी आपल्या उच्चशिक्षणाचा अहंकार सोडला नसता, तर तेही अशाच भाषेत बोलत राहिले असते. त्यांच्या कष्टाने ज्यांना रोजगार मिळाला, ते आणखी शेदिडशे लोकही आज तसेच नोकर्‍या शोधत राहिले असते. कदाचित त्यांनीही मोदी शहांच्या नावाने शिव्याशाप देण्याला़ बुद्धीवाद मानले असते. हे अर्थात उच्चशिक्षित उदाहरण आहे. असली प्रव़चने नित्यनेमाने झोडणार्‍या पत्रकार संपादकांना एक नाव न सांगताही ओळखता येईल, ज्याला चार ओळी लिहीता वाचता येत नाहीत. पण त्यानेच अर्धा डझन वर्तमानपत्रे काढून मागल्या दोन दशकात सुशिक्षित पत्रकार संपादकांना रोजगार पुरवला आहे. किमान हजारभर लोकांचा रोजगार निर्माण केला आहे आणि मराठीतले तिसर्‍या क्रमांकाचे दैनिक तोच माणुस चालवतो आहे. तोही असाच कपाळावर हात मारून सत्ताधार्‍यांच्या नावे बोटे मोडत बसला असता, तर या हजारभर लोकांना कधीच रोजगार मिळाला नसता. दुर्दैवाने त्याच्याही वर्तमानपत्रात असलीच अक्कल आज पाजळली जाते आहे. पण ती पाजळणार्‍यांना याचे भान नाही, की मुरलीधर शिंगोटे नावाच्या एका माणसाने वर्तमानपत्राचे गठ्ठे उचलण्याची हमाली निष्ठेने केली नसती, तर अनेक मराठी बुद्धीमान संपादकांनाही आज रोजगार कुठे आहे, असले प्रश्न विचारीत बेकारांच्या रांगेत उभे रहावे लागले असते. शिंगोटे असोत की ते वडपाव विकणारे लंडनचे तरूण असोत, ते हातात वाडगा घेऊन उभे राहिले नाहीत. हा पकोड्यातला आशय आहे. पण तो शहाण्यांना समजायला हवा ना? अतिशहाणा तोच बैल रिकामा हे आपल्या पुर्वजांनी उगाच सांगून ठेवलेले नाही. पण ते युरोपियन विचारवंतांनी कुठेल्या पुस्तकात लिहून ठेवलेले नाही ना?


6 comments:

  1. Very well explained sir, and we common people understand this better than 'so called " journalists.
    Opposition party can criticize government buy journalist should not be biased

    ReplyDelete
  2. खरयं भाऊ...त्यात आता या एमपीएससी च्या बावळटांची भर...जागा वाढवा म्हणून...हे सुध्दा त्याच कुळातले

    ReplyDelete
  3. Tasehi mala vatate ki rojgar nirmiti hi ashikshit lokach jast karu shaktat Karan tya lokan madhye ladhnyache bal asate

    ReplyDelete
  4. आम्ही अमुक एक वर्षे शाळेत कॉलेजमध्ये खर्ची घातली आहेत. आमच्या जन्मदात्यांनी कुठून तरी पैसे आणुन आमच्या शिक्षणात गुंतवणूक केलेली आहे. तेव्हा त्याची हप्तेबंद परतफ़ेड सरकारने केली पाहिजे. त्या व्यवस्थेला रोजगार असे आज नाव मिळालेले आहे. इतके पैसे पगार घेऊन त्याच्या बदल्यात समाजाला वा सरकारला आम्ही काय देणार, याचे उत्तर कोणापाशी नाही
    hi line saglyat jabardast aahe.... copy karu ka???

    ReplyDelete
  5. भाऊ याचे उत्तम उदाहरण fb वर आपल्या comment मधे टाकतो

    ReplyDelete