सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा, त्यांची संगत नकोरे बाप्पा, अशी एक उक्ती मराठीत दिर्घकाळ प्रचलीत होती. अलिकडच्या काळात तितकी मराठी वापरात राहिली नसल्याने अशा उक्ती मागे पडत गेल्या आहेत. मग कधी तरी काही विशिष्ट प्रसंगी घटनाक्रमानेच अशा उक्ती आठवतात. समाजातील कर्माधिष्ठीत घटक होते, तेव्हा त्यांच्या वागण्याच्या ठराविक पद्धती होत्या आणि त्यातल्या जाच वा त्रासामुळे अशा लोकांविषयी उक्ती तयार झाल्या होत्या. जे लोक सहजगत्या फ़सगत करतात, त्यांच्यापासून जपून रहावे, किंवा त्यांची संगत तोट्यातली असते, इतकाच या उक्तीचा अर्थ आहे. आज त्याच जातीचे लोक तो कर्म वा व्यवहार करीत नाहीत किंवा कुठल्याही जातीत जन्मलेला माणूस अन्य कुठल्याही जातीचे व्यवहार करीत असतो. म्हणूनच या उक्तीला जातीवाचक म्हणता येणार नाही. पण त्या कर्माधिष्ठीत कामाविषयी असलेल्या शंका वा आक्षेप आजही संपलेले नाहीत. हेच नीरव मोदी या जवाहिर्याने म्हणजे सामान्य भाषेतल्या सोनाराने जगाला पटवून दिले आहे. परंतु इथे जाती वा कामाविषयी बोलायचे नाही. या नीरव मोदीविषयी ज्याप्रकारे राजकीय पक्ष व नेते आपापले अंग झटकून टाकत आहेत, तेव्हा त्या जुन्या उक्तीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. नीरव मोदी हजारो कोटीची अफ़रातफ़र करून फ़रारी झाल्यावर तो कोणाच्या जवळचा वा कोणाच्या ओळखीचा होता, त्याची छायाचित्रे व पुरावे समोर आणायचा उद्योग जोरात सुरू झाला आहे. नुकत्याच गाजलेल्या डावोस येथील मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समवेत भारतीय व्यापारी उद्योगपतींचे एक छायाचित्र उपचार म्हणून घेण्यात आले होते. तेच पुढे करून कॉग्रेसने पंतप्रधानांनीच आपल्या सोबत नेवून नीरवला परदेशी सुखरूप जागी पोहोचते केल्याचा आरोप केला आहे. मग भाजपानेही त्याचे राहुल सोबतचे फ़ोटो जगासमोर आणले.
नीरव मोदी हा हजारो कोटी रुपये बॅन्केतून बेकायदा उचलून मोठ्या मेजवान्या देत होता आणि त्यात समाजातील नावाजलेली प्रतिष्ठीत मंडळी गर्दी करीत होती. फ़ार कशाला, नीरवच्या अशा समारंभ पार्ट्यांमध्ये आमंत्रण मिळण्यालाच समाजात मोठी प्रतिष्ठा मानले जात होते. आज त्याच्या नावाने विविध माध्यमे व वर्तमानपत्रात शिव्याशाप देणारे अनेक मान्यवर पत्रकारही तिथल्या आलिशान चैनबाजीची दिलखुलास वर्णने लिहीत होते, किंवा छापत प्रक्षेपित करत होते. तेव्हा नीरव किंवा त्याच्या निकटवर्तियांची कौतुके सांगताना अशा मान्यवरांना थकवा येत नव्हता. ‘पेज-३’ अशी एक वेगळी समाजसंस्कृती आपल्या देशात आता प्रतिष्ठा पावलेली आहे. त्यातच घुटमळणार्यांना आपण नित्यनेमाने वाहिन्यांवर बघत असतो आणि कौतुकेही ऐकत असतो. तिथे स्थान असल्याने कुठलेही दुसरे कर्तृत्व नसलेल्यांना देशातल्या कुठल्याही महत्वाच्या विषयावर मतप्रदर्शन करण्याचे अधिकार आपोआप मिळत असतात. अशा पार्ट्या वा समारंभाची शान वाढवण्यासाठी मग सत्तेतील, राजकारणातील वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील नावाजलेल्यांना खास आमंत्रण मिळत असते. बाकीचे लोक त्यांच्याशी जवळीक करून आपलेही त्यांच्यासोबत फ़ोटो काढून स्वत:ची प्रतिष्ठा वाढवित असतात. त्यामुळे असे फ़ोटो वा चित्रण अडगळीतला इतिहास बनुन जात असतो. नीरव किंवा विजय मल्ल्या यांच्यासारख्या भामट्यांना आपल्या पापावर पांघरूण घालण्यासाठी अशा नामवंतांची कवचकुंडले हवीच असतात. दरोड्यातील काही किरकोळ रक्कम खर्ची घालून अशा प्रतिष्ठीत नामवंतांना शोभेचे आयटेम म्हणून विकतही घेता येत असते. आजकाल तर कुठल्याही श्रीमंताच्या लग्न बारशालाही मान्यवर रोख रकमेच्या बदल्यात हजेरी लावत असतात. त्यांचेही दर किंमती ठरलेल्या असतात. त्यामुळे नीरव सोबत कोणाचे फ़ोटो आहेत, याला फ़ारसा अर्थ नसतो.
वर्षभरापुर्वी विजय मल्ल्याने पोबारा केला आणि माध्यमातून त्याच्यावर दुगाण्या झाडल्या जावू लागल्या. तेव्हा त्याने अशा प्रतिष्ठीत संपादक पत्रकारांच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगलेली होती. लुटेरा वा भामटा अशी विशेषणे मल्ल्याला लावली जात होती, तेव्हा त्याने ट्वीट करून भिकारड्यांनो, कुणाच्या तुकड्यावर चैन केलीत, असा सवाल जाहिरपणे विचारलेला होता. कारण अशा बुद्धीमंत, अभ्यासक वा प्राध्यापक संपादकांची त्याच्या पार्ट्यांमध्ये चाललेली चंगळ त्याने चित्रित करून ठेवलेली होती. फ़ार कशाला अशा आशाळभूतांना आपल्या दरोड्यातील पैशातून खाऊपिऊ घालताना खर्चलेल्या पैशाचे हिशोबही मल्ल्याने लिहून व जपून ठेवलेले आहेत. मग तसेच नीरव मोदीने केलेले नसेल काय? आणि पुरावे जपून ठेवायची तरी गरज काय? अशा फ़ुकटखाऊंचे गुणगान करणारे स्तंभ प्रतिष्ठीत वर्तमानपत्रात नित्यनेमाने छापले जात असतात. त्यांच्याही दफ़्तरी त्याचे पुरावे आहेत़च की. त्यामुळे आता चोर चोर म्हणून नीरवकडे बोट दाखवणार्या कोणालाही शुचिर्भूत असल्याचा दावा सांगण्याचा काही अधिकार नाही. पण यापैकी प्रत्येकाच्या मनातला चोर व पाप त्यांना शांत बसु देत नाही, की तोंड लपवायला जागा उरलेली नाही. सहाजिकच आपण सोवळे शुद्ध असल्याचे सिद्ध करण्याची प्रत्येकाला घाई झालेली आहे. त्यातून मग दुसर्याला पापी ठरवून आपले पावित्र्य सिद्ध करण्याच्या केविलवाण्या धडपडी सुरू झाल्या आहेत. मग ते राहुल गांधी असोत की भाजपाचे कोणी नेते असोत. प्रत्येकाला आपली नीरवशी ओळख समोर येण्याच्या भितीने पछाडलेले आहे. किती लाचार व दीनवाणे लोक आहेत ना हे? कालपर्यंत नीरव किंवा मल्ल्याच्या पार्ट्यांमध्ये प्रवेश आमंत्रण मिळण्याला प्रतिष्ठा म्हणून मिरवणारेच आता ‘त्यांची ओळख नकोरे बाप्पा’ अशा थाटात आपापले अंग झटकून मोकळे होत आहेत.
अर्थात नामवंत पत्रकार संपादक किंवा बुद्धीजिवी शहाणे पार्टीत जाणे, हा गुन्हा नसल्याचा बचावही मांडतील. मात्र जो त्यांचा बचाव आहे, तोच राजकारण्यांना कशासाठी लागू होत नाही? त्याचा खुलासा कोणी करणार नाही. राजकीय नेते सत्तेचा अशा भामट्यांना उपयोग करू देतात. बुद्धीजिवी पत्रकार कुठला लाभ चोरट्यांना देणार? असाही बचाव केला जाईल. पण तोच अधिक फ़सवा व दिशाभूल करणारा आहे. कारण नीरव, मल्ल्या किंवा शिना बोरा हत्याकांडातील इंद्राणी व पीटर मुखर्जी हे गुन्हेगार, माध्यमाच्या मुखंडांनीच राजकारण्यांच्या दारात नेवून ‘ओळख’ करून दिलेले असतात. माध्यमातून त्यांची जाहिरात होते आणि पुढल्या काळात त्यांच्याकडे उद्योगपती वा अधिकारी राजकारण्यांचा ओघ सुरू होत असतो. किंबहूना आजकाल अशा पत्रकार संपादकांना भुरटे भामटे लोक मध्यस्थ दलाल म्हणूनही वापरून घेत असतात. २जी घोटाळ्याचा पर्दाफ़ाश झाला, तेव्हा नीरा राडीया टेप्स चव्हाट्यावर आल्या. त्यात वीर संघवी, बरखा दत्त वा प्रभू चावला असे मान्यवर संपादक पत्रकारच सौदेबाजीच्या बोली लावताना ऐकू आलेले होते ना? मग मल्ल्या वा नीरव मोदी यांचे खरे ‘तारण’ कोणी निर्माण केले ते लक्षात येऊ शकते. आता मात्र प्रत्येकाला त्यांची संगत वा ओळख नको आहे. जसे आता नीरवला कुठल्या पार्टी आयोजनाचे नाव नको आहे, तसेच इतरांना नीरवचे नाव आपल्याशी जोडले जायला नको आहे. वाल्याने वाटमारी करावी आणि त्यातून आपली चैनमौज चालावी. पण त्याच्या पापातली भागिदारी कोणालाच नको होती ना? त्यापेक्षा आज काहुर माजवणारे विविध क्षेत्रातले मान्यवर किंचीत तरी वेगळे आहेत काय? प्रत्येकजण आपल्या परीने व कसोशीने आपण नीरवला ओळखत नसल्याचा आक्रोश करण्यात गर्क आहे आणि आपली ‘ओळख’ लपवण्यासाठी दुसर्याकडे बोट दाखवण्याची जोरदार स्पर्धा चालली आहे.
Apratim visleshan ahe Bhau. Dhanyawad
ReplyDelete