Sunday, February 18, 2018

साहेबांचे जन-धन खाते



सत्ता गेल्यापासून राष्ट्रवादी कॉग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ज्ञानदान यज्ञ आरंभलेला आहे. मागल्या काही महिन्यात तर राज्याच्या विविध भागात मेळावे भरवून त्यांनी सामान्य जनतेच्या ज्ञानात भर घालण्याचा सपाटाच लावला आहे. खरेतर त्यांना अशा उद्योगात पडायची गरज नव्हती. पुर्वी सत्ता गमावली मग पवार साहेब क्रिकेटच्या उद्धारासाठी घराबाहेर पडत असायचे. पण मागल्या काही वर्षात सुप्रिम कोर्टाने त्याही उद्योगाला प्रतिबंध घातला आहे आणि त्यांच्यासारख्या क्रिकेट उद्धारकांना त्यात हस्तक्षेप करण्याच प्रतिबंध घातला आहे. सहाजिकच विरंगुळा म्हणून साहेबांना काही दुसरे काम शोधणे भाग होते. त्यातूनच मग त्यांनी ज्ञानदानयज्ञ आरंभला आहे. त्यात शेतीविषयक समस्या किंवा देशातील विविध समस्यांवरही ते ज्ञानदान करीत असतात. ताज्या होमहवनात त्यांनी दोन मोठ्या गोष्टींचा तपशील समोर आणला आहे. त्यापैकी एक आहे देशाला लुटून परदेशी पळालेले भामटे आणि दुसरा मोदीपुर्व जमान्यातही झिरो बॅलन्स बॅन्क खात्याची जनधन योजना. कालपर्यंत तरी लोकांचा असा समज होता, की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी लालकिल्ला येथून भाषण करताना १५ ऑगस्ट २०१४ रोजी जनधन योजना घोषित केली. पण त्याचा पर्दाफ़ाश साहेबांनी दोन दिवसांपुर्वी एका मेळाव्यात केला. त्यांच्या गौप्यस्फ़ोटानुसार मोदी गुजरात्चे मुख्यमंत्री असतानाच देशात झिरो बॅलन्स जनधन खाती उघडण्याचे काम चालू झाले होते आणि त्याचा देशातील पहिला खातेदार सर्वात गरीब असा नीरव मोदीच होता. २०११ सालात मनमोहन सिंग यांचे युपीए सरकार सत्तेत असताना खिसे फ़ाटलेल्या कोणालाही सरकारी बॅन्केत खाते काढण्याची खास योजना राबवली गेली होती. त्यामुळेच नीरवला पंजाब नॅशनल बॅन्केत फ़क्त खाते उघडता आलेले होते. पण त्यात २०१७ पर्यंत दमडाही नव्हता. पैसे आले मोदी पंतप्रधान झाल्यावर!

पंढरपूर तालुक्यातील एका गावात हा मेळावा भरलेला होता आणि तिथे बोलताना साहेबांनी हा मोठा खुलासा केलेला आहे. त्यांचे नेमके वाक्य असे होते, पवार म्हणाले, ‘मनमोहन सरकारवर आरोप केले जात असले तरी नीरव याने २०११ मध्ये फक्त बँक खाते उघडले होते. मात्र प्रत्यक्ष ११ हजार कोटी उशिराने आले.’ याचा अर्थ काय होतो? २०११ पासून २०१४ पर्यंत नीरव मोदीच्या खात्यात दमडाही नव्हता. असता तर पैसे नंतर आले, असे साहेब कशाला म्हणाले होते? त्याचा अर्थ असा, की शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांचे पंतप्रधान मनमोहन होते आणि त्यांनी नीरव मोदीला पंजाब नॅशनल बॅन्केत दमडाही न भरता खाते उघडू दिले होते. त्यात नंतरही कुठली उलाढाल होत नसताना खाते चालूच राहिले होते. त्याविषयी बॅन्केने कुठली विचारपूस केली नाही की खाते बंद केले नाही. शून्य बॅलन्स असतानाही बॅन्केचे खाते चालू राहिले. मग तो कशाला ते खाते उघडून बसला असावा, असा प्रश्न पडतो. त्याचे उत्तर साहेबांनी दिलेले नाही. किंबहूना अशा प्रश्नांची उत्तरे साहेब कधी देत नाहीत. कारण दळभदी पत्रकारही कधी असे नेमके प्रश्न साहेबांना विचारत नाहीत. अन्यथा साहेबांनी कधी प्रश्नांचे उत्तर टाळले नसते. त्यात लपवण्यासारखे काही नाही, तर लपवाछपवी करायची कशाला? नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर प्रत्येक खात्यात पंधरा लाख रुपये असेच भरणार असल्याचे खुद्द साहेबांनीच नीरवला पटवून दिले होते आणि त्यासाठी २०११ पासून त्याने बॅन्केत खाते काढून ठेवलेले होते. मोदींनी लोकसभेचा प्रचार सुरू करण्यापुर्वीचे ते प्रत्येक खात्यात १५ लाख रुपयांचा भरणा करणार असल्याची बित्तंबातमी साहेबांना नरेंद्र मोदींच्याही आधीच लागलेली होती. आता समजले, बारामतीला पंतप्रधान गुरूदेव कशाला म्हणतात? मोदींची मनकीबात बारामती्त शिजते आणि दिल्लीतून परोसली जात असते. क्या समझे?

आणखी एक गोष्ट ज्ञानदानाची! त्याच मेळव्यात बोलताना पवारांनी संघाला आपले स्वयंसेवक काठ्या घेऊन सीमेवर पाकिस्तानशी लढायला पाठवण्याचाही सल्ला दिलेला आहे. सीमेची चिंता आज करायला पवारसाहेब संरक्षणमंत्री नाहीत. दोन दशकापुर्वी होते आणि ते पद सोडून त्यांना राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून यावे लागले होते. त्यांच्या आगमनानंतर सहा दिवसात मुंबईत बॉम्बस्फ़ोट मालिका झाली होती. तेव्हा सीमेवरून सैनिकांना मुंबईत सुरक्षेसाठी पाचारण करावे लागले होते. त्यातून तरी सैनिक वा लढाई सीमेवरच नव्हेतर देशाच्या कुठल्याही अंतर्भागातही चालू असते, इतके सामान्य माणसालाही कळू शकते. पण तो झाला सामान्य ज्ञानाचा विषय. साहेब अगाध ज्ञानयोगी असल्याने असल्या सामान्य बुद्धीच्या गोष्टी कशाला सांगतील? त्यांना पाकिस्तान फ़क्त सीमेवरच भारताशी लढतो वा हल्ले करतो, असे १९७१ सालचे ज्ञान असावे. अन्यथा त्यांनी सीमेपेक्षा देशात अन्य भागात चालू असलेल्या घातपाती जिहादशी लढायला स्वयंसेवक पाठवण्याचे आवाहन भागवतांना केले असते. अर्थात युद्ध ही फ़क्त सीमेवरची गोष्ट नसते. देशातल्या कुठल्याही भागात संकटकालीन स्थिती उदभवले, तेव्हा तिच्याशी सामना करतानाही युद्ध पातळीवर काम चालते, हे साहेबांना दिर्घकाळ प्रशासन राबवून अजूनही उमजलेले नसावे. अन्यथा त्यांनी असली वायफ़ळ भाषा कशाला केली असती? ज्या पुणे जिल्ह्यात आपले वर्चस्व असल्याचा साहेबांना दावा कायम आहे, त्याच पुण्याच्या भुगोलात एक माळीण नावाचे गाव आहे. ते एका पावसाळ्यात दरड कोसळून चिखलात गाडले गेले होते. बारामतीहून तिथे पोहोचायला फ़ारसा वेळ लागत नाही. पण पुण्याहून वा बारामतीहून तिथे साहेबांचे किती अनुयायी मदतीला पोहोचू शकले होते? त्यांच्याही आधी संघाचे स्वयंसेवक पोहोचले आणि त्यांच्या कामात मदत करण्याचे आदेश कॉग्रेसी शासनाला करण्याची नामुष्की आलेली होती.

एकूण काय तर साहेब सध्या ज्ञानयज्ञात मग्न आहेत आणि त्यामुळे जगातल्या ताज्या घडामोडींची माहिती घेणे मिळवणे, यासाठी त्यांच्यापाशी सवड नसावी. अन्यथा त्यांनी अशी मुक्ताफ़ळे कशाला उधळली असती? बॅन्केपासून शेतीपर्यंत आणि सीमेवरील लढाईपासून संघापर्यंत साहेबांचे ज्ञान खुप जुने आहे. त्याच्या आधारे ज्ञानदान यज्ञ जोरात चालला आहे. अधूनमधून चिंतन मनन शिबीरेही भरवली जातात. पण त्यात आपल्या राजकीय कारकिर्दीची दुर्दशा वा पक्षाची हलाखीची स्थिती, यावर काही चिंतन अजिबात होत नाही. इतरांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यातच कालापव्यय केला जात असतो. मग अकस्मात उठून आपल्या पंतप्रधानपदी पोहोचलेल्या शिष्याला बारामतीत समारंभाला आमंत्रित करण्याचीही सुरसुरी साहेबांना येते आणि तिथे आपल्या मनीचे दु:ख व्यक्त करायला राहुल बजाननाही वक्ता म्हणून आणले जाते. ते देशाला न लाभलेला पंतप्रधान म्हणून साहेबांचा गौरव करतात. पण साहेब मात्र आपण देशाला ‘लाभार्थी’ ठरवण्यात कुठली चुक केली, त्याचा विचारही करायला तयार नसतात. ही ‘राष्ट्रवादी शोकांतिका’ होऊन बसलेली आहे. ललित मोदी कशाला देश सोडून पळाले, त्याचेही विस्मरण होते आणि इतरांना सल्ले देण्यावर वेळ भागवून न्यावी लागत असते. अधूनमधून नव्या इतिहासकारांची पाठ थोपटण्याचे काम उरकावे लागते आणि उरल्या वेळात राहुल गांधी यांनी ‘फ़िरवलेली’ पाठ थोपटावी लागतेच. ज्ञानदानाचे काम सोपे असते. मार्च १९९३ सालात मुंबई बॉम्बस्फ़ोट मालिकेने हादरली होती तेव्हाही बारावा स्फ़ोट घडवून साहेबांनी मुंबईकरांना असाच ज्ञानाचा लाभ दिलेला होताच ना? लोकहितासाठी अधूनमधून थापा माराव्याच लागतात. आताही सवड आहे तर थोडे लोकहित साधायचे म्हणून नीरव मोदीला साहेबांनी जनधन खाते काढून दिले आहे. तितकेच त्यांचे बॅन्क घोटाळ्यातील योगदान झाले नाही का?

3 comments:

  1. Excellent analysis.. I am fed up of these biased journalists who project Pawar as a great leader , great knowledgeable personality etc and bla bla...
    I don't understand logic behind neglecting his all bad castism based policies and backstabbing habbits.

    ReplyDelete
  2. Candid! Hope he reads this blog. आशा आहे की निदान आयुष्याच्या या टप्प्यावर तरी साहेबांना देव सद्बुद्धी देईल

    ReplyDelete
  3. अतिशय चांगला व ऊपहासाने साहेबांची पार ऐशीतशी करणारा लेख!मला नेहमी असा प्रश्न पडतो की,सत्ताकाळात अतिशय भ्रष्ट आचरण केलेल्या,शेती व शेतकरी विरोधी धोरणे आखण्यात अग्रभागी असलेल्या,अनेक गुन्हेगार,देशद्रोही क्रुत्यात सहभागी असलेल्या(पुरावा देशद्रोहींसोबत विमान प्रवास व बनावट स्टंप घोटाळ्यातील खुद्द तेलगीची नार्को टेस्ट) या साहेबांना,लाभार्थी सोडा,पण अनेक राजकीय नेते (यात भाजप शिवसेनेचेही आले),साहीत्यीक,शेतकरी नेते ,व पत्रकार या साहेबांना "जाणते",शेती तध्न्य वगैरे संबोधुन अजुनही त्यांचा गौरव कां वाढवितात?

    ReplyDelete