Saturday, February 24, 2018

चिलखती मुलाखती

संबंधित इमेज

जागतिक मराठी अकादमीने योजलेल्या पुण्यातील कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळाला. सर्वसाधारणपणे पत्रकारांनी वा तत्सम कोणा जाणत्याने राजकीय नेत्यांची मुलाखत घ्यावी, हा आजवरचा प्रघात आहे. पण त्याला बगल देऊन संयोजकांनी दोन मराठी नेत्यांनाच एकमेकांच्या मुलाखती घेण्य़ाचे काम सोपवले आणि त्यातले नाविन्य ओळखून लोकांनीही तिकडे गर्दी केली. शरद पवार हे अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रभावित करणारे व्यक्तीमत्व आहे आणि राज ठाकरे हे तुलनेने नव्या पिढीचे स्वयंभू नेतृत्व आहे. आपल्या आक्रमक व व्यंगात्मक शैलीने राजनेही महाराष्ट्राला काही काळ मोहिनी घातलेली आहे. पण आजकाल हे दोन्ही नेते तसे राजकारणातून बाजुला फ़ेकले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सदरहू मुलाखतीला अनेक लोकांनी नाके मुरडली तर समजण्यासारखे आहे. यातली पहिली गोष्ट अशी, की ज्यांना त्यात मुळातच रस नव्हता त्यांनी टिकेचा सूर लावला, तर नवल नाही. तिथे काय विचारले गेले वा काय उत्तर मिळाले, त्याच्याशी अशा नाराजांना कवडीचेही कर्तव्य नसेल, तर त्यांनी त्यावर प्रतिक्रीयाही देण्याची गरज नव्हती. पण प्रतिक्रीया आली आणि नाके मुरडली गेली, याचा अर्थच यांनाही त्याविषयी उत्सुकता नक्की होती. अर्थात त्यात आता काही नवे राहिलेले नाही. आपली मते ठरलेली असतात आणि समोरचा काय बोलतो वा सांगतो, त्याच्याशी कर्तव्य नसल्याने प्रतिक्रीया त्याने बोलण्यापुर्वीच तयार असतात. म्हणूनच अशा प्रतिक्रीया वा नापसंतीची दखल घेण्याचे काही प्रयोजन नाही. ज्यांच्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते, त्यांनी तिकडे गर्दी केली आणि त्यांनी त्याची मजाही मनसोक्त लुटली. तर त्याचे आयोजन यशस्वी झाले हे मान्यच करावे लागेल. दुर्दैवाने मला त्याची मजा घेता आली नाही. वर्तमानपत्रातूनच त्याची चव चाखावी लागली.

गेल्या दोनतीन वर्षात अशा गप्पावजा मुलाखतीचे एक नवे पर्व वाहिन्यांवर सुरू झालेले आहे. एक अभिनेता दुसर्‍या अभिनेत्याची मुलाखत घेतो, असा प्रकार अनेकदा बघायला मिळालेला होता. रणवीर कपुरने अमिताभ बच्चन वा अनील कपूर यांच्याशी साधलेला संवादवजा मुलाखती बहुधा इंडीय टूडे या वाहिन्यांवर बघितल्या होत्या. त्यात कुतूहल व उलगडा असे त्याचे सरसकट स्वरूप होते. पित्याच्या सोबतचा अभिनेता अमिताभ आणि ॠषिकपूरच्या पुत्राने घेतलेली मुलाखत मजेशीर होती. तसेच काही इथेही व्हावे, अशी अपेक्षा असल्यास गैर मानता येणार नाही. पण त्याचा मागमूस या मुलाखत गप्पांमध्ये आढळला नाही. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवार म्हणजे मागल्या अर्धशतकाचा चालताबोलता इतिहास आहे. त्यांच्याकडून काही धडे मिळण्यासाठी नव्या पिढीच्या नेत्याने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा कोणी केलेली नव्हती. ते कलाकारांच्या बाबतीत शक्य असले तरी राजकीय व्यक्तींना तितके मोकळेढाकळे वागता येत नाही. उद्या त्याचाच वापर करून आणखी राजकीय रणधुमाळी माजवली जाऊ शकते. त्यामुळे एकमेकांना कुठलाही ओरखडा येणार नाही, अशी काळजी घेतच हा संवाद व्हावा ही अपेक्षा होती. त्यात कुठे अर्णब गोस्वामी डोकावणार नाही, हेच निश्चीत होते. जेव्हा असा संवाद होतो, तेव्हा त्यातून काही खळबळजनक सापडण्याची अपेक्षाच गैरलागू असते. आणखी एक बाब अशी, की त्यात एकमेकांना गोत्यात घालणारा संवादही होऊ शकत नाही. कारण तिथे एकमेकांचे वस्त्रहरण करायला वा जयपराजयाच्या आवेशाने कुस्ती होत नसते. शक्यतो परस्परांना समजून घेतानाच अन्य जमलेल्या प्रेक्षकांना आनंद मिळावा, असाच त्यातला हेतू असतो. सहाजिकच तो हेतु साध्य झाला आणि कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळण्यापासून मनोरंजनही खुप झाले. त्यातून पुढले काही राजकारण व्हावे ही अपेक्षा चुक आहे.

सध्या शरद पवार आपली गमावलेली राजकीय प्रतिष्ठा व शक्ती पुन्हा मिळवण्यासाठी धडपडत आहेत. आरंभी म्हणजेच स्वतंत्रपणे आपला पक्ष काढून जबरदस्त यश संपादन केलेले राज ठाकरेही सध्या राजकीय अज्ञातवासात गेल्यासारखे मागे पडलेले आहेत. त्यांना अशा कार्यक्रमातून उभारी मिळेल, ही त्यांचीही अपेक्षा नसावी. मग त्यात राजकारण शोधणे चुकीचे नाही काय? पण या निमीत्ताने त्यांनी जो संवाद केला, त्यातून अनेक जुन्या गोष्टी उकरल्या गेल्या आहेत. काही आजवर झाकलेल्या गोष्टींना नव्याने उजाळा मिळालेला आहे. इतके तिथे जमलेल्या लोकांसाठी पुरेसे होते. वाहिन्यांवरून थेट प्रक्षेपण बघणार्‍यांसाठीही ते आनंददायक होते. त्यासाठी पवार किंवा राज यांच्याविषयी आपल्या मनातली गृहिते पुढे ठेवून टिकाटिप्पणी करणे योग्य नाही. त्यात उपस्थित झालेल्या विषय व मुद्दे यांच्याबद्दल उहापोह जरूर होऊ शकतो. पण तो करताना मनातले पुर्वग्रह दूर ठेवले पाहिजेत. ती मनसेची वा राष्ट्रवादीची सभा वा मेळावा नव्हता. म्हणूनच राजकीय भूमिकांच्या आधारे त्यावर आरोप करण्यात अर्थ नाही. त्यापेक्षा त्यात आलेले व उल्लेखले गेलेले मुद्दे, याची मिमांसा करणे योग्य आहे. उदाहरणार्थ मोदींची कार्यशैली वा त्यांच्या हाती न लागलेली पवार साहेबांची करंगळी, यावर भाष्य होऊ शकते. सोनियांच्या वर्तनामुळे आपल्याला पक्ष सोडावा लागला त्याचे पवारांनी दिलेले कारण, त्याची सत्यता तपासायलाही अजिबात हरकत नसावी. राहुल किंवा कॉग्रेसविषयी साहेबांनी दाखवलेला ‘प्रचंड आशावाद’ किती वास्तववादी आहे, त्याचीही तपासणी करता येईल. मला यातले आवडलेले सर्वात महत्वाचे विधान म्हणजे बाळासाहेबांच्या इतका जातपात न मानणारा दुसरा नेता महाराष्ट्रात झाला नाही हे होय. कारण पवारांसारख्या अतिशय सावध नेत्याचे ते विधान अत्यंत गंभीर व आशयगर्भ आहे. पण त्यावर कोणी मतप्रदर्शनच केलेले नाही.

बाळासाहेबांच्य इतका जातपात निरपेक्ष दुसरा नेता महाराष्ट्रात झाला नाही. असे पवार म्हणतात त्याचा अर्थ आपणही तितके सोवळे नसल्याचीच कबुली असते. तेच कशाला, त्यात मग एसेम जोशी, यशवंतराव चव्हाण, कॉम्रेड डांगे यांच्यापासून तमाम मराठी दिग्गज नेतेही येतात. इतके छातीठोकपणे पवार पुर्वीच्या तमाम मराठी नेत्यांना जातीचे पक्षपाती कसे ठरवू शकतात? बाळासाहेबांचे कौतुक नक्कीच आहे. तसे नसते तर अठरापगड जातीच्या तरूणांनी तीन पिढ्या त्यांचे नेतृत्व निष्ठेने पत्करलेच नसते. पण बाळासाहेबांच्या कौतुकाच्या नादात पवारांनी अन्य मराठी दिग्गजांवर अन्याय तर केलेला नाही ना? जोशी, चव्हाण वा डांगे यांच्यासारखे नेते कधी कुठल्या कारणाने जातीय भावनेने वागले असतील काय? आणि असतील, तर त्यांच्या तशा गोष्टीचे एखादे तरी उदाहरण त्याच मुलाखतीत विचारले गेले पाहिजे होते. त्यात कुठलेही पक्षीय राजकारण आले नसते आणि अनुभवी पवारांकडून नव्या पिढीला त्या दिग्गजांचा खरा चेहरा बघता आला असता. पण राज यांनी त्यावर उपप्रश्न केलेला दिसत नाही. कदाचित हसतखेळत मनोरंजन करायचा हेतू असल्याने इतक्या खोलात जायचे नाही, असे आधीच ठरलेले असू शकते. पण माझ्यासारख्या चौकस माणसाला त्याविषयी उत्सुकता वाढलेली आहे. आज नाही तरी उद्या कोणा पत्रकाराने मुलाखत घेताना वा संधी मिळताच साहेबांना याविषयी विचारून घेतले पाहिजे. कारण ज्या तीन नेत्यांची नावे मी इथे घेतली आहेत, त्यांच्याकडूनच पवारांनी फ़ुले शाहू आंबेडकरांचे धडे गिरवल्याचे त्यांनीच आजवर अनेक प्रसंगी अगत्याने कथन केले आहे. मग आताच त्यांनी बाळासाहेबांवर स्तुतीसुमने उधळताना अन्य नेत्यांना वाळीत कशाला टाकावे? व्यक्तीगत काही अनुभव असल्याशिवाय साहेब असे बोलणे शक्य नाही. म्हणून ही मुलाखत मनमोकळी असण्यापेक्षा चिलखती बंदिस्त वाटली.

आणखी एक गोष्ट आठवली, ती सोनियांवरील आक्षेपाची. वाजपेयी सरकार एका मताने कोसळल्यावर पंतप्रधान पदावर दावा करण्यास सोनिया गांधी गेल्याने परंपरेचा भंग झाला, असाही एक किस्सा पवारांनी कथन केला. मनमोहन सिंग वा पवार यापैकी एकाचा तो अधिकार होता आणि तोच सोनियांनी डावलला. म्हणून आपण पक्षाला रामराम ठोकला, असे साहेबांनी राजला सांगितले. त्यांच्या म्हणण्यातली परंपरा खरी आहे. कारण त्यावेळी दोन्ही सभागृहात हेच दोघे कॉग्रेसचे व विरोधी पक्षाचे पुढारी होते. पण त्यातल्या पवारांचा अधिकार फ़क्त राष्ट्रपती भवनात डावलला गेला नव्हता. खुद्द लोकसभेतही पवारांचा अधिकार सोनियांनी दाबून नाकारला होता. कुठल्याही सरकारच्या विरोधात विश्वास वा अविश्वास प्रस्ताव येतो, तेव्हा विरोधी पक्षनेत्याचा त्यावर बोलण्याचा पहिला अधिकार असतो. पण वाजपेयी सरकार कोसळले, तेव्हाच्या प्रस्तावावर विरोधी नेता असूनही पवार बोलू शकलेले नव्हते. त्यांच्या जागी विरोधी उपनेते माधवराव शिंदिया यांना बोलणे भाग पडलेले होते. एकप्रकारे तिथेच प्रथम पवारांचा अधिकार व त्यासंबंधीची परंपरा पायदळी तुडवली गेलेली होती. पण त्याविषयी कुठलेही वैषम्य साहेबांनी दाखवले नव्हते. उलट मोठ्या मनाने त्यांनी संसदेच्या पायरीवरून सोनियांच्या नेतृत्वाखाली आता पर्यायी सरकार स्थापन करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. कॅमेराने टिपलेला व थेट प्रक्षेपण झालेला तो प्रसंग आज देखील माझ्या मनात ताजा आहे. तेव्हा सरकार आटोपून एक तासही झाला नव्हता, की सोनियांनी राष्ट्रपतींकडे कुठला दावाही पेश केलेला नव्हता. त्यामुळे सोनियांनी दावा केल्यानंतर आपण पक्ष सोडला असे बोलणार्‍या साहेबांची स्मृती काहीशी क्षीण झाली असे वाटते. आणखी एक महत्वाची घटना पवारांना स्मरण करून देण्यासारखी आहे. सोनियांचा दावा फ़ेटाळला जाईपर्यंत त्यांनी पक्षाचा राजिनामा दिलेला नव्हता.

राष्ट्रपतींनी सोनियांकडे बहुमताच्या आकड्याचा खुलासा मागितला होता आणि संबंधित पक्षनेत्यांची पाठींब्याची पत्रेही मागितली होती. त्यात सोनियांनी समाजवादी पक्षाचे मुलायमसिंग यांना गृहीत धरले होते आणि आपल्याला विचारल्याशिवाय दावा केला गेल्यामुळे मुलायमनी नंतर पाठींबा द्यायचे नाकारले. त्यामुळे सोनियांचा दावा बारगळला होता. सहाजिकच लोकसभा बरखास्त करून मध्यावधीला सामोरे जाण्याखेरीज पर्याय राहिला नव्हता. मग सगळेच पक्ष निवडणूकीच्या तयारीला लागले आणि त्यात सोनियांचे दूत म्हणून शरद पवार चेन्नईला अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्याकडे निवडणूकपुर्व आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलेले होते. म्हणजेच सोनियांनी परस्पर दावा केल्यामुळे पक्षाचा राजिनामा दिल्याची गोष्ट विपर्यास आहे. खरेतर त्यांनी पक्षाचा राजिनामा दिला नव्हता. परदेशी जन्माच्या असल्याने सोनियांनी देशाचा पंतप्रधान होणे घातक असल्याचा प्रस्ताव त्यांनीच अन्य नेत्यांच्या सहीनिशी पक्षाकडे पाठवला होता. त्यावर चिडून सोनियांनीच अध्यक्षपद सोडण्याचा पवित्रा घेतला होता. तेव्हा इतर नेत्यांनी ठामपणे सोनियांचे पाय धरून त्यांना राजिनामा मागे घ्यायला लावले. त्यांना परदेशी ठरवणार्‍या पवार, संगमा व तारीक अन्वर यांची पक्षातून हाकालपट्टी करणारा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. या दरम्यान म्हणजे पंतप्रधान पदावर सोनियांनी दावा करण्यापासून पक्षाचा त्यांनीच राजिनामा देण्यापर्यंत दोनतीन आठवड्य़ाचा कालावधी उलटला होता. पवारांचा त्या पदावर दावा करण्याचा इतकाच हट्ट होता, तर त्यांनी सरकार कोसळल्यावर विनाविलंब थेट कॅमेरासमोर सोनियांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापण्य़ाची घोषणा कशाला केली होती? अशा प्रश्नांची उत्तरे खरेतर मिळायला हवीत. कारण ती अन्य कोणी देऊ शकत नाही. मुळात सोनियांच्या परदेशी मूळाचा आक्षेप कशासाठी सोडला, त्याचेही उत्तर गुलदस्त्यात आहे.

हे अर्थातच राजकीय आक्षेप आहेत आणि राजकीय अभ्यासकाचे आक्षेप आहेत. तिथे मुलाखतीची मजा घ्यायला जमलेल्यांना तितका काथ्याकुट कुठे हवा असतो? त्यांना मनोरंजक व विरंगुळा म्हणून एक कार्यक्रम हवा होता. राज व पवार यांनी तो अतिशय चांगला सादर केला. त्यात कोणी दुखावले नाही की कोणालाही पकडताही येणार नाही अशी करंगळी पवार कुठे लावतात, आणि आरोपाचे गोवर्धन कसे तोलतात, तेही लोकांना अनुभवता आले. त्या करंगळीनेच मुलाखतीचा गोवर्धन उचलून धरला ना? त्यासाठीच तर अशा कार्यक्रमांचे आयोजन होत असते. ते अभ्यासकांच्या चिकित्सेसाठी योजले नसेल तर त्याविषयी आक्षेप घेणे वा टिकाटिप्पणी करणे म्हणून गैरलागू आहे. अशा संवाद व मुलाखती अंगात चिलखत घालून केलेल्या असतात. त्यात कोणाला जखम होऊ नये किंवा ओरखडाही येऊ नये, याची पुरेपुर सज्जता राखलेली असते. मात्र उपस्थितांना खणाखणी झाल्याचा आनंद लुटता आला पाहिजे, हेही बघावे लागते ना? त्यामुळे मोदीबाग नावाचे निवासस्थान, करंगळी वा मोदींची कार्यशैली, राहुलचे कौतुक वा कॉग्रेसच भाजपाला पर्याय, असल्या खणाखणीच्या गोष्टी ओघाने आणल्या गेल्या. त्याखेरीज आरक्षण, मुंबई वेगळी करणे वा यशवंतरावांचे नेहरूविषयक उद्गार पुढे करण्यात आले. पण २०१४ साली परस्पर भाजपाला सरकार बनवायला पाठींबा देण्याची घोषणा, विधानसभेपुर्वी अकस्मात आघाडी मोडण्याचा निर्णय, असले टोचणारे विषय आलेच नाहीत. कदाचित आणले गेले नाहीत. बहुधा चिलखत फ़ाडून असे प्रश्न जखमा करण्याची शक्यता असावी. पण त्याची इथे गरजही नव्हती. जमलेल्यांचे मनोरंजन हाच उद्देश असल्यावर असल्या प्रश्नांची गरज कुठे होती? मनमोहन सिंगांच्या बाबतीत मोदी म्हणाले होते ना? रेनकोट घालून आंघोळ? तसाच काहीसा हा प्रकार! चिलखत चढवून एकमेकांना रक्तबंबाळ करणारी खणाखणीची ही मुलाखत होती आणि ती रंगलीही खुप छान!

5 comments:

  1. भाऊ
    खूपच मस्त .पारदर्शक विश्लेषण .

    ReplyDelete
  2. भाऊ आपसे अपेक्षा है कि कभी आप सुब्रमण्यम स्वामी के बारे में भी कुछ लिखेंगें.

    ReplyDelete
  3. उत्तम विश्लेषण भाऊ.. कुठलंही ठोस प्रयोजन नसलेली ही मुलाखत म्हणजे कालापव्यय वाटला.. अर्थात मुलाखत देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोन्ही व्यक्तींना सध्या काहीही काम नसल्यामुळे त्यांना त्याबद्दल काही वाटलं नसावं.. स्वपक्षाच्या राजकीय स्थितीबद्दल वा वाटचालीबद्दल न बोलता सत्ताधारी पक्षावर टीका करण्याकरता इतका घाट घालायची काय आवश्यकता होती कळत नाही..

    ReplyDelete
  4. "चिलखती मुलाखत" पेक्षा "बिनतलवारींच द्वंद" असा मथळा योग्य वाटतो.कारण जोरदार वार झाला तर चिलखतामुळे बचाव होतो.इथ तर जोरदार वार सोडा गुदुगुल्या करुन श्रोत्या/प्रेक्षकांना हसवण्याचा प्रकार वाटला.पूर्वी बेनिफीट सामन्यात स्टार खेळाडू गोळा करावयाचे ,फलंदाजांनी फटक्यांची आताषबाजी करायची आणि गल्ला गोळा करायचा.

    ReplyDelete
    Replies
    1. 'सिक्सर' स्टेडियमच्या बाहेर...

      Delete