Monday, February 5, 2018

‘बाळासाहेब’ आंबेडकर

thakre pawar के लिए इमेज परिणाम

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देणारे भारीप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर भलतेच फ़ॉर्मात आलेले आहेत. सातत्याने वादग्रस्त विधाने करणे व त्यातून प्रसिद्धीझोतात रहाण्या़चा विडा त्यांनी उचलला आहे. त्यात भिडेगुरूजी यांच्या अटकेच्या मागणीपासून तोंड उघडल्यास शरद पवारांना पळता भूई थोडी होण्यापर्यत अनेक विधानाचा समावेश होतो. ही सर्व विधाने एकत्र अभ्यासाला घेतली, तर प्रकाशजी आणि पवार यांच्या आंदोलनातला फ़रक लक्षात येतो. पवारांनी हल्ली संविधान बचावाचे काम हाती घेतले आहे आणि प्रकाशजींनी आपलेच विधान बचाव मोहिम हाती घेतलेली दिसते. नित्यनेमाने वादग्रस्त विधाने करायची आणि त्यानंतर त्याच विधानांचा बचाव मांडत माध्यमातून झळकायचे, असे त्यांच्या मोहिमेचे स्वरूप आहे. पण बर्‍याच काळानंतर प्रकाश आंबेडकर प्रकाशात आलेले आहेत आणि म्हणून त्यांनी त्यातला प्रत्येक क्षण पुरेपुर वापरून घेतला, तर गैर मानता येणार नाही. त्या ओघात त्यांनी आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरचा सुप्रिमो आपणच असल्याचीही घोषणा करून टाकलेली आहे. कदाचित बाळासाहेबांनी बंदचा आदेश दिल्यावर मुंबई व अन्यत्र बिनबोभाट बंदचे पालन व्हायचे, तो संदर्भ पकडून आपल्या सुप्रिमो असण्याची गर्जना प्रकाशजींनी केलेली असावी. मात्र केवळ बंदच्या डरकाळ्या फ़ोडून ठाकरे सुप्रिमो झालेले नव्हते, की त्यांनी कधी कुठली निवडणूक लढवली नाही. याचा नव्या सुप्रिमोंना विसर पडलेला दिसतो. अन्यथा त्यांनी इतक्या टोकाची आवेशपुर्ण भाषा केली नसती. एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल, की बाळासाहेब ठाकरे हा निकष त्यांनी जाहिरपणे मान्य केला व वापरला, त्याबद्दल आंबेडकरांचे कौतुक करावे लागेल. सुप्रिमो म्हणजे काय, त्याचा अन्य कुठला निकष वा मोजपटटी असूच शकत नाही. मात्र नुसते नाव वा विशेषण घेऊन कोणी सुप्रिमो होत नसतो, हेही लक्षात घेतले पाहिजे.

शिवसेनाप्रमुख म्हणून आपल्या अनुयायांना व समर्थकांना आदेश देण्याचे अधिकार बाळासाहेबांनी मिळवले होते आणि ते आदेश पाळलेही जातील, इतकी त्यासाठी शक्ती उभारलेली होती. नुसत्या माध्यमातल्या गर्जना करून ते सुप्रिमो म्हणून कधी मिरवले नाहीत. त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे बाळसाहेबांनी कधीच स्वत:ला सुप्रिमो म्हणवून घेतलेले नव्हते. सरसकट इंग्रजी माध्यमे आणि अधूनमधून भाषिक माध्यमांनी त्यांच्यामागे सुप्रिमो ही बिरूदावली चिकटवलेली होती. खुद्द साहेबांनी स्वत:ला शिवसेनाप्रमुख म्हणवून घेण्यात आनंद मानला होता. समाधान शोधले होते. पण शिवसेनाप्रमुखच लोकांना सुप्रिमो वाटत होता, ही बाब लक्षणिय होती. प्रकाश आंबेडकर ते कितपत समजू शकले आहेत? समजले असते, तर त्यांनी आपल्या कृती व कर्तॄत्वातून इतरांच्या तोंडी सुप्रिमो हा शब्द येण्याची परिस्थिती निर्माण केली असती. पण तसे अजून एकदाही अनुभवास आलेले नाही. कालपरवाच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनानंतर जी जाळपोळ वा हिंसाचार झाला, त्याची जबाबदारी आंबेडकरांनी कितीशी घेतली? अशी जबाबदारी झटकून टाकल्याने कोणी सुप्रिमो होत नसतो. कुठल्या कायदेशीर बडगा वा खटल्याच्या भयाने शब्द वा निर्णय मागे घेण्याची वेळ ठाकर्‍यांवर आली नाही. त्यांच्या शब्दाला लोक प्रमाण मानत होते आणि अनुयायी त्यासाठी जीव देण्यासाठी सज्ज असायचे. सहाजिकच त्यामुळे उदभवणार्‍या परिस्थितीला सरकार व प्रशासन वचकून असायचे. त्या परिणाम व तशा शक्यतेचा जो धाक होता, त्यातून सुप्रिमो ही उपाधी आलेली आहे. त्या कृतीसुद्धा निवडणूकांवर डोळा ठेवून किंवा मते मिळवण्याच्या गणितातून येत नसायच्या. जे मनाला पटले व योग्य वाटले, त्यासाठी आवाज उठवण्यापासून रस्त्यावर उतरण्यापर्यंत कुठलाही निर्णय शिवसेनाप्रमुख बेधडक घेत असत आणि त्यातून त्यांच्या शब्दाला वजन आले होते.

अजून लोकसभा निवडणूकीचा खेळ सुरू झालेला नाही आणि सुरू झाल्यानंतर आपणच त्यातला सबसे बडा खिलाडी असणार, ही प्रकाशजींची भाषा अनाकलनीय आहे. सबसे बडा खिलाडी ही दूरची गोष्ट झाली. मागल्या तीन दशकात आपण महाराष्ट्राच्या राजकारणातही दमदार खिलाडी का होऊ शकलो नाही, त्याचा आधी विचार त्यांनी केलेला बरा. कारण रिपब्लिकन पक्षाचा एक गट आणि नंतर त्याला जोडलेली बहुजन महासंघ अशी आघाडी, यांना अजून तरी एकाही निवडणूकीत आपला प्रभाव दाखवता आलेला नाही. क्वचितच महाराष्ट्रात फ़ेरी मारून गर्जना करणार्‍या मायावतींनी मोठे यश इथे मिळवलेले नसेल. पण त्यांच्या बसपाला मिळणारी मते आणि दिसणारा प्रभावही, भारीप बहुजनांपेक्षा मोठा आहे. एकूण आंबेडकरी चळवळी व रिपब्लिकन गटातही प्रकाशजींना आपला बलवान गट उभारता आलेला नाही. विरोधकांची जमवाजमव चालते त्यातला एक गट, यापेक्षा अधिक कुठलेही राजकिय स्थान त्यांना तीन दशकात संपादन करता आलेले नाही. अशा स्थितीत थेट सबसे बडा खिलाडी ही भाषा हास्यास्पद असते. कधी कॉग्रेसशी संगत करायची तर कधी डाव्यांच्या तंबूत शिरायचे, असे लपंडाव करताना त्यांनी स्वत:ची प्रतिमा विस्कटून टाकलेली आहे. अलिकडल्या काळात तर प्रकाशजी आंबेडकरी चळवळीत आहेत, की नक्षलवादी प्रवाहात वाहून गेलेत, त्याचाही थांगपत्ता त्यांचे अनुयायी व सहकार्‍यांना लागलेला नाही. मग महाराष्ट्राच्या राजकारणात सुप्रिमो वा बडा खिलाडी आहोत, म्हणजे काय? राजकारणातले खिलाडी दोन प्रकारचे असतात. एक जो मतदानात उमेदवार पाडण्याची कुवत राखतो किंवा दुसरा निवडून आणण्याची क्षमता सिद्ध करतो. शरद पवार पहिल्या वर्गातले खिलाडी मानले जातात, तर शिवसेनाप्रमुख दुसर्‍या वर्गातले खिलाडी म्हणून ओळखले जातात. प्रकाश आंबेडकर कुठल्या वर्गातले खिलाडी आहेत?

भीमा कोरेगावच्या घटनेनंतर प्रकाशजींना प्रसिद्धी मिळाली आणि आपण सुप्रिमो झाल्याचे त्यांना वाटू लागले असेल, तर नवल नाही. पण अशी संधी मिळते तेव्हा ती अतिशय जपून वापरावी लागते. नुसतीच तोंडाची वाफ़ दवडून उपयोग नसतो. एक एक शब्द जपून बोलावा लागत असतो आणि त्यातून कमाल परिणाम साधणे भाग असते. प्रकाशजींना त्याचे भान नसावे. म्हणूनच त्यांनी नित्यनेमाने जपमाळ ओढल्यासारखी वादग्रस्त विधाने करण्याचा सपाटा लावला आहे. मग कधी भिडेगुरूजींचे निमीत्त करून मुख्यमंत्र्याला चिमटे काढतात. तर कधी शरद पवारांना तोंड उघडण्याची हुलकावणी देतात. अनेक वर्षे पवारांना पळता भूई थोडी करण्याचे राजकीय इशारे देणारे सत्तेत आले व सत्तेतून बाहेरही फ़ेकले गेले. पण पवारांना ‘भूई कधी थोडी’ झालेली नाही. उलट त्यांच्यापाशी मोजता येणार नाही इतकी अफ़ाट भूई असल्याच्या कथा नित्यनेमाने ऐकू येत असतात. अशा पवारांना धमकावण्यापेक्षा हाताशी काय असेल ते बोलून टाकावे आणि पवारांना पळते करावे ना? पवारांवर कुठलेही आरोप करता येतील. पण पळण्याइतका हा शेळपट नेता नाही, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावेच लागेल. अर्धशतकाच्या कालखंडात पवारांनी नुसते पावसाळेच बघितलेले नाहीत, तर अनेक दुष्काळही पचवलेले आहेत. प्रकाश आंबेडकरांना त्याचेही भान उरलेले नसेल, तर त्यांनी आपल्या समजुतीच्या भ्रमात रममाण व्हायला हरकत नसावी. कारण सुप्रिमो होणे किंवा पवारांना भूई थोडी करणे, वास्तवातले मोठे राजकीय आव्हान आहे. ते कुठल्या सेमिनार वा पत्रकार परिषदेत विधाने करण्याइतके सोपे काम नाही. याही वयात पवार जितके हिंडत फ़िरत असतात, तितके नुसते फ़िरून बघावे आणि मग तोंड उघडावे. कारण शिवसेनाप्रमुख होणे जितके अवघड आहे, तितकेच शरद पवारांना आव्हान म्हणून उभे रहाणेही मुश्कील काम आहे.

8 comments:

  1. भाऊ तुमचा ब्लॉग मी सातत्याने फॉलो करतो
    कित्येक वेळा बोचटपणा, आचरटपणा, मिश्कीलता दिसून आलीये. पण तितकंच सत्य सुद्धा दिसुन आलंय आजसुद्धा पुन्हा एकदा तुमचा हा लेख संधीसाधूपणा दाखवून सतत वादग्रस्त विधानं करून स्वतःला प्रकाश-झोतात ठेवू इच्चीणाऱ्या उतावीळ राजकारण्याची भंपक शोबाजी आणि दिखाऊवृत्तीचे दर्शन करतोय...

    ReplyDelete
  2. भाऊ हे पपू (म्हणजे परम पूज्य) प्रकाश आंबेडकर म्हणजे एखादया करोडपती व्यावसायिकाचा मुलगा/नातू असतो तसे आहेत. फक्तं आडनावावर मोठे झाले आहेत. ज्या प्रमाणे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कर्तृत्व शून्य. आमच्या शाळेचं एक ब्रीदवाक्य आहे. 'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे'. आंबेडकर तसेच काहीसे आहेत.

    एक मात्रं नक्की की स्वतःच्या आजोबांच्या आडनावाला डाग लावण्याचं काम ते अगदी मनोभावे करतायत.

    ReplyDelete
  3. एकदम सुंदर लेख.....

    ReplyDelete
  4. व्वा अतिशय सुरेख मांडणी केलीत.

    ReplyDelete
  5. भाऊंनु एक नंबर.

    ReplyDelete
  6. balasaheb thakare honyachi swapna kuni pahu nayet

    ReplyDelete