Monday, July 16, 2018

विषाची परिक्षा

Image result for HDK cried

पुराणकथा किंवा मनूवाद म्हणून टिंगल उडवणे खुप सोपे असते. पण अशा अनेक पुरणकथांचा आशय पचवणे खुप अवघड असते. कारण त्या पुराणकथा आज कालबाह्य झालेल्या आहेत. त्यात काळाचा संदर्भ तुटलेला आहे. पण कुठल्याही कथेत एक बोध असतो, तो आशय मात्र त्रिकालाबाधित असतो. त्याला पचवणे अतिशय अवघड काम असते. कधीकाळी देवदानवांनी समुद्रमंथन केल्याची एक पुराणकथा आहे. त्यातून म्हणे अनेक रत्ने सागराच्या पोटातून बाहेर काढण्यात आली. मग त्याच्या वाटपावरूनही देवदानवात रणकंदन माजलेले होते. त्यात अमृत होते तसेच हलाहल नावाचे भयंकर विषही होते. अमृतासाठी प्रत्येकजण पुढे सरसावला होता. पण त्या हलाहलाचे काय करावे, याचे उत्तर मिळत नव्हते. कारण विषप्राशन कोणालाही नकोच असते. पण तेच पचवण्याची क्षमता खरी कसोटी असते आणि तीच महा-देव असल्याची साक्ष देत असते. कुणालाही वरदान देण्याची कुवत असलेला भोळा शंकर इतकी सिद्धी कुठून प्राप्त करू शकला होता, त्याचे उत्तर त्या विषप्राशनात आहे. हलाहल पचवण्याची वेळ आली, तेव्हा तोच पुढे आला होता आणि ते कटू सत्य त्याला पचवता आले, म्हणून त्याच्यापाशी इतकी मोठी सिद्धी आलेली होती. त्यासाठीचे धाडस नसलेल्या अनेकांना तशीच सिद्धी हवी असते, पण त्यांना हलाहलासारखे विष मात्र नको असते. सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी त्याच अनुभवातून जात आहेत. अवघे दोन महिने झाले नाहीत, तर त्यांना मुख्यमंत्रीपद हे जीवेघेणे जहर असल्याचा शोध लागला आहे. शपथ घेताना वा पदभार स्विकारताना ते अमृत वाटले होते. आता त्यांना ते हलाहल पचवताना नाकी नऊ आलेले आहेत आणि ते दु:ख पक्षाच्या एका मोठ्या समारंभात बोलून दाखवताना, कुमारस्वामी यांचे डोळे पाणावले. राहुल गांधींचे दु:ख त्यांना आता कळले असावे.

दोन महिन्यापुर्वी जेव्हा विधानसभेचे निकाल लागलेले होते, तेव्हा कुमरस्वामी यांचा जनता दल सेक्युलर पक्ष तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकला गेला होता आणि कॉग्रेसने सत्ता व बहूमत गमावलेले होते. भाजपाने सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली तरी बहूमत थोडक्यात हुकलेले होते. तर त्यालाच सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी दुसर्‍या क्रमांकाच्या कॉग्रेसने थेट कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद देऊ केले आणि खुप मोठा तमाशा होऊन अखेरीस त्यांनी सत्तापद स्विकारलेले होते. मग दिल्लीला जाऊन त्यांनी राहुल गांधी हे पुण्यात्मा असल्याची ग्वाही दिली होती. त्यातले राहुलचे नेमके पुण्य कोणते, याचा खुलासा त्यांनी केलेला नव्हता. तो असा, की २०१४ च्या आरंभी त्याच राहुल गांधींनी सत्ता म्हणजे विष असल्याचा हवाला दिलेला होता. सत्ता ही जहरी असते म्हणून त्यापासून दुर रहावे, अशी शिकवण आपल्याला मातोश्रीने बालपणापासून दिली असल्याचे राहुलनी जयपूरच्या पक्ष अधिवेशनात सांगितले होते. पण इतका मोठा व बहूमोलाचा उपदेश कुमारस्वामींच्या पिताश्रींनी कधी केलेला नसावा. खरेतर पिताश्री देवेगौडा यांनी ते विष दोन दशकापुर्वी प्राशन केले होते आणि अवघ्या दहा महिन्यात त्याचा प्रभाव पडून ते पंतप्रधान म्हणून मुर्छित पडलेले होते. तरीही कधी त्यांनी आपल्या पुत्राला सत्ता हे जहर असल्याचा उपदेश केला नाही. म्हणून असेल कुमारस्वामी आयुष्यभर सत्तेच्या मागे हावर्‍यासारखे पळत राहिलेले आहेत. किंबहूना त्यांनी मिळेल तिथून असे विष संपादन करीत मुख्यमंत्रीपदाचा हव्यास कधी सोडला नाही. आज त्यांच्या डोळ्यात अश्रू पाठीराख्यांनी बघितले आणि अनेकजण खुपच हळहळले आहेत. पण बारातेरा वर्षापुर्वी असेच अश्रू पिताश्रींनी ढाळले, तेव्हा त्याकडे काणाडोळा करून कुमारस्वामींनी मुख्यमंत्रीपदाची पहिली शपथ घेतलेली होती. आज इतरांना त्याचे स्मरण नसेल तरी गौडा पितापुत्रांना त्याचे स्मरण असायला हरकत नसावी.

तेव्हा अशीच स्थिती कर्नाटकात आलेली होती आणि बहूमत गमावलेल्या कॉग्रेसची सत्ता टिकवण्यासाठी देवेगौडांनी पाठींबा दिलेला होता. मुख्यमंत्री कॉग्रेसचा तर जनता दल सेक्युलरचा उपमुख्यमंत्री असा सौदा झालेला होता. सिद्धरामय्या त्यावर खुश होते. तर सत्तेचे विष प्राशन करायला उतावळे झालेल्या कुमारस्वामींनी मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून त्या आघाडीला सुरूंग लावला होता. भाजपाशी सौदा करून दोन दोन वर्षासाठी सत्तेचे वाटप केलेले होते. आपल्या पुत्राच्या अशा दगाबाजीने गौडा व्यथित झाले होते आणि त्यांनी अश्रू ढाळले होते. पण त्यांच्या अश्रूंनी एकाही आमदाराला पाझर फ़ुटला नाही, की कोणी पिताश्रींचे डोळे पुसायला रुमाल घेऊनही आला नव्हता. सगळा पक्ष व आमदार सत्तेचे विष प्यायला धावलेले होते. एकटे सिद्धरामय्या मागे थांबले आणि पुढे त्यांनी पक्षालाच रामराम ठोकून कॉग्रेसचा आश्रय घेतला होता. मग पुढल्या राजकारणात गौडा पितापुत्र मागे फ़ेकले गेले आणि त्यांच्या नाकावर टिच्चून सिद्धरामय्या मागली पाच वर्षे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सत्ता भोगत राहिले. त्यांनी आपल्या परीने गौडांचा प्रभाव संपवण्याचा प्रयत्न केला आणि दोघेही आपसात लढताना दुबळे होऊन गेले. त्याच्याच परिणामी भाजपाला त्या राज्यामध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकाची मजल मारता आली. मुळात त्या दोन्ही पक्षांसाठी तोच तर विषाचा पेला होता. तो पिण्याचे व पचवण्याचे धाडस दोघांपाशीही नव्हते. म्हणूनच मग युक्तीवादाच्या कसरती करून पुरोगामी सेक्युलर मतांची बेरीज दाखवत, पुन्हा सत्तेचे काल्पनिक विष पिण्याची वेळ आलेली आहे. गौडा असोत की त्यांचे सुपुत्र असो, त्यांना सत्ता हे विष वाटत नाही. त्यांना तेच राजकारणातले अमृत वाटते आणि सतत तेच प्राशन करून ते राजकीय आत्महत्या करीत राहिलेले आहेत. म्हणूनच त्यांनी डोळे ओले करणे वा अश्रू पुसण्याचे कितीही नाटक केले, म्हणून कोणाच्या काळजाला पाझर फ़ुटत नाही.

विरोधी एकजुटीचे नाटक रंगवणे सोपे आहे आणि अशी आघाडी चालवून दाखवणे अशक्य गोष्ट आहे. जे चालले आहे ते ठिक नाही अशा शब्दात कुमारस्वामी डोळ्य़ाला रुमाल लावतात, तेव्हा ते कशाबद्दल बोलतात? काय चालले आहे आणि ते का योग्य नाही? कर्नाटकात तर त्यांचेच सरकार चालले आहे आणि ते चांगले नसल्याची ग्वाही खुद्द मुख्यंमंत्रीच देत आहेत. यासारखा दुसरा कुठला विरोधाभास असू शकत नाही. त्यांच्याच शपथविधीला मंचावर जमलेल्या लोकांनी हातात हात गुंफ़ून उंचावले होते. तेव्हा आधुनिक युगातील देवलोक असलेल्या बहुतांश उपग्रहवाहिन्यांच्या देवादिकांनी अवकाशातून स्तुतीसुमनांचा वर्षाव केलेला होता. आज त्या फ़ुलांचे अश्रू झालेले आहेत. तेच कुमारस्वामींच्या डोळ्यातून ओघळत आहेत. दोन महिन्यापुर्वी आपण जे विरोधी ऐक्याचे वा भाजपाविरोधी एकजुटीचे नाटक रंगवले, त्यात अजिबात तथ्य नसल्याची ग्वाही हा मुख्यमंत्री देतो आहे. आपण सध्या आघाडी नावाचे विष पचवत असल्याचे मनपुर्वक सांगतो आहे. पण त्याचा अर्थ राज्यसत्ता हे विष नसून आघाडी वा कॉग्रेसचा पाठींबा म्हणजे कॉग्रेसचे विष असल्याची ग्वाही देतो आहे. नेहमीच्या राजकीय भाषेत त्याला टांगलेली तलवार म्हणतात. कधी ती निसटेल आणि आपल्याच मानेवर पडून कपाळमोक्ष होईल, याची अनिश्चीतता डोळ्यात अश्रू आणणारी आहे. म्हणून तर सत्ता संपादनानंतर पक्षाचा पहिलाच समारंभ असूनही मुख्यमंत्र्यानेच कुठलाही सत्कार घेण्यास नकार दिला. उलट अश्रू ढाळून दुखवटा साजरा केला. लोकसभेच्या मतदानाला अवघे नऊ महिने शिल्लक असतानाची ही स्थिती आहे. दोन महिन्यात विरोधी एकजुटीच्या अमृताचे विष होऊन गेलेले आहे. उपग्रह वाहिन्यांवरून पुष्पवृष्टी करणारे बुद्धीमान पुरोगामी देवादिक कुठल्या कुठे बेपत्ता झालेले आहेत. पुण्यात्मा राहूलही मदतीला धावलेले नाहीत.

एक गोष्ट साफ़ होती. कुमारस्वामींमुळे कर्नाटकात सिद्धरामय्यांचे उपमुख्यमंत्रीपद गेले, तेव्हापासून त्यांच्यात हाडवैर सुरू झालेले होते. यावेळी तर सिद्धरामय्या यांच्यामुळे कॉग्रेसला इतक्या जागा मिळालेल्या असून, त्याच मेहनतीवर आपल्या सर्वात मोठ्या दुष्मनाला मुख्यमंत्रीपद भूषवण्याचे सुख तो पदभ्रष्ट नेता देईल, यावर फ़क्त मुर्ख लोक विश्वास ठेवू शकतात. आपल्याकडे शहाण्यांना असल्या गोष्टी सत्य वाटतात. म्हणूनच अशा आघाडीचे गुणगान करण्याची दोन महिन्यापुर्वी स्पर्धा झालेली होती. कौतुक करणार्‍याचे काही जात नसते. टाकीचे घाव देव होणार्‍या दगडाला सोसावे लागत असतात. कुमारस्वामींची तीच दुर्दशा झालेली आहे. पुण्यात्मा राहुल गांधींनी त्याना गाभार्‍यात बसवलेले आहे. पण पुजारी आजही सिद्धरामय्याच आहेत आणि पदोपदी ते देवमुर्ती झालेल्या कुमारस्वामींची पूजा करताना नाकातोंडात पाणी जाईल, असा अभिषेक करीत असतात. जगाला ती पूजाअर्चा भासत असते. पण व्यवहारात तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात, त्यातला प्रकार असतो. सासरी नवविवाहितेला जे सोसावे लागते, त्याची वेदना तिलाच कळत असते आणि माहेरसह सासरचे लोक तिला ‘इज्जतीचा सवाल’ म्हणून सर्वकाही निमूट सोसायचे सल्ले देत असतात. कुमारस्वामींची अवस्था तशी झालेली आहे. त्यांच्या सहनशीलतेवर देशातील पुरोगामी सेक्युलर एकजुटीची इज्जत अवलंबून आहे. आगामी लोकसभा मतदान होईपर्यंत कुमारस्वामींना हा सासुरवास सोसण्याला पर्याय नाही. तसे झाले नाही तर संसदीय निवडणूकीत सर्वपक्षीय आघाडी होऊनही फ़ायद्याचे नाही, हे अठरापगड पक्ष कधी एकत्र नांदू शकत नसल्याची ग्वाही त्यातून दिली जाईल आणि त्याचा मोठा लाभ भाजपा वा मोदींना मिळू शकेल. याचा विचार कुमारस्वामींनी शपथ घेण्यापुर्वीच करायला हवा होता. पण तेव्हा आघाडी व कॉग्रेसचा पाठींबा अमृत वाटले होते ना?

5 comments:

  1. भाऊ तुमच खरंय काँग्रेस ला ज्या काही जागा मिळाल्यात त्या सिद्धरामयामुळे राहुल मुळे नाही ,तरीपण दिल्लीतून असा सौदा त्यांना मुळीच मान्य नाही ,२ महिन्यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यात त्याना चेहरा सर्वांनी पहिला त्यांनी आपली नाराजी मुळीसुद्धा लपवली नाही. आता तर ते फुल्ल फॉर्म मध्ये आहेत

    ReplyDelete
  2. सासरी नवविवाहितेला जे सोसावे लागते, त्याची वेदना तिलाच कळत असते आणि माहेरसह सासरचे लोक तिला ‘इज्जतीचा सवाल’ म्हणून सर्वकाही निमूट सोसायचे सल्ले देत असतात. कुमारस्वामींची अवस्था तशी झालेली आहे. त्यांच्या सहनशीलतेवर देशातील पुरोगामी सेक्युलर एकजुटीची इज्जत अवलंबून आहे " भाऊ आपण सासुरवसाची केलेली तुलना अगदी चपखल बसली आहे. हे असे होणारच होते.ते कुमारस्वामी यांना आधीच कळायला हवे होते.पण म्हणतात ना दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होतील तर ते कुमारस्वामी कसले?

    ReplyDelete
  3. खरंय आहे भाऊ एकदम.... त्या समस्त तळी उचणणार्या कळलं तर बरं... त्यात माध्यमातले काही अतिउत्साही निवेदक..

    ReplyDelete
  4. पुण्यात्मा राहुल गांधींनी त्याना गाभार्‍यात बसवलेले आहे. पण पुजारी आजही सिद्धरामय्याच आहेत आणि पदोपदी ते देवमुर्ती झालेल्या कुमारस्वामींची पूजा करताना नाकातोंडात पाणी जाईल, असा अभिषेक करीत असतात. जगाला ती पूजाअर्चा भासत असते. पण व्यवहारात तोंड दाबून बुक्क्याचा मार म्हणतात, त्यातला प्रकार असतो. सासरी नवविवाहितेला जे सोसावे लागते, त्याची वेदना तिलाच कळत असते आणि माहेरसह सासरचे लोक तिला ‘इज्जतीचा सवाल’ म्हणून सर्वकाही निमूट सोसायचे सल्ले देत असतात. Ek number bhau.. Hats off to you

    ReplyDelete
  5. भाऊ तुमचं म्हणणं खर ठरलं .कुमारस्वामिना सिद्धाच त्रास देतायत ,या रडण्यामागे सिद्धांची पत्रे आहेत जी ते सतत CM ना लिहीतायत ,जशी सिद्धाना त्रास द्यायला देवेगौडा लिहीत असत .नवभारत मध्ये बातमी आहे

    ReplyDelete