Saturday, July 14, 2018

अंजन, डोळे आणि पापण्या

Image result for pakistan cartoon kureel

आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ़ यांना अटक करून तुरूंगात टाकण्यात आल्यामुळे अनेकांना ती लोकशाहीची हत्या वाटते आहे आणि त्यात तथ्य आहे. पण अशी लोकशाहीची प्रथमच पाकिस्तानात हत्या झालेली नाही वा जगातलाही हा पहिला प्रसंग नाही. जे लोक आज लोकशाहीच्या नावाने गळा काढतात, अशाच लोकांच्या मदतीने नेहमी लोकशाहीचा गळा घोटला जात असतो. कारण ज्या तत्वावर किंवा नियमाच्या पायावर लोकशाही उभी असते, तो पाया खोदून काढण्यासाठी अशाच उतावळ्या लोकशाहीवादी दिडशहाण्यांचा हातभार लागत असतो. आज बळीचा बकरा दिसणारे नवाज शरीफ़ त्यापैकीच एक आहेत आणि कधीकाळी त्यांनीच आपल्या आजच्या मारेकर्‍यांना त्यासाठी बळ दिलेले होते. पाक लष्करशाहीने कायम पाकिस्तानी लोकशाहीला व जनतेला ओलिस ठेवलेले आहे. पण त्या लष्करशाहीला शिरजोर व्हायला नवाज शरीफ़ वा बेनझीर भुत्तो व तिच्या पित्याने, म्हणजे झुल्फ़ीकार अली भुत्तो यांनीही बळ दिलेले होते. लष्करशाही वा हुकूमशाहीकडे कुठलेही तत्व किंवा विचारधारा नसते. अशावेळी त्यांना आपली हुकूमत जनतेच्या गळी सुखनैव उतरवण्यासाठी आपल्या कुठल्याही कृत्याला वैचारीक चौकटीत बसवून देणारे समर्थक वा बुद्धीमंत लागत असतात. राजकीय नेतेही आवश्यक असतात. तेव्हा जे लोक झटपट मार्गाने सत्तेपर्यंत जायला उतावळे झालेले असतात, तेच मग सत्तेच्या आमिषाने  दडपशाहीला समर्थन देऊन जवळचा मार्ग म्हणून दडपशाहीचे भागिदार होतात. हळुहळू त्यांच्या हातचे कळसुत्री बाहुले बनून जातात. पण लौकरच आपण सुत्रधार नसून बाहुले झाल्याची जाणिव त्यांना होते आणि तोवर वेळ गेलेली असते. एकेदिवशी तेच अशा दडपशाहीचे बळी होतात, जसे आज शरीफ़ बळी गेले आहेत आणि काही वर्षापुर्वी बेनझीर व तिच्यापुर्वी झुल्फ़ीकार अली भुत्तो बळी गेलेले होते.

१९६० च्या जमान्यात पाकिस्तानची सत्ता याह्याखान नावाचा लष्करप्रमुख बळकावून बसला होता. १९६५ च्या युद्धात भारताकडून दणदणित पराभव झाल्याने जनरल आयुब खान या लष्करशहाला सत्ता सोडावी लागली. त्याने गाशा गुंडाळून तात्कालीन सरसेनापती याह्याखान यांना सत्ता देऊन निरोप घेतला. त्या काळात राजकीय नेतृत्व झुल्फ़ीकार अली भुत्तो यांच्यापाशी होते. पाकिस्तानात दोन राजकीय प्रवाह प्रचलीत होते. एक पश्चीम पाकिस्तानची पिपल्स पार्टी व दुसरा पुर्व पाकिस्तानातील शेख मुजीबूर रहमान यांची आवामी लीग. १९७० च्या सुमारास जगभरचे दडपण आले म्हणुन याह्याखान यांनी सार्वत्रिक निवडणूका घेतल्या आणि त्यात लोकसंख्येने मोठ्या असलेल्या पुर्व पाकिस्तानातील बहुतांश जागा जिंकलेल्या अवामी लीगच्या हाती सत्ता जाणार हे उघड होते. पण पाकिस्तानची सत्ता स्थापनेपासून पश्चीमेकडल्या पंजाबी मुस्लिमांच्या हाती राहिलेली होती. राजकारणापासून सर्व क्षेत्रात पंजाबी मुस्लिमांचा वरचष्मा होता आणि त्यात सिंध वा बंगाली नेत्यांसह कुठल्याही क्षेत्रातील पाक मान्यवरांना स्थान मिळत नव्हते. अशावेळी लोकशाही मार्गाने जिंकलेल्या बंगाली अवामी लीगच्या मुजीबूर यांच्या हाती देशाची सत्ते सोपवणे पाक लष्करशहांना अशक्य झालेले होते. त्यातून पर्याय म्हणून सिंधी नेता असलेल्या व सिंधी वर्चस्व असलेल्या पिपल्स पार्टीच्या भुत्तो यांना याह्याखान यांनी पुढे केले. त्यांनीही लोकशाहीला लाथ मारून आपल्या जागा कमी असताना पंतप्रधान होण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी मुजीबूर यांच्यावर दबाव आणला गेला. तो त्यांनी मानला नाही तर मुजीबूरना थेट तुरूंगात टाकून पुर्व पाकिस्तानात लष्करी बळावर अवामी लीग संपवण्याचे प्रयास झाले आणि त्यासाठी भुत्तो यांची बुद्धी वापरली गेली. पण यातून लौकरच आपलाही असाच बळी जाऊ शकतो, हे भुत्तोंना कुठे उमजले होते? सत्तेच्या आमिषामुळे त्यांनी लष्कराचे कळसुत्री बाहुले होण्यास मान्यता दिली.

१९७१ च्या युद्धात भारताकडून दुसरा फ़टका बसल्यावर आयुबखान यांच्याप्रमाणेच याह्याखान यांना पळ काढावा लागला आणि त्यांनीच पुढे केलेले भुत्तो उरलेल्या पाकिस्तानचे सर्वेसर्वा झाल्यासारखे वागू लागले. युद्धातील पराभव व नामोहरम झालेल्या पाकसेनेचे मनोधैर्य खच्ची झालेले होते आणि त्याचा राजकीय फ़ायदा घेत भुत्तो यांनी मोठी धुर्त चाल खेळली. आपल्याला लष्कर शिरजोर होऊ नये, म्हणून त्यांनी तुलनेने अननुभवी व कोवळ्या वयातले लष्करी अधिकारी झिया उल हक यांना लष्करप्रमुख म्हणून नेमले आणि ज्येष्ठ अनुभवी सेनाधिकार्‍यांना परस्पर निकालात काढले. लष्करी संघटनेत आपला जम व बस्तान बसेपर्यंत झिया शांत होते. पण जसजशी भुत्तो यांना सत्ता राबवण्यासाठी लष्कराचा अधिकाधिक उपयोग करण्याची पाळी येत गेली, तसतशी झियांची महत्ता वाढत गेली. भुत्तो सरकारच्या विरोधात थोडी नाराजी व्यक्त होऊ लागल्यावर झियांनी आजच्या शरीफ़ यांच्याप्रमाणेच झुल्फ़िकार अली भुत्तोंना हाकलून लावत सत्ता काबीज केली आणि पाकिस्तानात लष्करी राजवट जाहिर केली. आपल्या सत्तेला जनतेचा पाठींबा मिळण्यासाठी त्यांनी भुत्तो यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आणि न्यायालयावर दडपण आणून भुत्तोंना दोषीही ठरवून घेतले. तेवढ्यावर न थांबता भुत्तोंना फ़ाशीही फ़र्मावून घेतली आणि जाहिर चौकात फ़ाशीचा तमाशाही केला. त्यामुळे जगभर कल्लोळ माजला तरी लौकरच सोवियत युनियनने अफ़गाणिस्तानमध्ये घुसखोरी केली आणि पाकिस्तानच्या याच लष्करशाहीला जगभरच्या महान लोकशाहीवादी सत्तांनी समर्थन दिले. त्यातून त्याच झियांना जगन्मान्यता मिळाली. कारण जगातल्या तथाकथित महान लोकशाहीवाद्यांना अफ़गणिस्तानात सोवियत सत्तेशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानचे सहकार्य व सहभाग हवा होता. म्हणजेच आज जे पाकिस्तानात घडते आहे, त्याला जगभरचे लोकशाहीवादी तितकेच जबाबदार आहेत ना?

अमेरिका व युरोपच्या महान लोकशाहीप्रेमींना अफ़गाणिस्तानात व अन्यत्र कम्युनिस्ट प्रसार थोपवायचा होता आणि पाकिस्तानात नवाज शरीफ़ या नव्या नेत्याला सत्ता मिळवण्याची स्वप्ने पडत होती. त्याने पाकिस्तान मुस्लिम लीगच्या नावाने राजकारणात प्रवेश करून लष्कराशी हातमिळवणी केलेली होती. तेव्हा लष्कराच्या दडपशाही व हुकूमशाहीला कंटाळलेल्या जनतेला पर्याय हवा होता आणि तो शरीफ़ नक्कीच नव्हते. त्यामुळे पित्याच्या फ़ाशीपुर्वीच परदेशी पळून गेलेल्या बेनझीर भुत्तोविषयी एक सहानुभूती जनमानसात होती. तिचा प्रभाव दिसायला झियांचा अपघाती मृत्यू व्हावा लागला. पित्याच्या पुण्याईवर बेनझीर पाकिस्तानच्या पंतप्रधान होऊ शकल्या. पण तिथली लष्करशाही व पंजाबी वर्चस्वाला आव्हान देताना त्यांची सत्ता लौकरच ढासळली. तेव्हा हक्काचा पंजाबी राजकीय नेता म्हणून लष्कराने नवाज शरीफ़ यांना पुढे आणलेले होते. आज जितक्या कारस्थानी कारवाया करून इमरान खान याला पंतप्रधान बनवण्यासाठी तिथली हेरसंस्था व लष्कर पुढाकार घेत आहे, तसेच तेव्हा शरीफ़ यांच्यासाठी प्रयत्न झालेले होते. शरीफ़ हा त्यातूनच प्रभावशाली नेता होऊ शकला. पण हळूहळू तो आपल्या बुद्धीने चालू लागल्यावर लष्कराला त्याची अडचण व्हायला लागली. नव्या पिढीत नवाज आणि बेनझीर असे दोन पाकिस्तानी प्रतिस्पर्धी नेते उदयास आले आणि त्यांना दाणे टाकून झुंजवण्याचे डावपेच लष्करी नेतृत्व खेळत राहिले. शरीफ़ यांना लष्करानेच पुढे आणलेले होते. पण खरीखुरी सत्ता हाती आल्यावर त्यांनी बेनझीरच्या पित्याची चुक जशीच्या तशी पुन्हा केली. त्यांनी आपल्याला लष्करात आव्हान देणारा कोणी राहू नये, म्हणून मुशर्रफ़ या मोहाजीर अधिकार्‍याची लष्करप्रमुख म्हणून नेमणूक केली. पण एकेदिवशी तोच झियांसारखा उलटला आणि त्याने भुत्तोंच्याच पद्धतीने शरीफ़ यांना सत्ताभ्रष्ट केले. सौदी अरेबियाच्या राजाने हस्तक्षेप केला म्हणून आज शरीफ़ हयात आहेत.

मुशर्रफ़ यांनी सत्ता बळकावली आणि काही नामधारी राजकीय नेत्यांना पंतप्रधान वगैरे नेमून सत्ता राबवली. तेव्हा शरीफ़च्या सुडबुद्धीला घाबरून बेनझीरने परदेशी पळ काढलेला होता. म्ह्णूनच बेनझीरने मुशर्रफ़ यांच्या कृतीचे नंतर समर्थन केले होते. पुढे जागतिक दडपणामुळे मुशर्रफ़ना निवडणूका घ्याव्या लागल्या, त्यांनी इमरान खान हे पात्र पुढे आणलेले होते. बेनझीर व शरीफ़ यांच्या समोर इमरानची डाळ शिजणार नाही, म्हणून बेनझीरची हत्याही घडवून आणली गेली. पण त्याने सहानुभूती निर्माण होऊन कारभार तिचा पती आसिफ़ अली झरदारीकडे गेला. पाच वर्षे चाललेले तेच बहुधा पहिले सरकार असावे. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत इमरान खानला पाकचा अरविंद केजरीवाल असल्यासारखा पेश करण्यात आले, पण त्याचा खरोखर केजरीवाल झाला आणि शरीफ़ मोठ्या मताधिक्यने निवडून आले. त्यानंतर मात्र शरीफ़नी पद्धतशीर लष्कराची महत्ता कमी करण्याचे प्रयास केले आणि दिवसेदिवस हे वितुष्ट वाढतच गेले. ज्या लाष्करशहांना १९८० च्या दशकात प्रतिष्ठा मिळवून देण्याची घाई शरीफ़ यांनी केली, त्याच लष्कराने आता त्यांची चोहीकडून कोंडी केलेली आहे. त्याच शरीफ़ यांनी बेनझीर व तिच्या पतीला गोत्यात टाकण्यासाठी एनएबी नावाची दक्षता संस्था उभी केली, तिचाच आधार घेऊन लष्कराने आज शरीफ़ यांचा दुसर्‍यांदा बळी घेतलेला आहे. हा जगभरच्या व खास करून भारतातल्या उतावळ्या आणि अतिरेकी लोकशाहीवादी प्रवृत्तीसाठी धडा आहे. अर्थात तो शिकण्याची त्यांच्यापाशी किती तयारी आहे देवजाणे. धडा असा आहे, की झटपट कुठल्याही मार्गाने सत्ता मिळवण्याची घाई लोकशाहीला खिळखिळी करीत असते आणि लोकशाहीत राजकीय विरोधकाला खलनायक म्हणून रंगवण्यातून लोकशाहीबाह्य शक्ती बलिष्ट होतात. त्या शिरजोर झाल्या, मग लष्करशाही व हुकूमशाहीला पाठबळ मिळत असते. डोळ्यात अंजन घालणारा हा घटनाक्रम आहे. पण ज्यांच्या डोळ्यात ते अंजन पडावे, त्यांनीच डोळे घट्ट बंद केले तर पापण्यांना अंजन लागून काय उपयोग असतो? ते हिंदू पाकिस्तानची मुक्ताफ़ळे उधळ्ण्यात रमलेले असतात.

7 comments:

  1. https://www.loksatta.com/desh-videsh-news/poll-strategists-prashant-kishore-once-again-to-work-for-narendra-modi-1713257/

    ReplyDelete
  2. भाउ पाक सारखी इथलेही deep assets राहुलला सत्ता द्यायला काहीही करायला तयार आहेत 2014साली मोदी नको म्हनुन केजरीवालचा प्रयोग फसला आता तर पुरोगामी अतिरेकी लोकशाही वाले देश तोडायला पन कमी करनार नाहीत कालच रामचंद्र गुहासारखा कांगरेसचा डीप असेट त्याचे संकेत देत होता म्हने आता परत मोदींनी उत्तरेतल्या राज्याच्या जीवावर सत्ता मिलविली तर द्रविडी देशाची मागणी जोर धरेल 70 वर्ष कांगरेसने तेच केल तेवा नाही अस कोनी म्हनाल आता मोदी करतायत तर अस आणि गुहा कर्नाटकचा आहे उद्या त्याने हक्क वेगेरे टुम काढली तर पुरोगामी अतिशहाने मोदीविरोधासाठी उचलुन पन धरतील

    ReplyDelete
  3. 2008 साली पाक मध्ये अंदाधुदी होती रोज स्फोट होत होते मुशरफ चा उपयोग संपला म्हनुन अमेरीकेनने बेनझीरला तयार केले त्यासाठी कोंडोलीसाला तिची मनधरनी करायला लावले.शरीफ पन त्यावेळी परत पाकमध्ये आले पन लढले नाहीत त्यांना कळल की कायदा व्यवस्था वाइट आहे.बेनझीर सत्तावाचुन राहु शकत नव्हती १२ वरशे बाहेर होती आधीच पाक मध्ये असलेल्या तालीबान्यानी बळी घेतला लष्कराने घेउ दिला

    ReplyDelete
  4. आज पाककडे १ महिना पुरेल इतकाच परदेशी चलन आहे कोनी आल तरी काय करनार आहेत माहीत नाही.इमरानची इमेज प्लेबाॅय ते इस्लामी कट्रवादी झालीय इतकी की सत्तेसाठी त्याने भयानक काळी जादु करनारी बायको केलीय,त्याच्याकडे बेनझीर वा शरीफ इतका लोकपाठिंबा पन नाही की ज्याच्या दबावाने थोडा तरी नीट वागेल.तो पुरन बाहुले असनारेय आर्मीच

    ReplyDelete
  5. "भरचौकात फाशीचा (भुत्तोंच्या)तमाशाहि केला. "फाशी दिली पण भरचॊकात नाही अस मला आठवत.जरा तपासून पहा भाऊ.

    ReplyDelete
  6. Bhutto wasn’t publicly hanged. He was hanged in prison

    ReplyDelete