Tuesday, July 24, 2018

ओन्ली हॅपन्स इन इंडिया

kureel on rahul in LS के लिए इमेज परिणाम

रोमन साम्राज्य दीर्घकाळ टिकून राहिले याचे कारण देखील काही प्रमाणात तरी ग्रीक बुद्धिजिवी मंडळी आणि रोमन राज्यकर्ते या दोघातील घनिष्ठ सख्यत्व हेच होय. जित ग्रीकांना वाटत होते की ते जेत्या रोमनांना कायदा व सुसंस्कृततेचे धडे देत आहेत आणि म्हणून ग्रीक बुद्धिजिवी स्वत:वर बेहद्द खुश होते. रोमन सम्राट निरोचा ग्रीकांनी जो सन्मान केला त्याची लांबलचक वर्णने उपलब्ध आहेत. ही वर्णने एखाद्याने वाचली तर ग्रीकांबद्दल त्याला घृणाच वाटेल आंणि आश्चर्यसुद्धा वाटेल. कारण सम्राट निरो शारिरीक व मानसिक दोन्ही प्रकारच्या व्याधींनी पछाडला असूनसुद्धा ग्रीकांमधील चांगली सुशिक्षित मंडळी त्याची स्तुती करीत होती. ग्रीक बुद्धीमंतांनी निरोचा सत्कार करण्याचे कारण हे होते की तो ग्रीक बुद्धीमंतांचे तोंड भरून कौतुक करीत असे आणि त्या कौतुकाची परतफ़ेड म्हणून ते बुद्धीमंत एक अत्यंत बुद्धीमान कलासक्त राजा म्हणून तोंड फ़ाटेस्तोवर त्याची स्तुती करीत होते. (‘झुंडीचे मानसशास्त्र’ पृष्ठ २०४)

शुक्रवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा चालली होती आणि त्यापेक्षा मोठी रणधुमाळी सर्वभाषिक वाहिन्यांवर माजलेली होती. त्यात अविश्वास प्रस्ताव आणि त्यातल्या मुद्दे तपशीलासह विविध नेत्यांची भाषणे एका बाजूला राहिली. राहुल गांधी यांचा आवेश व वर्तन याचीच चर्चा सर्वाधिक झाली. राहुलच्या लहानसहान हालचाली व कृतीचे समर्थन वा टवाळी त्यातून रंगलेली होती. त्यातही कौतुक शोधणार्‍या विद्वानांची भाष्ये ऐकली आणि दिवंगत विचारवंत विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ पुस्तकाचे स्मरण झाले. त्यातलाच हा उतारा आहे. कॉग्रेसने स्वातंत्र्योत्तर दिर्घकाळ या देशावर राज्य का केले, त्याचे नेमके उत्तर त्या पुस्तकाच्या उपरोक्त परिच्छेदात आलेले आहे. हजारो वर्षापुर्वीच्या ग्रीक बुद्धिजिवी वर्गाची शुक्रवारी अनेक पुरोगामी विचारवंत अभ्यासकांनी आठवण करून दिली.

रस्त्यावरच्या सामान्य माणसाला किंवा खेड्यापाड्यातल्या खेडूताला जरी ती दृष्ये दाखवली, तरी त्यातला खुळेपणा कोणीही सहज संगू शकतो. पण त्यातही उपरोधिक आशय शोधण्याची भारतीय पुरोगामी विचारवंतांची कला, अक्षरश: कौतुकास्पद आहे. कुठल्याही देशाच्या संसदेत असे चित्र बघायला मिळणार नाही, की कुठल्या पक्षाचा वरीष्ठ नेता जाऊन प्रतिपक्षाच्या सत्ताधार्‍याच्या गळी पडलेला दिसणार नाही. एखाद्या प्रसंगी संसदेत हाणामार्‍या वा फ़ेकाफ़ेक हिंसा झालेली असेल. पण असे चमत्कारीक प्रेमभावाचे दृष्य बघायला मिळणार नाही. प्रतिपक्षाच्या नेत्याची शेलक्या भाषेत निंदा करायची आणि मग त्यालाच आपली प्रेमाची शिकवण म्हणून गळ्यात पडायला धाव घ्यायची, हा चमत्कार फ़क्त राहुल गांधीच करू शकतात. पण त्यापेक्षा कौतुकाची बाब म्हणजे त्यातले औदार्य शोधू शकणारे बुद्धीजिवीही आपल्या देशात उपलब्ध आहेत. आपल्या अशा वागण्यातून प्रतिपक्षाला खिल्ली उडवण्य़ाची आयती संधी देणार्‍या खुळेपणाला विजय ठरवणाराही अजब शहाणपणा फ़क्त आपल्या देशातच मिळू शकतो. म्हणून मग त्या ग्रीक विचारवंतांचे स्मरण झाले. ते निरोचे कौतुक कशाला करायचे आणि निरो, तात्कालीन साहित्य अकादमीचे पुरस्कार त्यांना कशासाठी देत असे, त्याचे नेमके स्पष्टीकरण आपल्याला मिळू शकते. किंबहूना दोन वर्षापुर्वी अचानक पुरस्कार वापसीचे नाटक कशामुळे हाती घेण्यात आले, त्याचेही धागेदोरे सापडू शकतात. सामान्य लोकांना अशा बुद्धीजिवींचा तिटकारा कशाला निर्माण झाला आहे, त्याचाही खुलासा होऊ शकतो. जो खुळेपणा आपल्याला नुसत्या डोळ्यांनी बघता येतो आणि समजू शकतो, त्यात शहाणपणा शोधणार्‍या बुद्धीमंतांकडे लोक मग कुठल्या नजरेने बघू शकतील? देशातील पुरोगामी बुद्धीमंतांची आज केविलवाणी स्थिती होऊन गेलेली आहे. कारण कुठल्याही आश्रित विचारवंतांची त्यापेक्षा वेगळी स्थिती होत नसते.

वस्त्रहरण होताना द्रौपदीने दुर्योधनाच्या दरबारातील बुद्धीमंतांना एक प्रश्न विचारला होता. जे आधीच दास होऊन गेलेत, त्यांना पत्नी म्हणून कुणा व्यक्तीला पणाला लावण्याचा अधिकार असू शकतो काय? त्याचे स्पष्ट उत्तर ‘नाही’ असेच होते. पण ते उत्तर उच्चारण्याची हिंमत द्रोणाचार्य, कृपाचार्य वा द्रोणाचार्य दाखवू शकलेले नव्हते. कारण ते बुद्धीमान जरूर असतील. पण त्यांनी दुर्योधनाच्या सत्तेचा पट्टा आपल्या गळ्यात अडकवून घेतलेला होता. त्यांची बुद्धीही दास झालेली असेल, तर त्यांना राजाला मान्य असलेले बोलण्याचे स्वातंत्र्य कसे असू शकते? ज्यांनी आधुनिक कालखंडात नेहरू राजघराण्याला आपली बुद्धी गहाण दिलेली आहे, त्यांना स्वयंभूपणे आपली बुद्धी वापरून कुठलेही मत कशाला व्यक्त करता येईल? त्यापेक्षा कुठल्याही खुळेपणातही शहाणपणा सिद्ध करण्यातच ‘शहाणपणा’ असतो ना? म्हणून राहुल गांधी यांनी लोकसभेत जी सर्कस केली, त्याचे गुणगान करण्यापलिकडे अशा लोकांची बुद्धी जाऊ शकत नाही. एकदा ही बौद्धिक गहाणवट स्विकारली, मग सोनिया गांधींमध्ये इंदिरा गांधी बघता येतात आणि राहुल गांधींमध्ये भविष्यातले नेहरूही शोधता येत असतात. त्याच्या बालीश चाळ्यांमध्ये धुर्त डावपेचही सिद्ध करता येतात आणि सगळ्या निवडणूका हरूनही ‘जिंकलास वत्सा’ असा आशीर्वादही तोंड भरून देता येत असतो. कारण जिंकण्याला काहीही अर्थ नसतो. जिंकण्यावर शिक्कामोर्तब पुरे असते. त्यामुळेच आणखी एक नैतिक विजय राहुल गांधी मिळवून गेले आहेत, किंबहूना एक निवडणूकांचा अपवाद केल्यास राहुल गांधी कायम जिंकत राहिलेले आहेत. कारण ते जिंकण्यासाठीच जन्माला आलेले असल्याचे पुरोगामी मनुवादात नमूद केलेले आहे. त्यानुसार चालतात व बोलतात, त्यांना़च पुरोगामी विचारवंत बुद्धिजिवी म्हणून मान्यता मिळत असते. सहाजिकच अविश्वास प्रस्ताव अशा नैतिक बळावर जिंकला गेलेला असला, तर नवल नाही.

मागल्या अधिवेशनात पंतप्रधानांच्या भाषणात राज्यसभेत रेणुका चौधरी या कॉग्रेसी सदस्य हास्याचा गडगडाट करून व्यत्यय आणत होत्या. तर त्यांना सभाध्यक्षपदी बसलेले व्यंकय्या नायडु समज देत होते. तेव्हा त्यांना थांबवताना मोदींनी उपरोधिक भाष्य केलेले होते. रामायण कथामाला संपल्यापासून असे हास्य ऐकायचे सौभाग्य कुठे मिळाले आहे? रेणूकाजींना हसू द्यावे, असे मोदी म्हणाले. त्याचा अर्थ व उपरोध अनेकांच्या लक्षात यायलाही काही वेळ गेला. पण तोंडाने वा शब्दाने शुर्पणखा असा शब्द उच्चारल्याशिवाय मोदींनी नेमक्या दुखण्यावर बोट ठेवलेले होते. तर बहुतांश पुरोगामी शहाण्यांना औचित्याचे स्मरण झालेले होते. जो शब्द मोदींनी उच्चारला नाही, तो जणू त्यांनी उच्चारला असावा, अशा थाटात मोदींना तेव्हा औचित्य शिकवले जात होते. व्यवहारात त्याला उपरोध म्हणतात. पण त्या उपरोधालाच वक्तव्य ठरवून हातपाय आपटले गेले होते. ज्यांना त्यातले औचित्य उशिरा दिसले, त्यांना शुक्रवारच्या राहुल गांधीकृत वैगुण्यातले औचित्य मात्र तात्काळ उमजले होते. यासारखी बौद्धिक दिवाळखोरी फ़क्त दरबारी खुशमस्कर्‍यांमध्येच सापडू शकते. अन्यथा बालिशपणात शहाणपणा धुर्तपणा कोणी शोधला असता? किंबहूना अशा बुद्धीजिवींवर मोदी खुश असतात. कारण आपल्या असल्या बौद्धिक दिवाळखोरीने या़च शहाण्यांनी मोदींना पंतप्रधानपदी आणुन बसवलेले आहे. मोदींना कुणा बुद्धीजिवींना आश्रित ठेवायची म्हणूनच भिती वाटत असावी. निंदक इतके मदतनीस ठरत असतील, तर कुठला राजा सत्ताधीश भाट खुशमस्कर्‍यांची फ़ौज कशाला बाळगणार ना? तेव्हा अशा पुरोगाम्यांनी राहुल गांधींचे गुणगान अशाच आवेशात व जोशात चालू ठेवावे. आणखी आठदहा महिन्यात मोदींना पुन्हा लोकसभा जिंकायची आहे. त्यात पुरोगामी बुद्धीमंतांच्या तोडीची मदत कोणी हिंदुत्ववादी विचारवंत नक्कीच करू शकणार नाही.

7 comments:

  1. भाऊ या खुशमस्करीनी इतकं राहुलच फालतू कौतुक ते हि समोर बालिशपणा दिसत असताना करतायत कि ,लोक त्यांना अक्षरशः मोदींचे डबल एजन्ट म्हणतायत ,कारण त्याना हे दिसतंय कि याचा फायदा मोदींना होतोय,आणि जे खरे जे कोणी काँग्रेस चे मतदार असतील त्यांना पण आक्वर्ड होत .

    ReplyDelete
  2. राहुलच्या भाषणावर एकेकाचे अग्रलेख ,fb पोस्ट ,ट्विटर .पहिले कि खरंच ते बुद्धिमान आहेत हे पटत ,कारण मूर्खपणात जे उघड्या डोळ्यांनी दिसतेय त्याला चांगलं म्हणणं याला बुद्धीच हवी ,उदा . एका पुणेरी डा ची पोस्ट भाषण उत्तम झालं ,पण शेवटची कृती अनावश्यक . अरे त्यांनी उत्तम का काय भाषणाची वाट लावली ना सरळ म्हणा कि बालिशपणा कुणी लिहिलंय कि राहुलनी भाजप ला प्रतिक्रिया द्यायला लावली ,आयत हातात कोलीत दिल्यावर ते बोलणारच ना ,कुणी तर स्वतःच १० पैकी ८ गुण दिलेत ते फक्त राहुलच मोदींना कमी तरी द्यावे ना मग मार्कशीट कशाला?

    ReplyDelete
  3. भाऊसाहेब एवढं नेमकं कसं लिहिता?

    ReplyDelete
  4. हो खर आहे कुमार केतकर हे उत्तम उदाहरण आहे या सर्वाचे.

    ReplyDelete
  5. जो पर्यंत विरोधकांचा विरोध या पातळी वर आहे तो पर्यंत प्राप्त सरकार ला भीतीचं काहीच कारण नाही.ज्या दिवशी पातळी उंचावेल तेव्हा खरी लढत होईल. पण ती शक्यता इतक्यात नजरेच्या टप्प्यात दिसत नाही... 😟

    ReplyDelete
  6. Respected Bhau...
    Simply amazing. Last 8 days all posts are worth a great fortune.

    Also you have rightly mentioned that these " so called intellectuals " have frankly become intellectually bankrupt. And still they are happy & enjoying HMV...it can happen only in India.
    Wishing you a long & healthy life.🙏

    ReplyDelete
  7. Opposition just don't get it that the way they are used to battle out bjp before is not doing any good.. It's proved in Gujrat and in Center that it doesn't work against Modi. They either have to change the tactics or the opponent itself to win.. Which I guess is not visible in near future. These so called intellectuals need to ask this question as "why it doesn't work against Modi?", which apparently they don't do. Well.. That works perfectly well for Modi. :)

    ReplyDelete