Wednesday, July 11, 2018

अपप्रचाराचे नवे मॉडेल

thackeray के लिए इमेज परिणाम

१९९० पुर्वीची एक घटना आठवली. तेव्हा आजच्यासारख्या वाहिन्यांचे पेव फ़ुटलेले नव्हते, की खाजगी वृत्तवाहिन्याही नव्हत्या आणि सामान्य लोकांना रोजच्या सकाळ संध्याकाळी प्रसिद्ध होणार्‍या वर्तमानपत्राच्या बातम्यांवर अवलंबून राहावे लागत होते. अशा काळात आजच्या संभाजी भिडे गुरूजींसारखा एक वाद खुप उफ़ाळला होता. सांगली येथे भाषण करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटीशांचे हस्तक असल्याचा आरोप केल्याची ती बातमी होती. मुळात ही बातमी ‘लोकसत्तेत’ आलेली होती. नंतर इतर वृत्तपत्रांनी उचलून धुमाकुळ घातला होता. मग काय तात्काळ निषेधाच्या गर्जना सुरू झाल्या, आरोपांच्या फ़ैरी झडल्या आणि प्रत्येक राजकीय पक्षाने आपापली भडास काढून घेतली होती. अनेक वृत्तपत्रांनी संपादकीय खरडून आपलीही मळमळ ओकून घेतलेली होती. बाळासाहेबांनी ठामपणे अशा उद्गार वा आरोपांचा साफ़ इन्कार केलेला होता. पण ऐकून कोण घेतो. अखेरीस नामदेव ढसाळ व रामदास आठवले मातोश्रीवर गेले आणि त्यांना साहेबांनी आपल्या भाषणाची संपुर्ण ध्वनीमुद्रित टेप ऐकवली होती. त्यांनीही बाहेर येऊन साहेब तसे काही बोलले नसल्याचा निर्वाळा दिलेला होता. पण सत्य कोणाला हवे असते? प्रत्येकाला आपल्या मनातल्या अढी व मत्सराला वाट करून देण्याची सोय व संधी तर हवी असते. मग त्यात बाबासाहेब वा अन्य कुठल्या विभूतीची पायमल्ली झाली तर कुठे बिघडते? अखेरीस सांगलीचे महाराष्ट्र टाईम्सचे वार्ताहर रविंद्र दफ़्तरदार यांनी सविस्तर बातमीपत्र लिहून खुलासा केला, की बाळासाहेब तसे बोलालेले नाहीत आणि आपण व्यक्तीश: तिथे सभेला बातमीदार म्हणून उपस्थित होतो. आठवडाभरात त्यावर पडदा पडला आणि विषय संपला. आताही भिडे गुरूजीं विरोधातला तमाशा त्यापेक्षा तसूभर वेगळा नाही की त्यातला हेतूही वेगळा नाही.

बाळासाहेबांच्या सांगलीतल्या त्या विधानावर कल्लोळ माजला आणि शांत झाला. कारण आजच्या भाषेत ती फ़ेक न्युज होती. पुढल्या काळात तशा बातम्या व त्यावरून गदारोळ माजवण्याची कला विकसित होत गेली. अगदी अलिकडले त्याचे आणखी एक स्वरूप म्हणजे न्या. लोया मृत्यू प्रकरण सांगता येईल. खरेतर अशा बातमीसाठी शिवसेनाप्रमुखांनी लोकसत्ता वा तशी बातमी देणार्‍या बातमीदारावर कायदेशीर कारवाईची मागणी करायला हवी होती. जशी ‘द वायर’ नावाच्या पोर्टलवर अमित शहांच्या सुपुत्राने केस दाखल केली आहे. पण बाळासाहेब तात्कालीन संपादक बुद्धीमंतांपेक्षा कमालीचे ‘सहिष्णू’ व संयमी होते. म्हणून त्यांनी त्याचा पाठपुरावा केला नाही आणि तो विषय तिथेच संपला. पण पुढल्या काळात तो एक संसर्गजन्य पत्रकारी आजार होऊन गेला. त्याचेच भयंकर रूप आज आपण वाहिन्यांच्या व सोशल माध्यमातून अनुभवत असतो. यातला मुद्दा असा होता, की सांगलीच्या त्या सभेत शिवसेनाप्रमुख असे काही आंबेडकरांविषयी बोलले नसतील, तर त्याची बातमी कशी होऊ शकली? ती लिहीणारा स्थानिक वार्ताहर वा ती बातमी तशीच बेछूटपणे छापणारा इथला संपादक, यांच्या मनात बाबासाहेबांची अवहेलना करण्याचा पक्का हेतू होता. त्यात सांगली येथील बाळासाहेबांचे भाषण हे निमीत्त होते. त्यांनी विभूतीची अवहेलना केलेली नसेल, तरी बातमी लिहीणारा व छापणारा यांनी तर नक्कॊच बाबासाहेबांची विटंबना केली होती. मग त्यावर कारवाई कशाला झाली नाही? बाबासाहेबांच्या थोरवीसाठी गळा काढून बातम्या व अग्रलेख रंगवणार्‍यांना कशाशी कर्तव्य होते? बाबासाहेबांच्या महत्तेशी की शिवसेनाप्रमुखांना गोत्यात टाकण्याशी? कारण भाषणातून नसेल तरी बातमीतून बाबासाहेबांची विटंबना झालेली होती आणि त्याची कोणाला फ़िकीर नव्हती. त्यामध्ये बाबासाहेब हे निमीत्त होते आणि लक्ष्य बाळासाहेब होते.

ह्याला अजेंडा म्ह्णतात. कुठल्याही विभूती वा महात्म्याची विटंबना याच्याशी अशा अजेंडा राबवणार्‍यांना काडीमात्र कर्तव्य नसते. पण तसे निमीत्त मिळाले तर समाज व त्यातील विविध घटकांना एकमेकांच्या विरोधात झुंजवण्याचा हा अजेंडा असतो. म्हणून शिवसेनेला व बाळासाहेबांना त्या निमीत्ताने झोडपून घेण्यात आले. शिवसैनिक व भीमसैनिकांमध्ये चुड लवण्यात आली. पण त्यात तथ्य नसल्याचे सिद्ध झाल्यावर विषय गुंडाळण्यात आला. याचा साधासरळ अर्थ असा होता, की बाळासाहेबांनी तसे विधान केले असेल वा भाषणत बोलले असतील, तरच आंबेडकरांची अवहेलना होते. इतर कोणी तसे काही बोलले वा लिहीले असेल तर त्याला तेच शब्द माफ़ असतात. किंबहूना हाच पुरोगामी पत्रकरितेचा नमूना असतो. त्यातून समाजाच्या विविध घटकांमध्ये वैमनस्य निर्माण करणे, अशा जागा शोधणे व किंचीत कुठे ठिणगी सापडली तर त्याचा आगडोंव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू होत असतात. यासाठी थोरामोठ्यांच्या किंवा धर्माच्या भावनांची जपणूक करण्याचे नाटक रंगवले जाते. प्रत्यक्षात हेतू आग अधिक भडकावण्याचा असतो. आताही वारीच्या निमीत्ताने आपल्या संघटनेचे धारकरी तरूण व वारकरी संप्रदायाचे भाविक यांची गळाभेट करण्याच्या हेतूने संभाजी भिडे गुरूजींनी जे काही भाषण केले. त्यातून असाच आगडोंब पेटवण्याचा प्रयास झालेला आहे. त्यात ज्ञानेश्वर माऊली वा तुकोबा महाराज यांच्यापेक्षा मनु नामे ॠषी महान असल्याचे विधान पकडून कल्लोळ माजवण्याचा पद्धतशीर प्रयास झाला. पण असेच आठनऊ वर्षापुर्वी संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी ज्ञानोबापेक्षा तुकोबा महान म्हणत जे उद्योग केले, तेव्हा कोणी चर्चा रंगवल्या होत्या काय? वारीमध्ये ब्रिगेडचे काय काम, असले प्रश्न विचारले होते काय? त्याचा उपयोग नव्हता. कारण ब्रिगेडला खरोखरच आग लावायची होती आणि चर्चा रंगवल्या तर आगाडोंब विझवला जाण्याची शक्यता होती ना?

अशा रितीने मोठ्या तात्विक चर्चा रंगवण्याचे नाटक हे मुळात आगी लावण्याचे उद्योग होऊन बसलेले आहेत. त्यासाठी मग कधी ज्ञानोबा तुकोबांची मनु सोबत तुलना गैरलागू ठरवण्याचे प्रयास होतात. मध्यंतरी तेच भिडे गुरूजी मनुस्मृती ही जगातली पहिली राज्यघटना असल्याचे म्हणाले, त्यालाही चुड लावण्याचा उद्योग झाला होता. गंमत अशी की गुरूजींच्या विधानाला जो आशय आहे, तोच तसाच्या तसा शरद पवार यांच्या पाच महिन्यापुर्वीच्या औरंगाबाद येथील भाषणाचा आशय आहे. कुराण हा इश्वर अल्लाचा शब्द असून त्यात कोणी तिहेरी तलाक बंदीच्या निमीत्ताने हस्तक्षेप करू शकत नाही, असे पवारांचे उद्गार होते. त्याचा अर्थ काय होतो? देशाची राज्यघटना, त्यानुसार स्थापन झालेली संसद वा न्यायपालिका यांच्यापेक्षा कुराण दोन पावले पुढे आहे. असाच अर्थ निघत नाही काय? मग त्यासाठी आजच्या रडवेल्या बुद्धीमंतांनी दोन अश्रू ढाळले होते काय? पवारांना जाब विचारला होता काय? कुराण व राज्यघटना यांची तुलना कशी करता, म्हणून प्रश्न विचारले होते काय? कशा विचारतील? पुरोगामी शरीयत मानणार्‍यांना खरी शरीयत म्हणजेच आपली सेक्युलर विचारांची घटना वाटत असेल, तर पवारांना जाब कोण विचारणार? सवाल ज्ञानोबा, तुकोबा, राज्यघटना वा आंबेडकरांच्या थोरवी वा अपमानाचा नसतोच. असा अपमान कोणी केला त्याला महत्व असते. ती व्यक्ती लक्ष्य असते. तेव्हा बाळासाहेब अशा पुरोगामी पत्रकारीतेचे लक्ष्य होते. पश्चीम महाराष्ट्रातून शरद पवार व कॉग्रेसचा पाया उखडला गेल्यापासून संभाजी भिडे हे पुरोगामी संपादक पत्रकारांचे टारगेट झालेले आहे. त्यामुळे वारीत धारकरी कशाला? त्याचे भगवे फ़ेटे कशाला? मनुशी कोणाची तुलना कशाला, असले सवाल अगत्याने पुढे आणले जात आहेत. त्यावर अखंड रण माजवले जात असते. पुर्वी अपप्रचारी जाहिरातींचे मॉडेल बाळासाहेब होते आणि आज अशा अपप्रचाराचे मॉडेल भिडेगुरूजी झालेले आहेत.

7 comments:

  1. वायर वर करन थापर नावाचा नेहरु वंशज सध्या नवनव्या मोदीत्रस्तांना घेउन मुलाखती करत असतो, तो प्रत्येकाकडुन वदवुन घेतो की मुस्लीमांचीवाइट अवस्था झालीय राहुल एक वर्षात सुधरलाय ते होकार भरतात पुढे एक शंका असते की मोदी खराब म्हनताय तर शाह का ५०% मते आणि जास्त जागा सांगतात पन पा पाहुन्याकडे काही उत्तर नसते ते म्हनतात की मोदी शहा एेन वेळी कोणते पत्ते काढतील माहीत नाही तरी करन परत विचारत राहतो कीते सत्तेत येतील?असत येउ शकतात मग करन निराश होतो पुढल्यावेळीनवा मोदीत्रस्त आणि मजा म्हनजे त्याचे मोदीविरोधी प्रेक्षक सांगत असतात काॅंमेट करुन का मत देनार नाही ते तरी करनला पटत नाही मोदी हरनार आणि का ते त्याला अभिजन लोकांकडुनच वदवायचय मतदारांकडुन नाही असे

    ReplyDelete
  2. भाउ भिडें च्या फेक न्युज छापन्यात लोकसत्ता आजही आघाडीवर आहे तरी वेबवर वाचक खप कमी झालेत म्हनुन पेजव्युह वाढविण्यासाठी काॅमेट न संपादन करनार अॅप आणलय पन त्यावर लोक इतक्या घान काॅंमेट टाकतात की वाचवत नाही किळस येते आणि ते नेटवरुन जगभर दिसत

    ReplyDelete
  3. तात्पर्य भीडे गुरूजींनी बाळासाहेबांची जागा घेतली. किंवा पूरोगामी लोकांनी भीडे गुरूजींना ती जागा बहाल केली. कोणीही का असेना. एक गोष्ट चांगली झाली. पुरोगामी लोकांची insecurity intact राहीली. त्या साठी गुरूजींना धन्यवाद.

    ReplyDelete
    Replies
    1. काही comparison नाहीच.दोघांचेही कार्य उत्तम व वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय आहे . सदसद्विवेकबुद्धी ठेवून न्युज बघाव्यात आणि वाचाव्या. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून काही विशिष्ट समाज जातीय तेढ पसरवतो आहे. बळी पडू नये

      Delete
  4. संजू चित्रपटात नेमक्या याच मुद्द्यावर भर दिला आहे, मीडिया एखाद्याची कशी वाट लावू शकतो ते यात दाखवले आहे ,विशेष म्हणजे ते बेधडकपणे सांगितले आहे

    ReplyDelete
  5. Bhau
    You are absolutely spot on. But slowly our people started realizing that media is not always true or correct rather hardly they are correct.
    Till then it will definitely do some damage but if some one is thinking that by using such tricks they can win this country by breaking it then its really laughable.
    All these powers using such tricks can never achieve their target of breaking this country in to pieces. They really need to re think their strategy.

    Again in the country of 130 crores, hardly 30 crores might be watching news channel on regular basis. again at least 10% of them must be elite & can make out intentions behind such acts.

    However people like you are doing great job of awakening & educating the public. and definitely it has an positive impact. We are circulating your articles & doing small role from our side.

    Jai Hind

    ReplyDelete
  6. वृत्तवाहिन्यानी भिडे गुरुजींच्या एकाच वाक्य वारंवार दाखवले "मनू एक पाऊल पुढे होता" ह्या वाक्यात कुठेच मनु श्रेष्ठ आहे असा अर्थ निघत नाही
    ह्या वरून राजकरण्याची बुद्धीमत्ता,विचार करण्याची क्षमता कळते

    ReplyDelete