Monday, August 19, 2013

मोदींचे ‘लक्ष्य २७२’

   शनिवार रविवारी भाजपाच्या देशभरच्या प्रवक्ते व प्रमुख पदाधिकार्‍यांचे एक बैठकवजा संमेलन दिल्लीत योजलेले होते. काही हिंदी वृत्तवाहिन्यांनी त्याची मोदींची पाठशाळा अशीही टवाळी केली. पत्रकार व माध्यमांसमोर पक्षाची भूमिका कशी मांडावी व कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे; याबद्दल त्यात नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले. अर्थात मोदी एकटेच मार्गदर्शक नव्हते. पक्षाच्या अन्य वरीष्ठ नेत्यांनीही तिथे हजेरी लावली होती. पण माध्यमांसाठी मोदी वगळता अन्य कोणी महत्वाचा नेताच देशात उरलेला नसल्याने मोदी करतील वा बोलतील त्याची बातमी होत असते. बाकीच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्यांची लायकी आता त्यावर प्रतिक्रिया देण्यापुरती राहिलेली आहे, अशीच बहुधा त्या नेत्यांची व माध्यमांची समजूत झालेली आहे. म्हणून की काय, अवघ्या राजकीय बातम्या व चर्चा मोदींच्या भोवतीच घोटाळत असतात. सहाजिकच त्या माध्यम संबंध संमेलनात मोदी काय बोलले व त्यांनी कोणती दिशा दिली, याचाच गाजावाजा सुरू झाला. खरे तर त्यात मोदी यांनी भाजपाने आगामी लोकसभेत २७२ जागा स्वबळावर मिळवण्याचे लक्ष्य ठेवण्याची मांडलेली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तमाम मतचाचण्या मोदी हाच देशातील सर्वाधिक लोकपिय नेता असल्याचे दाखवत असतानाच भाजपासह त्यांच्या एनडीए आघाडीला दोनशेही जागा मिळण्याशी शक्यता वर्तवत नाहीत. मग थेट स्वबळावर मोदी २७२ जागा जिंकण्याचे लक्ष्य मांडतात, तेव्हा त्यामागच्या भूमिकेचा उहापोह अधिक योग्य ठरला असता. पण चर्चेपेक्षा गोंगाटाच्याच दिशेने जाणार्‍या वाहिन्यांकडून तशी अपेक्षा बाळगणे आता चुकीचेच होऊन बसले आहे. त्यामुळे पाठशाळा असे हिणवून विषय बाजूला पडला.

   लोकसभेत ५४३ जागा आहेत त्यामुळे सत्तेचे बहूमत मिळवण्यासाठी २७२ जागा आवश्यक असतात. त्याच्या आसपास गेल्या सात सार्वत्रिक निवडणुकीत कुठलाच पक्ष पोहोचू शकलेला नाही. अगदी मागल्या चार निवडणूकीत दोन आघाड्यात राजकारण विभागले गेल्यापासूनही कुठली आघाडी तितकी मजल मारू शकलेली नाही. मग अजून पक्षाकडून उमेदवारीही न मिळालेल्या मोदींनी स्वबळावर २७२ जागांचे लक्ष्य कुठल्या बळावर गाठायचा मनसुबा बांधला आहे? माध्यमातून येणार्‍या चाचण्यांच्या आकड्यांकडे पाठ फ़िरवण्याइतका हा नेता मुर्ख नक्की नाही. पण मग त्याच चाचण्यात दिडशेचाही पल्ला गाठताना दमछाक होत असलेल्या पक्षाला मोदी कुठल्या आधारावर पावणे तीनशेचे लक्ष्य दाखवत आहेत? राजकीय अभ्यासक व विश्लेषकांनी त्याचे समिकरण मांडणे अगत्याचे ठरले असते, तसेच ते उदबोधक ठरले असते. त्याचे समिकरण विस्कळीत चाचण्यांमध्येच दडलेले आहे. गेल्याच आठवड्यात इंडिया टुडे समुहाने चाचण्या घेतल्या. त्यात पहिली चाचणी राज्यवार पक्षनिहाय मिळू शकणार्‍या जागांची होती आणि दुसरी मतचाचणी नेत्यांच्या लोकप्रियतेची होती. त्यामध्ये मोदी तमाम नेत्यांना खुप मागे टाकून पुढे पोहोचलेले आहेत. अजून लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले नाहीत आणि त्याची प्रचार मोहिमही सुरू झालेली नाही, तर मोदी यांची देशव्यापी इतकी लोकप्रियता असेल; तर मग त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपा, अशीच चाचणी व्हायला हवी. आणि तशी चाचणी झालीच तर खरे चित्र समोर येऊ शकते. पण नेत्याची व्यक्तीगत लोकप्रियता मतचाचण्यात प्रतिबिंबीत होत नाही, असे विश्लेषणाच्या चर्चेत बोलले गेले. हा विनोदच आहे. नेत्याच्या पक्षाला मते मिळणार नसतील, तर ती लोकप्रियता कशासाठी असू शकेल?

   इंदिरा गांधी यांही लोकप्रियता अशीच पक्षापेक्षा अधिक होती आणि जेव्हा तिची कसोटी लागायची पाळी आली; तेव्हा त्यांचाच पक्ष फ़ुटला तरी इंदिराजींच्या पाठीराख्यांना पक्षापेक्षा अधिक मते मिळाली होती आणि आपोआपच मग त्या पाठीराख्यांच्या जमावाला कॉग्रेस संबोधले जाऊ लागले. उरलेला संघटना मानला जाणारा नेत्यांचा पक्ष आज अस्तित्वातसुद्धा राहिलेला नाही. त्यामुळेच मोदींची लोकप्रियता ही आज भाजपाच्या भूमिका पुढे घेऊन जाणारा नेता अशीच आहे. त्यामुळेच भाजपाच्या मतांमध्ये मोदींची मते येऊ शकणार नसली, तरी मोदींच्या लोकप्रियतेमध्ये भाजपाच्या मतांचा आपोआप समावेश होतो. कारण भाजपा व कॉग्रेस विरोधाचे मोदी एक प्रभावी प्रतिक झालेले आहेत. एका बाजूला भाजपाचा पाठीराखा व दुसरीकडे कॉग्रेसला पराभूत करायला उतावळा झालेला वर्ग. मोदींकडे पर्यायी नेतृत्व म्हणून बघू लागला आहे. अशा मतांवर डोळा ठेवूनच मोदी आपली खेळी करीत आहेत आणि त्यासाठीच त्यांनी मोठ्या चतुराईने बहूमताचा आकडा हेच आपले लक्ष्य केलेले आहे. ज्यांना कॉग्रेसचा विट आलेला आहे आणि त्या अनागोंदीपासून मुक्त व्हायचे आहे, त्यांना पर्याय म्हणून आपण भाजपातर्फ़े पुढे येत आहोत, असा तो संकेत आहेत. अनागोंदी नको आणि अडवणूकीतून सरकार पांगळे नको असेल; तर पक्के स्थीर सरकार देण्यासाठी आपल्याला स्पष्ट बहूमत द्यावे, असेच मोदी त्यातून सांगत सुचवत आहेत. अगदी मित्रपक्ष सोबत असले तरी सरकार नुसत्या बहूमतावर खंबीर पावले उचलू शकत नाही. तेव्हा स्पष्ट बहूमत अधिक मित्र पक्षांचा पाठींबा आपल्याला हवा आहे आणि तरच आपण निर्णायक कारभार करू शकू; हे मोदी यांनी ‘लक्ष्य २७२’ मधून सुचवले आहे. त्यांचे समिकरण वाटते तितके चुकीचे नाही.

No comments:

Post a Comment