Wednesday, August 21, 2013

ईश्वरेच्छा बलियसी?



   मंगळवारी पुण्यात भल्या सकाळी हमरस्त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या चहात्यांपासून सहकारी, अनुयायांच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर त्याची एकच गोळाबेरीज होऊ शकते. दोनच शब्दात सांगायचे तर त्यांनी जुनी उक्तीच वेगळ्य़ा प्रकारे उच्चारली, ईश्वरेच्छा बलियसी. हल्ली कदाचित हे शब्द फ़ारसे वापरात नाहीत. पण जुनी माणसे आजही ते शब्द वापरतात. त्याचा अर्थ जे काही होत घडत असते ती देवाची इच्छा असते, त्यापुढे माणसाचे काही चालू शकत नाही. मग व्हायचे व झालेले चांगले असो किंवा वाईट असो, ती देवाची इच्छा मानायचे आणि आपल्या कामाला लागायचे. ही मानसिकता एका हतबल अवस्थेतून येत असते. तिथे विवेक वा चिकित्सेला स्थान नसते. मते श्रद्धेसारखी ठाम असतात. अमुक झाले म्हणजे तमूकच असणार. मग उत्तराखंडात ढगफ़ुटी होऊन हजारो संसार उध्वस्त व्हावे किंवा माणसे मृत्यूमुखी पडावीत. ती देवाचीच इच्छा असेल तर माणूस काय करू शकतो? केदारनाथ मंदिराच्या मागल्या बाजूला पुरातून एक अजस्र शीळा वाहून आली. त्यामुळे पाण्याचे प्रवाह विभागून गेले व मंदि्राची फ़ारशी हानी झाली नाही, तर त्याला देवाची करणी ठरवणारे रिपोर्ट काही वाहिन्या अगत्याने दाखवत होत्या. त्यामागेही नेमकी तीच मानसिकता आहे. जे निर्जीव दगडाचे मंदिर पुन्हा बांधणे शक्य आहे, ते वाचवताना आपल्याच भक्तांना मरू देणारा देव काय कामाचा? असा प्रश्न तशी निस्सीम भक्ती असणार्‍यांना पडत नसतो. त्यांच्यासाठी ईश्वरेच्छा बलियसी असते. भक्तांना वाचवायची देवाची इच्छा असती तर त्याने वाचवले असते. असे त्यांचे उत्तर असते. कारण अमूकाचा अर्थ अमूक ही त्यांची पक्की श्रद्धा असते.

   कुठल्याही भक्त श्रद्धाळूंचे अंदाज आडाखे व खुलासे जसे कायम सज्ज असतात, तशाच कालच्या हत्याकांडानंतरच्या प्रतिक्रिया नव्हत्या काय? पोलिसांनाही दहा तास उलटून गेल्यावर झालेल्या तपासात काहीही हाती लागलेले नसताना अनेकजण आपल्या पुरोगामीत्वाच्या बळावर खुनाचा तपास उरकून निकालही देऊन मोकळे झालेले होते. अगदी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या हत्येमागे कारस्थान असल्याचा निर्वाळा देऊन टाकला. तो मान्य करायचा तर मग त्यांनी पोलिसांचा वेळ तरी कशाला वाया घालवायचा? त्यांनी नेमके कारस्थान पोलिसांना सांगून संशयित वा खुन्यांना, त्यांच्या सुत्रधारांना बेड्या ठोकायला काय हरकत होती? आणखी कोणा पुरोगामी विचारवंतांनी हे फ़ॅसिस्ट प्रवृत्तीचे काम असल्याचा निकाल देऊन टाकला. जयंत पाटिल या मंत्री महोदयांनी धर्मांध शक्तीच हल्लेखोर असल्याचे ठामपणे सांगून टाकले. कोणी सनातन संस्थेकडे बोट दाखवून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. परंतू जी घटना घडली, तिचा तपास, धागेदोरे शोधण्याची कोणाला किंचितही गरज वाटलेली नाही. प्रत्येकाचे पुरोगामी ठोकताळे तयार आहेत. त्यामध्ये दाभोळकर पुरोगामी होते आणि म्हणूनच धर्मांधशक्तींनी त्यांचा बळी घेतलेला आहे. अर्थातच पुरोगामी अहिंसक असतात व धर्मांध हे आपोआपच हिंसाचारी असतात, हा प्रत्येकाचा निष्कर्ष आहे. यापैकी कोणाला तरी आपल्या चिकित्सक विवेकी बुद्धीचा वापर अशा प्रसंगी करावासा वाटला काय? इश्वरेच्छा बलियसी म्हणणारे जितके चिकित्सेपासून दूर असतात, तितकेच अशा प्रतिक्रिया देणारे वास्तवापासून भरकटलेले नव्हते काय? एकप्रकारे मंगळवारी पुरोगामी चकमक चालू नव्हती काय? पोलिस चकमक कशी होते?

   इशरत जहान प्रकरणात जी चिकित्सकवृत्ती व विवेकाचा आग्रह धरला जातो, तो मंगळवारी कुठे पळून गेला होता? ज्यांनी इशरतची चकमकीत हत्या केली, त्यांचे तर्कशास्त्र काय होते? दोन पाकिस्तानी घुसखोर संशयित त्यांच्या हाती लागले होते. त्यांना सहभागी असलेला जावेद शेख याचा सुगावा लागला होता. त्यांच्या सोबत इशरत होती. पाकिस्तानी संशयित म्हणजेच जिहादी आणि त्यांचा साथीदार म्हणून जावेद शेख दहशतवादी. अशा तिघांच्या सहवासात इशरत असेल तर ती निरपराध कशी? इशरतला जिहादी घातपाती ठरवण्य़ाचे जे तर्कशास्त्र आहे, त्यापेक्षा मंगळवारी हिंदूत्ववाद्यांवर झालेले आरोप वा घेतला गेलेला संशय तसूभर वेगळा आहे काय? दाभोळकर पुरोगामी होते म्हणूनच त्यांना मारणारा हा धर्मांधच असला पाहिजे आणि तो धर्मांध आपोआपच हिंदूत्ववादी असला पाहिजे, हेच इशरतची चकमक करणार्‍यांचेही तर्कशास्त्र आहे. याच तर्कशास्त्राला अंधश्रद्धा म्हणतात, जिथे पु्रावे किंवा कुठल्या विवेकबुद्धीची गरज नसते. जो माणुस आयुष्यभर विवेकबुद्धी व चिकित्सक वृत्तीचे समर्थन करीत राहिला, त्याच्याबद्दल सहानुभूती व आपुलकी दाखवताना कुठल्या पातळीवर आरोप चालले होते? विवेकबुद्धीला ते आरोप वा आक्षेप शोभादायक होते काय? जिथे विवेकबुद्धी गुंडाळून ठेवली जाते तिथेच अंधश्रद्धेचा उदभव होत असतो आणि दाभोळकरांनाच श्रद्धांजली देताना त्या विवेकबुद्धीचाही मुडदा त्यांच्याच चहात्यांनी पाडावा, यापेक्षा दुर्दैव कुठले असेल? हत्याकांड धर्मांधच करू शकतात आणि पुरोगामी करीत नाहीत; याचा कुठला वैज्ञानिक पुरावा निकष यापैकी एकाकडे तरी आहे काय? ज्यांच्या मांडीला मांडी लावून हल्लेखोर व खुनाच्या खटल्यातले आरोपी प्रतिष्ठेने बसतात, ‘त्यांनी पुरोगामीत्वावर हल्ला म्हणावे’; यापेक्षा दाभोळकरांच्या हौतात्म्याची दुसरी कुठली टवाळी असू शकेल? हे खुन्याच्या मांडीला मांडी लावून बसणारे पुरोगामी कोण? कोणाला आठवते का?

1 comment:

  1. खुन/हल्ला, त्याचे नियोजन हे गुन्हेच आहेत. हात धुवून घेणे, पोळी भाजून घेणे, टोपी बदलणे, (व.पू.भाषेत) 'आय इज....सांगण्याचा प्रयत्न.' अजून गुन्हा ठरत नाही, भाऊ हे असेच चालणार!!!!!!!

    ReplyDelete