Wednesday, August 21, 2013

हिंसा: पुरोगामी की प्रतिगामी?



   मंगळवारी डॉ. दाभोळकर यांची हत्या झाल्यावर त्या संबंधात कुठल्या वाहिनीवर प्रतिक्रिया देताना ग्रामिण विकासमंत्री जयंतराव पाटिल यांनी हे धर्मांधांचेच काम आह असे छातीठोकपणे सांगितले. अर्थात आधीच्या सरकारमध्ये जयंतराव स्वत:च गृहमंत्री होते, त्यामुळे त्यांना अशा हत्याकांडात कोण कसे गुंतलेले असतात त्याचे खास आकलन असणार. अन्यथा त्यांनी इतके ठामपणे निष्कर्ष काढलेच नसते. कारण असे सुपारी देऊन गाफ़ीलपण कुणाला कोण जीवानिशी मारू शकतो, त्यामागची मानसिकता काय असते, त्याचा अनुभव त्यांनी एका भीषण खुन प्रकरणात गृहमंत्री म्हणून घेतला होता. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर सात वर्षापुर्वी पवनराजे निंबाळकर नावाच्या एका व्यक्तीची हत्या झाली होती. धावत्या गाडीने पाठलाग करून ही हत्या करण्यात आलेली होती. त्याचा तपास अखेर सीबीआयकडे द्यावा लागला होता आणि तेव्हा गृहमंत्री जयंतरावच होते. त्यासंबंधी विधान परिषेदेत प्रश्नोत्तरे झाली तेव्हा जयंतरावांनीच उत्तर दिले होते. हे पवनराजे निंबाळकर उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणात विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटिल यांचे विरोधक मानले जायचे. त्यांच्याशी मतभेद असल्याने त्यांचा मुकाबला पद्मसिंहांनी कसा केला? त्यांच्याच आज्ञेवरून दोघा इसमांनी पवनराजे यांना यमसदनी पाठवल्याचा शोध सीबीआयने लावला. पुढे तपास अधिक विस्तारत गेला आणि त्यात सीबीआयने पद्मसिंहांना आरोपी म्हणून अटक केली आणि राष्ट्रवादी कॉग्रेसने त्यांना पक्षातून काढून टाकले होते. २००९ सालात त्याविषयी आमदाराने पश्न विचारला त्याला जयंतरावांनी उत्तर दिलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला मतभिन्नता मान्य आहे वा विचारांचा मुकाबला विचारांनी करावा असे वाटते मानायचे काय?

जयंतरावांनी याचे उत्तर देणे अगत्याचे आहे. कारण मते व विचार न पटतील त्याचा हिंसात्मक मार्गाने काटा काढावा असा पाठ त्यांच्याच पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने घालून दिलेला आहे. हेच पद्मसिंह अनुभवी नेते व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांचे दिर्घकालीन निकटवर्तिय मानले जातात. योगायोगाने मंगळवारी डॉ. दाभोळकरांच्या हत्येवर प्रतिक्रिया देताना पवारांनीही हा पुरोगामीत्वावरचा हल्ला असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. मग पद्मसिंह पाटलांविषयी त्यांचे मत काय आहे? कारण पवनराजे निंबाळकर हत्याकांडाची सुनावण चालू असेपर्यंत पाटलांना पक्षातून काढून टाकलेले असतांनाही पवार कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसत असतात. मग त्याचा अर्थ कसा लावायचा? पवनराजेंच्या हत्येची सुपारी दिल्याने पद्मसिंहांना धर्मांध प्रतिगामी आणि म्हणूनच त्यांच्यासहीत त्यांच्या तमाम सहकारी व पक्षालाही धर्मांध म्हणायचे की पुरोगामी समजायचे? सनातनच्या वेबसाईटवर दाभोळकर यांच्याविषयी काही मजकूर असल्याने त्या सम्पुर्ण संघटनेला खुनी व हिंसाचारी ठरवायला उतावळे झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष जीतेंद्र आव्हाडांना काय म्हणायचे आहे? त्यांच्या पक्षाचे एक खासदार खुनाची सुपारी देतात असा सीबीआयचाच दावा आहे. मग सनातनवर बंदी घालण्याला उतावळे झालेले आव्हाड राष्ट्रवादीवरच्या बंदीची कधी मागणी करणार आहेत? की पुरोगामी सेक्युलर असतील त्यांनी खुन पाडावेत, खुनाच्या सुपार्‍या द्याव्यात तरीही त्यांना गांधीवादी अहिंसावादी म्हणावे अशी राज्यघटनेत वा कुठल्या कायद्यात तरतूद आहे काय? हिंसा वा अहिंसा यांचा पुरोगामी प्रतिगामी असण्याशी काही संबंध असतो काय? नसेल तर सरसकट आरोपबाजी कशासाठी?

दाभोळकर संयमी होते वा अहिंसावादी होते म्हणून त्यांच्या प्रत्येक चहाता व पाठीराख्यांनी गांधीवादाचा अहिंसेचा मुखवटा लावण्याचे कारण नाही. सगळिच माणसे कमी अस्धिक सोशिक वा हिंसक असतात. सोय व शक्यतांवर त्यांच्या कृती अवलंबून असतात. कुठल्या विचारांनी प्रभावित होणे वा अनुकरणामुळे कोणी हिंसाचारी वा अहिंसक होत नसतो. कायम हिंसाचारी वा कुठल्याही प्रसंगी संयमी रहाणार्‍या व्यक्ती अपवादात्मक असतात. त्यामुळेच त्यांचा आडोसा घेऊन कोणी स्वत:ला गांधींचा आवतार मानायचे वा दुसर्‍याला हिंसाचारी गोडसे ठरवण्याचे कारण नाही. तसे नसते तर शरद पवारांनी पद्मसिंहांना अगत्याने शेजारी व्यासपीठावर बसवून पुन्हा संयमाची प्रवचने कशाला दिली असती? त्याच पद्मसिंहांच्या पक्षाचा कार्याध्यक्ष असताना आव्हाडांनी सनातन संघटनेवर गोडसेवादी वा हिंसाचारी असले आर्प कशाला केले असते? मोजके सन्मान्य अपवाद सोडले तर आपण सर्वच माणसे कमी अधिक अशा विकारांचे बळीच असतो. कधी त्याची प्रचिती शब्दातून तर कधी कृतीतून येत असते. या पवनराजे निंबाळकरांच्या हल्लेखोराने तपासात त्याला त्याच लोकांकडून अण्णा हजारे यांनाही ठार मारायची सुपारी मिळाल्याचे कबूल केलेले होते. पण त्यावर कुठली कारवाई झाली नाही. मंगळवारी शांतता, संयम, विवेक वा सहिष्णूतेची प्रवचने देणार्‍या कुणाला हजारेंच सुपारी, पद्मसिंहांचे प्रताप किंवा पवनराजे निंबाळकर कसा आठवला नाही? ही तमाम नावे पुरोगामी हिंसाचाराशी संबंधित आहेत म्हणून असे झाले का? की पुरोगामी हिंसा पवित्र आणि प्रतिगाम्यांची हिंसा म्हणजे घोर पापकर्म असते असे कुठल्या सेक्युलर पुराणात कथन करून थेवलेले आहे? की पुरोगाम्यांची हिंसा वैचारिक असते आणि प्रतिगाम्यांची वैचारिक दुष्मनी हिंसा असते?

   मंगळवारी कायबीइन लोकमत वाहिनीवर बर्‍याच दिवसांनी कायबी बडबडत असताना निखीलला सनातनच्या वेबसाईट वा अन्य गोष्टी अगत्याने आठवत होत्या. पण आपल्याच वाहिनीच्या वेबसाईट्वर १ जुन २००९ रोजी प्रसिद्ध केलेली व त्याच दिवशी प्रक्षेपित केलेली अण्णा हजारे यांच्या हत्येच्या सुपारीची बातमी कशाला आठवू नये? की पुरोगामी हिंसा म्हणजे वैचारिक संघर्ष आणि प्रतिगामी विरोध म्हणजेच हिंसा असा दावा आहे? कारण सनातन विरोधात पोलिसांकडून कुठलाही पुरावा अजून समोर आणला गेलेला नाही. पण राष्ट्रवादी कॉग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटिल यांच्यावर आरोप खटला चालू आहे आणि त्यातील सहआरोपीने अण्णा हजारे यांच्याही हत्येची सुपारी मिळाल्याची कबुली दिलेली आहे. मग आपल्या अचुक बातम्यांवर तरी हे अर्धवटराव ठाम आहेत की नुसतेच ठाम मत सांगतात?


No comments:

Post a Comment