दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर कॉग्रेस पक्षात हळुहळू वादविवाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. माजी अर्थमंत्री व गृहमंत्री चिदंबरम यांनी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या अपुर्व विजयावर आनंद व्यक्त केल्याने दुसर्या एक कॉग्रेस नेत्या खवळल्या आहेत. त्यांचे नाव शर्मिष्ठा मुखर्जी असे असून त्या माजी राष्ट्रपती प्रणबदा मुख्रर्जींच्या कन्या आहेत, दिर्घकाळ दिल्लीतले वास्तव्य असल्याने त्यांनीही पित्याच्या पावलावर पाऊल टाकून कॉग्रेस पक्षात राजकारण सुरू केले. सध्या त्या दिल्ली प्रदेश कॉग्रेस महिला संघटनेच्या अध्यक्षा आहेत आणि चिदंबरम यांचा ओसंडून जाणारा आनंद बघून त्यांना संताप आवरलेला नाही. म्हणूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जाहिरपणे स्वपक्षाच्या त्या ज्येष्ठ नेत्याची खरडपट्टी काढलेली आहे. आम आदमी पक्ष जिंकताना भाजपाला सत्ता मिळाली नाही म्हणून आनंदित व्हायचे असेल, तर कॉग्रेसने विविध राज्यातील पक्षाच्या संघटना गुंडाळाव्यात काय, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. अशा रितीने अस्वस्थता वा संताप व्यक्त करणार्या शर्मिष्ठाजी एकट्याच नाहीत. अनेक कॉग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रश्न पडलेला आहे, की आपण पक्ष म्हणून काय करायचे? आपल्या पक्षाची लोकप्रियता वाढवणे किंवा संघटना विस्तारणे हे आपले काम आहे, की भाजपाच्या अपयशाचा आनंदोत्सव साजरा करणे, हा पक्षाचा कार्यक्रम आहे. त्यांचा संताप रास्त आहे. कारण भाजपाची सत्ता हुकलेली असली तरी कॉग्रेसचा दिल्लीत पुरता सफ़ाया झालेला आहे. सलग पंधरा वर्षे शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत बहूमतासह सत्ता मिळवणारा कॉग्रेस पक्ष, गेल्या दोन विधानसभा निवडणूकीत जवळपास नामशेष झाला आहे. त्याची किंचीत वेदनाही श्रेष्ठींच्या वागण्यात नसावी याची खंत अशा नेत्यांना कार्यकर्त्यांना सतावते आहे. अर्थात ती वेदना कितीही खरी असली, तरी तोच तर कॉग्रेस पक्षाचा मागल्या सहासात वर्षात कार्यक्रम होऊन बसला आहे आणि त्यामागे मणिशंकर अय्यर या बुद्धीमान नेत्याची प्रेरणा आहे.
२०१६ साली अनेक राज्यात विधानसभा निवडणूका झालेल्या होत्या आणि त्यात बंगालमध्ये ममता बानर्जी आणि तामिळनाडूत जयललिता विजयी झालेल्या होत्या. त्या दोन्ही राज्यात भाजपा कधीच शक्तीमान पक्ष नव्हता. दोनतीन टक्केही मते मिळवू शकणारा पक्ष अशी त्याची ओळख नव्हती. तरीही त्या दोन राज्यात भाजपाला यश मिळाले नाही म्हणून अय्यर कमालीचे खुश होते. उलट त्या दोन्ही राज्यात पहिल्या चार सार्वत्रिक निवडणुकात सत्ता संपादन करणार्या कॉग्रेसचा सफ़ाया झाला होता. मागल्या सहासात विधानसभा लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसला आपली गमावलेली ताकद परत संपादन करता आलेली नाही. तरीही अय्यर खुश होते आणि त्यावरून एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला होता, की कॉग्रेसच्या पराभवातही ते खुश कशाला आहेत? त्याचे उत्तर देताना अय्यर म्हणाले होते, कॉग्रेस जिंकण्याचा मुद्दाच नाही. भाजपा हरण्याला महत्व आहे. चिदंबरम त्यांच्याच तत्वाला धरून खुश झालेले आहेत. त्यात चुक तरी काय आहे? २०१३ सालात आम आदमी पक्ष हा नवखा स्पर्धक मैदानात उतरला होता. त्याने दुसर्या क्रमांकाची मते मिळवताना दिल्लीत तिनदा मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षितांचा आपल्या मतदारसंघातच पराभव केला होता. पण कोणालाच बहूमत मिळाले नाही आणि बहूमत हुकलेल्या भाजपा पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कॉग्रेसने नवख्या आम आदमी पक्षाला पाठींबा देऊन केजरीवालांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. त्यानंतर क्रमाक्रमाने कॉग्रेस पक्ष दिल्लीतून आटोपत गेला. तेव्हा तरी कॉग्रेसला २० टक्क्याहून जास्त मते मिळालेली होती. पण नंतरच्या विधानसभा निवडणूकीत ती नऊ टक्केपर्यंत झाली आली आणि यावेळी केवळ चार टक्के मतांपर्यंत कॉग्रेसची घसरण झाली आहे. त्याचे दु:ख कशाला? भाजपाला सत्ता मिळालेली नाही ना? बस्स, हे आता कॉग्रेसचे उद्दीष्ट झाले आहे. त्यामुळे शर्मिष्ठा मॅडमनी नवी भूमिका समजून घेतली पाहिजे.
भाजपाचा पराभव हा कॉग्रेसने आपला विजय मानण्याचे अनेक राजकीय फ़ायदेही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तो पराभव आपण करण्याची गरज उरत नाही, की त्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही. संघटना उभारा वा निवडणूक जिंकण्यासाठी कष्ट घ्या, असल्या कटकटी संपून जातात. कोणी का भाजपाला पराभूत करीना, सत्ता कुठल्याही पक्षाला का मिळेना, भाजपा वंचित राहिला म्हणजे झाले. ही राहुल गांधींची रणनिती आहे. त्यात पक्षाला, नेत्यांना वा कार्यकर्त्यांना काहीही काम उरत नाही. दिवसभर माध्यमांच्या कॅमेरासमोर टिवल्याबावल्या करणे, बाष्कळ बडबड करून भाजपाला टोमणे मारले; तरी ज्येष्ठ नेतेपद कायम राखता येते. मते मिळवून पक्षाला निवडणूकीत यशस्वी करण्याचा भार उरत नाही. मात्र जुन्या पुण्याईमुळे ठराविक जागा जिंकून आल्या, मग आघाडीत समाविष्ट होऊनही काही मंत्रीपदे मिळवता येत असतात. तेवढाच बोनस समजून बसायचे. सबसिडी म्हणून अशी मंत्रीपदे व सत्तापदे पुरेशी असतात. कष्टाविना झालेली कमाई कोणाला नको असते? ही नवी कॉग्रेस आहे. अर्णब गोस्वामी तिला वाड्रा कॉग्रेस म्हणतो. ते समर्पक नाव आहे. वाड्रा या इसमाने इतकी अफ़ाट संपत्ती कुठून जमा केली? त्याने त्यासाठी कुठले कष्ट उपसले? सासूबाई कॉग्रेस व युपीएच्या अध्यक्षा म्हणून त्यांना कुठलेही भूखंड सहज खरेदी करता आले आणि अधिक किंमतीने विकून आयती कमाई झालीच होती ना? आता तर अवघ्या कॉग्रेसने तोच तसा कार्यक्रम स्विकारला आहे. महाराष्ट्र विधानसभेत आशा सोडून दिलेल्या कॉग्रेसलाही बारा मंत्रीपदे अशीच मिळाली नाही का? मग अपयशाला रडायचे कशाला? भाजपा सत्तेला वंचित राहिल्याचा आनंदोत्सव करावा आणि कालचक्र फ़िरले तर सत्तापदे बोनस म्हणून उपभोगायची ना? महाराष्ट्रातल्या कॉग्रेस नेत्यांना त्याचे आकलन झालेले असेल, तर शर्मिष्ठा मुखर्जी वा दिल्लीच्या कॉग्रेसजनांची नाराजी अनावश्यकच नाही का?
यातला उपहास सोडला तरी कॉग्रेसची दुर्दशा वेगळी सांगण्याची गरज नाही. शर्मिष्ठा यांच्याप्रमाणेच जयराम रमेश या अभ्यासू नेत्यानेही श्रेष्ठींना सवाल केलेला आहे. भाजपाच्या अपयशात आनंद साजरा केल्याने आपल्या पक्षाला उभारी येऊ शकत नाही. आपली मते घटत आहेत. सेक्युलर शब्दाचा अतिरेक करून आपण देशातील बहुसंख्य हिंदूंना दुखावत चाललो आहोत, असेही त्यांनी उघडपणे म्हटलेले आहे. जितक्या आवेशात हिंदू धर्मांधतेवर कॉग्रेस बोलते तितक्या कठोरपणे अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या धर्मांधतेवर बोलत नाही, हे आता रमेश यांनाच सांगण्याची वेळ आलेली आहे. त्याचे परिणामही त्यांनी दाखवले आहेत. कितीही लांगुलचालन करून मुस्लिमांची एक गठ्ठा मते कॉग्रेसला मिळत नाहीत आणि हिंदूंची मिळू शकणारी मतेही कॉग्रेस क्रमाक्रमाने गमावते आहे, असाही इशारा रमेश यांनी दिला आहे. अर्थात रमेश हे सतत पक्षाला सावध करीत राहिले आहेत. पण तोंडपुज्या नेत्यांनी त्यांना सतत नामोहरम करून पक्षावर अशी नामुष्कीची वेळ आणली आहे. २०१३ सालात लोकसभा निवडणूकीचे वेध लागलेले असताना कॉग्रेसची सुत्रे पुर्णपणे राहुल गांधी यांच्या हाती होती आणि तेव्हा पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये उतरलेल्या नरेंद्र मोदींनी झंजावात निर्माण केलेला होता. त्याचे नेमके वर्णन रमेश यांनीच केलेले होते. स्वातंत्र्योत्तर काळात नरेंद्र मोदींच्या इतके अपुर्व आव्हान कॉग्रेस पक्षासमोर कोणी उभे केलेले नव्हते, असे आकलन रमेश यांनी जगासमोर मांडलेले होते. आठदहा महिन्यांनी होऊ शकणार्या दारूण पराभवाची चाहुल त्यांना लागलेली होती. पण त्यांचा इशारा समजून घेण्यापेक्षा राहुल गांधींच्या चमच्यांनी व भाटांनी रमेश यांनाच वाळीत टाकायचे काम केले. रमेश यांना इतकेच मोदींनी प्रभावीत केले असेल तर त्यांनी भाजपात जाऊन मोदीभक्त व्हावे, असला जाहिर सल्ला पक्षाच्या प्रवक्त्यानेच दिलेला होता. त्याचे परिणाम समोर आले तरी श्रेष्ठी शुद्धीवर यायला अजिबात राजी दिसत नाहीत.
त्याच दरम्यान म्हणजे २०१३ च्या उत्तरार्धात राहुल गांधी ही कॉग्रेससाठी शापवाणी असल्याचेच आकलन रमेशनी केलेले होते. एका मुलाखतीत ते म्हणाले होते, कॉग्रेसजनांना २०१४ च्या लोकसभा निवडणूकीची विवंचना लागली आहे आणि राहुल गांधी २०१९ च्या निवडणुकीची तयारी करीत आहेत. ह्याचा अर्थ सोपा सरळ होता. राहुलना आपण कुठली लढाई करतोय याचीही जाणिव नाही, असेच रमेश यांना सांगायचे होते. पण तोंडपुज्यांच्या जमावात त्यांचे कोण ऐकून घेणार वा सुधारणा करणार ना? परिणाम काय झाला? तेव्हा कॉग्रेसची धुळधाण उडालीच. पण पुढे पाच वर्षांनीही कॉग्रेस स्वत:ला सावरू शकलेली नाही. याचे कारण अन्य कुणाच्या हानीमध्ये आपण आनंदाचे क्षण बघू लागलो, मग आपले नुकसान बघायला सवड मिळत नसते. मग त्याचेच परिणाम उत्तरप्रदेशात दिसले. आधी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यासारख्या आधुनिक चाणक्याला करोडो रुपयांचा मलिदा देऊन आणले गेले आणि त्याने एकहाती सत्ता कॉग्रेसला मिळवून देण्याऐवजी आणखीनच अधोगती घडवून आणली. राहुल वा सोनियांचा करिष्मा नसतानाही कॉग्रेस उत्तरप्रदेशात जितके यश मिळवू शकत होती, त्यापेक्षा अधोगती झाली. चारशे आमदारांच्या विधानसभेत कॉग्रेस चार आमदारांपर्यंत खाली घसरली. पण पर्वा कोणाला होती? बिचारे जयराम रमेश सावधानतेचे इशारे देत राहिले व चमच्यांकडून जोडेही खात राहिले. म्हणून परिस्थिती बदलली नाही. २०१९ च्या निवडणूकी दरम्यान पुन्हा रमेश यांनी कॉग्रेसच्या खर्या आजाराकडे इशारा केला होता. कॉग्रेस पक्षासाठी अस्तित्वाची लढाई आहे, असे त्यांनी बजावले होते. त्याकडे दुर्लक्ष करण्याची किंमत राहुलनाच अमेठी या पिढीजात मतदारसंघात मोजावी लागली. सर्ववेळ तिथे प्रियंका गांधी ठाण मांडून बसल्या असतानाही राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाले. यापेक्षा कॉग्रेसच्या दुखण्याचे आणखी काय निदान होऊ शकत होते?
आताही महाराष्ट्रात वा हरयाणात कॉग्रेस काहीअंशी सुधारली आहे. त्यातील राहुल वा सोनियांचे योगदान बहूमोलाचे आहे. त्या दोघांनी त्या निवडणूकीत अजिबात प्रचार केला नाही वा तितके लक्ष घातले नाही आणि संपत आलेली कॉग्रेस धडपडत का होईना सावरली आहे. निवडून येऊ शकणार्या उमेदवारांसाठी आपल्या बकवास भाषणातून राहुलनी घातपात केला नाही, त्याचा लाभ पक्षाला मिळून गेला आहे. पण मुद्दा शतायुषी पक्षाच्या अशा सावरण्याचा नसून पुन्हा उठून उभे रहाण्याचा आहे. त्यासाठी खंबीर नेतृत्व आणि संघटनात्मक विस्तृत पाया हवा आहे. आज कॉग्रेस पक्षात नेतृत्व देऊ शकणारा कोणी नेता उरलेला नसून बांडगुळे म्हणावे तसे नेते पक्षश्रेष्ठी होऊन बोकांडी बसले आहेत. त्यांना मतदारात जाऊन स्वबळावर निवडून येण्याची हिंमत नाही व राज्यसभेत बसून डावपेच खेळण्याच्या पलिकडे त्यांना काही जमत नाही. त्यांच्या हाती सत्तासुत्रे गेलेली आहेत. भाजपाला व मोदींना शिव्याशाप देण्यापलिकडे त्यांना काहीही साध्य होत नाही. म्हणून मग भाजपाच्या अपयशात आनंद शोधणे हा पक्षाचा कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे काही करून पक्षाला नव्याने उभारण्याची इर्षा व इच्छा असलेल्या शर्मिष्ठा वा रमेश यासारख्या लोकांची कोंडी झालेली आहे. ते सत्य बोलण्याची हिंमत करीत असले तरी त्यांचे कोणी ऐकूनही घ्यायला राजी नाही. ज्योतिरादित्य शिंदे, विरप्पा मोईली असेही अनेकजण आहेत. त्यांना उध्वस्त पक्षाला नव्याने उभा करण्याच्या उर्मी आहेत. पण अधिकार त्यांच्या हाती नाहीत. आणि ज्यांनी श्रेष्ठी म्हणून पक्ष बळकावला आहे, त्यांना पक्षाच्या भवितव्याची पर्वा नाही. म्हणून ते आम आदमी पक्षाच्या विजयात आपला आनंद शोधत असतात आणि आपल्याच पक्षाच्या वाताहतीवर पांघरूण घालण्यात धन्यता मानतात. पण त्याच्या पलिकडे एक आशेचा किरणही दिसू लागला आहे. नवे नेतृत्व नवा विचार अशीही मागणी हळुहळू मूळ धरू लागली आहे. त्यातून गांधी घराणे मुक्त कॉग्रेस असाही सूर क्षीण वाटला तरी उमटू लागला आहे. तोच आशेचा किरण आहे.
लोकसभा निवडणूकीचे निकाल लागल्यावर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारून अध्यक्ष पदाचा राजिनामा दिला आणि महिनाभर पक्षाला कोणी अध्यक्षही नव्हता. राहुलच्या जागी अध्यक्ष होण्यासाठी कोणी नेता पुढे येऊ शकला नाही, हा गांधी कुटुंबासाठी अभिमानाचा विषय असला तरी शतायुषी पक्षासाठी अत्यंत शरमेची बाब होती. कारण राजकीय पक्ष म्हणजे घराण्याची मालमत्ता वा कंपनी नाही. तिथे विचार व त्यानुसार चालणारे नेतृत्व हेच भांडवल असते. त्यातून पाठीराखे व कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याची कुवत म्हणजे पक्ष असतो. त्याचा कुठे मागमुस आज कॉग्रेस पक्षात उरलेला नाही. पक्षाचा सत्यानाश राहुलनी केला असला तरी त्याविषयी चकार शब्द बोलायची कोणाची हिंमत नाही आणि कोणी हिंमत केली तर त्याच्यावरच तुटून पडणारी निष्ठावंतांची लाचार फ़ौज हा कॉग्रेसला जडलेला असाध्य रोग आहे. त्यापासून त्याला मुक्ती देण्याची हिंमत करू शकणार्या कुणा कॉग्रेस नेत्याची गरज आहे. तोच या पक्षाला गाळातून बाहेर काढू शकतो. तसा कोणी नेता सध्या तरी दिसत नाही. ममता बानर्जी यांनी अशाच अडचणीची कोंडी फ़ोडून बंगालच्या कॉग्रेसजनांना दोन दशकात एकत्र केले आणि त्यांनीच डाव्यांचा बालेकिल्ला झालेल्या बंगालला कॉग्रेसी विजयाचे ठाणे बनवून दाखवले. ममतांसारखा कोणी भारतीय पातळीवरचा नेता पुढे येऊन कॉग्रेसचा उद्धार करू शकेल. अन्यथा गांधी घराण्याच्या गुलामीत बुद्धीने व मनाने खितपत पडलेल्या कॉग्रेसचा जिर्णोद्धार अशक्य आहे. बंगालचा तृणमूल वा आंध्रातील जगन रेड्डीचा पक्ष मुळचे कॉग्रेसचेच अवशेष आहेत. ते स्थानिक नेतृत्वाच्या आधाराने उभे राहू शकत असतील, तर देशाच्या कानाकोपर्यात रुजलेल्या कॉग्रेसचा पुनरूद्धार अशक्य कशाला असेल? पण त्यासाठी आजाराला आजार मान्य करूनच उपाय योजवे लागतील. राहुल वा त्यांचे घराणे ही समस्या असताना त्यालाच उपाय समजून पुढे जाण्यात कॉग्रेसला काही भवितव्य नाही.
शेवटचं वाक्य अति सत्य. काँग्रेस गांधीमुक्त झाली तर मोदींचा देशाला काँग्रेसमुक्त करण्याचा अजेंडा हरेल.
ReplyDeleteTyanna ka educate karta aahat, jaau dya Na. BJP Changle kaam kartey deshasathi. Karu dyaa.
ReplyDeleteतुमचा प्रत्येक लेख हा पूर्वी पेक्षा जास्त जळजळीत वाटतो... कसं काय शक्य होतं तुम्हाला हे?
ReplyDeleteभाऊ, नुसते काँग्रेसच नाही, तर दिल्लीतल्या भाजपच्या पराभवामुळे शरद पवारसुद्धा खूप आनंदी झाले आहेत. त्यांनी हि भाजपच्या शेवटची सुरुवात असल्याचे सांगितले, तर रोहित पवारांनी "काँग्रेसला" निवडणुका कश्या जिंकाव्यात ह्याचा "सल्ला" दिला आहे. सकाळने नेहेमीप्रमाणे त्यावर ३-४ वेगवेगळ्या मथळ्याखाली त्याच त्या बातम्या छापल्या आहेत. कोण जाणे, कदाचित रोहित आणि पार्थ पवार हे महाराष्ट्रातले होऊ घातलेले "राहुल" असतील....आणि "साहेबाना" खुश ठेवण्यासाठी तमाम राष्ट्रवादीकर ह्या दोघांचा उदो उदो करत राहतील....
ReplyDeleteकॉंग्रेसचे योग्य विश्लेषण. असे विश्लेषण शरदचंद्र कॉंग्रेसचे कृपया करावे ही विनंती. शेअरिंग
ReplyDeleteकॉंग्रेसच्या तिजोरीची किल्ली गांधी घराण्याबाहेर जाऊं शकत नाही. त्यामुळे कॉंग्रेसचा अंत अटळ आहे. फक्त सोपस्कार बाकी आहेत.
ReplyDeleteकुठल्याही कॉंग्रेसी नेत्यास कॉंग्रेसमधून बाहेर पडल्याशिवाय काहीही कर्तुत्व दाखविता येऊ शकत नाही
एकंदर पाहता काँग्रेस ही संघटना म्हणून फारशी अस्तित्वात दिसत नाही . दुसरीकडे जी काही नेते मंडळी वरती ठाण मांडून वर्षा नू वर्ष बसलेली आहेत त्यांना देखील असे वाटत नाही की पक्षाचे चांगले व्हावे .त्या मुळे हे असेच चालणार
ReplyDeleteलाचार काँग्रेसजन फक्त पक्ष्यातच नव्हे तर बाहेरही आहेत. माझाच एक मामा यापैकी आहे तो सत्त माझ्या मामीला हिणऊन मोदींची नक्कल करण्यात धन्यता मानणारा आहे.वय वर्ष पासष्ठ... आता बोला
ReplyDeleteBhau suttivar Gele ki Kay
ReplyDeleteVachaka na kahi vichar karayala khadya nahi dile
Congress cha punarudhharachi ATA garaj naiye. To kadhich sampayala havi hoti. ATA sample. Der aye durust aye.
ReplyDeleteफार छान विश्लेषण भाऊ ! रमेश तळगांवकर
ReplyDelete